सोमवार, ३० सप्टेंबर, २०१३

वामन देणार बामसेफला वारस... वाममार्गाने!वामन मेश्राम नावाचा गृहस्थ जो बामसेफचा(वामन गट) सर्वेसर्वा  म्हणून प्रसिद्ध आहे ह्यानी नुकतच लग्न करुन मोठ्या थाटामाटात गृहस्थाश्रमात प्रवेश केला. या वामन मेश्रामनी लग्न जरी आत्ता केलं तरी ब-याच वर्षापासून लग्नाचे फायदे मात्र उपभोगत होता. वाम मार्गाने लग्न उपभोगणा-या(की स्त्री उपभोगणा-या?) वामनाचे नाव वामन असणे ख-या अर्थाने सार्थ ठरले असे आज मोठ्या लज्जेने(?) म्हणताना मला प्रचंड लाजल्यासारखे वाटत आहे. मी आजन्म अविवाहीत राहून आंबेडकरी चळवळ चालविन म्हणून शेंड्या लावणारा वामन शेवटी नावावर गेला हेच खरे. कोणत्याही शेंडीवाल्यांला लाजवेल एवढी लबाडी व कसलेला दांभिक वामन, लग्न करुन स्वत:च स्वत:चे बुरखे टराटरा फाडून घेतले व आव काय आणला तर तब्बेत बरी नसते... अरे वामन भाऊ तुझी तब्बेत बरी नसते तर उपचार करायचा की, बायको काऊन केलास? केलास त केलास पण वयानी २५-३० वर्ष लहान केलास. या एकुण प्रकरामुळे किती किती धोके उत्पन्न झाले याचा तुला अंदाज आहे का? अशानी एक दिवस तुझा जीवही जाईल की. म्हाता-या माणसाची तरुण बायको... आईग... केवढे धोखे! सावध रे बाबा! वामना!  
तर वामन हे नाव प्राचिन काळापासून बहुजन समाजाला शाप ठरलं असून आजच्या युगातही त्या नावाचं शाप ठरण्याचं गुण तसूभरही कमी झालं नाही हे परत एकदा प्रत्ययास आलं. काहिही म्हणा... बहुजनांचा घात करण्यात हे नाव अनेक शतकापासून आपलं ब्रॅंड टिकवून आहे हे मात्र खरं.

