सोमवार, २७ जानेवारी, २०१४

सलग सत्तेतून येते बेफिकीरी!

कॉंग्रेसचं राज्य चांगलं की वाईट? जर असा प्रश्न विचारला तर सहज उत्तर देता येणार नाही पण चेकलिस्टवर कॉंग्रेसच्या एकूण राजकारणाची तपासणी केल्यास हल्लीचं बोकाळलेलं भ्रष्टाचार नि राजकरण्यांची उदासीनता पाहता कॉंग्रेसचं राज्य वाईटच म्हणावं लागेल. पण कॉंग्रेस नको तर मग कोण? असा प्रश्न लागूनच येतो व त्याचं उत्तर डाव्यांच्यांत असलेली वैचारीक विसंगती नि विस्खटलेलं नेतृत्व पाहता भाजप असेच म्हणावे लागेल.  पण भाजप म्हटल्यावर ठसठशीत उमटतं ते म्हणजे त्यानी आजवर जपलेलं हिंदुत्व. हे हिंदूत्व आहे तोवर भाजपच्या नावाने सामान्य माणूस दचकतच राहील. त्यातल्या त्यात दलित व मुस्लीम समाज तर भाजपाच्या सत्तेच्या निव्वड केल्पनेनी सुद्धा अस्वस्थ होतो. यामागे भाजपाची भगवी भुमिका कारणीभूत असून समाजाचं हे रिएक्शन नैसर्गिक आहे.  नरेंद्र मोदी काही असले तरी त्यांची विकास पुरुष म्हणून जी प्रतीमा आज निर्माण झाली आहे (मग ती मिडीयानी केली असली तरी)त्याला प्रतिउत्तर म्हणून तोडीचा नेता देण्यात कॉंग्रेसला अपयश आले हे सुद्धा तेवढच खर. राहूल गांधीचं सौम्य नि संयमी नेतृत्व तसं लोकाना भावलहीं असतं, पण कॉंग्रेसच्या पुढा-यानी सलग सत्तेतून आलेल्या बेफिकीरीतून, समाजकारण नि विकासाच्या प्रति पराकोटीची उदासीनता दाखवत जनसामान्याला कॉंग्रेसच्या प्रती उदासीन करुन सोडलं. आता ही उदासीनता  कॉंगेसला भोवनार एवढं नक्की. 
आजच्या या उदासीनतेच्या वातावरणात सौम्य नि संयत नेतृत्व म्हणजे राहूल गांधी हे कॉंगेसला मारकच ठरत असून विरोधी पक्षानी उभं केलेलं तडाखेबंद व आक्रमक नेतृत्व नव्या पिढीला तरी आकृष्ट करत आहे. अत्यंत गाफील बनलेल्या व सुस्तावलेल्या कॉंगेसच्या राजकारण्यांमुळे लोकाना आता आक्रमक नि तडाखेबंद नेतृत्व आजमावून पाहण्याची खुमखुमी झाली नाही तरच नवलं. तसं कॉंगेसचा पारंपारीक मतदार पक्का आहे. तो कधीच भाजप व इतराना मत देत नाही, पण नव्या दमानी मतदानकेंद्रावर धडकणारा तरुण ही आजवरची पारंपारीक समिकरणं बदलून टाकेल असं दिसतय.
२०१४ च्या निवडनूकांत भाजपनी सत्ता काबिज केली तरी फार काही दिवे लावणार नाही हे जाहीरच आहे पण त्यातून एक गोष्ट साध्य होईल ती म्हणजे यापुढे कॉंगेसपक्ष आपला आळस झटकून कामाला लागेल. पारंपारीक मतदारांच्या भरवश्यावर न बसता नव्या मतदारांचा नि बदलत्या समिकरणांचा अभ्यास करुन सुदृढ राजकराणाची सुरुवात करेल. आजवरचे आयतोबा व खायतोबांचे तिकट बाद करुन खरोखरच काम करणा-या कार्यकर्त्याना पक्षात महत्वाचे स्थान देणे सुरु होईल,(होईल का? न झाल्यास कॉंगेस संपणार एवढच!) यातून बाहुबली व घराणेशाहीलाही एका अर्थाने लगाम बसेल. 
परवा मिलिंद देवरा आपल्या मतदार संघात गेले तेंव्हा लोकानी अक्षरशा शिव्या हासडून देवराला पिटाळले. सगळ्यांचं म्हणनं हेच होतं की देवरा साहेब निवडून आल्यानंतर एकदाही आपल्या मतदार संघाकडे फिरकले नाहीत. मागच्या पाच वर्शात याना आपल्या मतदार संघाची साधी आठवणही झाली नव्हती नि आज निवडणूका तोंडावर आल्यावर हे थोबाड धरुन इकडॆ आले... वगैरे प्रचंड सुरु होतं. हे काय होतं? मतदारांचा राग होता. कशामुळे? तर सलग सत्तेतून त्यांचा नेता बेफिकीर बनल्यामुळे.  म्हणजे आता या नेत्याना यांची बेफिकीरी नडणार एवढं मात्र खरं. म्हणजे यांच्या विरोधात जो कोणी निवडून येईल तो लायक आहे म्हणून नाही तर सध्याच्या नेत्याच्या विरोधात होणा-या मतदानाचा तो परिणाम असेल. अगदी असचं जिथे जिथे खदखदणे सुरु आहे तिथे तिथे विरोधात मतदान होणार...
आजवरची गोष्ट निराळी होती. मतदार मुका, आंधळा, बहिरा होता.  जातीच्या नावानी मतदान करणारा होता व आजही आहेच. कॉंगेसच्या प्रती प्रचंड आदर बाळगणारा होता. हे सगळं खरं असलं तरी, दोन निवडणूकीत पाच वर्षाचा काळ लोटत असतो. या पाच वर्षाच्या काळात नव्या दमाचा मतदार उभा होत असतो. हा तरुण मतदार  कसा विचार करतो याचा विचार झालाच पाहिजे. सध्या मोदी नावाचं घोंगावणारं वादळ तरुणाना प्रचंड भुरळ घालत आहे. नव्याने होणारी मतदार नोंदणी लक्षणीय असून हा तरुण मतदार कॉंगेसच्या एकूण उदासीनतेपायी कंटाळलेला आहे. मोदीच्या नावानी दंगलखोर म्हणून कितीही खळे फोडले तरी तरुण मतदाराला भुतकाळाच्या भुताटकीत अडकवून ठेवणे अशक्य आहे. नव्या पिढीची मानसिकता वेगळी असून झालं गेलं विसरुन नवा प्रयोग अजमावयाला ती तयार असते. जुन्या जखमाना कवटाळून आयुष्य काढणारी पिढी संपत असून, जखमांवर समयसुचकतेची पट्टी बांधून नव्याने झेप घेणारी ही पिढी तौलनिकदृष्ट्या जास्त व्यवहारी आहे, प्रक्टीकल आहे.  अस्मिताचं दळण फार दिवस दळता येणार नाही एवढा बदल नक्कीच झाला आहे. तो होऊ नये असं वाटणारे राजकारणी निव्वड मुर्ख असून वेळीच त्यानी स्वत:ला नाही बदलं तर तरुण त्याना बदलणार ही गोष्ट अटळ आहे.
२०१४ मध्ये मोदी नावाचा प्रयोग अजमावण्यासाठी तरुण मतदार उत्सूक आहे तर या उत्सूकतेला एनकॅश करण्यासाठी भाजपही तेवढ्याच शिताफिनं फासे फेकतो आहे. त्यात तडाखेबंद मोदी समोर राहूल गांधी हे नेतृत्व कमी पडत आहे हे वेगळच दुखणं. वृत्तवाहिन्यांच्या चाचण्या सुद्धा भाजपचं पारडं जड असल्याचे समिकरण मांडत आहेत. एकूण वातावरण पाहता २०१४ मध्ये कुणाला बहुमत मिळॊ अथवा ना मिळॊ पण भाजपं सर्वात जास्त जागा मिळवेल असे चित्र आहे.

हे घडण्याचे कारण भाजपची ती लायकी आहे म्हणून नव्हे तर सलग सत्तेतून कॉंगेसमध्ये आलेल्या बेफिकीरीचा तो परिणाम असेल. 

-----
जयभीम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा