मंगळवार, २१ जानेवारी, २०१४

AK - 45 ( अरविंद केजरीवाल, वय-४५)

अरविंद केजरीवाला नावाचं जे राजकीय वादळ उठलं ते शमवता शमवता कॉंगेसच्या नाकी नऊ आले व भाजपा पार घायाळ झालाय. मोदी नावाचं वादळ कॉंग्रेसच्या विरोधात देशभर घोंगावत असताना चार राज्यात मात खाल्लेली कॉंग्रेस मेटाकुटीला आली नसली तरी अवस्था फार बिकट आहे. मोदीच्या दिवसा आड होणा-या तडाखेबंद सभा त्यात अजुन भर घालत आहेत.  मोदीला सडेतोड उत्तर देणे ही काळाजी गरज ठरली आहे. मोदीच्या विरोधात उतरविण्यासाठी तुल्यबळ नेताही कॉंग्रेसला गवसेना... परवाच्या कॉंग्रेसच्या  सभेत देशभरातील कार्यकर्ते आपल्याला पंतप्रधान पदाचा नेता/उमेदवार मिळेल या आशेनी आले होते पण अधीकचे तीन सिलेंडर घेऊन नेत्या विनाच परतावे लागले. थोडक्यात मोदीच्या तोडीचा नेता नाही हा संदेश देशभर गेला व ते कॉंग्रेसच्या हिताचे नक्कीच नाही. ही सगळी कसरत चालू असताना केजरीवाल नावाचं वादळ कॉंग्रेसला उसंत देईना... केजरीवालचं एकूण वागणं हे कॉंग्रेसला डिवचणारं आहे. तरी येऊ घातलेल्य निवडणूकांच्या तोंडावर केजरीवालच्या विरोधातील निर्णय आततायी व अपरीपक्वतेचं पाऊल ठरु नये म्हणून कॉंग्रेस केजरीवालचे सगळे नखरे खपवून घेत आहे. किंबहुना केजरीवाल सुद्धा ही एकूण रणनिती जाणून आहे व निवडणूका नंतर फार उड्या मारता येणार नाही, काय तो धुमाकुळ आत्ताच घालून घ्या असा केजरीचा होरा दिसतो. निवडणूका नंतर खरा केजरीवाल काय आहे ते आपल्याला कळेलच.  दिल्लीचा काया पालट करणे हे उद्दिष्ट गाठायचे म्हटल्यास आरे ला कारे करुन चालणार नाही, तर जरा धोरनात्मक व संयत खेळी खेळ्त सत्तेत राहुन विकास करण्याचा शहाणपणा निवडणूकां नंतर केजरीलला दाखवावा लागेल. तसे न केल्यास सरकार पडणार हे मात्र पक्कं. 
पण सध्या ज्या प्रश्नावर केजरीवालनी धरणे आंदोलनाचे शस्त्र उपसले ते पाहता केजरीची मागणी अनाठायी आहे असे अजिबात नाही. वेश्या व्यवसाय व ड्रग्सचा धंधा करणा-यांच्या विरोधा दिल्ली  पोलिस कारवाई करण्यास तयार नाहीत. खुद्द मंत्री उभं राहून रेड टाकतात व घरातून ड्रग्स मिळते तरी पोलिस अधिकारी मंत्र्याना वारंट नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करत कारवाईस दाखविलेली असमर्थता म्हणजे गुन्हेगारांचे समर्थनच.  दिल्लीतील गुन्हेगारी वाढीस पोलिसच जबाबदार असल्याचा यापेक्षा मोठा अजुन कोणता पुरावा हवा? जर मंत्र्याच्या तोंडादेखत गुन्हेगाराला पोलिस पाठिशी  घालत असतील तर तर इतर वेळी पोलिस व गुन्हेगार एकमेकाना कवटाळतात हे उघडच. त्याच बरोबर या काळ्या धंध्यांचे लाभार्थी पोलिस व नेते आहेत हे सुद्ध उघडच आहे. परवा ज्या पोलिस अधिका-यानी गुन्हेगारांवर कारवाई करण्यास असमर्थता दर्शवत आपण लाचखोर आहोत याचे चक्क पुरावे दिले त्याना जाग्यावर सस्पेंड करायला हवे होते. पण केंद्र सरकार तसं करत नाही याचा अर्थ सरकारही दिल्लीतील गुन्हेगारी कमी करण्यास फारशी उत्सूक दिसत नाही. केजरीवालची मागणी काय तर अशा करप्ट अधिका-याना निलंबित करा किंवा यांची बदली करा... मागणी रास्तच आहे. पण केंद्र सरकार मात्र वेगळाच हट्ट करत आहे नि वरुन केजरीवाल हाच हट्टी आहे म्हणून बरळत आहे.  त्याच बरोबर मुख्यमंत्री कधी धरणा धरत असतो का वगैरेही गप्पा हाणून झाल्या. मग आजवरचे कोण कोणते मुख्यमंत्री स्वत:च्याच सरकार विरोधात या आधी आंदोलने केली याची उजळनी करत डॉ. बी. सी. रॉय व अजय मुखर्जी ही विस्मरणात गेलेली नावे नव्या पिढीला माहित करुन देण्यात आली.  एकूण मागणी काय तर दिल्ली पोलिसांची जबाबदारी नैतिकतेच्या कसोटीवर घासून काढण्याची मागणी केजरीवालकडून होत आहे व ती मागणी योग्यच आहे.
या सगळ्या दरम्यान किरण बेदी नावाची बाई अधेमधे काहीतरी बरळत असते. भाजपाचे कार्यकर्ते तर चक्क बाप नावाच्या टोप्या लेवून माकड उड्या मारुन परतले. केजरीवाल नावाच्या राजकीय वादळाशी कॉंग्रेस सध्या बचावात्मक पवित्रा घेत लोकसभेची खेळी बिघडणार नाही त्या दृष्टीने पावलं उचलत आहे तर केजरीच्या दमदार राजकीय उडीनी दिल्लीत घायाळ झालेला भाजप मात्र आपची बदनामी करत सुटला आहे. पण कॉंग्रेस किंवा भाजप हे दोघेही दिल्लीतील पोलिसांची अकाऊंटॅबिलिटी यावर ब्र शब्द बोलायला तयार नाहीत. याचा अर्थ हे दोघेही आड मार्गाने का असेना पण पोलिसांच्या काळ्या कमाईतले लाभार्थी आहेत हेच खरे.
या घटकेला केजरीवालची मागणी त्या तीन करप्ट अधिका-यांचे निलंबन एवढीच असली तरी लवकरच ती मागणी दिल्ली पोलिस राज्याच्या अखत्यारित आणण्या पर्यंत जाईल हे जाणून असलेले केंद्र सरकार गोत्यात आले म्हणावे लागेल. केजरीवाल दिल्लीत भाजपासाठी कर्दनकाळ ठरला असून कॉंग्रेसची अवस्था दयनीय झाली.  आप एक असं दुखण बनलय ज्याला धरलं तर चावते अन सोडलं तर पळते... पण हा खेळ फार फार तर निवडणूकां पर्यंतच सहन केल्या जाणार... म्हणून त्या आधी केजरीवाल जमेल तेवढे चावणे-पळने करुन घेत आहे. अन या खेळात निवडणूका आधी  मिळेल तेवढे पदरी पाडून घेण्याची ही शक्कल आहे.

केजरीवालच्या रुपाने भारतीय राजकारण कात टाकणार हे दिसतच आहे. आपच्या विजयामुळे शहरी भागातला  तरुण वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साहित झाला आहे. काल पर्यंत मोदी हवा की मोदी नको अशी स्थीती होती. त्या नंतर राहूल की मोदी अशी स्थीती निर्माण करण्याचा कॉंग्रेस द्वारे प्रयत्न केला जाणार होता पण तो फसणार की काय याची कॉंग्रेसला भिती दिसते. अचानक उडी मारुन आलेले केजरीवाल मोदी व कॉंग्रेस दोघांच्याही वाट्याचे तरुण मतदार पळवणार हे दिसतच आहे. या सगळ्या घडामोडीमधे मोदीच्या विरोधात तुल्यबळ नेता उभा करणे कोणालाच जमले नाही. ही एकुण परिस्थीती पराजीत मनस्थीतीची लक्षणं व  लढण्या आधीच हार स्विकारल्याचा संकेत आहे. थोडक्यात आपच्या दुखण्यासकट मोदीचं पारडं जड आहे ते आहेच.  
मोदीनी कॉंग्रेसला घाम फोडला पण केजरीमुळे मोदीला घाम फुटला आहे ही गोष्टही तेवढीच खरी. कॉंग्रेसला एकहाती घेण्याचं भाजपचं स्वप्न केजरीमुळे नेस्तानाबूत होताना दिसत आहे. ज्या तरुणांच्या वोटवर भाजपचा डोळा होता त्यातल्या मोठ्या वर्गाला आप खुणावत आहे.  बाकी काही म्हणा... पण AK-45 च्या पुढे भाजप घायाळ व कॉंग्रेस हतबल  झालीये हे मान्यच करावे लागेल. २०१४ च्या निवडणूका ख-या अर्थाने रंगणार आहेत.

****
जयभीम

1 टिप्पणी:

  1. Kejriwal exposed everybody. Behind the scene bjp and congress work together and split corruption money between them.
    bjp accuse AAP being B team of congress. But bjp is real B team of congress and partner in corruption.

    Looks like Modi and company forgot ram temple issue and all communal nonsense they always throw at poor and ignorant people. It is good people are getting smarter and focus on real issues.

    उत्तर द्याहटवा