खरं तर वामन मेश्रामानी लग्न केलं यावर आक्षेप यायला नको होतं किंवा वामनरावाला तसा अधिकार आहे व तो त्यानी बजावला. लग्न ही माणसाची वयक्तीक बाब असून इतरानी त्यावर शेरा मारण्याचे काहीच कारण नाही. पण होतं काय की या वामनानी मी आजन्म अविवाहीत राहून आंबेडकरी चळवळ चालवतो आहे अस सांगत अनेक उपद्रव केले. अविवाहीत प्रकाराचं पद्धतशीरपणे ब्रॅंडीग करत ते बामसेफच्या कार्यकर्त्यांचं एक प्रकारे क्वालिफिकेशनच बनवुन टाकलं. अविवाहीत सेवा लोकाना भुरळ घालण्यासाठी प्रचंड प्रभावी ठरली. मी स्वत: आजन्म अविवाहीत राहीन असा प्रचार करत नव्या दमाच्या कार्यकर्त्यानासुद्धा तो आदर्श घालून दिला. हा हा म्हणता अविवाहीत हे वामनचं  बामसेफमधील क्वालिफिकेशन ठरलं. मग इतरानिही ते क्वालिफिकेशन मिळविण्याची सुरुवात केली. ही चांगली गोष्ट होती. पण आता वामनानी आजाराच्या नावाखाली बायको हवी म्हणून जे स्वत:चं लग्न करुन घेतलं त्यामुळे प्रचंड धोखा निर्माण झालाय. वामनभक्त चेल्यानी गुरुचा आदर्श कृतीत उतरविल्यास केवढं नुकसान! (बामसेफच्या कार्यक्रमाना पोरी पाठविण्याआधी वरील धोका लक्षात ठेवा रे भावानो!)
बरं दुसरी गोष्ट अशी की वामन मेश्रामला लग्न करण्याचा नैतिक(कायदेशीर नाही बरं का!) अधिकार होता का? अजिबात नाही. कारण वामनानी अविवहीत राहणे ही गोष्ट स्वत:ची बामसेफ चळवळीतील क्वालिफिकेशन/अर्हता म्हणून वापरली होती. त्यामुळे प्रचंड प्रमाणात वर्गणी गोळा होऊ लागली. एकंदरीत लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी अविवाहीतपणाचं भांडवल वापरलं गेलं. अन या भांडवलातून पैसा उभा होत गेला व ते हळूच प्रेयसीवर उडविणे सुरु झाले. प्रेयसीही फार हुशार... कित्येक वर्ष लोकांच्या पैशावर ऐश केल्यावर व फुकटच्या पैशाची चटक लागल्यावर जिव कुठे थांबतो... लग्नाचा हट्ट धरला... वामनानी तो पुरवला.  यातून दोन गोष्टी सिद्ध होतात. एकतर वामन मेश्रामचं क्वालिफिकेशन गेलं, तो डिस्क्वालिफाय झालाय. या आधारावर त्यानी बामसेफचा राजिनामा देऊन निवांत संसार करावा. कोणी अडवलेलं नाही. अन दुसरं असं की कार्यकर्त्यांचा घात झाला. अविवाहीत राहणे अजिबात गरजेचं नसताना खोटा अविवाहितपणाचा आव आणून मागचे अनेक वर्षे एका बाईशी स्वत: तर शैय्या केली पण कार्य कर्त्यांना त्यापासून दूर ठेवलं. हा एक प्रकारे धोखाच झाला. आता कार्यकर्ते वामन भक्त असल्यामुळे ते उघडपणे हे बोलणार नाही... पण मनात खदखदत नसेल असे अजिबात नाही.

वर्गणीदारांची दिशाभूल
बामसेफचे अविवाहीत कार्यकर्ते या क्वालिफिकेशनला भुलून वर्गणीदारानी त्यांच्यावर विश्वास टाकून समाज कार्यासाठी जो पैसा दिला त्या पैशातून वामन मेश्रामनी होणा-या बायकोशी अनेक वर्षे प्रेमप्रकरण चालविले. आता वामनाची वयक्तीक कमाई काहीच नाही म्हटल्यावर वर्गणीतले पैसेच खरचले असणार. म्हणजे समाज सेवेच्या नावानी गोळा केलेली वर्गणी प्रेयसीवर उडविली. हा झाला पहिला गुन्हा. दुसरा गुन्हा हा की केवळ लग्न करुन हा वामन थांबला नाही तर मोठ्या थाटामाटात पुण्यात लग्नाचं रिसेप्शन दिलं. म्हणजे हा खर्च सुद्धा वर्गणीतूनच केल्या गेला असावा. अन एवढच नाही तर लोकवर्गणीतून चालणा-या मुलनिवासी नायक नावाच्या एकपानी पेपरात पानभर फोटोसकट बातमी छापली... आता बातमी छापायची म्हणजे शाई, डी.टी.पी. टायपिंग पासून संपादन पर्यंत सगळ्या गोष्टीचा खर्च येतोच. तो सगळा लोकवर्गणीतून होतो. म्हणजे हा सगळा खर्च लोकांकडून मिळविलेल्या वर्गणीतून झाला. अन सध्या नवरा बायको मस्तपैकी लोकवर्गणीचे  पैसे उडवत आहेत. वामनाची काहीच कमाई नसल्यामूळे या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हायला हवी.

वामन मेश्रामनी अध्यक्षपदाचा तात्काळ राजिनामा देऊन वरील सगळ्या गोष्टींची चौकशी होऊ द्यावी. बायकोला घेऊन सुखात संसार करावा. फार फार तर कार्यकर्ता म्हणून काम करावे. पण अध्यक्ष बणून राहणे व वर्गणीतले पैसे बायकोवर उडविणे थांबवावे. वामन मेश्रामचे भक्त हे सगळं होऊ देतील असं वाटत नाही. ते वामनलाच अध्यक्षपदावर ठेवण्याची प्रचंड शक्यता आहे. तसे झाल्यास मी एवढेच म्हणेन....


..वामन देणार बामसेफला वारस... वाममार्गाने!

जयभीम
***

शनिवार, २८ सप्टेंबर, २०१३

मुस्लिमानी केली गणपतीची पुजा, हिंदू कधी धरणार रमजानचा रोझा?

सध्या फेसबुकवर हा फोटो सर्वत्र फिरविला जात असून गणपतीची आरती करणा-या मुस्लिमांचे समस्त हिंदू बांधवांकडून तोंड भरुन गुणगाण सुरु आहे. या फोटोला लाखो लोकानी लाईक केले, पन्नास हजाराच्या जवळपास शेअर करण्यात आले व साडेतीन हजारच्या वर लोकानी कमेंट लिहली आहे. समस्त नेटकर हिंदूनी मुस्लिमांची तोंडभरुन स्तूती करताना अनेक शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  या फोटोला इतकं डोक्यावर उचलुन धरण्यामागचं कारण काय? तर मुस्लिम कुटुंब गणपतीची आरती करतोय... मी मागच्या कित्येक दिवसा पासून या फोटोवरील हालचाली पाहतो आहे पण फारसा विचार केला नव्हता. पण आज जरा विचार केल्यावर लक्षात आले की ही तर अत्यंत महत्वाची घटना असून आजवर कट्टरपंथी म्हणून कायम हिणविला गेलेला व दुखविला गेलेला मुस्लिम समाज जुने बंध झुगारुन नवा संदेश देत आहे. सामाजिक सलोखा व सौख्य लाभावा यासाठी त्यानी चक्क पहिले पाऊल टाकले आहे.

या फोटोतून काय संदेश जातो आहे?
फोटोकडे नीट बघा व क्षणभर विचार करा. या फोटोतूण एकंदरीत काय संदेश जातो ते तपासून बघा. एक अत्यंत महत्वाचा संदेश जातो आहे एवढं नक्की. फक्त गरज आहे आपण तो महत्वाचाच...च...च... संदेश उचलण्याची. मुस्लिम बांधव गणपतीची आरती करत आहेत. जातीयवादी हिंदुना हे पाहुन उकळ्य़ा फुटले असतील... का? तर आमच्या देवाची पुजा बांडॆ करत आहेत. ते असेच झुकले पाहिजेत... त्यानी असच केलं पाहिजे... वगैरे वगैरे विचार करणारा एक गट आहे. तर दुसरा गट.... वा वा किती छान. मुस्लिम असून सुद्धा गणपतीची पुजा.... वा व्वा... मस्त. वगैरे म्हणणारा दुसरा गट. अन तिसरा गट... तो म्हणजे या व अशा घटनांचं राजकीय भांडवल बनविणारा व मत मिळविण्यासाठी ते वापरणारा...  पण आपल्याला या सर्वांच्या पलिकडे जाऊन सामाजिक सौख्याचा संदेश घ्यायचा आहे. 
वरील फोटोतून मुस्लीम समाज हा अत्यंत उदार असून हिंदू सारख्या जातीयवादी लोकांच्या देवाची चक्क  पुजाही करु शकतो हे जाहीर आहे.  ही पुजा देवभोळेपणातून नाही तर सामाजीक जाणीवेतून करत आहेत हे आपण सगळ्यानी मनावर/मेंदूवर (अजुन जिथेकुठे शक्य आहे तिथे) कोरून घेतले पाहिजे. का बरं? कारण त्याना या देशात धर्मा-धर्मात उभी असलेली भिंत अमान्य असुन दोन धर्मात एकोपा असावा असे वाटते नि याच भावनेतून ही पुजा केली जात आहे. याचाच अर्थ असा की मुस्लीम समाज खराखुरा सर्वधर्म समभाव मानतो. किंवा समाजिक सलोख्यासाठी स्वधर्माच्या कक्षा ओलांडून तो हे सगळं करतो. त्यामुळे आपण सगळ्यानी या मुस्लिम बांधवांची स्तुती केली पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजे.  कारण मुस्लिमांचे हे कृत्य हिंदूना मैत्रीचा संदेश देणारे आहे. 
आता लगेच दुसरा प्रश्न आपल्याला पडायलाच पाहिजे... तो म्हणजे मुस्लिमानी गणपतीची पुजा केली म्हणून त्यांचं कौतुक ठीक आहे.  पण आता याची अशीच परतफेड नको का? माझ्यामते समस्त गणपतीच्या लेकरांवर ही नैतिक जबाबदारी येऊन पडते की त्यानिही इतकेच उदार होत किमान वर्षातून एकदा तरी मुस्लीमाना असाच सरप्राईज गिफ्ट दयायला हवा. म्हणजे नेमकं काय? तर समस्त गणपतीच्या लेकरानी रमजानचा रोजा ठेवावा नि गोमास भक्षण करुन अल्लाचे आभार मानत महिनाभर नमाज पढावा. मुस्लिमानी बेझिजकपणे गणपती बसवून धार्मिक कट्टरतेला बगल देत जशी आपली राष्ट्रीय व सामाजीक जबाबदारी सिद्ध केली अगदी तशीच हिंदूनीही ती सिद्ध करावी. मुस्लिमांच्या प्रति मनात वितुष्टी नाही हे सिद्ध करावे. मुस्लिमाना कट्टरपंथी म्हणून कायम  हिणविणा-या हिंदूनी तर सर्वात आधी ते करावे. किंबहुना त्यांची ती नैतिक जबाबदारीच आहे. 
जर तसं केलं नाही तर मुस्लिमानी बसविलेला गणपती, केलेल्या आरत्या व पुजा हे सगळं  फुकट गेलं असच म्हणावं लागेल. कारण सामाजिक सलोखा राबविण्यासाठी दोन्ही कडुन पाऊल पडायला हवे. मुस्लिमानी ते टाकले. आता हिंदूनी रमझानचे रोजे धरत आपल्या बाजुने पाऊल टाकायला हवे आहे.  पुढच्या रमझानच्या वेळी मी याच ब्लॉगवर समस्त हिंदूना याची आठवण करुन देईन. वरील फोटोला प्रतिउत्तर देणारा एकजरी हिंदूचा फोटो मिळाला तरी मी भरुन पावेन. 
वरील पुजेचा फोटो हा सामाजिक समतेचा व एकात्मतेचा प्रतिक असेल तर अगदी असेच कृत्य हिंदूनी करुन ती समता व सलोखा अधिक घट्ट करण्याची नैतिक जबाबदारी पार पाडावी.  जर हिंदू तसे करत नसतील तर त्याचा अर्थ असा होतो की मुस्लिमानीच काय ते बदलावं... आम्ही अजिबात बदलणार नाही.. 
मुस्लिमांकडुन आलेल्या या सलोख्याच्या हाकेला हिंदू रमजानचा रोझा धरुन प्रतिसाद  देतील अशी अशा बाळगतो. शेवटी एवढ्च म्हणेन...  
मुस्लिमानी केली गणपतीची पुजा, हिंदू कधी धरणार रमजानचा रोझा?

जयभीम.
***
फेसबुकवरील मुळ लेख खालील धाग्यावर वाचा.

शनिवार, २१ सप्टेंबर, २०१३

ऐसा पोप होणे नाही!कॅथलिक चर्चचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फान्सीस यानी सुरुवातीपासूनच पुरोगामी विचाराची कास धरली आहे. पोप म्हणून निवड झाल्यावर काही दिवसांतच त्यानी आजवरच्या प्रथेला खिंडार पाडत चर्चमध्ये स्त्रीयांचे पाय धुवून जगभरातील समस्त कॅथलिकांमध्ये खळबळ उडवुन दिली होती. या घटनेने अनेक प्रतिगामी कॅथलिक कासाविस झाले तर पुरोगामीनी प्रचंड उत्साहात नव्या पोपच्या या परिवर्तनवादी भुमिकेचे स्वागत केले. पोपनी आजवर चर्चमध्ये फक्त पुरुषांचे पाय धुण्याची प्रथा होती, ती मोडीत काढत स्त्रीयांचे पाय धुतल्यामुळे स्त्री समाजात समतेचा संदेश देण्यात पोपनी बाजी मारली. चर्चकडून झालेला हा स्त्री सन्मान जगभरातील स्त्रीयांसाठी अभूतपुर्व सोहळा होता. ओरडा करणारे विरोधकही मागे राहिले नाहीत. त्यानी जमेल तेवढा ओरडा करुन पाहिला खरा पण पोपच्या बाजूने घोंगावणा-या वादळात विरोधकांचा सूर विरुन गेला.
टाईमच्या बातमीनुसार पोपनी आजुन एक क्रांतिकारक पाऊल टाकले असून त्यांचे म्हणणे काही असे आहे... “चर्चच्या प्रत्येक धार्मिक कार्यात व महत्वाच्या निर्णयप्रक्रियेत स्त्रीचा सहभाग असलाच पाहिजे...  एवढेच नाही तर स्त्रीसुलभता(आध्यात्मिक अर्थाने) हा चर्चचा भाग असून तो देवाने योजलेला आहे.  माझ्या स्वप्नातील चर्च हे आई स्वरुप असून स्त्रीचे अस्तित्व चर्चच्या चराचरात आहे” असे अत्यंत क्रांतीकारक आवाहन केल्यामुळे जगभरातील स्त्रीयानी पोपचे आभार मानले आहे. एवढ्यावरच न थांबता पोप पुढे म्हणतात... “अबॉर्शन, कॉन्ट्रासेप्चूअलचा वापर व समलिंगी संबंध सारख्या गोष्टींच्या विरोधात धार्मिक शक्ती खर्ची घालणे माझ्या नजरेत एक निरर्थक उपद्र्व असून हे सगळे देवाच्याच इच्छेनी होत आहे” म्हणजे जुन्या विचाराना घट्ट कवटाळून समाजात वितुष्टी पसरविण्याचा धंधा बंद झाला पाहिजे अशा अर्थाची एकुण भुमिका आहे. समाज व संस्कृती ही नेहमी प्रवाही असते व सर्वानी त्यानुसार प्रवाही असावे हे सत्य पोपनी ताडले असून समस्त कॅथलिकाना पोपनी एका अर्थाने प्रवाही होण्याचे आवाहनच केले आहे. थोडक्यात प्रतिगाम्यांच्या पुरातन विचाराला पोपनी अक्षरशा  खिंडार पाडले आहे. अत्यंत कडवट समजला जाणारा कॅथलिक चर्च कात टाकताना पाहून समस्त पुरोगामी बांधव पोपचे अनेक आभार मानत आहेत. प्रवाही असणे कशाला म्हणतात त्याचा हा अभुतपुर्व नमुना आहे.

आपण सर्वानी पोप फ्रान्सीसचे आभार मानू या!

सोमवार, १६ सप्टेंबर, २०१३

रणशिंग-२०१४ : भाग-०१ मोदी हवा किंवा मोदी नको!

