बुधवार, १८ डिसेंबर, २०१३

खाल्या मिठाला जागताना...!
खाल्या मिठाला जागलं पाहिजे हा मराठी टोमणा आजकाल तेवढा ऐकायला येत नसला तरी अधे मधे तो येत असतो.  आदर्शवादी विचारसरणी रुजविताना खास करुन नोकर वर्गांवर हे मिठाला जाण्याचा विचार खोलवर रुजविण्याचा एक काळ होता. मग मालक कितीही नालायक असला तरी मालकाचे अनेक जुलूम सहन करत मिठाला जागणारे नोकरही होते. मालक व नोकर यातील जुलुमी नातं अतूट बनविण्याची ही अफलातून शक्कल कोणी लढविली माहीत नाही, पण ती एकतर्फी व मालकांच्याच हितार्थ राबविली गेली हे मात्र नक्की. हा विचार/तत्वज्ञान कधी सुरु झालं माहीत नाही पण जेंव्हा केंव्हा याची सुरुवात झाली असेल तेंव्हा मजूर वर्गाचं जिवन अत्यंत दयनीय व हालाखीचं होतं एवढं मात्र नक्की. काय असेल ते असेल पण या विचाराला जर कुणी कळस चढविला तर तो हिंदी सिनेम्यानी. मस्तवाल मालिक आपल्या नोकराला चाबकाचे फटकारे मारतो आहे अन दोन हात जोडून “मैने आपका नमक खाया है हुजूर..” म्हणणारे अनेक सीन साठ-सत्तरच्या दशकातील हिंदी सिनेम्यांतून दिसायचे,  आजकाल ते दिसत नाही.  आज हे जुने सिनेमे पाहताना  “मैने आपका नमक खाया है...” वाले सीन आले की हासायला होतं.
सोमवार पासून जळगावात आहे. हॉटेलमध्ये टी.व्ही असल्यामुले रोज सिनेमे पाहणे सुरु आहे. त्यातून हे "मैने आपका नमक खाया.... वाले संवाद काळाच्या ओघात विचित्र जाणवू लागलेत. आज जरा शांत डोक्यानी या नमकच्या फिलॉसॉफीचा विचार केल्यावर चिडचिड झाली व मी त्या पिढीचा नाही म्हणून बरही वाटलं. ज्या कोणा वर्गाकडे विचार रुजविण्याची जबाबदारी होती तो किती बेजबाबदारपणे वागला हे दाखविणारा आरसा म्हणजे मिठचं तत्वज्ञान.  मालकाकडॆ काम करणारा मजूर म्हणजे आपल्या कष्टाच्या बदल्यात मजूरी मिळवीत असे. खरं तर ती मिळविणे हा त्याचा अधिकारच. पण मालक कंपुतल्या लोकाना तसं वाटत नसे. त्याना वाटे की हे मालक लोकं मजूरांवर उपकार करत आहेत.  ते एका अर्थाने खरही असेल. कारण काम देणारे कमी अन मागण-यांची गनती नाही. म्हणजे श्रमाचे नेगोशिएशन होऊन श्रम-मुल्य घसरायला प्रचंड स्कोप होता. या सगळ्या परिस्थीत एखाद्याला काम मिळाल्यावर ते उपकार वाटत असल्यास नवल वाटायचं कारण नाही. म्हणजे हे खाल्या मिठाला जागण्याचं तत्वज्ञान रुजायला श्रमाचा गरजेपेक्षा अधीक असलेला पुरवठाही जबाबदार होता असं म्हणता येईल.  
पण वरील युक्तीवाद मला पटत नाही. श्रमाचा पुरवठा अधिक असल्यामूळे श्रमाचं मुल्यं घसरत हे मान्य पण त्यामुळे उपकारभावना व मिठाची गुलामी हे नाही पटत. कारण श्रमाच्या पुरवठ्याची परिस्थीती आजही फारसी बदललेली नाहीच. एक आय.टी. व विशेष कौशल्य असणारे एक दोन क्षेत्र सोडले तर बाकी  सगळ्या क्षेत्रात श्रमाचा पुरवठा जास्तच आहे. नोक-या नाही, रोजगार नाही ही परिस्थीत उलट वाढत चालली आहे.  तरी आजचा तरुण खाल्या मिठाच्या बदल्यात मालक देवो भवो वगैरे खपवून घेत नाही. मालकाशी खटके उडाल्यास तू नाही तर तुझा बाप म्हणतो... मिठाला जागणे संकल्पना हद्दपार होऊन मालक जे पैसे देतो ते उपकार नसून माझ्या कष्टाचे व हक्काचे पैसे आहेत असा विचार सर्वत्र रुजत चालला आहे. अगदी कारखान्यातील कामगारापासून शेतात राबणा-या शेतमजूरा पर्यंत हे मिठाचं गणीत झुगारणे सुरु झाले. मिळणारा पैसा उपकार नसून राबलेल्या कष्टाचा मोबदला आहे अन मी जे मीठ खातो ते मालकाचं नसून माझ्या स्वत:च्या कष्टाच्या पैशाचं खातो हा नवा विचार मागच्या दहा एक वर्षात सर्वमान्य होत आहे. म्हणजे नोकरा सोबत मालकही हा विचार स्विकारतो आहे. 
मालकाचे नोकरावर उपकार असतात असं माणणारा काळ गेला असून मला जशी पैशाची गरज आहे तसच मालकालाही काम करणा-या कामगाराची/मजूराची गरज असते हे कामगाराना तर कळलेच पण मालकानीही मान्य केले. उपकार आणि व्यवहार यातील फरक स्पष्ट होत गेला. आजच्या घडीला मिठाला जागणे वगैरे प्रकार बंद झाले अन या नात्यातील व्यवहार जास्त ठळकपणे अधोरेखीत होत गेला. मालकाचे मीठ जाऊन स्वत:चे मीठ ही संकल्पना रुजली असून  मिठाला जागण्याचे दिवसही इतिहासातील घटना बनल्या आहेत. खाल्या मिठाला जागताना आधी पिढ्यान पिढ्या झिजायचे. आता मात्र समिकरण बदललं असून खाल्या मिठाला ना जागायची गरज ना वाकायची गरज असे चित्र आहे. कारण ते मिठ कोणा ति-हाईताचं नसून आपलं स्वत:चं असत हे कामगाराना कळून चुकलं.
मग याचा प्रतिबिंब सिनेम्यांतून उमटताना दिसू लागलं. आजकालच्या सिनेमात ते "आपका नमक खाया हुजूर" ही डॉयलॉग शोधून सापडत नाही. सिनेमे हे काळाचा आरसा असतात हे खरच आहे. अमिताभ व राजेश खन्नाच्या काळातल्या सिनेम्यांतून दिसणारा "आपका नमक खाया" वाला एकुण कनसेप्ट आज हद्दपार झालेला दिसतो. वीस-तीस वर्षा आधी माणूस कसा विचार करायचा नि आज कसा विचार करतो यातील फरक अनुभवायचं असल्यास त्या त्या काळातले सिनेमे नक्की पहावे... त्यातून ब-याच गोष्टी काळाचं गुपीत सांगतात. समाजातील परिवर्तन कसे होत चालले हे ही सांगतात. एकुण मानसिकता कुठल्या दिशेनी जात आहे याचाही अंदाज येतो.
आजची पिढी अनेक अर्थाने व्यवहारी असून भावनिक व मारक अशी जुनी मुल्य नाकारत आहे. कालच्या पिढीला मात्र हीच मुल्ये नीतीमत्तेच्या मोजपट्टीत अधिक प्रिय असून आजची व्यवहारी मुल्ये म्हणजे नीतिमत्तेचे अध्य:पतन वाटते. कारण ती पिढी आयुष्याचा होम करायची... खाल्या मिठाला जागताना!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा