शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१३

मी लक्ष्मी यंत्र नाकारला...!आज दुपारी २.२ मिनटानी माझा मोबाईल वाजला. ज्या नंबर वरुन फोन आला तो नंबर 918960001589 होता. मी एका कामात अत्यंत व्यस्त होतो. तरी मुर्खा सारखा फोन घेतला. तिकडून एका बाईचा गोड आवाजातला संवाद सुरु झाला. पहिल्या दोन वाक्यात दोन गोष्टी लक्षात आल्या एक तर फोन दिल्ली व तत्सम प्रांतातून होता. अन दुसरं म्हणजे हा पैसे लुबाडणा-या बुवाजिच्या टोळीतील एका लुटारु बाईचा फोन होता. अन योगायोग म्हणजे मागच्याच आठवड्यात लोकमत मध्ये अशा फोन संदर्भात एक मोठा लेख वाचला होता. त्यामुळे लगेच लक्षात आलं की पुढचा एकंदरीत संवाद कुठल्या दिशेनी  जाणार आहे. त्याच बरोबर काय काय मागण्या होणार हे सुद्धा आधिच कळलं होतं. त्यामुळे मी शांत होऊन संवाद ऐकत होतो.
"आपको हमारी आश्रम की तरफ से लक्ष्मी यंत्र दिया जा रहा है....आप एक नशिबवान व्यक्ती हो क्युं की ये सबको नही दिया जाता... गुरु की आप पर कृपा है... लक्ष्मीजी भी आप पर प्रसन्न है..." वगैरे वगैरे ती सुरुवात. म्हणजे माणसाला सायकॉलॉजिकली तयार करण्याची ही प्रोसेस.
...तर आध्यत्मिक सेवेच्या अंतर्गत १४०० रुपयात एक लक्ष्मी यंत्र त्यांच्या आश्रमा तर्फे मला देण्यात येत आहे. हे यंत्र पोस्टाने किंवा कुरीअरने मला पाठविण्यात येईल. POD ने डिलिव्हरी असेल म्हणजे फक्त डिलिव्हरी घेताना १४०० मोजावे लागणार. एकदा का पैसे दिले व यंत्र घेतले की पुढचा फोन येईस्तोवर वाट बघायचे. चार-पाच दिवसानी तिच्या गुरुचा फोन येणार... तो मला मंत्र व यंत्र बांधण्याची प्रोसेस सांगणार. हे सगळं त्यांच्या मार्गदर्शना नुसार करायचे होते. त्या दरम्यान परत पैशाची मागणी होणार होतीच. एकदा हे सगळं उरकलं की मग मी सुखी होणार असं तिनी आश्वासन दिलं. त्याच बरोबर देव धर्म नि चमत्कार वगैरे बरच काही सांगुन झालं. या यंत्रामुळे नि तीच्या गुरुच्या आशिर्वादामुळे मी सुखी होणार हे ती सारखं सारखं सांगू लागली.
"तुम्हे सुखी होना है या नही... सुखी होना है या नही..." हे वाक्य बोलताना एक मानसिक दबाव निर्माण करण्याचा टोन होता. म्हणजे माणसाला सायकॉलॉजिकली कसा घेराव टाकावा याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊनच या पोरीना कामावर रुजु केलं जातं हे मला लक्षात येत होतं. त्याच बरोबर देवाचं नाव घेताना व माझ्या आयुष्यात सुखाचा कसा वर्षाव होईल हे सांगताना स्वरातील व एकुण संवादातील ठामपणा कमालीचा मेंटेन केलेला होता. पुढे हा संवाद ठामपणा ते आदेश असं स्वरुप घेत गेलं... तिच्या एकुण संवादाचा माझ्यावर फारसा परिणाम होत नाही हे कळल्यावर तीनी आक्रमकता अवलंबत माझ्यावर हावी होण्याचा पवित्रा स्विकारला.

"नही, मुझे इन बातोमे भरोसा नही है" माझ्या वरिल वाक्यावर बया चवताळून उठली. 
"...क्यों तुम आपने आपको भगवानसे भी बडे समझते हो क्या. अरे भगवानका प्रसाद तुम्हारे घर चलके आ रहा है और तुम उसे ठुकरा रहे हो. तुम एक ना समझ बच्चे हो. भगवान अंतरयामी होते है. उसने तुम्हे लक्ष्मी यंत्र के लिये चुना है इस लिए मै तुम्हे फोन कर रही हुं. वरना मुझे क्या पडी थी की तुम्हे फोन करु. लेकिन तुम तो भगवानकी आज्ञा का धिक्कार कर रहे हो. भगवानजी बार बार प्रसन्न नही होते. हम भी बार बार फोन नही करते... समझे... समझे ना? तो ज्यादा सोचो मत. उपरवालेने जो देना चाहा है उसे उपकार समझकर स्विकार करलो... समझे ना... क्या बोल रही हुं मै.. समझे ना?" 
एकंदरीत ब्लॅकमेलिंग व धमकीने भरलेला संवाद होता. मी आजवर कित्येक टेलिकॉलिंगच्या पोरींचे फोन अटेंड केले... त्यात त्यांचा सूर मार्केटींगचा असतो. पण हा फोन वेगळा होता. ही मुलगी देवाच्या नावाने थेट धमकी देण्या पर्यंत गेली. म्हणजे हा फोन टेलिमार्केटींगच्या कॅटेगिरीत बसणारा नव्हता. मग कशात बसणारा होता? खंडणी! हो खंडणी मागणा-या गुंडाच्या कॅटेगिरीतलाच होता. कारण सुरुवाती पासूनच तो संवाद दबाव वाढविणारा होता. अन मी विषय तर्कावर नेल्यावर थेट देवाच्या वतीने तिनी धमकीच सुरु केली. अन तिची बडबड सुरु झाली...
"...तुम क्या अपने आपको भगवानसे भी बडे समझते हो क्या... यंत्र बोले तो क्या आपको मजाक लगता है क्या. दो किताबे पढने से भगवान को छोटा समझने लगे हो. इतना घमेंड अच्चा नही होता... समझे ना! सुन रहे हो ना! (मी अधुन मधुन "हुं..." "हां..." करत होतो) क्या तुम सुखी हो... बताओ मुझे. तुम सुखी हो? भगवान को छोडकर कैसे कोई सुखी हो सकता है? हां... बोलो! मै तुम्हारी खुशीया चाहती हुं. और मै कोन होती हूं ये चाहने वाली. ये भगवान का आदेश है... इसलिए मै आपसे बात कर रही हुं... समझे ना आप? समझ रहे हो क्या?... सुन रहे हो क्या?.." अशी तिची अखंड धमकी चालू होती. म्हटलं आता हिला धडा शिकवलाच पाहिजे. 

माझ्यावर तिची मोहिनी चालत नाही हे कळल्यावर तिनी मला तुच्छ लेखने सुरु केले. मग काही ठेवणितली वाक्यं फेकली...


मी सगळं ऐकुन घेतलं व त्या नंतर हळूच माझा प्रस्ताव ठेवला.
अगर आप सचमुच चाहती हो की मै खुष हो जांऊ तो आप को एक रात मेरे साथ सोना पडेगा. मै पैसे भी डबल दुंगा. तो बोल राणी आज रात आओगी?”

त्या नंतर जो भडका उडाला तो सांगु शकत नाही.... प्रचंड मनोरंजन झालं. असो, मी लक्ष्मी यंत्र नाकारुन माझे १४०० रुपये वाचविले. तुम्ही पण वाचवा!

जयभीम
****

मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१३

आम्ही माडिया मधून (सरकारी सेवक)खालील उतारा ’आम्ही माडिया’ या पुस्तकातून देत आहे.

------------------------------------------------

...अजून ईकडे शिक्षण काय असतं याचा पत्ता नव्हता. नोकरी म्हणजे साक्षात इंद्र वेदांमधून प्रकट होऊन दिलेला वरदान जणू. म्हणुनच हा वरदान आपल्याला प्रत्यक्षात तर सोडाच पण स्वप्नातही मिळणार नाही याची खात्री झालेली. किंबहुना इंद्राला भामरागडचा पत्ता माहित नसल्यामुळे तो तिकडे फिरकणारच नाही यावर आम्ही सगळे ठाम. ग्रामसेवक बाबू, शिक्षक, वन अधिकारी, पोलिस व नर्स ही पाचच लोकं अख्खं सरकारी खातं सांभाळतात अशा आमच्या भाबळ्या समजूती, पण त्या समजूतींच समर्थन मात्र बिनतोड असे. या पाच पैकी सहावी आजुन कुठली नोकरी असते या गोष्टींवर आमचा अज्जीबात विश्वास नव्हता. तेंव्हा आमच्या भागात भांडण तंटे झाले की कोर्ट कचेरीची कामं करायला थेट सिरोंचा गाठावं लागत असे. आजचे चार तालुके (भामरागड, एटापल्ली, अहेरी व मुलचेरा) तेंव्हा सिरोंचा या एकाच तालुक्याच्या अंतर्गत येत असल्यामुळे त्या काळात सिरोंचा हे दंडकारण्यातील सरकारी कामकाजाचे मुख्यालय होते. मग ईथे जज असतो, तहसिलदार असतो वगैरे फक्त ऐकीव बाता होत्या, कोणी कधी प्रत्यक्ष जाऊन पाहिलेलं नव्हतं. अन असल्यासही ते बाबूचेच एक प्रकार असावेत असा अंदाज असे. कित्येकानी तर उभ्या आयुष्यात पोलिसाला सुद्धा बघितलेलं नव्हतं. अन ज्यानी बघितलं त्यांची पॅंट टरकायची... असा तो पोलिसी थाट वाटायचा... खाकीचा रुतबाच और होतो. मलासुध्दा लहानपणी पोलिस व वनरक्षक सारखेच वाटत. आज मात्र तसं नाही वाटत, कारण आज नक्षलवाद फोफावल्यामुळे नवजात शिशूची बापाची ओळख होण्या आधी पोलिसांशी गाठ पडते. हे आजच्या पोरांचं दैव की दुर्दैव ते ठरवता येण महाकठीण काम. मात्र त्या काळात बिचारे कित्येक लोकं एक साधा पोलिस न बघताच मरत होते हे मात्र नक्कीच त्यांच दुर्दैव होतं. का? कारण तो थाट बाट मिस्स व्हायचा... म्हणून....
या अशा मोजक्या सरकारी कर्मचा-यांची नावं उच्चारण आम्हाला प्रचंड चॅलेंजिग होतं. मग आम्ही त्यांचं थेट बारसं करायचो. त्याच्या गमती काहिशा अशा...
नार्सी : ( परिचारिका)
आमच्याकडे शासकीय रुग्णालयाच्या व्यतिरीक्त ग्रामपंचायत पातळीवर नर्स सेविका असतात. सुरुवातीला त्या बाईनी आपला परिचय परिचारिका असं दिलं असावं. पण ते काही आमच्या पल्ले पडत नाही हे दिसल्यावर बाईनी विंग्रजीत परिचय दिला. नर्स  हे मात्र आमच्या लोकांना एका झडक्यात पेलवलं. विंग्रजी उगीच नाही पसरली जगभर. तीच्यात एक विलक्षण लवचिकपणा आहे. मग काय आम्ही नर्स च नार्सी असं बारसं करुन टाकलं. नर्सचा पेहराव, तीच्या साडीचा पांढरा रंग, पांढराच पोलका(कारण असले कॉंबिनेशन आम्ही बाप जन्मी पाहिले नव्हते) ते ही स्वच्छ धुतलेले अन वरुन सरकारी नोकर असल्याचा तोरा याचा एकंदरीत प्रभाव असा पडत असे की नार्सी म्हणजे आम्हाला परिकथेतील रंभा, उर्वशी वाटायच्या.  गावात येऊन पाटलाच्या घरी ठाण मांडायचं अन तिथुनच प्रतिवेद (रिपोर्ट) तयार करुन पोबारा करायचा असा नार्सीचा कार्यक्रम असे. मग आम्ही लोकं जाताना किंवा येताना त्या नर्सरुपी परिकथेतील ललनाला बघुन पुढचे कित्येक महिने चकाट्या पिटायचो. ती सुंदर होती, विवाहित होती, गोरी होती, ह्यातलं काही एक पत्ता नसायचं. दुरुन चालणारी शूभ्रवस्त्रधारी नार्सी म्हणजे उर्वशी रंभा............ बास. सौंदर्य कशाला म्हणतात हे ज्याच्या त्याच्या उपलब्ध परिस्थीती नुसार ठरत असतं. आम्ही आंगावर फाटका कपडा नसणारे व नागडॆ फिरणारे रानटी... त्यामुळे नार्सी म्हणजे उगीच सुंदर वगैरे वाटायची. आमच्याकडच्या पोरी नाकी डोळी कित्येक पटीने सुंदर पण या नैसर्गिक रेखिव सौंदर्याला कृत्रीम वैभवाचा अतीव अभाव. त्यामुळे या नर्सबाई जीचा चेहराही पाहिला नाही त्या उगीच पेहरावामुळे दुरुन सुंदर वाटायच्या. अशा या नार्सिचे स्वप्न मात्र आम्ही कधीच रंगवत नसू. कारण ती आमच्यासाठी इंद्रपरी समान, त्यामूळे ती स्वप्ना पलिकडची स्त्री असे. अशा प्रकारे आम्हाला ज्ञात असलेली ही एक सरकारी सेवक.
ग्रामसेवक बाबू:
ग्रामसेवक बाबूचं मात्र उलटं होतं. त्याला स्वत:लाच त्याच्या हुद्याला विंग्रजीत काय म्हणातात हे माहित नसायचं. अन ग्राम गाळुन बाबू  तेवढ उच्चरायला आम्हाला मुळीच त्रास होत नसे. म्हणुन याचं मात्र कधीच सेकंड बारसं झालं नाही. आम्ही त्याला ईमाने इतबारे जसच्या तसं मुळ रुपात फक्त पहिला शब्द गाळुन स्विकारलं.  ग्रामसेवक बाबू ऐवजी  बाबू हे सर्वांच्या सोयीच पडलं.  या बाबूचं आगमन, त्याचा थाटमाट, पदाचा रुबाब अन एकंदरीत वागणूक म्हणजे  जणू राजाच. तो आला की गावातील पाटलानी त्याची राहायची, खायची व पिण्याची (दारु बरं का) सोय करण्याचा दंडकच असे. बाबूला नाराज करणे स्वत:वर नि गावावर संकट ओढवुन घेणे होय. तो बोट ठेवेली ती कोंबडी स्वाह, मागेल ती बाटली अर्पण म्हणेल तेवढे दिवस पाहुणचार असा हा बाबूशाही थाट असे. ग्राम सेवकाचं काम नेमकं काय असतं ते मला काल परवा पर्यंत माहित नव्हतं. पण लहान पणापासून दाखल्यासाठी तेवढी ग्रामसेवकची गरज पडायची. दाखला मागायला जाताना कोंबडी व एक बाटल दारू एवढा तो ऐवज सोबत न्यावा लागे. हे ग्रामसेवक महाशय आमच्या कुडकेल्लीत वास्तव्यास नसत. बोटनफूंडी ग्राम पंचायतच्या अंगर्गत कुडकेल्ली येत असल्यामूळे त्यांचं वास्तव्य तिकडे. अधून मधून कुडकेल्लीत चक्कर टाकायचे.  मग लोकं स्वत:च त्याना घरी बोलावून मान-पान करायचे. पण त्याच बरोबर दारु व कोंबडी न देऊ शकणा-यांचीही कामं पार पडत हे ही तेवढच सत्य आहे.
पटवारी:

आमच्या गावचा पटवारी आमच्या गावात न राहता एटापल्लीला राहात असे. त्याला यदाकदाचीत कधी आठवण झालीच की तो कुडकेल्लीचा पटवारी आहे तर तो कुडकेल्लीत बातमी पाठवुन कोतवालाला बोलावून घेई व तालूक्याच्या ठिकाणाहूनच शासकीय कामं पार पाडी. दर महिन्याला कुडकेल्लीत गेलेच पाहिजे हे बंधनकारक नसावं बहुतेक, पण पगार मात्र महिन्याला मिळत असावा असा माझा अंदाज आहे. एटापल्लीत राहुन राहुन कंटाळा आला की फेरफटका मारण्यासाठी पटवारी कुडकेल्लीत येत असे. मग तो कुडकेल्लीत आला की त्याचं जंगी स्वागत होई. पटवा-यासाठी तेंव्हा कुडकेल्लीत घर नव्हतच. मग तो पाटलाच्या घरी थांबुन दोन तीन दिवस मस्त पाहुणचार घ्यायचा. ईथेही दारु, कोंबडी असा पारंपारीक पाहुणचार होत असे. हा सर्व कार्यक्रम यथावत पार पडल्यावर मस्त खाऊन पिऊन आठवडाभर सुस्त झालेला पटवारी कुडकेल्लीचा निरोप घ्यायचा. पावसाळ्यातले चार महिने तर कुडकेल्ली हे नाव सुद्धा त्याला आठवत नसावं. दाखला बिखला लागल्यास आमची पार दमछाक होईस्तोवर कुडकेल्ली ते एटापल्ली अशी दौड मारावी लागे. यातही पहिल्या खेपेस पटवारी एटापल्लीतही भेटेलच याची खात्री नसे. तर असा हा पटवारी...
गार्दाल : (वनरक्षक)
आम्हाला न जमणा-या उच्चारांचं आम्ही लगेच बारसं करुन मोकळे होत असु हे मी वर सांगितलच आहे. त्याच प्रमाणे आजुन एक बारसं म्हणजे गार्दाल.  वनरक्षक हा पक्का पुणेरी शब्द, तो उच्चारताना आमच्या जिभेचे तुकडे पडायचे. एवढं महाभयंकर शब्द आम्ही बाप जन्मी उच्चारलेला नव्हता. परत परत विचारल्यावर वैतागलेल्या वनरक्षकानी  विंग्रजीत आपला हुद्दा सांगितला गार्ड....... फॉरेस्ट गार्ड” (बॉंड.... जेम्स बॉंड टाईप)  हे मात्र आपल्या पट्टीतलं वाटलं. आम्ही लगेच या रानातल्या बॉंडचं बारसं केलं, तेही आपल्या भाषेत अन गार्डचं गार्दा करुन मोकळे झालो. आमची हुशारी पाहुन गार्दा चॅट पडला. सतरा वेळा नावाची दुरुस्ती करत ज्ञान पाजळण्यापेक्षा गार्दा काय वाईट अशी स्वत:ची समजूत घालून या पुढे तो बिच्चारा स्वत:च आपला परिचय देताना गार्दा असं देऊ लागला. या भागातील सगळे वनरक्षक आता स्वत:ला गार्दाच म्हणतात...
आमच्या रानटी मानसातील ही वरिल दोन चार शहरी पात्रं. आमच्या लोकांत येऊन जुडवून घेताना त्यानाही अनेक अडचणी येत पण शेवटी नोकरी सोडता येत नाही या नाईलाजास्तव सरकारला शीव्या शाप देत ही लोकं अधे मधे गावातून फेर फटका मारुन आपला अधिकार बजावताना दिसत. या लोकांचं आमच्या गावात येणं म्हणजे आमच्यावर केलेले उपकार एवढच. एका अर्थी ते खरही आहे. कारण त्या रानातलं आयूष्य म्हणजे शहरी व नागरी भागातील माणसाना खरच अत्यंत बिकट व अडचणीचं आहे.

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१३

आम्ही माडिया

भामरागडच्या दंडकारण्यातील पहिली पिढी १९८० च्या दशकात शिक्षणासाठी बाहेर पडली. मी त्या पहिल्या पिढीचा प्रतिनिधी. पहिल्या पिढीतील अधिकांश मुलं ७ वी पर्यंतचं शिक्षण घेऊन पोलिस सेवेत रुजु झाली. त्या नंतर काहिनी दहावी पर्यंत शिक्षण घेऊन पोलिस व शिक्षकी पेशा धरला. एक दोन पोरं डॉक्टर झालित. मी मात्र वाणिज्य शाखेची पदवी  घेऊन पुण्यात आलो. इथे आल्यावर संजय सोनवणीशी महाजालावर ओळख झाली. मी वाचन करायचा व ब्लॉग लिहायचा. त्यानी माझ्या ब्लोगवरील गोटूलची लेखमालिका वाचली होती. त्यावर अनेक वेळा आम्ही चर्चा करायचो. अन हळूच त्यानी  पुस्तक लिहण्याचा किडा माझ्या डोक्यात सोडला...  मग निव्वड आठवणी म्हणून लिहलेल्या त्या ब्लॉग पोस्टची परत जुडवा जुडव करुन एका क्रमाने मांडायची सुरुवात झाली. पहिला कच्चा खर्डा तयार करुन सोनवणींकडे सुपुर्द केल्यावर किमान पाच वेळातरी त्यानी तो बदलवुन घेतला... त्यानी स्वत: ही अनेक वेळा तो ड्राफ्ट वाचला व काही बदल सुचविले. अशा प्रकारे अनेक कसरती करुन त्या ब्लॉगच्या पोस्टची शेवटी एका क्रमात मांडणी झाली...
त्या नंतर सुरु झाली कसरत ती प्रकाशक शोधण्याची. मग काही दिवस प्रकाशक शोधण्यात गेले. अखेर प्रकाशक भेटला व दोन महिन्यात होकारही दिला. त्या नंतर अजुन काही महिने लोटले व एकदाची कामाला सुरुवात झाली. इथवर लेखक म्हणून मजा वाट्त होती. पण इथून सुरु होते ती शिक्षा... आपणच लिहलेला ड्राफ्ट आपणच पुन्हा पुन्हा वाचणे ही लेखकाला प्रकाशकानी दिलेली शिक्षा असते. पुस्तक हातात येईस्तोवर ही शिक्षा कितीही वेळा भोगावी लागते. परत परत वाचने... लहानशी चूक शोधण्यासाठी वाचणे... विषयाची सलगी तपासण्यासाठी वाचणे... क्रमवारीत काही बदल करावा का? यासाठी वाचने... असे अने वाचने करताना लेखक रडकुंडीला येतो. या सगळ्या दिव्यातून गेल्यावर अखेर माझे पुस्तक बाजारात येण्यासाठी तयार झाले आहे.

मी जरी हे पुस्तक लिहले असले तरी हे पुस्तक लिहण्याची प्रेरणा मात्र संजय सोनवणी यांचीच... त्यामुळे संजय सोनवणी यांचा आभारी आहे.ऑनलाईन खरेदीसाठी खालील धाग्यावर जा...

पुस्तक जत्रा या साईटवरुन ऑनलाईन खरेदी करु शकता

-----------------------------------

प्रकाशकाचा पत्ता व संपर्क क्रमांक

समकालीन प्रकाशन.(पुणे)
८ अमित कॉंप्लेक्स, ४७४, सदाशिवपेठ,
न्यू इंग्लिश स्कूल समोर, टिळक रोड,
पुणे-४११ ०३०
संपर्क:- ०२०-२४४७ ०८९६

समकालीन प्रकाशन.(मुंबई)
१०६, प्रसन्न अपार्टमेंट, कबुतरखान्या जवळ,
भवानी शंकर रोड, दादर(प),
मुंबई-४०० ०२८
संपर्क:- ०२२-२४३१ १३९८मित्रानो...

आपल्याला पुस्तक हवे असल्यास जरुर संपर्क करा.

एम. डी. रामटेके
 ---------
टीप: पहिल्या पुस्तकाच्या वेळी अनेकाना मी भेट म्हणून प्रती दिल्या होत्या. मैत्री खातर अनेकाना ते वाचने व प्रतिसाद देणे बंधनकारक बनले. काही दिवसा नंतर ही कुजबुज माझ्या कानावर आली. त्यामुळे या वेळी मी कोणालाही भेट म्हणून पुस्तक देत नाहीये. 
कृपया गैरसमज नसावा.