२०१४च्या निवडणूकीचे पडघम वाजू लागले अन ना ना लोकांची तोंडही वाजू लागली. कधी नव्हे ते बोलले अन बोलले काय तर ते मत कोणाला देणार हे बोलले.  त्यातल्या त्यात काही लोकं कोणाला मत देणार हे जरी नाही बोलले तरी कोणाला देणार नाही हे मात्र ठासून बोलले. सध्या मोदीला मत देणार नाही असं बोलणा-यांची लाट(?) उसळली आहे किंवा तसी लाट उसळते आहे याचा आव आणणा-या हेडलाईन्स तरी नक्कीच झडकत आहेत.  अगदी विख्यात अर्थतज्ञ व जागतीक पातळीवर नोबेलने गौरवलेले अमर्त्य सेन पासून गल्लीत ज्याला काळ कुत्रही हुंगत नाही असे अनेकजण उसन्या अवसानानी गरजू लागले. एकंदरीत काय तर रणशिंग-२०१४ च्या निवडणूकांची ही पुर्वतय्यारी तय्यारी आहे. येणा-या निवडणूकासांठी त्या त्या पातळीवर चाललेली ही मोर्चेबांधणी आहे.  मागच्या काही वर्षात कॉंग्रेसच्या विरोधात जनमत तयार होत आहे खरं पण तो नेमकं कुठे व कोणत्या पातळीवर याचा काही थांगपत्ता लागत नाहीये. शहरी भागतील तरुणांमध्ये कॉंग्रेस विरोधी धग अधिक पेटत आहे हे जाणवते खरे पण अधुन मधुन होणा-या पोटनिवडणूकीचे निकाल पाहता हा दावाही फोल ठरतो.
सध्या कॉंगेसच्या गोटातून त्यांची पुढच्या निवडणूकीसाठी असलेली तय्यारी व धोरणं काय हे सांगण्यापेक्षा मोदीच्या नावानी गळा काढणे सुरु आहे.  सुरुवातीला मिडीया मोदी विरोधी आलाप मुक्त कंठाने आवळायचा. आता त्या आलापाचा आवाका व कक्षा विस्तारल्या असून दुहेरी रागदारी सुरु झाली आहे. मोदीवर जमेल तेवढं तोंडसुख घेणे ही त्याची एक बाजू तर दुसरी बाजू ही की  भाजपातील मोदी विरोधकांचे रडीचे गाणे सगळ्या चॅनल्सवर अखंड वाजवित ठेवणे. याला मी माझ्या  भाषेत मोदीविरोधी सामुहीक यज्ञ असे म्हणतो. हे सगळं करुनही भागणार नाही असं वाटणारे वरिष्ठ पत्रकावर व त्यांचे अधिकारी नि सवंगडी मिळून या सामुहिक यज्ञाची अखंडता जोपसताना अधेमध्ये गोध्रा प्रकरणाचे तूप शिंपडून यज्ञात भडका उडवतात. हा मोदीविरोधी यज्ञातील भडका लोकाना दिसावा म्हणून समस्त पत्रकारलोकं अधुन मधुन सामुहीकपणे किंचाळणेही सुरु ठेवतात. गोध्राकांडात मोदी जर दोषी असतील तर त्यावर न्यायालय काय तो निकाल देईल. तोवर आपण धीर धरला पाहिजे.  आजवर मिडीयानी चालविलेल्या या मोदीविरोधी यज्ञाचा प्रसाद खाण्यासाठी आता कॉंगेसी नेते पण यज्ञस्थळाला भेट देऊ लागली आहेत. मोदी हा जातीयवादी आहे असे ओरडून सांगताना कॉंगेसी मात्र पद्धतशीरपणे विसरतात की १९८४च्या दंगलित शिखांचे शिरकाण करणारे कॉंगेसीही काही कमी दंगलखोर नाहीत. त्या टायटलरला पोटात घालून माकड उड्या मारणारी कॉंगेस काही धुतल्या दुधाची नाहीये. दंगलीचा अरोप ठेवून जर मोदीना बदनाम करायचे म्हटल्यास अगदी असाच अरोप शिखविरोधी दंगलिच्या बाबतीत कॉंगेसवरही ठेवता येईल. आधी केवळ मिडीयाकडून ओरडा करवून घेणारे राजकारणी आता मात्र प्रत्यक्ष ओरडा करायला पुढे येत आहेत ही सगळ्यात नवलाची गोष्ट आहे.
एकुण परिस्थीती पाहता असेच दिसते आहे की कॉंग्रेसला मोदीची भिती वाटू लागली आहे. मोदी हवा की मोदी नको अशी एकुण परिस्थीती निर्माण होताना दिसत आहे. ही परिस्थीती निर्माण होण्यात मोदीचं असं खास कर्तुत्व नक्कीच नाही. कॉंगेसच्या रोजच्या मोदीविरोधी भुपाळ्या व भैरव्यांमुळे लोकाना असं वाटू लागलं की मोदी म्हणजे नक्कीच कोणीतरी  दमदार राजकारणी वगैरे नक्कीच असावा. त्याच्या नावानी कॉंगेसला घाम फुटतोय म्हणजे प्रकरण एवढे साधे नक्कीच नाही. मोदी नावाचा कोणी गुज्जू माणूस कॉंगेसला रडीचे का असेना पण गाणी गायला लावतो म्हणजे हा पट्टा नंबर एकचा उस्तादच आहे. तसही कॉंगेसमध्ये मास्तराच्या अभावी निर्माण झालेल्या बेशिस्तीला जरा ताळ्यावर आणायला अशा मास्तराची गरज होतीच. पण वाईट याचं वाटतं की हा मास्तर नेमका सी-वर्गाचा नसून बी-वर्गाचा आहे. तरी सुद्धा सी-वर्गातली पोरं रोज उठून मोदी मास्तराचा धसका घेतात म्हणजे सालं हे मोदी मास्तर काहीतरी जबरी प्रकरण असावं असा एकंदरीत संदेश लोकांपर्यंत जाऊ लागला आहे. यातून आता लोकानाही मोदी माहात्म्य  काय ते आजमावून पहावसं वाटल्यास नवल वाटू नये. समस्त कॉंगेसी एका सुरात मोदीविरोधी सामुहिक आरोळी करताना पाहून मोदीला या कॉंग्रेसवाल्यांच्या अंगावर एकदातरी सोडून गंमत पाहण्याची खुमखुमी प्रत्येकाच्या मनात नक्कीच येत असेल. गोध्रा परकरण अखंड तापवत ठेवुनही व आडवानी सारखे दिग्गज वाट अडवुणही मोदी मात्र सगळे अडथळे उध्वस्त करत जी मुसंडी मारत आहे ती पाहता २०१४ च्या निवड्णूका एकतर्फी होणार नाही एवढं मात्र नक्की.
बाकी काहिही असो. मोदी बद्दलची सगळी गृहितकं बाद ठरत असून या देशातील अत्यंत बलाढ्य समजला जाणारा कॉंग्रेस नावाचा पक्ष मोदीचा खरोखरच धसका घेत आहे हे जाहीर आहे. कोणाला निवडून द्यावं नि कोणाला नको अशी चर्चा रंगायला हवी होती. पण यावेळेस मोदी हवा की मोदी नको असं वातावरण निर्माण होत आहे. अशी परिस्थीती यापुर्वी एकदाच निर्माण झाली ती म्हणजे इंदिरा गांधीच्यावेळी. आणीबाणी लागु झाल्यानंतर इंदिराजींच्या विरोधात झालेलं मतदान व त्या नंतर  दिल्लीत खेळली गेलेली राजकीय रंगपंचमी याचा वीट येऊन पुढच्या वेळेस देशात जे वातावरण निर्माण झालं ते काहीसं असच होतं... इंदरा हवी किंवा इंदिरा नको...त्यावेळी लोकानी इंदिराजी हवी यावर शिक्कामोर्तब केलं.
आज तीस बत्तीस वर्षा नंतर संपुर्ण भारतात तशीच परिस्थीती परत एकदा उभी होताना दिसत आहे. मोदी हवा किंवा मोदी नको... रणशिंग-२०१४ मध्ये बाजी कोणिही मारो, पण मोदीच्या विरोधात व बाजूने अशा दोनच भागात सव्वाशे कोटी लोकांची होणारी विभागणी  ही असामान्य गोष्ट आहे. थोडक्यात पुढच्या निवड्णूकीचा केंद्रबिंदू नरेंद्र मोदी हाच असणार हे निर्विवाद सत्य आहे.

टीप: मी कॉंग्रेसचा कट्टर समर्थक असून भाजपाचा पारंपारीक विरोधक आहे.