गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१३

प्रकाशन सोहळ्याचे निमंञन

सर्वाना अगत्याचे निमंञन!
ब्लोल पोस्ट म्हणून केलेले लिखाण पुस्तक रुपात प्रकाशित होताना पाहण्याचा आनंदच निराळा. 'गोटूल' नावांनी एक लेखमालिका ब्लोगवर लिहिली होती. नेटवरील वाचकांनी खूप प्रशंसा केली. ते सर्व  लिखाण आता पुस्तक रूपातून प्रकाशित होत आहे. २४ नोव्हेंबर २०१३ ला प्रकाशन सोहळा आहे. ब्लोगचे वाचक व इतर सर्व मित्रांना अगत्याचे निमंत्रण. कार्यक्रमाला नक्की या!

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१३

HOPE - अमोल साईनवारही गोष्ट आहे राजुराच्या एका शाळेतील. सन १९९६ चा उन्हाळा सुरु झाला. नुकतीच बाराविची परिक्षा संपल्यामुळे सगळ्याना सुट्ट्यांचे डोहाळे लागले. प्रत्येक जण सुट्ट्या घालवायला निघाला. तेंव्हा सुट्ट्यां घालविण्याचा प्रकार हा आज इतका बोकाळलेला नसला तरी शेवट्टी सुट्टी ती सुट्टी... सुट्टीचं आकर्षण नाही असा विध्यार्थी नाही.  ज्याची जशी कुवत त्याची तशी सुट्टी... पण सुट्टी मात्र ठरलेली. वर्षभर बारावीचा अभ्यास केल्यामुळे घरातही केवढं कौतूक... त्यातल्या त्यात मामाच्या गावाला जाणा-याचा भरणा अधिकच. गावातली पोरं आपापल्या बॅगा भरुन सुट्ट्यावर निघालीत. बस्टॅंडवर पोरांची व पालकांची गर्दी दिसू लागली. रोज कोणी ना कोणी सुट्टीवर जाताना दिसू लागला. हा हा म्हणता गावातली सगळीच पोरं सुट्टीवर गेली. पण एक पोरगं मात्र अगदी या सगळ्याच्या विसंगत वागत होता. तो सुट्टीवर जाणार नव्हता. तर तो कामाच्या शोधात होता. अगदी बाल वयातच ज्यानी कमवा आणि शिका हा सिद्धांत स्विकारला हा तो विध्यार्थी होता. हाच तो ज्यानी पुढे राजुरा भागात गरीब पण हुशार विध्यार्थ्यांसाठी HOPE निर्माण केली.
तर...
ही सगळी पोरं जेंव्हा सुट्टीवर जाण्यासाठी बॅगा भरत होती तेंव्हा हा मुलगा मात्र रस्तो रस्ती नोकरी शोधत हिंडत होता. त्या काळात गल्लो गल्ली टेलिफोन बूथ असायचे. सगळ्यात सोपी नोकरी या अशा बुथमध्ये मिळायची. त्याच्या पाठोपाठ कपड्याच्या दुकानात नोक-या मिळायच्या... शिकणारी पण गरीब घरातली पोरं उन्हाळ्यात ही असली काम करुन दोन पैसे साठवायची. जेंव्हा त्यांचे इतर मित्र सुट्ट्यांचा उपभोग घेत असत, आजचा क्षण तेवढा जगत असत तेंव्हा त्याच वयाची गरीब पोरं मात्र भविष्याची तजविज करण्यात गर्क असत. एकाच वयातील ही वैचारीक विसंगती अवाक करणारी आहे. ती कोणाच्या लेखणीतून त्यावढ्या प्रभाविपण उतरत नाही ही गोष्ट मात्र दुर्दैव! तर सुट्ट्यांमध्ये गरीबांची पोरं अशी राब-राब राबायची. अन एकदा जून उजाडला की याच साठवलेल्या पैशातून शाळेची खरेदी करत विद्यार्जनासाठी शाळेत दाखल व्हायची.  
...तर आज हा मुलगा अशाच कामाच्या शोधात होता. समान वयातील दोन वैचारीक टोकांचा हा एक टोक होता. तो परिस्थीतीने घडवून आणलेला नि विवेकाची देण असलेला टोक होता.
हा हा म्हणता राजूराभर हिंडुन झालं अन कामही मिळालं.
कुठे मिळालं?
न्यू केरला टायर, राजुरा येथे काम मिळालं.
काम काय होतं?
टायर बदलविणारा ऑपरेटर!
कुठल्याही कामाकडॆ पाहण्याचे दोन दृष्टिकोन असू शकतात. एक म्हणजे कामाला साध्य मानणारं व दुसरं म्हणजे कामाला साधन मानणारं. कामाला साध्य मानणा-यांचं काम बोंबलतं. पण जे कामाला साधन मानतात त्यांच्या नजरेत त्यांचं ध्येय साठलेलं असतं. हा असाच एक झपाटलेला ध्येयवेडा होता. त्यानी अत्यंत आनंदाने ही नोकरी धरली. सोबतची मुलं जेंव्हा सुट्ट्या घालवत होती तेंव्हा हा मुलगा मात्र टायरच्या राबत होता. करणार तरी काय? वयाच्या आठव्या वर्षी वडील वारले. घरची परिस्थीती बेताचीच. शिक्षण शिकून मोठं व्हायचं याची मनोमनी शपथ घेतलेली. काही झाले तरी परिस्थीतीवर मात करायची अशी प्रतिज्ञाच जणू ती... समज येण्याचं खरतर वय नसतच. परिस्थीतीची जाणीव झाली व त्या परिस्थीतीशी झगडा करायची तय्यारी केली की समज आपोआप आकार घेत जातो. त्यासाठी मग वयाची गरज अजिबात नसते. हीच माणसे पुढे ध्येयनिष्ठ व यशस्वी व्यक्ती म्हणून समाजात नावलौकिकास येतात. पण अगदी याच्या उलटाही होतं. तुम्हाला परिस्थीतीची जाणीव झाली पण लढाऊपणा नसला की तुम्ही लढण्या आधीच हरता. लढाऊपणाच्या अभावातून तुम्ही परिस्थीतीशी झगडा मांडायचा विचार सोडला... तर मात्र तुमचं अस्तीत्व काळाच्या वादळात गाडल्या जातं. हाच गट पुढे समाजात उदासीन व नाकर्ता म्हणून ओळखला जातो. फक्त एका गोष्टीच्या अभावातून दोन परस्पर विसंगत समाजाची निर्मीती होते... ती म्हणजे लढाऊपणा! अत्यंत महत्वाचा गुण...!
मी ज्या मुलाची गोष्ट सांगतो आहे तो लढाऊ होता. काही झाले तरी परिस्थीतीवर मात करायचीच हे ठरवून टाकलेला. स्वभावने अत्यंत मृदू पण निश्चयाने मात्र कणखर. जोडीला कठोर परिश्रम हा निसर्गदत्त गुण लाभलेला. वयाच्या आठव्या वर्षी लर्न एन्ड अर्न तत्वावर शिक्षण सुरु केले. वडील वारले म्हणून रडत बसला नाही... वा शिक्षण सोडले नाही. पडेल ते काम करत शिक्षण सुरु ठेवले. हा हा म्हणता आज १२वी ची परिक्षा देऊन टायरच्या दुकानात दाखल झाला होता. अन पगार होता रु. १५००/- प्रतिमाह. मन लावून काम करणे सुरु झाले. सुरुवातीचे काही दिवस हे काम अत्यंत कष्टाचे वाटले. पण नंतर त्याची सवय झाली. हा हा म्हणता दोन-अडीच महिने उलटले. अन एक दिवस तिकडे १२वी चा निकाल लागला. कामावरुन सुट्टी घेतली व धावत धावत जाऊन निकाल बघितला. ७८% गुण मिळाले होते. मार्कशीटला छातीशी कवटाळून काही मिनीट शांत डोळे मिटून घेतले. हा अत्यंत आनंदाचा क्षण होता. कारण तो महाविद्यालयातून प्रथम आला होता... एवढच नव्हे तर तालूक्यातूनही प्रथम क्रमांक पटकाविला होता.  संपुर्ण राजु-यात त्याचं कौतूक सुरु झालं. सर्वत्र एकच नावाची चर्चा सुरु झाली... ते नाव होतं अमोल साईनवार.  पडेल ते काम करुन शिकणारा हा अमोल साईनवार आज राजू-याच्या प्रत्येक शाळेत चर्चेचा विषय होता. हा क्षण त्याच्यासाठी अभूतपुर्व होता. अत्यंत खडतर प्रवास व विपरीत परिस्थीतीवर मात करुन मिळविलेले हे गूण दैवी अनुभूतिंच्या पलिकडील आनंद देत होते.  आईच्या पायावर मार्कशीट ठेवून आशिर्वाद घेताना चमकलेले तीचे डोळे हा तर त्याही पलिकडची अनुभूती देणार क्षण... एकाच दिवसात किती किती आनंदाचे क्षण. वडील गेल्या पासून आजवर तिचे डोळे कधी एवढे चमकलेले पाहिले नव्हते. आपल्या या यशातून आई एवढी सुखावली याचा झालेला अभिमानही काही औरच होता...
पण...
दोन दिवसात या आनंदावर विरजण घालणा-या घडामोडी सुरु झाल्या. बारावीचा निकाल आल्यावर सुरु झाली ती म्हणजे उच्च शिक्षणाच्या प्रवेशाची घाई.  ज्याला अमोलपेक्षा कमी गुण होते अशी पोरं इंजिनिअरीग व मेडीकलसाठी अर्ज भरू लागली. हा मात्र कुठे अर्ज भरावा या संभ्रमावस्थेतच. नंबर लागणार की नाही याची भीती नव्हती, तर प्रवेश मिळवून शिकणार कसं? हा यक्षप्रश्न होता. टायरच्या दुकानात काम करुन तीन हजार रुपये साठविले होते.  एक मित्र राजू-यावरुन चंद्रपूरला निघाला होता. त्याच्या हातात १२०० ठेवले व प्रोस्पेक्टस आणायला सांगितलं.  मेडीकल, इंजिनिअरींग व डी.एड. अशी तिन्ही ठिकाणी अर्ज भरला.
 डी. एड.ची यादी लागली तेंव्हा सर्वात प्रथम याचंच नावं होतं.  त्याच बरोबर इंजिनिअरींगचीही यादी लागली. सीईसी, चंद्रपूरमध्ये ३०% कोट्यातून नंबर लागला होता.
इंजिनिअरींगसाठी  रु. ५३५०/- एवढी फी भरावी लागणार होती तर डी. एड. साठी रु. १०००/-. अन बचत केलेली एकुण रक्कम होती १२००/- म्हणजे इंजिनिअरींग काही जमणार नव्हतं. म्हणजे उरला तो डी. एड.
तसं हा पठ्ठा स्वभावाने शिक्षकच. वरील सगळी कामं सांगताना अजुन एक काम सांगायचं राहून गेलं. १२वी चा निकाल लागला तेंव्हा याच्याकडॆ वेगवेगळ्या शिकवण्या मधून शिकविण्याचा एकुण ५ वर्षाचा अनुभव होता.  त्यामुळे तसं हे क्षेत्र आवडीचच... मग काय याने कुठल्यातरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  शिक्षक म्हणून जायचं ठरवून टाकलं.
अन तिकडे कॉलेजात शिक्षकांच्या कानावर ही बातमी गेली.  प्रा. पोतनुरवार व प्रा. धवस अमोलच्या घरी धावले. हा पट्ठा मस्तपैकी शिक्षकी पेशाचे स्वप्न रंगवत बसला होता. कारण डी. एड. ला तर नंबर लागलाच होता. आता फक्त फीज भरून दोन वर्षात पदवी मिळविली की झालं या विचारात होता.  दारावर थाप पडली. यानी दार उघडून पाहिले तर दारात शिक्षक उभे. गुरुजनांचा स्वागत केलं.
“अमोल, हे काय ऐकतोय आम्ही?” सरानी विचारलं "म्हणे तु डी. एड. ला प्रवेश घेणारेस?"
“हो सर मी डी. एड. करण्याचं ठरवलं आहे” अमोलचे शब्द ऐकुन शिक्षक उडालेच. एक अत्यंत हुशार, विनम्र व कष्टाळू विध्यार्थी जो अमर्याद बुद्धीमत्तेचा धनी होता तो प्रायमरी शिक्षकाच्या वाटॆवर निघाला हे त्याना अजिबात आवडलेलं नव्हतं. हा गरीब होता हे त्याना माहीत होतं पण पडेल ते काम करणारा असल्यामुळे त्याची ही बाजू तेवढी महत्वाची आहे हे आजवर तरी जाणवलं नव्हतं. वा यानी तसं जाणवू दिलं नव्हतं. पण आज मात्र ती बाजू  शिक्षणाच्या एकुण ग्राफवर ठसठशीत उमटली होती.  त्यामुळे थोडावेळ शिक्षकही गोंधळले. पण लगेच स्वत:ला सावरत त्यानी अमोलची समजूत घालायला सुरुवात केली. डी.एड. निवडण्याची एकुण भुमिका समजावून घेतल्या नंतर शिक्षकांच्या लक्षात आलं की फक्त पैशाच्या अभावामुळे एक प्रतिभावंत विध्यार्थ्याची धुळधाण होणार होती. “नाही अमोल... आम्ही असं नाही होऊ देणार. काही तरी मार्ग नक्की निघेल. चल तू आमच्या सोबत” अन ते दोघे अमोलला घेऊन कॉलेजच्या प्रिन्सिपॉलकडॆ निघाले. प्रिन्सिपॉलनी संपुर्ण माहिती ऐकून घेतल्यावर एकच प्रश्न विचारला...
“अमोल, इंजिनिअरींगसाठी तुला किती पैसे लागणार आहेत?” त्यांच्या स्वरात ठामपणा होता. ती निव्वड केलेली चौकशी नव्हती तर आकडा ऐकुन जमेल तेवढी वा कुवती प्रमाणे मदत देण्याची जणू हमी होती. “ सर ४०००/- रुपयाची गरज आहे” अमोलच्या तोंडचं वाक्य संपायच्या आता प्रिन्सिपॉल म्हणाले “२०००/- मी दिले”  प्रिन्सिपालनी त्यांच्या परीने काय शक्य आहे ते सांगून टाकल्यावर ही टीम सामाजीक कार्यकर्ते श्री. चिल्लावर व शशिकांत यांच्याकडे थडकली. उरलेल्या दोन हजाराची सोय ईथून झाली. अन अमोलचं इंजिनिअरीगच शिक्षण सुरु झालं.
चंद्रपुरला राहून शिकताना फीजचा प्रश्न मिटला होता, पण पैशाची चणचण भासत असे. मग पहिलं वर्ष तेवढं अडचणीत काढलं. दुस-या वर्षापासून याच्या शिकवण्या सुरु....
हा हा म्हणता चार वर्ष कशी गेली कुणाला कळलच नाही. शेवटच्या वर्षाला विद्यापिठातून क्रमांक पटकावला. त्या नंतर सुरु झाली नोकरी. सीपला सारख्या नावाजलेल्या कंपनीत दाखल झाला. अनेक महत्वाच्या प्रोजेक्ट्स्वर काम केल्यावर कंपनीने विदेशात संधी दिली. काही वर्षे विदेशात वास्तव्य करुन अमोल मुंबईत परतला...आता त्याची नोकरी व्यवस्थीत सुरु आहे.
तर हा झाला त्याच्या आयुष्याचा सारांश...पण समाजाचं देण लागतो ही भावना त्याला स्वस्थ बसू देईना. आपल्या आयुष्याची घडी नीट बसली हे पक्क झाल्यावर Pay Back to Society ही अवस्था सुरु झाली...
.
.
अत्यंत बिकट परिस्थीतून पुढे येताना कित्तेकानी हातभार लावला अन आज अमोल एक  यशस्वी इंजिनिअर आहे. स्वत: हालाखीच्या परिस्थीतून गेल्यामुळे त्याला गरीबीचे चटके तर माहीत आहेतच, पण त्याच बरोबर फक्त पैशाच्या अभावामुळे कशी एखाद्या हुशार विध्यार्थ्याची राख रांगोळी होऊ शकते याचा निसटता अनुभव त्यालाही आलाच.  यातूनच त्यानी एक निश्चय केला की आपल्या आसपासच्या लोकामंधील कोणताही गुणी विध्यार्थी फक्त पैशाच्या अभावामुळे मागे राहू नये. आपण अशा हुशार पण गरीब विध्यार्थ्याना शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवायची. त्यांचं आयुष्य उभं करायचं व समाजाला व देशाला पछाडणा-या अविध्येचा प्रश्न जमेल त्या मार्गानी निकाली काढायचं. नव्या पिढीतील हुशार विध्यार्थ्यांना घडविण्याच्या कार्यात  जमेल तेवढं योगदान द्यायचं हा निश्चच केला. अन यातूनच जन्म झाला होपचा.  HOPE (Help Our People for Education). होप ही अमोल साईनवारनी २००७ मध्ये स्थापन केलेली संस्था आहे. ही संस्था हुशार पण गरीब विध्यार्थ्याना शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरविते. आजवर अनेक विध्यार्थी या संस्थेतून मदत घेऊन पुढे गेले. अमोलनी एकट्यानी स्थापन केलेल्या या संघटनेत अनेक लोकं जुळत गेली. विदर्भातील अनेक वृत्तपत्रानी याची दखल घेत अमोलच्या कार्याची स्तूती केली...

होप बद्दल पुढच्या भागात लिहतो...!

***