शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१३

स्वामी विवेकानंद :- भाग-१ ज्योतिषगिरी व अंधश्रद्धा!

स्वामी विवेकानंद हे आधुनिक भारतातील ते विद्वान सन्यासी आहेत ज्यानी हिंदू धर्माची पताका साता समुद्रापार फडकविली. आजवर हिंदू धर्मात अनेक संत महंत झालेत पण स्वामी विवेकानंदांचं स्थान मात्र या सर्वांच्या पलिकडचं आहे. इंग्रजी भाषेवर असलेलं प्रभुत्व, तल्लख बुद्धिमत्ता व प्रचंड वाचनाच्या बळावर प्राचिन संस्कृतीचा आधुनिक व पाश्चत्य संस्कृतीशी मेळ घालण्याचा अविश्वसनीय नमुना स्वामी विकानंदानी अत्यंत प्रभाविपणे सादर करताना या दोन संस्कृतीतील देवाणघेवाण होणे अनिवार्यच आहे हे केवळ ठासून सांगितले नाही तर जगाला सप्रमाण पटवुनही दिले. त्यामुळे आजचा तरुण हिंदुत्व नाकरत असला, बुवा बांजींचा तिरस्कार करत असला वा निरिश्वरवाद जपत असला तरी स्वामी विवेकानंदा बद्दल लगेच टोकाची भुमिका घेत नाही हेही तेवढच खरं. म्हणजे स्वामी विवेकानंदावर टिका करताना वा हिंदुत्वाचा लेबल चिकटविण्याआधी दहावेळा विचार करावा लागतो अशी एकंदरीत विवेकानंदांची प्रतिमा मागच्या शंभर वर्षात निर्माण करण्यात आली आहे. विवेकानंद सांगताना ते कसे आधुनिक विचारसरणीचे तरुण संत होते हेच सांगितले जाते. पण त्यानी केलेली बुवाबाजी मात्र पद्धतशीरपणे लपविली जाते.
स्वामी विवेकानंद अमेरीकेत जाण्यापुर्वी भारत भ्रमणावर निघतात. उत्तरेकडून दक्षिणेकडे त्यांचा प्रवास सुरु होतो. पंजाब प्रांत ओलांडून जेंव्हा ते राजस्थानात प्रवेश करतात तेंव्हा अनेक राजे-रजवाड्याना भेट देत ते पुढे सरकत असतात. याच दरम्यान कोटा दरबारातील एका मुसलमानानी स्वामी विवेकानंदाना मोठ्या आग्रहाणे आपल्या घरी निमंत्रीत केल्यावर पुढच्या काहिदिवसांचा मुक्काम मुसलमानाच्या घरीच होता. याच मुक्कामात राजा अजित सिंहाशी (खेतडीचे राजे) गाठ पडते व नंतर राजाच्या आग्रहावरुन स्वामी विवेकानंदाचा मुक्काम राजदरबारात हलतो. काही दिवस तिथे राहिल्यावर राजा अजितसिंह व मुनशी जगमोहनलाल हे दोघेही स्वामीचं शिष्यत्व पत्करतात. याच वास्तव्यात स्वामी विवेकानंद आपल्या शिष्याला म्हणजेच निपुत्रीक राजाला भविष्य सांगतात. विवेकानंद राजाला सांगतात की लवकरच तुला पुत्रप्राप्ती होईल. खरंतर ही घटना कुठल्या परिस्थीती समर्थनीय ठरु शकत नाही. आज पर्यंतच्या विवेकानंदाच्या प्रतिमेच्या विसंगत जाणारं हे विधान. स्वामीना खरच भविष्य कळत होते का? तर कोणताही तर्कवादी माणूस म्हणेल... अजिबात नाही, ते अशक्य आहे. म्हणजे याचाच अर्थ असा की स्वामी विवेकानंदानी थाप मारली होती. एकदा थाप मारली हे सिद्ध झाले की मग ओळीने अनेक प्रश्न येतात. गरजच काय होती? भविष्य कळत नसताना ही भोंदूगिरी केलीच कशाला पासून तर त्यामागे काही स्वार्थ वगैरे होता की कसं? की आजून काही कांड-बिंड वगैरे वगैरे. म्हणजे या एका घटनेमुळे स्वामींची आजवरची प्रतिमा पुसुन टाकली जाते.
असो, पुढे स्वामी विवेकानंद दक्षिणेत निघुन जातात.

इकडे खेतडीत खरोखर राजाची बायको गरोदर राहते. दिला दिवस गेले हे कळल्यावर राजवाड्याला उत्सवाचं रुप येतं. हा हा म्हणता नऊ महिणे उलटतात व राजा अजितसिंहाना पुत्र प्राप्ती होते. तोवर तिकडॆ दक्षिणेत स्वामी विवेकानंदाची अमेरीकाला जाण्याची पुर्ण तयारी झालेली असते. अन अचानक खेतडीच्या राजाचे मुनशी जगमोहनलाल दक्षिणेत येऊन थडकतात. तुमची पुत्रप्राप्तीची भविष्यवाणी खरी ठरली असून राजपुत्राच्या अन्नप्राशनाच्या कार्यक्रमात तुमची उपस्थीती व आशिर्वाद हवा असा मुनशीनी हट्ट धरतात. स्वामी विवेकानंद हा हट्ट पुरवायला तयार होतात.  काही दिवस खेतडीत राहिल्यावर महराजाकडून पैसे व महागडे कपडे स्विकारुन विवेकानंद अमेरीकेस रवाना होतात. अशी ती घटना.
खरंतर या घटनेतून स्वामी विवेकानंदाची ज्योतिषगिरी जाहीर होते, म्हणजेच बुवाबाजी नावाच शब्द जो आजवर आपण विवेकानंदाना अजिबात लावला नाही तो इथुन पुढे लागु पडतो. अधुनिक विचारसरनीच्या व तर्कनिष्ठ विवेकानंदाच्या एकुन तत्वज्ञाशी असलेली ही विसंगती विवेकानंदाचे तत्वज्ञान परस्पर विरोधी कसे असा प्रश्न उभा करतो. अंधश्रद्धा फैलविण्याचा आरोप ठेवण्यास ही घटना सबळ पुरावाच ठरते. विवेकानंचाच्या आधुनिक तत्वज्ञानाची पोलखोल करणारी ही घटना आजवर उसन्या अवसानानी निर्माण केलेली व सांगितलेली विवेकानंदाची पुरोगामी प्रतिमा खोटी आहे हे सप्राण सिद्ध करते. विवेकानंद हे तर्कवादी होते, आधुनिक विचारसरणीचे समर्थक व पुरोगामी होते हे सगळे दावे एका झटक्यात निकाली निघतात. त्यामुळेच ही ज्योतीषगिरी आजवर लपविली गेली की कसे असाही प्रश्न पडतो. किंबहुना स्वामी विवेकानंदाची ज्योतिषगिरी व प्रतिगामित्व लपवुन आजवर खोटा विवेकानंद आम्हाला सांगितल्या गेला हे जाहीर होते.

आजवर आम्ही वाचलेला विवेकानंद हा एकतर्फी होता हे नाकारता येणार नाही. खरा विवेकानंद अत्यंत प्रतिगामी, ज्योतीषी माणणारा, देवावर नितांत भक्ती असणारा व त्याच बरोबर कर्मकांड करणारा सनातनी वृत्तीचा भोंदू सांधूच होता असं म्हणायला पुरेपुर वाव आहे. फक्त तो प्रतिगामी विवेकानंद आजवर लपवुन ठेवण्यात आला होता त्यामुळे याआधी तसे म्हणता येत नव्हते. आजवर खोट्या विवेकानंदाचा फुगा फुगविण्यात आला होता. पण शेवटी फुगा तो फुगाच, कधितरी फुटणारच. माझ्या नजरेत तो आज फुटला. म्हणून दडपून ठेवलेला विवेकानंद मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पुढचं तुम्हीच ठरवा.    

----
संदर्भग्रंथ: स्वामी विवेकानंद यांचे चरित्र
प्रकाशक:-रामकृष्ण मठ, नागपूर
वरील उतारा:- पृष्ठ क्रमांक ११४ व १३२ मध्ये सापडतो.
लेखक:- स्त्येंद्रनाथ मुजुमदार (मूळ बंगाली लेखक)
अनुवादक:- स्वामी शिवतत्वानंद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा