मंगळवार, ७ जानेवारी, २०१४

५०० कोटी फुंकणारा बेजबाबदार तरुण!

धूम-३ नावाचा सिनेमा मी पहिलेला नाही नि वाचलेली परिक्षणं पाहता... पाहणे शक्यही नाही. त्यामुळे मी जे लिहतोय ते धूमचे परिक्षण नाही हे ही आधीच जाहीर करतो.  मग मी धूम-३ बद्दल काय लिहणार आहे? तर या सिनेम्यानी आज ५०० कोटीच्या कमाईचा आकडा पार केला. हे जाहीर करताना मिडीयाला उकड्या फुटल्या तर मी मात्र हळहळलो. कांद्याचा भाव ८० वर गेला की ओरडा करणारे शहरी लोकं (कारण खेड्यातली लोकं ओरडले तरी कोणी दखल घेत नाही व जे  खेड्यात असुनही  ओरडत नाही म्हणजे ते नक्कीच कांद्याचे उत्पादक असण्याची शक्यता असते. म्हणजे दोन्ही केस मध्ये खेड्यातील माणूस महागाईवर ओरडताना दिसत वा दाखवल्या जात नाही) ६००-८०० रुपये मोजून दर शुक्रवारी सिनेमे बघतात. तेंव्हा मात्र याना महागाई आठवत नाही... किंव अगदी याच धर्तीवर ही लोकं कधी एखाद्या सिनेमा गृहापुढे उभं राहून “आजकाल सिनेमे किती महाग झालेय... आमची लहान लहान मुलं बिचारी जांघा व मांड्या दाखविणा-या आयटम डान्सना मुकत आहेत” वगैरे म्हणत एखाद्या मल्टिप्लेक्सचा निषेध केल्याचे मी आजवर ऐकले/पाहिले नाही. त्याच बरोबर कांद्याचा भाव वाढला की  माईक धरुन धुमाकुळ घालणारे व दिसेल त्याला विचारत सुटणारे मिडीयावाले चुकूनही कधी मल्टिप्लेक्सच्या दारात उभं राहून तिकीट महाग झालं यावर आपलं काय मत आहे?” असा त्यांचा खानदानी  प्रश्न विचारतील तर शप्पथ... आता कोणी म्हणेल ती जिवनावश्यक वस्तू थोडीच आहे? बरोबर! ते मलाही माहित आहे... मलाही तेच म्हणायचं आहे... जी गोष्ट जिवनावश्यक नाही त्यावर आजची तरुणाई व श्रीमंत लोकं एवढा पैसा उधळतात की दर महिन्याला एक सिनेमा शंभर कोटीच्या घरात कमाई करतो हे कशाचं लक्षण आहे?  एवढा पैसा उधळणारा आजचा तरुण हा मोठ्या प्रमाणावर मध्यम वर्गातून आलेला दिसतो. भारतातील समस्त श्रीमंतानी किती कुंथून कुंथून सिनेमे पाहिले तरी सिनेमा ५०० कोटीच्या घरात जाणार नाही. मध्यम वर्गानी प्रतिसाद दिल्या शिवाय १८ दिवसात असा अवाढव्य आकडा पार करणे अशक्य आहे.
कांद्याचे भाव वाढले की ओरडतो तो मध्यम वर्गच पण हाच मध्यम वर्ग पोराना सिनेम्यासाठी ८०० रुपये देताना मात्र कचरत नाही... ही मनोवृत्ती  म्हणजे आत्ममग्न व स्वकेंद्रित समाजाची भर पडत  आहे याचा संकेत नव्हे का? त्यातून आजचा मध्यमवर्गीय तरुणही पैशाच्या बाबतीत बेबंध वागत चालला अन ही वृत्ती समाजाला व ओघाने देशाला मारक ठरणार हे कुणालाच का कळत नाही. त्यात अजुन भर काय तर आपल्या देशात क्रेडीट कार्डवर जगणारे कर्जकिडे मोठ्या प्रमाणात जन्माला येत आहेत. मागच्या दशक भरात या कर्जकिड्याना सदा डोक्यावर कर्ज घेऊन दिखाऊ जिवन जगण्याची सवय पडली आहे. एकुणच ही अमेरीकन संस्कॄतीची लागण इकडेही झाली एवढेच नव्हे तर प्रचंड बोकाळत चालली हेच  खरे.
आजच्या मल्टिप्लेक्सच्या जमान्यात एका आठवड्यात सिनेमा हीट की फ्लॉप याचा निकाल लागतो... पण त्याच्या जोडीला १०० कोटीचा क्लब गाठणारे सिनेमे हा एक नवाच प्रकार मागच्या पाचेक वर्षात पहायला मिळत आहे. आज धूम बाबानी ५०० कोटीची कमाई फक्त १८ दिवसात केली हा या नव्या क्लब संस्कृतीचा कळस आहे. विचार करण्यासारखी गोष्ट काय तर हा कळस चढवितो कोण? आजचे तरुण! ते ही मध्यम वर्गीय.

देशातील बेरोजगारी टोकाला जात आहे... शेतकरी आत्महत्या करत आहे. मजूर व कामगार मुश्कीलिने रोजचे ३५ रुपये खर्च करु शकत आहे अन  अशा अवस्थेत भारतातील मध्य वर्गातील तरुण मात्र १८ दिवसात ५०० कोटी रुपये सिनेम्याच्या नावानी फुंकतो आहे... खरच माझा देश लाज वाटावी अशा विविधतेने नटलेला आहे, अजुन काय!!!

1 टिप्पणी:

  1. आपल्या पोस्ट खूप छान तर्कसंगत आहेत. मी मात्र खूप कमी वेळा इतकं प्रदीर्घ लिहितो. पुन्हा नक्की भेट देईन.
    विजय शेंडगे

    उत्तर द्याहटवा