शुक्रवार, २४ जानेवारी, २०१४

कॉंग्रेसचं अस्तित्व भाजपमुळेच!

राजकीय पक्ष चालवायचे म्हटले की त्याच्यामागे थिंकटॅंक असावाच लागते. पक्षाची धोरणं, मतदाराना लुभावण्यासाठी लागणारी आश्वासनं, जाहिरनाम्याचा भुलभुलैय्या व अस्मितेची समिकरणं मांडत पक्षाला विजय मिळवुण देण्यासाठी जे अखंडपणे लढत असतात ते म्हणजे  पक्षचं थिंकटॅंक. मग या थिंकटॅंकमध्ये त्या त्या क्षेत्रातले दिग्गज व तज्ञ असतात.  मागच्या पन्नास साठ वर्षात कॉंग्रेसनी सत्तेत राहण्याची जी काही चिकाटी दाखविली आहे ते त्यांच्या बलाढ्य नि निपून थिंकटॅंकमुळ्चे हे सत्य की अर्ध्यसत्य? माझ्या मते सत्यच पण या सत्याला अजुन एक बाजू आहे ती म्हणजे विरोधी पक्षाच्या म्हणजेच भाजपच्या थिंकटॅंकची चुकलेली भुमिका. कॉंगेसचा प्रतिस्पर्धी म्हणून भाजप हा पक्ष उभा करताना भाजपच्या थिंकटॅंकनी कॉंगेसचं बलस्थान असलेला “पुरोगामीत्वाचा” बिल्ला कायम दुर्लक्षीला... अन इथेच भाजप प्रतिस्पर्धी म्हणून कमी पडत गेला. जेंव्हा जेंव्हा कॉंगेसला इतर मुद्दे भोवले व बाहेर फेकली गेली त्या नंतर तेवढ्याच ताकदीने कॉंग्रेसनी परत उसळी मारल्याचा इतिहास आहे. मागच्या साठ-सत्तर वर्षात तीन पिढ्या सरकल्या तरी कॉंगेस मात्र अजुनही सत्तेत कायम... याचं कारण वर वर पाहता असं दिसत की कॉंगेसनी जी पुरोगामीत्वाची भुमिका स्विकारली हे त्याचं फलीत आहे. पण माझं मत थोडसं वेगळं आहे. पुरोगामीत्व हे कॉंग्रेसचं बलस्थान नक्कीच आहे व याच शस्त्रानी कॉंग्रेसने आजवर विरोधकाना गारद केले. पण हे शस्त्र विरोधकांनी न बाळगणं हे सुद्धा दुसरं कारण आहे. म्हणजे विरोधकांची चुकलेली भुमिका कॉंगेसला बलाढ्य करत गेली.
खर तर आजही देशात कॉंग्रेसला बहुमत नाहीये. एकुण फक्त ११ राज्यातच कॉंग्रेस सत्तेत आहे. तरी दिल्लीत शेर-दा पुत्तर बसला आहे, हे कसं काय? कॉंगेसनी कितीही आव आणला तरी स्थानिकानी देश पातळीवर कॉंगेसला मोडीत काढलं. याची सुरुवात झाली इंदीरा गांधीच्या काळात.  इंदिरा गांधीच्या आणिबाणी नंतर देशभरात स्थानिक पक्षांची लाट उसळली. आजच्या घडीला तसा राष्ट्रिय पक्ष म्हणायला एकही पक्ष नाही. प्रत्येक राज्यातील स्थानिक पुढा-यानी कॉंग्रेस नावाच्या राष्ट्रीय पक्षाला आव्हान देत आपापले स्थानिक पक्ष बलाढ्य बनवत नेले व त्यातुनच राष्ट्रीय पक्षाना स्थानिक पातळीवर आपलं अस्तित्व गमवावं लागलं. मग करुणानीधी, जयललीता, चंद्रबाबू नायडू, मायावती, मुलायमसिंग, नितिश कुमार, लालूप्रसाद, नवीन पटनायक, ममता बॅनर्जी असे अनेक स्थानिक नेत उदयास आले जे थेट दिल्लीवाल्याना दरडावू लागले. एवढं झालं तरी मागच्या ६० वर्षात केंद्रात सर्वाधीक काळ सत्तेत राहण्याची अफलातून किमया कॉंग्रेसनी करुन दाखविली.  या किमयाचे किमयागार कोण? तर पुरोगामित्वाचा बिल्ला.  संयत नि धोरणात्मक खेळी खेळण्याचे सगळे डावपेच थिंकटॅंक कडूनच पुरविले जातात. आजही कॉंग्रेसचं थिंकटॅंक अव्वलच. दोन-तीन भुंकणारे कुत्रे सोडले तर कॉंग्रेसचे एकूण डावपेच हे थेट खुर्चीवर दावा सांगणारे ठरतात व आजवर तेच होत आलं आहे.
जसं कॉंग्रेसचं थिंकटॅंक आहे अगदी तसच भाजपचही थिंकटॅंक आहे. कॉंग्रेसच्या थिंकटॅंकनी सुरुवातीपासून पुरोगामीत्वाचा लेबल पक्षाला चिटकवून ठेवण्यात यश मिळविले. अगदी याच्या विरुद्ध भाजपचं थिंकटॅंक मात्र मागच्या तीन-चार दशकातं प्रचंड गोंधळलेला दिसत होता. संघाचा प्रभाव असलेला हा थिंकटॅंक सुरुवातीपासूनच हिंदूत्वाच्या मुद्द्याला चिकटून आहे. शहा बानोच्या निमित्ताने मुस्लिमानी उभ्या देशाला घाम फोडला व  राजीव गांधीनी कट्टरपंथीयाच्या धाकाने स्त्रीयांच्या विरोधात जाणारा कायदा पास करवून घेतला. घटस्फोटीत मुस्लीम स्त्रीला पोटगी मिळविण्याचा अधिकार राजीव गांधीच्या या नव्या कायद्यामुळे संपुष्टात आला. याचा विरोध म्हणून समान नागरी कायद्याची मागणी परत एकदा उचल खाल्ली व त्यातून भाजपचं हिंदुत्व धारधार व टोकाचं बनत गेलं. वातावरण अजुन तापत गेलं कारण एकुण परिस्थीत तशी होती. मग यातूनच राम मंदीराचं भिजत पडलेलं घोंघळं भाजपच्या थिंकटॅंकनी पेट्रोलनी पेटवावं तसं पेटवलं. शहा बानो प्रकरणानी हिंदू धगधगत होताच व याचा एकुण परिणाम असा झाला की देशात हिंदूत्वाची लाट आली नि शेवटी बाबरी उध्वस्त करुन उसळलेया दंग्यात अनेक जिवांची होळी करत गोध्राकांड  पर्यंतचा काळा इतिहास लिहून गेली.  महाराष्ट्रातील सेनेचं राज्य व वाजपेयी नावाचं अत्यंत संयत नेतृत्व या देशानी पाहिला तो याच काळात.
या नंतर काळ बदलला. इथला मतदार हिंदूत्वाच्या मुद्याला फारसा महत्व देत नव्हता. भाजपाची एका मागून एक हार होत गेली. त्यात मिडीयाचंही अचानक महत्व वाढत गेलं. मग मोदीच्या नावानी गळा काढत भाजपाला कोंडीत धरणे विरोधकांचं नित्याचं कार्य ठरलं. या सगळ्यात प्रमोद महाजन सारखा भाजपाचा लढवय्याही हरवला. रामाचा मुद्दा राजकारणात तेवढा उपयोगाचा नाही हे भाजपालाही तोवर कळून चुकले होते. मग भाजपनी हळूच रामाच्या कानात रामराम म्हटलं पण लोकांच्या पुढे मात्र “आपण तसं काही म्हटलच नाही” असं म्हणत वेळ मारुन नेली. एकंदरीत हिदुत्वाच्या मुद्द्यावरुन राष्टीय पातळीवर चमकलेलं भाजप हळू हळू बॅकफूटवर येऊ लागला. पण हे सगळं चालू असताना ईकडे कॉंग्रेसचा “पुरोगामीत्वाचा बिल्ला” मात्र मागच्या ६०-६५ वर्षा पासून कायम चकाकतच राहिला याकडे डावपेचात्मक दृष्टिकोणातून नजर गेलीच नाही. कॉंगेसवर घाराणेशाहीचे आरोप झाले, आणिबाणीचा डाग बसला, आपरेशन ब्ल्यू स्टार,  इंदिरा गांधीची हत्या, शिख दंगली, बोफोर्स  अशा अनेक कांडानी नाकी नऊ आणले... नंतर तर भ्रष्टाचाराचं पेटंटच कॉंग्रेसला मिळालं तरी सुद्धा या सगळ्या काळोखात कॉंग्रेसचा पुरोगामित्वाचा बिल्ला मात्र कायम चकाकतच गेला. अन प्रांता प्रांतात उदयास आलेल्या स्थानीक पक्षांच्या नव्या समिकरणातही या एका बिल्ल्यानी कॉंग्रेसला कायम सत्ताधीश ठेवलं.
हिंदुत्वाच्या गुर्मीत जगणा-या भाजपला आता कुठे या बिल्याचं महत्व कळू लागलं.  मागच्या दोन चार वर्षात भापच्य थिंक टॅंकनी प्रचंड मेहनत घेत असाच एक बिल्ला आपल्याकडेही हवा म्हणून नवी रणनिती आखून काम सुरु केल्याचे दिसते. मग त्या दिशेनी अनेक प्रयत्नही सुरु झाले.  मोदीची सदभावना त्यातलाच एक प्रकार आहे की गोध-या वरील उतारा हे मात्र अजुन स्पष्ट झाले नाही. पण २०१४ च्या निवडणूकांची मोर्चेबांधणी व मोदीला पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केल्यापासून मोदीनी जो सभांचा धडाका लावला, त्या संभांमधूण होणारे भाषण नीट ऐकल्यास भाजपचे मुद्दे व रणनीती बदलली आहे हे स्पष्ट दिसते. रामाच्या मुद्याला बगल तर दिलीच पण हिंदूत्वाचा मुद्दाही प्रांत पाहून बोलल्या जातो. मागच्या मुंबईतील सभेच पुरोगामी महाराष्ट्राचा धसका घेत हिंदूत्व अजिबात उच्चारला नाही. तिकडे उत्तरेत मात्र हिंदूत्वाचं टोकदार भाषण नसलं तरी अगदीच बगलही दिली जात नाही. त्याच बरोबर मुस्लीमांच्या मनातून भाजपची हिंदूत्ववादी ओळख पुसण्याचे अनेक प्रयत्न चालू आहेत.  
इकडे कॉंग्रेस मात्र दिग्गी-तिवारीच्या बेताल वक्तव्यामुळे तरुणांच्या मनातून उतरत असून त्याना आवर न घातल्यामूळे सोनी गांधी यांच्या बद्दलही मनात अढी निर्माण झाली आहे. कॉंग्रेसचे सत्तेत टिकून राहण्याचे खरे कारण कॉंग्रेस पुरोगामी होती म्हणून नव्हे तर भाजपं प्रतिगामी व जातीयवादी होता म्हणून होय. म्हणजे भारतीय मदराकडे पुरोगामी नावाचा बिल्ला गळ्यात असलेले दोन पर्याय आजवर उभे नव्हते म्हणून कॉंगेसचे निभावत आले आहे. पण जर का भाजपनी पुरोगामीत्वाची भुमिका स्विकारली व ती येनकेन लोकानी मन्य केली तर काही न करता कॉंग्रेसचा घात होईल. आजवर कॉंग्रेस टिकले ते भाजपच्या टोकदार जातीयवादी व भगव्या वृत्तीमुळे. भाजपच्या हिंदुत्ववादातून मुस्लीम व दलीत मदतार तर दुरावत गेलाच पण पुरोगामी मतदार मग तो कोणत्याही समाजाचा/जातीचा असो तो ही दुरावत गेला. राष्ट्रीय  पातळीवरील राजकारणाचे भाजपचे हे चुकलेले समिकरण कॉंगेसला नेहमीच फायद्याचे ठरत गेले.
२०१४ च्या निवडणूकीत भाजपानी एकूण जो पवित्रा घेतला तो संपुर्ण पुरोगामित्वाचा नसला तरी कॉंगेसच्या सत्तेत टिकण्याचे गमक असलेले हे पुरोगामित्व आता स्विकारणे अपरिहार्य आहे एवढे भाजपने ओळखले आहे. राष्ट्रीय  पातळीवरील राजकारणात अत्यंत मोलाचं ठरलेलं हे पुरोगामित्व जसजसं भाजपकडे वाढत जाईल तसं तसं कॉंगेसचा प्रतिस्पर्धी अधिक बलाढ्य होत जाईल.  म्हणजे भाजपचं पुरोगामित्व हे कॉग्रेसला ख-या अर्थाने शह देण्याचं काम करेल. आजवर विरोधकाकडील पुरोगामित्वाच्या अभावामुळे कॉंगेस हा भारतीय राजकारणाच्या शर्यतीतील  एकमेव पक्ष असायचा व तोच जिंकायचा. त्यामुळे मागच्या सहा-सात दशकात कॉंगेसनी सत्तेत टिकून राहण्याची चिकाटी दाखविली. आता प्रतिस्पर्धी सुद्धा पुरोगामीत्वाचं हत्यार घेऊन येतोय असे दिसते.
भाजपचं पुरोगामी नसणं हे कॉंगेसच्या विजयाचं गमक असून, भाजपाच्या पुरोगामी बनण्याने भारतीय राजकरणात ख-या अर्थाने कॉंगेसच्या पुढे तुल्यबळ प्रतिस्पर्धी उभा असेल. म्हणजे तेंव्हा लढा अटीतटीचा होईल.

म्हणून म्हणतो, कॉंगेसचं अस्तित्व हे विरोधी पक्षाच्या अपुरोगामीपणामुळे टिकून राहीलं.

-----
जयभीम

1 टिप्पणी:

  1. Totally agree. But bjp can not be secular until they get rid of RSS.
    That is not going to happen. And you forgot to mention that there is no inner party democracy in congress. It is a private property of one family.
    There is saying "man with only one eye is king in country of blinds" That is the situation in India. Congress has one eye and all others are blinds.
    Now we have new alternative who has two eyes that is AAP

    प्रत्युत्तर द्याहटवा