मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१३

आम्ही माडिया मधून (सरकारी सेवक)खालील उतारा ’आम्ही माडिया’ या पुस्तकातून देत आहे.

------------------------------------------------

...अजून ईकडे शिक्षण काय असतं याचा पत्ता नव्हता. नोकरी म्हणजे साक्षात इंद्र वेदांमधून प्रकट होऊन दिलेला वरदान जणू. म्हणुनच हा वरदान आपल्याला प्रत्यक्षात तर सोडाच पण स्वप्नातही मिळणार नाही याची खात्री झालेली. किंबहुना इंद्राला भामरागडचा पत्ता माहित नसल्यामुळे तो तिकडे फिरकणारच नाही यावर आम्ही सगळे ठाम. ग्रामसेवक बाबू, शिक्षक, वन अधिकारी, पोलिस व नर्स ही पाचच लोकं अख्खं सरकारी खातं सांभाळतात अशा आमच्या भाबळ्या समजूती, पण त्या समजूतींच समर्थन मात्र बिनतोड असे. या पाच पैकी सहावी आजुन कुठली नोकरी असते या गोष्टींवर आमचा अज्जीबात विश्वास नव्हता. तेंव्हा आमच्या भागात भांडण तंटे झाले की कोर्ट कचेरीची कामं करायला थेट सिरोंचा गाठावं लागत असे. आजचे चार तालुके (भामरागड, एटापल्ली, अहेरी व मुलचेरा) तेंव्हा सिरोंचा या एकाच तालुक्याच्या अंतर्गत येत असल्यामुळे त्या काळात सिरोंचा हे दंडकारण्यातील सरकारी कामकाजाचे मुख्यालय होते. मग ईथे जज असतो, तहसिलदार असतो वगैरे फक्त ऐकीव बाता होत्या, कोणी कधी प्रत्यक्ष जाऊन पाहिलेलं नव्हतं. अन असल्यासही ते बाबूचेच एक प्रकार असावेत असा अंदाज असे. कित्येकानी तर उभ्या आयुष्यात पोलिसाला सुद्धा बघितलेलं नव्हतं. अन ज्यानी बघितलं त्यांची पॅंट टरकायची... असा तो पोलिसी थाट वाटायचा... खाकीचा रुतबाच और होतो. मलासुध्दा लहानपणी पोलिस व वनरक्षक सारखेच वाटत. आज मात्र तसं नाही वाटत, कारण आज नक्षलवाद फोफावल्यामुळे नवजात शिशूची बापाची ओळख होण्या आधी पोलिसांशी गाठ पडते. हे आजच्या पोरांचं दैव की दुर्दैव ते ठरवता येण महाकठीण काम. मात्र त्या काळात बिचारे कित्येक लोकं एक साधा पोलिस न बघताच मरत होते हे मात्र नक्कीच त्यांच दुर्दैव होतं. का? कारण तो थाट बाट मिस्स व्हायचा... म्हणून....
या अशा मोजक्या सरकारी कर्मचा-यांची नावं उच्चारण आम्हाला प्रचंड चॅलेंजिग होतं. मग आम्ही त्यांचं थेट बारसं करायचो. त्याच्या गमती काहिशा अशा...
नार्सी : ( परिचारिका)
आमच्याकडे शासकीय रुग्णालयाच्या व्यतिरीक्त ग्रामपंचायत पातळीवर नर्स सेविका असतात. सुरुवातीला त्या बाईनी आपला परिचय परिचारिका असं दिलं असावं. पण ते काही आमच्या पल्ले पडत नाही हे दिसल्यावर बाईनी विंग्रजीत परिचय दिला. नर्स  हे मात्र आमच्या लोकांना एका झडक्यात पेलवलं. विंग्रजी उगीच नाही पसरली जगभर. तीच्यात एक विलक्षण लवचिकपणा आहे. मग काय आम्ही नर्स च नार्सी असं बारसं करुन टाकलं. नर्सचा पेहराव, तीच्या साडीचा पांढरा रंग, पांढराच पोलका(कारण असले कॉंबिनेशन आम्ही बाप जन्मी पाहिले नव्हते) ते ही स्वच्छ धुतलेले अन वरुन सरकारी नोकर असल्याचा तोरा याचा एकंदरीत प्रभाव असा पडत असे की नार्सी म्हणजे आम्हाला परिकथेतील रंभा, उर्वशी वाटायच्या.  गावात येऊन पाटलाच्या घरी ठाण मांडायचं अन तिथुनच प्रतिवेद (रिपोर्ट) तयार करुन पोबारा करायचा असा नार्सीचा कार्यक्रम असे. मग आम्ही लोकं जाताना किंवा येताना त्या नर्सरुपी परिकथेतील ललनाला बघुन पुढचे कित्येक महिने चकाट्या पिटायचो. ती सुंदर होती, विवाहित होती, गोरी होती, ह्यातलं काही एक पत्ता नसायचं. दुरुन चालणारी शूभ्रवस्त्रधारी नार्सी म्हणजे उर्वशी रंभा............ बास. सौंदर्य कशाला म्हणतात हे ज्याच्या त्याच्या उपलब्ध परिस्थीती नुसार ठरत असतं. आम्ही आंगावर फाटका कपडा नसणारे व नागडॆ फिरणारे रानटी... त्यामुळे नार्सी म्हणजे उगीच सुंदर वगैरे वाटायची. आमच्याकडच्या पोरी नाकी डोळी कित्येक पटीने सुंदर पण या नैसर्गिक रेखिव सौंदर्याला कृत्रीम वैभवाचा अतीव अभाव. त्यामुळे या नर्सबाई जीचा चेहराही पाहिला नाही त्या उगीच पेहरावामुळे दुरुन सुंदर वाटायच्या. अशा या नार्सिचे स्वप्न मात्र आम्ही कधीच रंगवत नसू. कारण ती आमच्यासाठी इंद्रपरी समान, त्यामूळे ती स्वप्ना पलिकडची स्त्री असे. अशा प्रकारे आम्हाला ज्ञात असलेली ही एक सरकारी सेवक.
ग्रामसेवक बाबू:
ग्रामसेवक बाबूचं मात्र उलटं होतं. त्याला स्वत:लाच त्याच्या हुद्याला विंग्रजीत काय म्हणातात हे माहित नसायचं. अन ग्राम गाळुन बाबू  तेवढ उच्चरायला आम्हाला मुळीच त्रास होत नसे. म्हणुन याचं मात्र कधीच सेकंड बारसं झालं नाही. आम्ही त्याला ईमाने इतबारे जसच्या तसं मुळ रुपात फक्त पहिला शब्द गाळुन स्विकारलं.  ग्रामसेवक बाबू ऐवजी  बाबू हे सर्वांच्या सोयीच पडलं.  या बाबूचं आगमन, त्याचा थाटमाट, पदाचा रुबाब अन एकंदरीत वागणूक म्हणजे  जणू राजाच. तो आला की गावातील पाटलानी त्याची राहायची, खायची व पिण्याची (दारु बरं का) सोय करण्याचा दंडकच असे. बाबूला नाराज करणे स्वत:वर नि गावावर संकट ओढवुन घेणे होय. तो बोट ठेवेली ती कोंबडी स्वाह, मागेल ती बाटली अर्पण म्हणेल तेवढे दिवस पाहुणचार असा हा बाबूशाही थाट असे. ग्राम सेवकाचं काम नेमकं काय असतं ते मला काल परवा पर्यंत माहित नव्हतं. पण लहान पणापासून दाखल्यासाठी तेवढी ग्रामसेवकची गरज पडायची. दाखला मागायला जाताना कोंबडी व एक बाटल दारू एवढा तो ऐवज सोबत न्यावा लागे. हे ग्रामसेवक महाशय आमच्या कुडकेल्लीत वास्तव्यास नसत. बोटनफूंडी ग्राम पंचायतच्या अंगर्गत कुडकेल्ली येत असल्यामूळे त्यांचं वास्तव्य तिकडे. अधून मधून कुडकेल्लीत चक्कर टाकायचे.  मग लोकं स्वत:च त्याना घरी बोलावून मान-पान करायचे. पण त्याच बरोबर दारु व कोंबडी न देऊ शकणा-यांचीही कामं पार पडत हे ही तेवढच सत्य आहे.
पटवारी:

आमच्या गावचा पटवारी आमच्या गावात न राहता एटापल्लीला राहात असे. त्याला यदाकदाचीत कधी आठवण झालीच की तो कुडकेल्लीचा पटवारी आहे तर तो कुडकेल्लीत बातमी पाठवुन कोतवालाला बोलावून घेई व तालूक्याच्या ठिकाणाहूनच शासकीय कामं पार पाडी. दर महिन्याला कुडकेल्लीत गेलेच पाहिजे हे बंधनकारक नसावं बहुतेक, पण पगार मात्र महिन्याला मिळत असावा असा माझा अंदाज आहे. एटापल्लीत राहुन राहुन कंटाळा आला की फेरफटका मारण्यासाठी पटवारी कुडकेल्लीत येत असे. मग तो कुडकेल्लीत आला की त्याचं जंगी स्वागत होई. पटवा-यासाठी तेंव्हा कुडकेल्लीत घर नव्हतच. मग तो पाटलाच्या घरी थांबुन दोन तीन दिवस मस्त पाहुणचार घ्यायचा. ईथेही दारु, कोंबडी असा पारंपारीक पाहुणचार होत असे. हा सर्व कार्यक्रम यथावत पार पडल्यावर मस्त खाऊन पिऊन आठवडाभर सुस्त झालेला पटवारी कुडकेल्लीचा निरोप घ्यायचा. पावसाळ्यातले चार महिने तर कुडकेल्ली हे नाव सुद्धा त्याला आठवत नसावं. दाखला बिखला लागल्यास आमची पार दमछाक होईस्तोवर कुडकेल्ली ते एटापल्ली अशी दौड मारावी लागे. यातही पहिल्या खेपेस पटवारी एटापल्लीतही भेटेलच याची खात्री नसे. तर असा हा पटवारी...
गार्दाल : (वनरक्षक)
आम्हाला न जमणा-या उच्चारांचं आम्ही लगेच बारसं करुन मोकळे होत असु हे मी वर सांगितलच आहे. त्याच प्रमाणे आजुन एक बारसं म्हणजे गार्दाल.  वनरक्षक हा पक्का पुणेरी शब्द, तो उच्चारताना आमच्या जिभेचे तुकडे पडायचे. एवढं महाभयंकर शब्द आम्ही बाप जन्मी उच्चारलेला नव्हता. परत परत विचारल्यावर वैतागलेल्या वनरक्षकानी  विंग्रजीत आपला हुद्दा सांगितला गार्ड....... फॉरेस्ट गार्ड” (बॉंड.... जेम्स बॉंड टाईप)  हे मात्र आपल्या पट्टीतलं वाटलं. आम्ही लगेच या रानातल्या बॉंडचं बारसं केलं, तेही आपल्या भाषेत अन गार्डचं गार्दा करुन मोकळे झालो. आमची हुशारी पाहुन गार्दा चॅट पडला. सतरा वेळा नावाची दुरुस्ती करत ज्ञान पाजळण्यापेक्षा गार्दा काय वाईट अशी स्वत:ची समजूत घालून या पुढे तो बिच्चारा स्वत:च आपला परिचय देताना गार्दा असं देऊ लागला. या भागातील सगळे वनरक्षक आता स्वत:ला गार्दाच म्हणतात...
आमच्या रानटी मानसातील ही वरिल दोन चार शहरी पात्रं. आमच्या लोकांत येऊन जुडवून घेताना त्यानाही अनेक अडचणी येत पण शेवटी नोकरी सोडता येत नाही या नाईलाजास्तव सरकारला शीव्या शाप देत ही लोकं अधे मधे गावातून फेर फटका मारुन आपला अधिकार बजावताना दिसत. या लोकांचं आमच्या गावात येणं म्हणजे आमच्यावर केलेले उपकार एवढच. एका अर्थी ते खरही आहे. कारण त्या रानातलं आयूष्य म्हणजे शहरी व नागरी भागातील माणसाना खरच अत्यंत बिकट व अडचणीचं आहे.

1 टिप्पणी:

  1. It is touching, informative, and funny.
    It only shows how our traditional social system (aka caste system) split people into totally different life style

    उत्तर द्याहटवा