गुरुवार, १९ डिसेंबर, २०१३

आंटिची मेस, जळगाव.

सौ. हेमलता वडनेरे
खानदेशातलं खाणं म्हणजे अप्रतिम चव. तसं कोल्हापुरी, नागपूरचं सावजी व कोणतालं कोकणी-मालवणी खाणही जबरदस्तच पण या सगळ्यात खाणदेशी जेवणाची चवच निराळी. आता ही सगळ्याना आवडेल की नाही ती गोष्ट वेगळी पण आहे मात्र जबरदस्त. जळगावातील नॉनव्हेजची दोन ठिकाणं मला प्रचंड आवडतात ती म्हणजे स्टेशन शेजारचं द्वारका व टॉवर चौकातून उजविकडे वळून गल्लीबोळातून(? जळगावात बोळं नाहीत) काही दूर गेल्यावर लागतं ते म्हणजे मराठ मटन.  या आधी जेंव्हा कधी कामा निमित्तानी जळगावात आलो तेंव्हा निव्व्ड मासाहारी जेवणार ताव मारुन परतायचो. पण या वेळेस मात्र आठवडाभर राहिल्यामुळे मग इतर प्रकारचं जेवण शोधणे सुरु झाले. अन मला सापडली आंटीची मेस ( Auntichi Mess, Jalgaon ).
मेस चालविणे आजच्या काळात एक धंधा बनला असून खास करुन जिथे बाहेर गावचे विध्यार्थी जेवायला येतात तिथे चव ही महत्वाची नसून कमी खर्चात जास्त कमविण्याचे समिकरण असते. अन चव दिलीच तर मग मिळणारे जेवण हे विद्यार्थ्याच्या आवाक्या बाहेरचे असते.  चांगली चव हवी असल्यास अवाजवी किंमत द्या नाही तर मिळेल ते पोटात ढकलून शिक्षणाचं काय ते पहा असा एकंदरीत होरा असतो.
पण जळगावात मात्र मला सौ. हेमलता वडनेरे यांच्या रुपात एक अपवाद सापडला. एम. जे. कॉलेजच्या परिसरात यांची मेस असुन त्या मागील २७ वर्षा पासून मेस चालवितात. मला  एका आटोवाल्यनी आंटीच्या मेसचा पत्ता सांगितला. मग मी शोधत शोधत शेवटी मेस मध्ये धडकलो. एकुण चित्र पाहून मला विश्वासच बसेना की ही मेस आहे...
मी विचारत विचारत जेंव्हा आटीच्या मेसमध्ये पोहचलो... पाहतो काय तर एक मोठं स्लॅबचं बैठं घर (की बंगला?). गेट मधुन आता शिरलात  की मध्ये दहा बाय पंधराची मोकळी जागा जिथे दोन-तीन टेबलं व खुर्च्या टाकल्या होत्या. अन ही जागा जिथे संपते तिथून सुरु होतं भलं मोठ्ठ किचन. त्याच बरोबर बंगल्याच्या सभोवतालीही थोडी मोकळी जागा आहेच. आत शिरुन पाह्तो काय तर पन्नासेक पोरं जेवायला बसलेली. पण कुठे? त्या बंगल्याच्या परीसरात जिथे कुठे मोकळी जागा दिसत होती तिथे, शाळेत जशा चटाई असतात तशा चटई टाकून पंगती बसल्या होत्या. काही मोठी माणसं टेबल खुर्च्यावर बसून जेवत होती व ते विध्यार्थी नसून परिसरातील नोकरवर्ग होते हे स्पष्ट दिसत होते. बर ही पंगतही मजेशीर होती... तिथे कोणी जेवण वाढत नव्हते. संपुर्ण सेल्प सर्व्हीस. मोकळ्या जागेतच पाच बायका पोळ्या लाटत होत्या व शेजारच्या टोपलीत टाकत होत्या. पंगतीतली पोरं किचन मधुन भाज्या घेऊन बाहेर पडत होती नि टोपलितल्या पोळ्या उचलून पंगतीत जाऊन बसत होती. पोळ्या अखंडपणे शेकल्या जात होत्या...पंगतीही उठत होत्या. नवी पोरं पंगतीत येत होती... आत मध्ये (किचन मध्ये) मोठ्ठाल्या दोन कढईंवर अखंडपणे भाज्या शिजत होत्या. शिजलेली भाजी किचनमधील एक टेबलावर ठेवलेल्या दोन पातेल्यात उलटवून परत कढईत नवी भाजी बनविणे सुरु होते... असं एकंदरीत सगळ अखंड चालू होतं....किचन मध्ये सर्वाना एंट्री. तिथूनच ताट, वाटी, भाज्या, वरण भात घ्यायचं... व बाहेर चपात्या!
मी हळूच जाऊन ताट घेतलं व टॆबलावरील पातेल्यातून दोन भाज्या घेऊन बाहेर आलो. टोपलीतून दोन पोळ्या उचलल्या व टेबलावर बसून जेवण केलं. मी एक गोष्ट नोटीस केली... शिकणारी पोरं घोळक्यानी येत... किचनमधुन भाजी-पोळी घेऊन कुठेतरी जाऊन खाली मांडी घालून बसत व जेवण झालं की निघून जात. माझ्या ताटातली भाजी संपली. मी भाजी घ्यायला किचनात गेलो तर तोवर आधिची भाजी संपुन दुसरी भाजी आली होती. हा चेंज प्रचंड आवडला. इरत्र जिथे एक किंवा दोन भाज्यावर बोळवण करतात तिथेच इथे मात्र एका दिवसात तीच भाजी रिपीट होत नाही. क्या बात है म्हटलं!
जेवण म्हणजे कसं हल्ली तीन पोळ्य़ा व दोन वाट्या टेबलावर आपटतात... परत हवे असल्यास एक्स्ट्रापैसे मोजावे लागते. पण इथे तसं नाही. आंटीच्या मेस मध्ये एक्स्ट्रा प्रकारच नाही. फूल्ल्ल... जेवण असा प्रकार आहे. तुम्हाला लागेल तेवढं खा... अन तृप्त होऊन जा. वरुन सेल्फ सर्व्हीस... तुम्हाला कोणी वाढणार नाही. लागेल तेवढं हातानी घेऊन खायचं. बास!
हे सगळं ठीक होतं. पण मला खरा धक्का तेंव्हा बसला जेंव्हा मी पैसे द्यायला गेलो. म्हटलं किती झाले? उत्तर आलं ३५ रुपये. मी उडालोच. कारण कालच रात्री चाळीस रुपयात अंडा बुर्जी खाल्ली होती. त्यातही दोनच पाव. वरच्या दोन पावासाठी अधिकचे पैसे मोजले होते. सकाळी भजी गल्लीत पोहे-रस्सा खाल्ला होता. पोट नाही भरल म्हणून परत एक मागवला. पैसे किती झाले विचारल्यावर उत्तर आलं ४० रुपये.  जळगावातच स्टेडीयम कॉंम्प्लेक्स मधील ’कॅफे मड्रास’ मध्ये दोन दिवसा आधी वडा सांबार खाल्ला होता. एका वडा सांबाराची किंमत आहे ४५ रुपये.  म्हणजे जळगावात इतर ठिकाणी नाश्ता करायचा म्हटल्यास चाळीसच्या खाली नाही. पण इथे मात्र अगदी फुल्ल जेवण ते ही तीन किंवा चार भाज्या, वरण, भात व पोळी हे सगळं मिळतं फक्त ३५ रुपयात.  अन चव? अप्रतिम चव. चवीच्या बाबतीत आंटी काम्प्रोमाईज करत नाही.... हे उभं जळगाव जाणतं. हो नुसतच ठोकत नाहीये. उभं जळगाव जाणतं. कारण जळगावातल्या जवळपास सगळ्याच वृत्तपत्रांतून आंटिचं कौतूक छापून आलेलं आहे. तर मी पैशाचं बोलत होतो... 
पैसे घेणा-या मालकिन बाईच्या चेह-यावर एक प्रसन्नता होती. समाधान दिसत होतं. मी विचारलं एवढं स्वस्त कसं काय देता? त्या हसून म्हणाल्या... काय म्हणाल्या.... बिचा-या मेस चालविणा-या त्याना कुठे काय म्हणता येतं की भावनाना छानशा वेष्टनात पॅक करुन मांडता येतं. अगदी जळगावी ठसक्यात जमेल तसं बोलल्या. पण भिडणारं होतं.... सगळच बोलण भिडणार होतं. अगदी खोल खोल उतरत होतं. कस आहे ना  तत्वज्ञानात नि वर्तनात विसंगती नसली की ते थेट भिडतच. मग त्याला जड नि भारदस्त शब्दाची गरज नसते. तर असा तो भिडणारा संवाद होता. त्या संवादाचा एकुण सारांशा काहिसा असा आहे...
... मी व्यवसाय म्हणून नाही तर सामाजीक बांधिलकी म्हणून हे करते. आज पासून २८ वर्षा आधी गरज म्हणून डबे सुरे केले. घरुन दोन डब्यानी सुरुवात झाली. कामावर निष्ठा व चांगली चव ह्यामुळे माझे डबे काही वर्षातच २०० च्या वर गेले. मग मात्र डबे पुरविणे अवघड जात होते. अन मी डबे बंद करुन मेस चालू केली. आज या व्यवसायात २८ वर्षे झालीत. मला दोन मुली आहेत. दोघीना याच व्यवसायातून शिकवलं, चांगले स्थळ शोधून लग्न लावून दिले. त्यातली एक मुलगी आज जळगावात स्वत:चं होटेल चालविते आहे. आज इथे माझ्याकडे रोज एका वेळेला ३५० मुलं जेवायला आहेत. एकुण १२ बाया कामाला आहेत. सगळ्याच मागील १०-१२ वर्षापासून असून त्या सर्वच बाबतीत समाधानी आहेत... वगैरे खुप भरभरुन बोलल्या. समाधान मात्र प्रत्येकीच्या चेह-यावर दिसत होतं.
एका वेळेला साडेतीनशे मुलाना जेवायला घालनं ही काही साधीसुधी गोष्ट नाही. पण त्यातही महत्वाचं काय तर अत्यंत वाजवी किमतीत घरच्या चवीचे जेवण मुलाना देणे ही हेमलता ताईची खासीयत. ३५ रुपतात आज जळगावात नाश्ताही मिळत नाही तिथे फुल जेवण वाढणे ही खूप मोठी गोष्ट आहे.  
मी अनेक मुलूख वेगळ्या माणसाना भेटलो आहे... हेमलताताई अशाच एक मुलूख वेगळ्या व्यक्ती आहेत.

२ टिप्पण्या:

  1. झकास! रामटेके बुवा, तुमचं ते राजकारण जरा बाजूला ठेवून असेच मन प्रसन्न करणारे लेख लिहित जावा की! थोरामोठ्यांची लफडी वाचण्यापरीस ह्या आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या जिद्दीच्या कथा लय बऱ्या.

    उत्तर द्याहटवा
  2. Chhan avadala lekh
    Ya Maharashtra ashi udar antahkarnachi manse ahet jyana paisyapeksha manuskichi Jan ahe.
    Blogdvare prasiddhi dilyabddal dhanyavad.

    उत्तर द्याहटवा