शनिवार, १४ डिसेंबर, २०१३

राजकरण्यांवर ’आप’बिति!


आजवरील राजकारणातील सामान्य प्रॅक्टीस ही आहे की ज्य पक्षाला सत्ता स्थापन करायचे असते त्यानी मदत घेण्यासाठी इतरांकडे गळ घालायची व या इतरानी त्यांच्या अटींची यादी सादर करायची. सत्तेत येणा-या पक्षाने या अटी मान्य केल्यास त्याना पाठींबा मिळायचा... ही होती आजवरची संस्कृती. मग यातून अपक्ष नावाचा नवा प्रकार रुजत गेला. कोण्याही ऐ-यागै-यानी व गावगुंडाने राजकारणात येण्याची जणू लाटच आली. पैशाच्या बळावर सीट जिंकायची नि बहुमतासाठी ताटकळत बसलेल्या हवशी (हौशी नाय बरं का) राजकारण्याशी सौदेबाजी करायची. मग काय खुर्चीसाठी हापापलेल्यानी या अपक्षकांना नकोतेवढं कुरवाळण, नको ते लाड पुरविणं चालू ठेवलं. त्यानी अपक्षांचा पेव फुटत गेला व पुढे पुढे याचा परिणाम असा झाला की बहुमत मिळविणे दुरापास्त झाले. मग काय गठबंधन हे समिकरणच होऊन बसले. मग त्यात मधेच पाठींबा काढून घेण्याचा अजुन एक नवा प्रकारही आला. कधिही उठून सरकार अल्पमतात आणू म्हणून ओरडणारे हल्ली गल्लो-गल्ली दिसू लागले. याचा एकुण परिणाम म्हणजे राजकारणाप्रती तरुणांमध्ये घृणा वाढत गेली... पाठींबा ही नवी संकल्पना राजकारणात अत्यंत मोलाची चीज बनली.
पाठींबा देणा-यांच्या अटींची पुर्तता म्हणजेच घोडेबाजार... जिथे कोटीच्या कोटीचे सौदे व्हायचे.

पण यावेळी चित्र उलट आहे.
बिचारे स्वत:च आपला गळ घालत आहेत की तुम्ही सत्ता घ्या आम्ही तुम्हाला बिनशर्त पाठींबा देतो. हे जरा अतीच होतं. तरी इथवर ठीकच होतं हो... पण कळस बघा.... आप नी उलट याच समर्थकाना यादी करुन पाठविली आहे की “बघा... तुम्ही म्हणता म्हणून मी सत्तेत बसतो. पण माझ्या या अमूक तमूक अटी आहेत. त्या तुम्हाला मान्य आहेत का ते लिखीत कळवा. मगच मी सत्तेत बसतो. तुम्ही नुसतं पाठींबा देऊन चालणार नाही. तर मी सत्तेत बसावं यासाठी तुम्ही माझ्या या अटीही मान्य करा. मगच मी सत्तेत बसतो......”
जगाच्या राजकीय इतिहासात हे आजवर कुठेच घडले नसेल... जे दिल्लीत घडत आहे.  हे म्हणजे कसय ना.... न्हाव्यानी तुमच्या दारात येऊन तुमची फुकटात कटींग करायची विनंती करावी नि तुम्ही वरुन नाव्यालाच दरडवायचं की...
“ठीक आहे... पण या नंतर तू रोज आंघोळ करणार, स्वच्छ कपडे घालणार, सात्विक जेवण घेणार, शिवीगाळ नाही करणार, बायकोशी नीट वागणार, देवाची रोज पुजा करणार, पोराबाळांची काळजी घेणार, समाजाशी बांधिलकीणे वागणार, स्वत:ची दाडी रोज स्वत:च करणार, स्वत:चे केसही नीट नि वेळेवर कापून मस्तपैकी हॅंडसम बनणार, चार लोकात नावी म्हणून कदर करावी असे वर्तन अवलंबिणार....अशी प्रतिज्ञा कर. या सगळ्या अटी तुला मान्य असतील तर मी तुझ्याकडून हजामत करुन घेईन...” वगैरे अटी घालुन....
“बोल न्हाव्या.... या सगळ्या अटी मान्य असतील तरच मी तुझ्याकडून हजामत करुन घेईन...” असा प्रतिप्रश्न टाकण्याचा प्रकार चालू आहे. खरंतर हे सगळं एक स्वप्न वाटावं अस सत्य आहे.
एवढ्या अटी टाकल्यावरही न्हाव्यानी दारात उभं राहुन... “साहेब करु का तुमची कंटींग?” म्हणावं तशी गयावया करणारी दिग्गज राजकारणी पाहून मला एक गोष्ट जाणवत आहे.... लोकशाहीचा प्रभावी वापर केल्यास मस्तवाल राजकरणी कशी नांगी टाकू शकतात याचा हा एक नमूना आहे. मतदार जर सजग झाला तर राजकारणी गिळगिळायला लागतील याचं हे जिवंत उदाहरण आहे. मतदारानी आपला अधिकार बजावत दिशाहिन झालेल्या राजकारणाला शिस्त लावावी ही वेळ नक्कीच आली आहे. किंबहुना केजरीवालच्या रुपात पहिला यशस्वी प्रयोग पार पडला आहे. २०१३ मध्ये दिल्लीत जो बदल घडला तो देशात सर्वत्र घडायला अजुन काही काळ उलटेलही... पण घडणारच नाही अशा धुंधीत मात्र कोणी राहू नये. जरा वेळ लागेल एवढेच...!!!
आजवर कुठल्याच राजकरण्यांवर अशी ’आप’बिति आली नसेल!!!

1 टिप्पणी: