सोमवार, १६ सप्टेंबर, २०१३

रणशिंग-२०१४ : भाग-०१ मोदी हवा किंवा मोदी नको!

२०१४च्या निवडणूकीचे पडघम वाजू लागले अन ना ना लोकांची तोंडही वाजू लागली. कधी नव्हे ते बोलले अन बोलले काय तर ते मत कोणाला देणार हे बोलले.  त्यातल्या त्यात काही लोकं कोणाला मत देणार हे जरी नाही बोलले तरी कोणाला देणार नाही हे मात्र ठासून बोलले. सध्या मोदीला मत देणार नाही असं बोलणा-यांची लाट(?) उसळली आहे किंवा तसी लाट उसळते आहे याचा आव आणणा-या हेडलाईन्स तरी नक्कीच झडकत आहेत.  अगदी विख्यात अर्थतज्ञ व जागतीक पातळीवर नोबेलने गौरवलेले अमर्त्य सेन पासून गल्लीत ज्याला काळ कुत्रही हुंगत नाही असे अनेकजण उसन्या अवसानानी गरजू लागले. एकंदरीत काय तर रणशिंग-२०१४ च्या निवडणूकांची ही पुर्वतय्यारी तय्यारी आहे. येणा-या निवडणूकासांठी त्या त्या पातळीवर चाललेली ही मोर्चेबांधणी आहे.  मागच्या काही वर्षात कॉंग्रेसच्या विरोधात जनमत तयार होत आहे खरं पण तो नेमकं कुठे व कोणत्या पातळीवर याचा काही थांगपत्ता लागत नाहीये. शहरी भागतील तरुणांमध्ये कॉंग्रेस विरोधी धग अधिक पेटत आहे हे जाणवते खरे पण अधुन मधुन होणा-या पोटनिवडणूकीचे निकाल पाहता हा दावाही फोल ठरतो.
सध्या कॉंगेसच्या गोटातून त्यांची पुढच्या निवडणूकीसाठी असलेली तय्यारी व धोरणं काय हे सांगण्यापेक्षा मोदीच्या नावानी गळा काढणे सुरु आहे.  सुरुवातीला मिडीया मोदी विरोधी आलाप मुक्त कंठाने आवळायचा. आता त्या आलापाचा आवाका व कक्षा विस्तारल्या असून दुहेरी रागदारी सुरु झाली आहे. मोदीवर जमेल तेवढं तोंडसुख घेणे ही त्याची एक बाजू तर दुसरी बाजू ही की  भाजपातील मोदी विरोधकांचे रडीचे गाणे सगळ्या चॅनल्सवर अखंड वाजवित ठेवणे. याला मी माझ्या  भाषेत मोदीविरोधी सामुहीक यज्ञ असे म्हणतो. हे सगळं करुनही भागणार नाही असं वाटणारे वरिष्ठ पत्रकावर व त्यांचे अधिकारी नि सवंगडी मिळून या सामुहिक यज्ञाची अखंडता जोपसताना अधेमध्ये गोध्रा प्रकरणाचे तूप शिंपडून यज्ञात भडका उडवतात. हा मोदीविरोधी यज्ञातील भडका लोकाना दिसावा म्हणून समस्त पत्रकारलोकं अधुन मधुन सामुहीकपणे किंचाळणेही सुरु ठेवतात. गोध्राकांडात मोदी जर दोषी असतील तर त्यावर न्यायालय काय तो निकाल देईल. तोवर आपण धीर धरला पाहिजे.  आजवर मिडीयानी चालविलेल्या या मोदीविरोधी यज्ञाचा प्रसाद खाण्यासाठी आता कॉंगेसी नेते पण यज्ञस्थळाला भेट देऊ लागली आहेत. मोदी हा जातीयवादी आहे असे ओरडून सांगताना कॉंगेसी मात्र पद्धतशीरपणे विसरतात की १९८४च्या दंगलित शिखांचे शिरकाण करणारे कॉंगेसीही काही कमी दंगलखोर नाहीत. त्या टायटलरला पोटात घालून माकड उड्या मारणारी कॉंगेस काही धुतल्या दुधाची नाहीये. दंगलीचा अरोप ठेवून जर मोदीना बदनाम करायचे म्हटल्यास अगदी असाच अरोप शिखविरोधी दंगलिच्या बाबतीत कॉंगेसवरही ठेवता येईल. आधी केवळ मिडीयाकडून ओरडा करवून घेणारे राजकारणी आता मात्र प्रत्यक्ष ओरडा करायला पुढे येत आहेत ही सगळ्यात नवलाची गोष्ट आहे.
एकुण परिस्थीती पाहता असेच दिसते आहे की कॉंग्रेसला मोदीची भिती वाटू लागली आहे. मोदी हवा की मोदी नको अशी एकुण परिस्थीती निर्माण होताना दिसत आहे. ही परिस्थीती निर्माण होण्यात मोदीचं असं खास कर्तुत्व नक्कीच नाही. कॉंगेसच्या रोजच्या मोदीविरोधी भुपाळ्या व भैरव्यांमुळे लोकाना असं वाटू लागलं की मोदी म्हणजे नक्कीच कोणीतरी  दमदार राजकारणी वगैरे नक्कीच असावा. त्याच्या नावानी कॉंगेसला घाम फुटतोय म्हणजे प्रकरण एवढे साधे नक्कीच नाही. मोदी नावाचा कोणी गुज्जू माणूस कॉंगेसला रडीचे का असेना पण गाणी गायला लावतो म्हणजे हा पट्टा नंबर एकचा उस्तादच आहे. तसही कॉंगेसमध्ये मास्तराच्या अभावी निर्माण झालेल्या बेशिस्तीला जरा ताळ्यावर आणायला अशा मास्तराची गरज होतीच. पण वाईट याचं वाटतं की हा मास्तर नेमका सी-वर्गाचा नसून बी-वर्गाचा आहे. तरी सुद्धा सी-वर्गातली पोरं रोज उठून मोदी मास्तराचा धसका घेतात म्हणजे सालं हे मोदी मास्तर काहीतरी जबरी प्रकरण असावं असा एकंदरीत संदेश लोकांपर्यंत जाऊ लागला आहे. यातून आता लोकानाही मोदी माहात्म्य  काय ते आजमावून पहावसं वाटल्यास नवल वाटू नये. समस्त कॉंगेसी एका सुरात मोदीविरोधी सामुहिक आरोळी करताना पाहून मोदीला या कॉंग्रेसवाल्यांच्या अंगावर एकदातरी सोडून गंमत पाहण्याची खुमखुमी प्रत्येकाच्या मनात नक्कीच येत असेल. गोध्रा परकरण अखंड तापवत ठेवुनही व आडवानी सारखे दिग्गज वाट अडवुणही मोदी मात्र सगळे अडथळे उध्वस्त करत जी मुसंडी मारत आहे ती पाहता २०१४ च्या निवड्णूका एकतर्फी होणार नाही एवढं मात्र नक्की.
बाकी काहिही असो. मोदी बद्दलची सगळी गृहितकं बाद ठरत असून या देशातील अत्यंत बलाढ्य समजला जाणारा कॉंग्रेस नावाचा पक्ष मोदीचा खरोखरच धसका घेत आहे हे जाहीर आहे. कोणाला निवडून द्यावं नि कोणाला नको अशी चर्चा रंगायला हवी होती. पण यावेळेस मोदी हवा की मोदी नको असं वातावरण निर्माण होत आहे. अशी परिस्थीती यापुर्वी एकदाच निर्माण झाली ती म्हणजे इंदिरा गांधीच्यावेळी. आणीबाणी लागु झाल्यानंतर इंदिराजींच्या विरोधात झालेलं मतदान व त्या नंतर  दिल्लीत खेळली गेलेली राजकीय रंगपंचमी याचा वीट येऊन पुढच्या वेळेस देशात जे वातावरण निर्माण झालं ते काहीसं असच होतं... इंदरा हवी किंवा इंदिरा नको...त्यावेळी लोकानी इंदिराजी हवी यावर शिक्कामोर्तब केलं.
आज तीस बत्तीस वर्षा नंतर संपुर्ण भारतात तशीच परिस्थीती परत एकदा उभी होताना दिसत आहे. मोदी हवा किंवा मोदी नको... रणशिंग-२०१४ मध्ये बाजी कोणिही मारो, पण मोदीच्या विरोधात व बाजूने अशा दोनच भागात सव्वाशे कोटी लोकांची होणारी विभागणी  ही असामान्य गोष्ट आहे. थोडक्यात पुढच्या निवड्णूकीचा केंद्रबिंदू नरेंद्र मोदी हाच असणार हे निर्विवाद सत्य आहे.

टीप: मी कॉंग्रेसचा कट्टर समर्थक असून भाजपाचा पारंपारीक विरोधक आहे.

1 टिप्पणी: