सोमवार, १६ सप्टेंबर, २०१३

आसाराम बापू:- आरोप झालाय, दोष सिद्ध व्हायचा आहे!आसाराम बापुच्या नावाने तमाम भारतीय मिडीया शिमगा खेळत आहे. हिंदू संतांवर मागच्या काही वर्षांपासून मिडीया विषेश उधळण करायला एका पायावर तयार असते. एका विषिष्ट धर्माला असे टार्गेट करणे तर्कबुद्धिला न पटणारे आहे. या आरोपांतून संताची प्रचंड बदनामी होते. नंतर न्यायपालिकेद्वारे आलेल्या निवाड्यात हे संत निर्दोष सुटतात. लोकशाहीचे सच्चे शिपाई म्हणून त्या निवाड्याचा आदर करणे आपले आद्यकर्तव्यच असते. पण मधल्या काळात मिडीयानी केलेल्या उधळनीमुळे बिचा-यांची प्रतिमा काही धुवून निघत नाही. एका अर्थाने माझ्या मते हा त्यांच्यावरील अन्यायच आहे. एखाद्याला जर न्यायपालिका दोषमुक्त करत असेल तर त्याला बा-इज्जत जगण्याचा अधिकार आहे. पण मिडीयानी मधल्या काळात खेळलेल्या शिमग्यामुळे ते तसे होत नाही. यात त्या माणसाचं वयक्तीत नुकसान तर आहेच. पण अशी व्यक्ती कार्यरत असलेलं ते क्षेत्रही बदनाम होतं. ही बदनामी न्यायालयाच्या निवाड्या नंतर भरुन निघत नाही ही सगळ्यात खेदाची बाब आहे. म्हणून न्याय निवाडा येईस्तोवर आपण सर्वानी धीर धरणे हेच जास्त संयुक्तीक असून त्यात मिडीयानी अग्रणी असणे अनिवार्य आहे.हिंदू धर्मातील जातीयवाद हे  मानवी समाजवर एक शापच आहे हे जरी मान्य असले तरी त्याच्या आडून पातळी सोडून पराकोटीचा द्वेष करण्याचं हल्ली एक नवीनच फॅड रुजत चाललं आहे. संत महंताना शिव्या देणे म्हणजेच पुरोगामित्व अशिही एक नवी फॅशन सगळे करु लागले आहेत. या नव्या फॅशनचा झग्गा घालुन फुगडी खेळण्यात सगळ्यात पुढे मिडीया आहे. एकुण काय तर मी पुरोगामी आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरोगामी विचार आचारण्यापेक्षा हिंदूना शिव्या दिल्या की पुरोगामित्वाचा अभिषेक होतो. सध्या असाराम प्रकरणाला मिडीयात प्रचंड डिमांड असून टी.आर.पी. च्या खेळात आसाराम नावाची रस्सी सगळेच खेचताना दिसत आहे. मग या रस्सीखेचमध्ये आम्ही कसे सरस आहोत हे दाखविण्यासाठी स्टिंग ऑपरेशन नावाचं पिल्लू नाचवायला सुरुवात झाली. या सगळ्या प्रकरणात जर कुणाचा बुद्धिभेद होत असेल तर तो प्रेक्षकांचा. कारण स्टिंग ऑपरेशनवर प्रगाढ श्रद्धा असणारा नव्या दमाचा प्रेक्षक निर्माण करण्यात मिडीयानी मागच्या काही वर्षात प्रचंड आघाडी घेतली असून आता त्याच्या भरवश्यावर पोळी शेकणे चालू आहे.
एखाद्यावर काही आरोप झाले की त्याचा तपास व न्यायनिवाडा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत. त्यासाठी आपण सर्वानी न्यायपालिकेवर विश्वास ठेवला पाहिजे. प्रकरणाची संपुर्ण चौकशी होणे गरजेचे असते आणि ते लोकशाहीला धरुनच आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आततायीपणा न करता प्रकरणाचा व न्यायालयाचा निवाडा येईस्तोवर दम धरणे आपल्याला बंधनकरक तर आहेच पण एक सुजाण नागरिक म्हणून ते आपले नैतिक कर्तव्यच आहे. पण हल्ली ही सगळी नैतिकता मिडीयाच्या कल्ल्यात वाहून जाते. मिडीयानी न्यायपालिकेस पुरक कार्य करावे नि त्या अनुषंगाने बातमी द्यावी ही मिडीयाची नैतिक जबाबदारी असते. पण सध्या टी.आर.पी. च्या जमान्यात सगळी नैतिकता व पत्रकारितेची संहिता धाब्यावर बसवुन पैशाच्या शर्यतीत उतरलेला मिडीया जास्तीत जास्त जाहिराती मिळविण्याचं समिकरण मांडूनच बातमीच सादरिकरण करत असते. मिडीयांच्या बातम्याना बातम्यांचं मुल्य असावं ही खरीतर पहिली अट पण आजचं चित्र वेगळं आहे. बातमिला बातीचं म्युल्य असो वा नसो पण त्याला टी.आर.पी. मुल्य वा त्यास पुरक असं वादळ उठविणारं मुल्यं असलं की ती मिडीयाच्या दृष्टीने ठरते ब्रेकिंग न्युज. त्याच्या जोडीला स्टिंग ऑपरेशन द्वारे निर्माण केलेला नवा बघ्या आहेच. पण या एकुण प्रक्रीयेतून साध्य काय? उत्तर सोपं आहे. मिडीयाची भरपुर कमाई होते. बास!
ज्या स्टिंग ऑपरेशनचं ढोल बळवत मिडीया स्वत:च न्यायालय असल्याचा आव आणत कोणालाही आरोपी ठरवू लागली आहे त्या स्टिंग ऑपरेशनच्या रेकॉर्डिंगला न्यायालयात काडीची किंमत नसते हे मिडीयाही जाणतेच. न्यायालयात पुरावा म्हणून दाखल करण्यासाठी रीळावरील रेकॉर्डिंगच ग्राह्य धरली जाते हे सगळ्याना (म्हणजे मिडियावाल्याना) चांगल माहीत आहे. मिडीयाचे सगळे स्टिंग ऑपरेशन हे डिजिटल रेकॉर्डींग असुन आजवर यांचा एकही स्टिंग मटेरीअल कोर्टात तग धरु शकला नाही. कारण डिजीटल डेटा कुठल्याही पातळीवर मॅनिप्युलेट करता येतो, त्यामुळे न्यायायलात त्याला पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जात नाही. म्हणजे न्यायालयीन प्रक्रीयेत यांच्या स्टिंग मटॆरीलला शुन्य मुल्य आहे. तरी सुद्धा लोकांच्या भावना भडकविण्यासाठी हे स्टिंग ऑपरेशन करतात व त्यातून एकमेव साध्य काय तर ह्यांची टी.आर.पी. वाढते. एवढच! त्यातुन दुसरं काही जर साध्य होत असेल तर लोकांचा न्यायपलिकवरील विश्वास ढळत जाऊन मिडीयावर गाढ श्रद्धा बसत जाते. ही एकुण यंत्रणा लोकशाहीला मारक ठरत असून न्यायालयाचाही अवमानच आहे.
एवढेच नाही तर एखादया व्यक्तीवर आरोप झाल्या झाल्या त्या आरोपांची शहनिशा न करता आरोपीला थेट गुन्हेगार व शिक्षापात्र ठरवुन  मिडीया मोकळा होतो. मिडियाच्या या आततायीपणामुळे न्यायालयातुन निर्दोष सुटणारे कित्येक लोकं मिडीया द्वारे मात्र विनाकारण बेअब्रू होत आहेत. संत असाराम बद्दलही तेच चालले आहे. आसाराम बापू दोषी आहेत की नाही हे सिद्ध करणे मिडीयाचे काम नसून ते न्यायपालिकेचे काम आहे. आसारामवर झालेल्या आरोपांचा तपास सुरु असुन न्यायपालिकेचा निकाल येईस्तोवर मिडीयानी धीर धरणे गरजेचे आहे. सध्या आसारामच्या नावाने शिमगा खेळणारा मिडीया आपली नैतिक जबाबदारी जाणून जरा न्यायपालिकेप्रती लोकांचा विश्वास वाढेल असा वागेल एवढीच अपेक्षा. मिडीयाला तशी सद्बुद्धी सुचो, बास!

-जयभीम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा