बुधवार, ११ डिसेंबर, २०१३

समलिंगी संबंध !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी समलिंगींच्या विवाहांबद्दलच्या विधानामुळे हा विषय अधिकच चर्चेत आला असला तरी २००५ मद्धे जेंव्हा मानवेंद्र सिंग गोहील या राजपुत्राने आपल्या देशात प्रथमच आपण "गे" असल्याचे जाहीर केले तंव्हापासुन या विषयाला प्रथमच जाहीर तोंड फुटले. आता समलिंगी (सम-रती) आपल्या हक्कांसाठी आंदोलनेही करत आहेत. आंतरजालीय संस्थळांवर या विषयावर खडाजंग्या घडत आहेत. या विषयाच्या नैतीक, सांस्कृतीक, कायदेशीर, वैद्यकीय इ. पैलुंवर अथक चर्चा घडत आहेत. पुर्वी या विषयावर तोंड उघडणेही अशक्यप्राय होते. भारतात समलिंगी मंडळी आपण "तसे आहोत" हे सांगायची हिम्मत करत नव्हते. परंतु आता ते तोंड उघडु लागले आहेत, न्यायालयाचे दरवाजे आपल्या हक्कांसाठी ठोठावू लागले आहेत. जाहीरपणे मुलाखती देवु लागले आहेत...त्यामुळे संस्कृती रक्षकांचीही पंचाईत झाली आहे. भारतीय संस्कृती रसातळाला जात आहे असा त्यांचा आक्रोश आहे. समलैंगिकता ही विकृतीच असून समाजव्यवस्था यामुळे कोसलेल असा यांचा दावा असतो. त्याचवेळीस, अशा व्यक्तींची घृणा वाटली तरी त्यांच्याकडे मानवतेच्या दृष्टीकोनातुन पहावे, त्यांच्या विवाहाला कायदेशीर मान्यता द्यावी असे म्हणनाराही मोठा वर्ग आहे.

 सामाजिक निषिद्धांत समलिंगी संबंध ठेवणे हे गंभीर पातक गणले गेले असले तरी भारतातील निषिद्ध संभोगाची परंपरा पुरातन आहे हे खुद्द धर्मशास्त्रे, पुराणकथा, महाकाव्ये, कामशास्त्रे, विविध शिल्पे (खजुराहो) व चित्रांमधुनही दिसून येते. निषिद्ध संभोगांत समलिंगी, अन्य-प्राणी संभोग, मुख वा पार्श्व-संभोग व क्लीबांशी केलेला संभोग प्रामुख्याने येतात. या सर्व प्रकारचे संबंध विपुल प्रमाणावर होते. मनुस्म्रुतीने स्त्रीने स्त्रीशी संभोग केला तर तिला चाबकाचे दहा फटके मारावेत व तिच्याकडुन दुप्पट वधुमुल्य वसुल करावे व समजा वयाने मोठ्या स्त्रीने कुमारिकेशी संबंध ठेवला तर तात्काळ तिचे केशवपन करुन तिची गाढवावरुन धिंड काढावी आणि हाताची बोटे कापुन टाकावी असे आदेश दिलेले आहेत. नारदस्मृतीही असेच निर्देश पुरुषांबाबत देते. असे नियम स्मृतीकारांना बनवावे लागले याचा अर्थ तो समाजातील एक प्रचलित भाग होता. आजपर्यंत तो अव्याहत चालु राहिला आहे, परंतु याबाबतीत गौप्य बाळगण्याच्या (लज्जेपोटी, समाजबहिष्कृततेच्या भयापोटी) प्रवृत्तीने काही जगजाहीर नाही म्हणुन याबाबत आपण फार सोवळे आहोत आणि पाश्चात्य जगच काय ते पापांच्या दलदलीत फसत चालले आहे असा भ्रम बाळगण्याचे कारण नाही.

समलिंगी संबंध फक्त मानवप्राण्यांत आहेत असे नाही. जगातील बव्हंशी प्राणी-पक्षी व जलचर जगतातही द्वै-लिंगी संबंध (समलिंगी व विभिन्नलिंगी) ठेवले जातात. यात बदके, कबुतरे, पेंग्वीन, डाल्फिन, सिंह, हत्ती, रानरेडे, जिराफ सरडे, घोरपडी इ. सर्वच आले. अर्थात त्यामागील कार्यकारण भाव आणि मानवी कारणभाव यात फरक आहे हे नक्कीच. पण पशुजगतही या प्रकारच्या संबंधांपासुन मुक्त नाही. किंबहुना नैसर्गिक कारणांमुळे निर्माण होणारी गरज आहे.

ही विकृती आहे काय?

निसर्गत: प्रत्येक पुरुषात थोडा स्त्रीचा तर प्रत्येक स्त्रीत थोडा पुरुषाचा अंश असतोच परंतु भोजनात मीठ असते तेवढ्याच प्रमाणात. त्यामुळेच मैत्री, स्नेह या सामाजिक भावना निर्माण होतात. परंतु या बाबतचे संतुलन ढळले कि समलिंगी संबंधांकडे वाटचाल होवू लागते. ही प्रवृत्ती (मी याला विकृती म्हणणार नाही) जन्मजात असते असा दावा अनेकदा केला जातो, पण ते सर्वस्वी खरे नाही. सम-रती बनण्यात अनेकदा कौटुंबिक, सामाजिक पर्यावरणामुळेही मानसिक बदल घडवण्यात हातभार लागतो व निसर्गत: तशी नसलेली व्यक्तीही समलिंगी बनु शकते. त्यासाठी आपण खालील काही कारणांवर चर्चा करुयात.

 १. ज्या पालकांना मुलगाच हवा असतो पण मुलगीच झाली तर असे पालक अनेकदा मुलीला मुलासारखे कपडे घालणे, तशीच केशरचना करणे ई. उपद्व्याप करत असतात. मुलगा झाला, पण मुलगी हवी होती असे झाले तर त्याच्यावर मुलीचे संस्कार केले जातात. यातुन जी मानसिकता बालवयापासुनच निर्माण होत जाते ती विभिन्नलिंगियांबाबत आकर्षण वाटण्याऐवजी समलिंगियांबाबत आकर्षण निर्माण करते.

पालकांचे याबाबत प्रबोधन करणे आवश्यक आहे. मुलाला मुलासारखेच व मुलीला मुलीसारखेच वाढु दिले पाहिजे. आता "नैसर्गिक" कलच जन्मता: वेगळा असला तर त्याचाही स्वीकार मोकळेपणाने केला पाहिजे. परंतु स्वत:च्या कर्माने समलिंगी निर्माण करण्यास हातभार लावणे हाच मुळात एक सामाजिक अपराध आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

२. कळत्या वयात विभिन्न-लिंगिय व्यक्तीची अनुपलब्धता. मुले व मुली लग्नाच्या वयाच्या आधीच वयात आलेले असतात. सामाजिक दबाव, योनीशुचितेचा आजही असलेला प्रचंड प्रभाव, आपल्याकडील विचित्र कायदे यामुळे विभिन्न लिंगियांचाच बाबतीत आकर्षण असले तरी ते जेंव्हा अप्राप्य होते व शरीर वासना जिंकतात तेंव्हा वासनाशमनासाठी समलिंगियच एकमेकांना मदत करू लागतात. असे घडण्याचे प्रमाण खेड्यांत तर कल्पना करता येणार नाही एवढे प्रचंड आहे. यातील अनेकजण पुढे लग्न झाल्यावर हा नाद सोडुन देतात, काही बाय-सेक्श्युअल बनतात तर अत्यल्प मंडळी कायमस्वरुपी समलिंगी बनतात, कारण त्यातच आनंद मिळत असतो. ही विभक्ती किती काळ संबंध राहिले यावर अवलंबुन असते. अनेक मुली वा मुले केवळ ज्येष्ठांच्या बलात्काराने समलिंगी बनल्याची अनेक उदाहरणे आहेत. होस्टेल्समद्धे राहणा-यांनी कधीतरी हा अनुभव (आवडो अथवा न आवडो) घेतलेलाच असतो, व तेथुनही समलिंगी निर्मितीचे लघुउद्योग चालु असतात..

कामशास्त्र ज्या देशात सर्वप्रथम लिहिले गेले त्या देशात सेक्सकडे पाहण्याचा दृष्टीकोन अजुनही विकृत आहे. मानवी कामवासना या मुळात नैसर्गिक आहेत. त्याचे शमन करण्याची सोय असायलाच हवी. वेश्या (अगदी पुरुषवेश्यांचीही) नीट आरोग्यदायी सोय असायला हवी, अथवा समाजातच तरुण तरुणींना पुरेशी मोकळीक द्यायला हवी. सातच्या आत घरात हा फंडा कालबाह्य झालेला आहे. पुर्वी गणिकांना समाजात जो सन्मान होता तो या मोकळ्या मनोवृत्तीमुळेच. तसेच वसंतोत्सवादि उत्सव खास तरुण-तरुणींकरताच राखुन ठेवलेले असत. त्यंत तरुण-तरुणींना मुक्त मोकळीक असे. पण हे उत्सव संस्कृती रक्षकांनी कधेच बंद पाडुन ताकले आहे. वेश्यांचे म्हणावे तर बव्हंशी एड्सचे-गुप्तरोगांचे आगर आहेत. त्यांना समाजात कसलाही दर्जा नाही. सर्वांना तेथे जायची हौस असतेच, पण कबुल करायची शरम वाटते...मग असे दुस-यांना सहजी शंका येणार नाही असे "कुतुहल" व वासना शमवण्याचे मार्ग शोधले जातात हेही लक्षात घेतले पाहिजे.

.३. दीर्घ पल्ल्याच्या शिक्षा भोगणारे कैदी बाय डिफाल्ट समलिंगी बनतात. त्यांच्या मादीची भुमिका करणा-याची स्त्रीसारखीच काळ्जी घेतात, अगदी लुगडी चोळीही हौसेने घालायला लावतात. येरवडा जेलमद्धे अचानक झडतीसत्र आले तेंव्हा दोनशेपेक्षाही अधिक साड्या मिळाल्या होत्या. महिला तुरुंगही यात मागे नाहीत. हीच मंडळी जेंव्हा मुक्त होवून बाहेर येते तेंव्हा अर्थातच ते पुर्णपणे समलिंगी बनलेले असतात.

 

अशा दीर्घमुदतीच्या सजा झालेल्या कैद्यांना कुटुंबियांना भेटता यावे यासाठी प्यरोलची तरतुद आहे. पण ती वर्ष दोन-वर्षांतुन मोठ्या मिन्नतवारीने मिळते. धनदांडगे कैदी इस्पितळात दाखल व्हायची सोय करुन आपली सोय करुन घेतात...त्यांचे ठीक आहे, पण मग अन्य कैद्यांची नैसर्गिक गरज मारण्याचा कोणता मानवी अधिकार आपल्या सुसंस्कृत समाजाला व कायद्याला आहे? पण तसे होते व समलिंगी आपसुक तयार होतात...कारण मनुष्य वासनाशमनाचा काहीतरी तोडगा काढतोच! मग ती सवय बनते. त्यापेक्षा नैसर्गिक मार्गानेच त्यांचे वासनाशमन होईल अशी व्यवस्था करता आली तर? मग ज्या संबंधांना आपण समाज-कुटुंबसंस्थेचे मारेकरी समजतो तसे संबंधच निर्माण होणार नाहीत.

४. शेळी, म्हैस व गायीशीही वासना न आवरता आल्याने संभोग करणारेही खुप महाभाग आहेत. खेड्यात याचे प्रमाण अर्थातच जास्त आहे व यात बहुतेक गुराखीच अधिक असतात. वर आधीच सांगितल्याप्रमाणे हा अनैसर्गिक संभोग असला तरी त्याचे कारण विकृती हे नसुन मादीची अनुपलब्धता आहे. स्त्रीयांना अश्वमेध प्रसंगी यद्न्यिय अश्वाशी संभोग करावा लागे, यावरुन स्त्रीयांतही ही अनैसर्गिक उर्मी येत असेल, शास्त्रकर्त्यांना ते माहित असल्याने अशी अनुमती असेलही...परंतु विद्यमान जगात तिचे शमन कसे होते हे मला माहित नाही.

थोडक्यात, निसर्गत: जेनेटिक समस्येने, हार्मोनिक असमतोलामुळे जी समलिंगी संबंधांची भावना निर्माण होते अशा व्यक्तींना दोष देणे आपला मुर्खपणा आहे. त्यांनाही सन्मानाने जगायचा, आपले हक्क अबाधित ठेवण्याचा अधिकार आहे व तो नाकारणे अमानवी आहे. अश रितीने निर्मान होणारे सम-रती हे तुलनेने अत्यल्प असतात. परंतु जे ६०-७०% समलिंगी निर्माण होतात ते आपल्याच सामाजिक विकृतींमुळे, आपल्या कर्मामुळे हेही लक्षात घ्यायला हवे. धर्म-संस्कृती या संकल्पना किती ताणायच्या हे आता आपल्याला ठरवावे लागणार आहे. कामवासना अत्यंत नैसर्गिक असून तिचे दमन विशिष्ट मर्यादेपार अशक्य असते व तिचा स्फोट हा असे संबंध निर्माण होण्यात होतो. अनेकजण मग बलात्कारही करतात. त्यामुळे याकडे अत्यंत मोकळ्या दृष्टीने पाहण्याची व तसे प्रबोधन करण्याची गरज आहे. निकोप कामजीवनाची सोय ज्या समाजात आहे त्या समाजात असे घडणार नाही अशी आशा आपण करु शकतो.

यावर प्रश्न असा उद्भवेल कि अमेरिकेत एवढे मुक्त लैंगिक स्वातंत्र्य असुनही तिकडे अशांचे प्रमाण जास्त का? पण हा प्रश्न निरर्थक असाच आहे, कारण ते मुक्तपणे बोलतात, हक्कांसाठी लढतात म्हणुन ती संख्या मोठी वाटते. आपल्याकडे असे प्रमान अत्यंत नगण्य असे आहे, वास्तव हे आहे किमान दहा कोटी लोकांनी पौगंड ते युवावस्थेतील काळात हे अनुभव घेतलेले असतात...त्यातील कोटभर स्त्री-पुरुष आज किमान समलिंगी आहेत. लोकलाजेस्तव हे संबंध गुप्तच ठेवण्याची खबरदारी ते घेत असतात. पण ही संख्या काळजी करावी एवढी मोठी आहे, हे नक्कीच! त्यामुळे संस्कृती रक्षकांनाच प्रथम डोळे उघडुन या वास्तवाकडे गांभिर्याने पहात जरा समाजाला मोकळा श्वास घेवू दिला पाहिजे.

 -साभार:- संजय सोनवणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा