शनिवार, २२ फेब्रुवारी, २०१४

दामानियाला लागल्या दादाच्या उचक्या!

पवार घरण्यावर चिखलफेक करुन प्रसिद्धी मिळविण्याचा धंदा आताकाही आपल्यासाठी नवीन राहिला नाही. खैरनारांपासून अनेकानी आजवर हे उद्योग केले व पुरावा द्यायची वेळ आल्यावर तोंडघषी पडले हे आपण सर्वानी पाहिले आहे. दमानिया बाईला भ्रष्टाचाराच्या नावाखाली सुरु झालेल्या अजित दादाच्या उचक्या त्यातलाच एक प्रकार आहे. अजित पवारांवर अरोप करुन चार बाईट्स मिळविणे व AAPला मिडीया फोकस देणे यापलिकडे सगळे अरोप फोल आहेत ते बाईही जाणतेच व आम्हिही जाणतो. बरं दादाच्य उचक्या देता देता बाईला मधेच अव्हाडाची उचकीही आली अन एक ओकारी झाली. आव्हाडाना थर्ड क्लासचा लेबल चिकटवून बाई मोकळी. येणा-या निवडणूकित आव्हाडांचा क्लास  काय आहे जनता ठरवेल की. मला एक प्रश्न पडतो की बाईना हा क्लास ठरविण्याचा अधिकार दिला कुणी? बरं मुख्य उचकी कोणाची तर दादाची, मग ती मिटवा ना! पण मधेच बाई दुस-याची पण उचकी घेते...अजुन कितीजणांची घेणार तीच जाणे!  अजित पवारांच्या विरोधात पुरावा असेल तर कोर्टात जावं नि सिद्ध करावं एवढं सोपं, साधं प्रभावी नि संविधानिक मार्ग मोकळा असताना रोज सकाळी उठून मिडीयाच्यापुढे दादाची उचकी घेण्याचे कारण काय? नशीब की बाईला निव्वड दादाच्या उचक्याच येताहेत... उद्या उलट्या होऊ नये म्हणजे मिरवलं. म्हणे जितेंद्र आव्हाड थर्ड क्लास... अरे मग तुझा क्लास कोणता? शेंडीचं तूप पिऊन पैलवानासारखी पोकलेली दमानिया परवा एका चॅनलवर रडून रडून सांगत होत्या की शेतजमिनीवरुन त्यांच्यावर कसे खोटेनाटे आरोप होत आहेत वगैरे... म्हणजे काय? तुमच्या शेतजमिनीवर प्रश्न विचारला की खोटे अरोप अन तुम्ही करता ते मात्र खरे आरोप... म्हणजे आरोपांची सत्यता घोषीत करण्याची तुम्हाला सनद मिळाली की कसे? की या सगळ्या गोष्टींचा निकाल देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या न्यायपालिकेवर  तुमचा विश्वास नाही?
आप नावाचा पक्ष जरी नवा असला तरी आज उभ्या देशाचे डोळे त्या पक्षाकडे लागले आहेत, तेंव्हा जरा सांमजास्यानं नाही का वागावं. अरविंद केजरीवाल हा माणूस जरी थोडासा सनकी असला तरी मागच्या २० वर्षाचं त्याचं कार्य पाहता तो अत्यंत प्रामाणीक आहे हे जाहीर आहे.   तरुण वयात मॅगसेसे सारख्या पुरस्कारानी सन्मानीत आहे. अन गंमत काय तर आपचा प्रत्येक व्यक्ती स्वत:ला केजरीवाल समजतो व दमानिया बाईलाही तोच रोग झालेला दिसतो. पण त्यासाठी तेवढं भक्कम नि चांगलं भुतकाळ असावं लागतं याचा बाईला विसर पडला. अन मग शेतजमिनीचा अरोप झाल्यावर चॅनलवर येऊन दमानियाबाई दमा लागेस्तोवर रडल्या... याला काय म्हणायचं? रडण्यानी काय अरोप जातात असे वाट्ले की काय? आरोपांचा गुंता न्यायालयात सोडवायचा असतो याचं बाईला ज्ञान दिसत नाहीय़े. जरा काही झालं की पळा चॅनलवर... हे आता जास्त दिवस चालायचे नाही.
बरं भ्रष्टाचाराची घाण साफ करु म्हणून रस्त्यावर उतरणारं आप संविधानिक मार्गानी मुद्दे सोडविण्याचा वा मांडण्याचा प्रयत्न करताना फारसा दिसत नाही. याचे कारण काय? उत्तर सोपं आहे... संविधानिक मार्गानी जायचं म्हटल्यावर संयम नि पुरावे दोन्ही लागतात व आप मध्ये तेच नाही. यांच्या डोक्यात संविधान विरोधी शेंडी-बनियाची घाण असून अधुन मधून ती  बाहेर पडत असते. शिला दिक्षीत पासून अंबानी पर्यंतची यांची आरोपांची ओकारी पाहुन लोकं आता आप पासून दूर पळू लागली हे त्यानाही माहित आहेच. बिन बुडाचे आरोप करुन फार दिवस टिकता येत नाही. शेवटी दिर्घकालिन लढा द्यायचा म्हटल्यास पुरावे द्यावे लागतील नि न्यायपालिकेच्या दारात जावं लागेल. आप मात्र दोन्ही करताना दिसत नाही...मग बिनबुडाचे आरोप व प्रसिद्धीचे डाव ही डुक्कर कुस्ती सुरू.


सध्या दमानिया बाईला दादाच्या उचक्या लागल्या आहेत, अजुन ओका-या बाकी आहेत.

-जयभीम

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०१४

फेक नक्षलवादी व फेक चकमकी

शक्यतो मी नक्षलवादावर लिहणे/बोलणे टाळतो, कारण तसे करणे म्हणजे पायावर धोंडा मारुन घेणे होय. आपल्या वाक्यातून कुठलेही दोन शब्द बाजूला काढून तुम्ही नक्षलवाद्यांच्या बाजूनी बोललात म्हणून बळवायला पोलिस तयार असतात व पोलिसांच्या बाजूनी बोलतोस का म्हणून बळवायला तिकडे निक्षलवादिही तयार असतात. दोघांचीही कटकट नकॊ म्हणून मी त्या विषयावरच बोलत वा लिहत नाही. पण आज थोडसं लिहावं म्हणतो. आजच्या पेपरात बातमी आली की आमच्या गडचिरोलीच्या रानात पोलिस-नक्षलवाद्यांत चकमक उडाली व सात नक्षलवादी मारले गेलेत. हल्ली पोलिस नक्षलवाद्यांच्या चकमकी म्हणजे रुटीन भाग झालाय. दर पंधरा वीस दिवसातून एकदा अशी बातमी वाचायला मिळते. त्यामुळे आजकाल मी तिकडच्या बातम्या वाचतच नाही...तर, फक्त मेलेल्या माणसांची नावं वाचून यात आपला कोणी ओळखिचा/नात्यातला नाही ना याची खात्री करुन घेतो. माझ्यासाठी बातमितला फक्त तेवढाच भाग महत्वाचा असतो. पण आजच्या बातमीत एक नाविन्य आहे ते म्हणजे या चकमकीत  एकही पोलिस मारला गेला नाही. मग प्रश्न पडतो की हे शक्य आहे का? अजिबात नाही. नक्षलवादी म्हणजे कोणी शेंबळी पोरं नाहित की त्यांची सात माणसं मारेस्तोवर ते उत्तर देणार नाहीत . पण आजची बातमी तर तेच सांगते आहे. त्यामुळे मला फेक नक्षलवादी व फेक चकमकींची आठवण झाली. मागच्या दोन तीन वर्षातले नक्षलवाद्यांचे हल्ले जरा बारकाईने तपासल्यास असे आढळेल की नक्षलवादी हे अत्यंत कुशल व प्रशिक्षीत लढवय्ये (किंवा लाल सैनिक) आहेत. मग ७ लाल सैनिकांचे मुडदे पडेस्तोवर एकही लाल गटातील गोळी पोलिसांचा समाचार घेत नाही म्हणजे दाल मे कुछ काला है.  इथे नक्षलवाद्यानी पोलिसाना मारावे ही इच्छा नसून दोन सशस्त्र गटात झालेल्या गोळीबारात एका गटाला खरचटतही नाही हा  मुख्य मुद्दा आहे. गडचिरोलीतील पोलिस काय उपद्रव करतात हे शहरात बसलेल्या पत्रकाराना कधीच कळत नाही व त्यामुळे तिथली खरी बातमीही बाहेर पडत नाही. भामरागडच्या रानात नक्षलवादी जितक्या पोलिसाना मारतात त्याच्या कित्तेक पट आदीवासीना पोलिस मारत असतात व त्यावर लेबल चिटकवतात की अमुक तमुक तो नक्षलवादी होता. अशीच एक गाजलेली केस म्हणजे आमच्या कुडकेल्लीच्या रेडी गायत्याची (एडका आत्राम)ची.  रेडीला पोलिसांनी धरुन नेलं व इतकं मारलं, इतकं मारलं की रेडीदादा (हा नात्यानी मला भाऊ लागायचा) जाग्यावर मेला. त्या नंतर आमची अवस्था काय झाली विचारायची सोय नाही. एडक्याची केस सुदैवाने मिडीयानी उचलली व पोलिसांचा बुरखा फाडला. पण असे अनेक एडके पोलिसानी आजवर मारले व त्याना नक्षलवादी घोषीत करुन मोकळे झालेत. आजची बातमी वाचून त्यातलाच एक प्रकार घडला असावा असे वाटते. तसं नसल्यास दुसरी शक्यता ही आहे की या नक्षलवाद्याना आधीच कधितरी धरलं असावं किवा नक्षलवादी शरण आले असावेत. अन आज पद्दतशीरपणे कट रचून त्यांचा गेम करण्यात आला असावा...पण खरीखुरी चकमक झाली, सात नक्षली मेले व पोलिसांना खरचटतही नाही ही गोष्ट मात्र केवळ अशक्य वाटते.
मी आमच्या कुडकेल्लीची अजुन एक बातमी आज फोडतोय ती म्हणजे  पेडू वड्डे नावाच्या तरुणाची. हा पेडू नावाचा तरुण  कुडकेल्ली फाट्यावर उतरुन गावात येत होता. रानात गस्तीवर असलेल्या पोलिसानी त्याला धरुन नेले व नक्षलवादी म्हणून घोषीत केले. आम्ही इकडे आवाक. कारण पेडूचं व नक्षलवाद्यांचं काहीच संबंध नाही हे उभ्या गावाला माहित होतं. पण आम्ही रानातली माणसं, पोलिसाना जाब विचारण्याची हिंमत कुणात नव्हती. आम्ही सगळी गप्प बसलो. तिकडे नक्षलवाद्याला धरले म्हणून पोलिसांचा सत्कार झाला व अधिका-यांचाही. अन एक फेक नक्षलवादी जगाच्या पुढे उभं  करुन पोलिसानी स्वत:ची पाठ थोपटून घेतली. आपल्याकडे वकिल नाही, केस लढायला पैसे नाही व शहरात येऊन एखाद्याला भेटून व्यथा मांडायची सोय नाही... हे सगळं नाही म्हणून पेडू नक्षलवादी ठरला तो ठरलाच. थोडक्यात साधनांचा अभाव तुम्हाला नक्षलवादी ठरवू शकतो हे मी डोळ्यानी पाहिले आहे.

पेडू वड्डॆची केस काय तर नुकतच ताडगावात नवीन पोलिस चौकी सुरु झाली होती. मग ताडगावचे पोलिस दुडेपल्ली-कुडकेल्ली-केडमारा या रानात नेहमी गस्त घालत असत.  नुसतं गस्तच नाही तर पोलिसांच्या या सशस्त्र फौजा कुडकेल्लीत अनेक वेळा तळ ठोकून राहू लागल्या. मग हे पोलिस कुडकेल्लीच्या कट्ट्यावर बसून दारु ढोसत व गस्त पुर्ण केल्याची रिपोर्टींग करत. काही दिवसानी कुडकेल्लीतच नाही तर दुडेपल्ली-ताडगाव इथेही पोलिस लोकं दारु  ढॊसू लागली. मग काय, दररोज नवीन दारुचे अड्डे शोधने व दारु ढोसने सुरु झाले. असच एकदा दारुचा अड्डा शोधताना ताडगावचे पोलिस एक बाईच्या दारु-अड्ड्यावर जाऊन धडकले. सुरुवातीला फुकट, मग पैशानी, नंतर उधारीवर अशा टप्प्यातून गेल्यावर तिथे मैत्रीही झाली.  मग मित्र पोलिसाना रात्री अपरात्री उठून दारु देण्याचे काम बाई चोख बाजावू लागली. 
काही पोलिसाना मात्र शराब-शवाबची सोय एकाच ठिकाणी होईल असे वाटले व तसे प्रयत्न करुन झाले. पण तिनी दाद दिली नाही, कारण त्या बाईचा धंधा दारु विकणे होता, शरीर नाही.   शेवटी एकानी प्रेमाचे फासे फेकले व बाई  फसली.  मग अजुन एकाने फासे फेकले तेंव्हा मात्र बाई गोंधळली. मग फासे फेकणारे दोन पोलिस एकमेकाचे शत्रू बनले. दोघानाही दारुवाल्या बाईवर ताबा मिळवायचा होता. बायका पोराना दूर शहरात ठेवून गडचिरोलीच्या रानात असणा-याना तेवढीच तात्पुरती सोय होताना दिसली असावी. पण इथे प्रेमाचा त्रिकोण तयार झाला. मग एकाच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली व त्यानी दुस-याचा खून करण्याचा कट रचला. पण खून करायचा कुठे हा प्रश्न होताच. मग एके दिवशी ही टीम आमच्या कुडकेल्लीच्या रानात गश्तीवर असताना प्रेमी नंबर एकने प्रेमी नंबर दोनचा काटा काढायचा ठरवला. कुडकेल्लीच्या रानातील एका ठिकानी जेंव्हा ही गस्त पोहचली तेंव्हा सोमरुन पेडू वड्डे येताना दिसला. हीच ती संधी साधून प्रेमी नंबर एकनी आपली बंदूक उचालली व प्रेमी नंबर दोनच्या छातीत गोळ्या उतरविल्या. पेडूला लगेच ताब्यात घेतलं व नक्षलवादी घोषीत करुन खुनाच्या आरोपात बेड्या ठोकल्या. बिचारा पेडू त्याचा काहिही दोष नसताना नक्षलवादी ठरला.

आजही कोणात हिंमत असेल तर आमच्या पेडू वड्डॆची केस रिओपन करावी अन पोलिसांचे करनामे पहावे.  ही माझ्या गावची घटना आहे.  भामरागडच्या रानात प्रत्येक गावातून अशा घटना घडल्याचे तुम्हाला दिसतील. एडका आत्रामचा पोलिसानी केलेला खून व पेडू वड्डेला नक्षलवादी घोषीत करणे... या दोनच घटनाच नाही तर अशा अनेक घटना आहेत ज्या गडचिरोली पोलिसांच्या फेक चकमकींचा पुरावा आहेत. का कुणास ठाऊक पण आजची चकमकही मला फेकच वाटते आहे. 

-जयभीम


सोमवार, १७ फेब्रुवारी, २०१४

मेधा पाटकरचा वैचारिक व्यभिचार!

आप नावाचं वादळ दिल्लीत उसळलं, नुसतं उसळलच नाही तर या वादळानी १५ वर्षे जुनी कॉंग्रेसची सत्ता उखडून फेकली व केजरीवाल नावाचं गल्लीतलं कारटं  दिल्लीत बसलं. नंतर तो कारट्यालाही लाजवेल असं वागला पण सुरुवात मात्र दमदार राहिली. हा एक चमत्कार होता. एक वर्ष जुना पक्ष थेट सत्तेत बसतो ही गोष्टच मुळात अशक्य होती.  केजरीवाल सत्तेत येईस्तोवर कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण तसे घडले व देशभरात एक नवी अशा पल्लवीत झाली. लोकाना वाटले आता केजरीवालच्या रुपात एक नवे देशव्यापी वादळ घोंगावेल व २०१४ चे सगळे समिकरण बदलुन टाकेल. मग केजरीवालच्या पक्षात एकसे बढकर एक लोकं दाखल होऊ लागली. लालबहाद्दुर शास्त्रीचा नातू, मिडीयातील नावाजलेलं नाव आशुतोष पासून अनेक सामाजिक कार्यकर्ते नि कार्पोरेट क्षेत्रातील दिग्गज लोकं आप मध्ये दाखल झाली. याच यादितील एक दिग्गज नाव म्हणजे मेधा पाटकर...
काल आपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली अन मेधा पाटकर मुंबईतून निवडणूक लढविणार हे ऐकुन मी हादरलोच. त्या निवडणूक लढविणार हे माहित होतं पण मुंबईतून लढविणार ही गोष्ट धक्कादायक होती. कारण मेधा मराठी असल्या तरी बाईची कर्मभूमी ही मुंबई नसून गुजरात मधिल नर्मदेच्या काठी मेधाबाईचं एकुण सामाजिक करिअर उभं झालं. नर्मदा बचाव आंदोलनातुन मेधा हे नाव लोकाना कळलं व त्याच आंदोलनावर उभी हयात उधळून देणारी मेधा निवडणूकीला उभी कुठून राहते, तर मुंबईतून. का बरं?  तुमची कर्मभुमी जर नर्मदा आहे, तुमचा सामाजिक लढा नर्मेदा खो-यातल्या लोकांसाठी आहे, तुम्ही ज्यांच्यासाठी झिजलात ती लोकं नर्मेदेच्या खो-यातली आहेत तर सहाजिकच तुमचं राजकीय करिअर सुरु करण्यासाठी नर्मदा खोरे हिच सगळ्यात उत्तम जागा ठरायला हवी होती. कारण राजकारणात सगळ्यात महत्वाचा घटक लागतो तो म्हणजे जनाधार... नि तुमचं कर्तुत्व जिथे जनाधार तिथे हे असं साधं समिकरण आहे.  पण बाई राजकीय इनिंगची सुरुवात नर्मदेतून करत नाही याचा अर्थ असा की नर्मदेच्या लोकांचा बाईला पाठिंबा नाही. मग याचा दुसरा अर्थ असा निघतो की बाईचा आजवरचा नर्मदा बचाव आंदोलन व लढा हा खोटा होता. कुणी म्हणेल आंदोलन खोटॆ नव्हते तर खरेच होते. तर मग परत तोच प्रश्न उठतो की बाईला लोकांचा पाठिंबा नव्हता की कसे? जर लोकांचा पाठींबा असता तर पाठीशी असलेला जनसमुदाय टाकून बाई मुंबईतून का निवडणूल लढवायला निघाल्या? जगातील कोणताही माणूस एवढा मुर्ख असूच शकत नाही की जिथे आपल्याला लोकांचा पाठिंबा आहे ती जागा सोडून भलतिकडूनच निवडणूक अजमावणार. यावरुन एक गोष्ट ठामपणे सांगता येईल ती म्हणजे बाईला नर्मदेच्या खो-यात पाठींबा नाही... अन पाठींबा नाही म्हटलं की लगेच बाईच्या आंदोलनावर प्रश्न उठणार. मग बाकी कोणी काही म्हणो पण बाईचं एकून कार्य शंकेच्या घे-यात आलं.
मेधा पाटकर मुंबईतून लढणार म्हटल्यावर एक गोष्ट सप्रमाण सिद्ध होते ती म्हणजे मेधाबाईनी नर्मदा खो-यात काहितरी लबाडी केली व त्यातूनच जनाधार मिळविण्यात कधीच यश आले नाही. मग ते आंदोलनासाठी असो वा राजकारणासाठी. अनेक वर्षाच्या अथक(?) परिश्रमा नंतर तो जनाधार राजकारणाच्या रुपातून आजमावण्याची वेळ येताच बाईला चक्क मुंबईला पळ काढावा लागतो, याचा अर्थ काय? नर्मदा खो-यात  सामान्य माणसाचा बाईला अजिबात पाठींबा नाही एवढच. मग आजवर कोणाच्या पाठिंब्यावर मेधाबाईचा लढा सुरु होता? कारण लढा सुरु होता हे जाहीरच आहे. पण नव्यानी जे सत्य बाहेर पडले किंवा मुंबईतून उभे राहून मेधाबाईनी ते स्वत:च बाहेर पाडले  ते म्हणजे नर्मदा खो-यात बाईला लोकांचा पाठींबा नाही. जर सामान्य माणूस तुमच्या पाठीशी नाही तर आजवर नर्मदा बचाव आंदोलन कोणाच्या सुपारीवर केल्या गेला व कोणासाठी केल्या गेला? असा भलताच प्रश्न उभा राहतो.  अन जर का याची चौकशी झाली तर मेधा कोणाची एजंट आहे तेही कळेलच.

बरं या बाईचं तत्वज्ञान काय तर कुठल्याही प्रकारचा विकास होऊ दयायचा नाही. पर्यावरणाचा बाऊ करुन विकास कामं थांबविणे एवढाच एककलमी कार्यक्रम बाईला कळतो. धरण बांधल्या शिवाय शहराना पाणी देता येऊ शकत नाही हे सांगायची गरज नाही. अन बाईचा धरणांना कडाडून विरोध असतो. मग नावाला पुनर्वसनाचा प्रश्न पुढे करायचा नि विकास कार्यात अडथळा निर्माण करायचा. हा पैसे उकळण्याचा उद्योग होता का अशीही अधेमधे शंका येते.  आता त्या स्वत: ज्या मुंबईतून निवडणूक लढवित आहेत तिथे पाणी कुठून येतं? कुठल्यातरी धरणातूनच येतं ना? मग स्वत: धरणाचं पाणी प्यायचं, धरणाच्याच पाण्यानी आंघोळ करायची, व धरणाच्याच पाणिनी स्वत:ची घाण धुवायची अन लोकाना काय सांगायचं तर धरणं नकोत. हा काय प्रकार झाला? अन आता निवडणूकीला उभं कुठून राहताय तर चक्क त्या ठिकाणाहून जिथला सगळा मतदार फक्त धरणाच्याच पाण्यावर जिवंत आहे. ही जी विचारातील व आचरणातील विसंगती आहे  याला मी वैचारीक व्यभिचार म्हणतो, अन मेधा बाईला  वैचारीक व्यभिचारी.

-जयभीम

रिपब्लिकन पक्ष : आंबेडकरी चळवळितील लांडगे.

सध्या आंबेडकरी समाजातील नेते राजकीय मोजपट्टीने उभ्या समाजाचे मुल्यांकन करुन आंबेडकरी समाजाचा कसा पाडावा झाला याचा प्रचार करत आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या विघटनेतून व टोळीबाजीतून आंबेडकरी समाज निष्प्रभ झाला हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत आहेत. पण माझ्या मते ही पोटार्थी राजकारण्यांची लबाडी आहे. कारण रिपब्लिकनचा पराजय म्हणजे आंबेडकरी समाजाचा पराजय हे समिकरणच मुळात चुकीचे आहे. मिडीयानी तसे ओरडून आमचे खच्चिकरण करावे एकदा मान्य आहे, पण स्वत:च्या हितासाठी निळ्या नेत्यांनिही लबाड मिडीयाचा राग आवळावा ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी आहे. राजकारणात पाय रोवण्यासाठी कुठल्याही स्थाराला जाऊन समाजाची फसवणूक करणा-या या रिपब्लिकन नेत्याना कशाचीच लाज लज्जा राहिली नाही.
राजकारण हे आंबेडकरी चळवळीचे एकमेव उद्दिष्ट  आहे का? अजिबात नाही. किंबहूना आंबेडकरी चळवळीत राजकारणाचे स्थान गौण आहे, नगण्य आहे.  स्वातंत्र्य, समता व बंधुता हा आंबेडकरी चळवळीचा मूलमंत्र असून राजकारणातून तो कसा साधता येईल हे आजवर एकाही लांडग्याने सिद्ध केले नाही. पण प्रचारात मात्र प्रत्येकच लांडगा वरील वचन आवर्जून म्हणत असतो. आता जनतेनी अशा लांडग्याना सवाल करावा की तुम्ही स्वत:च गहान पडत असता मग वरील बदल कसे काय घडविणार? बघा काय उत्तर येतं त्यांच्याकडून! आंबेडर चळवळ चालविण्यासाठी  राजकारणात यश मिळालेच पाहिजे ही गोष्ट गैरलागू नि अनावश्य असून आजवर राजकीय पराजया नंतरही आंबेडर चळवळ कायम यशस्वी राहिली आहे ही वस्तुस्थीती आहे. आता ही वस्तुस्थीती मिडीया दडपून टाकते वा अनुल्लेखानी मारते ही गोष्ट वेगळी. पोटार्थी राजकारणी मात्र आंबेडकरी चळवळीला नेहमी राजकारणाच्या मोजपट्टीने मोजत असतात व लोकांची दिशाभूल करत असतात.
आंबेडकरी समाजाचा विकास साधण्यासाठी राजकीय यश आवश्यक आहे अशी आवई उठवून समाजात संभ्रम निर्माण करण्याची सध्या लाट उसळली आहे, कारण पुढे निवडणूका आहेत. त्यांचे म्हणणे जर खरे असते तर स्वातंत्र्यापासून राजकारणात सत्ता बळकावून बसलेल्या मराठा समाजाची अवस्था आज एवढी बिकट नसती... राजकारणात बसलेल्या मराठा समाजाची भरभराटी व्हायला हवी होती, पण तसे झाले नाही. म्हणजे राजकारणातून समाजाचे हीत साधता येते ही गोष्ट चक्क खोटी असून फक्त मत मिळविण्यासाठी असे फंडे वापरले जातात हे सिद्ध होते. म्हणजे आंबेडकरी विचारवंत व राजकारणी सत्तेत बसण्यासाठी समाजाची चक्क फसवणूक करत आहेत.
आंबेडकरी चळवळीची राजकीय आघाडी फसली पण सामाजीक व धार्मिक आघाडी प्रकाशझोतापासून दूर राहून ग्राउंड लेवलवर सातत्याने काम करत आहे. गावा-गल्लीत अनेक सामाजीक संघटना असून स्थानिक पातळीवर आंबेडकरी विचाराचा नि बौद्ध आचाराचा अखंड प्रचार नि प्रसार चालू आहे. दर वर्षी अनेक बुद्ध विहारांची निर्मीती होत आहे. आमच्या गडचिरोलीचंच घ्या... १९९० मध्ये अहेरीत एकमेव बुद्ध विहार होतं. मागच्या वीस वर्षात एका अहेरी तालुक्यात वीस बुद्ध विहारं झाली. कोणी उभारली ही विहारं? ग्राउंड लेवलवरच्या कार्यकर्त्यानी! मी भामरागडच्या दंडकारण्यात वाढलो. माडिया गांवदेवी आव्वालची पुजा करत माझी पिढी मोठी झाली. आज भामरागडच्या रानातील प्रत्येक बौद्धाच्या घरात बाबासाहेब पोहचले आहेत. कोणामुळे? ग्राउंड लेवलवर काम करणा-या चळवळीमुळे. ही गोष्ट अत्यंत आशादायी असून भारतात सर्वत्र बौद्ध धम्माची शिबीरं नि व्याख्यानाद्वारे नव्या दमाचे नवे उपासक निर्माण करणे चालू आहे. अनेक संघटना स्थानिक पातळीवर धम्माचा प्रसार करणारे मासिकं व साप्ताहिकं चालवित आहेत. ही सगळी चळवळ जी स्थानिक पातळीवर कार्यरत आहे ती मुख्य प्रवाहाच्या मिडीयापासून दूर आहे. आंबेडकरी चळवळीच्या सामाजीक व धार्मिक आघाड्या कधीच प्रकाश झोतात येत नाही... पण त्यांचं कार्य अखंडपणे चालू असतं. अन सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चळवळीचा ग्राफ कायम वरच्या दिशेनी चढता आहे.
पण लबाड मिडीया कधी यावर प्रकाश टाकत ना्ही अन ज्याची शकले उडाली त्या रिपब्लकनवर सारखा कॅमेरा ताणून "बघा आंबेडकरी चळवळीचं काय झालं" असं म्हणत आमच्या कार्यकर्त्यांना नाउमेद करण्याचे काम करत असते. अन आता तर पोटार्थी राजकारणी सुद्धा हाच सूर लावताना दिसत आहेत. ही स्थानिक पातळीवर कार्य करणा-या व प्रकाश झोतापासून दूर राहून धम्माची सेवा करणा-या लोकांशी केलेली लबाडी आहे.
मी एकच सांगू इच्छितो...

रिपब्लिकन नेत्यांच्या नादी लागू नका. सगळे नेते लबाड लांडगे असून रिपब्लिकन हे नाव स्वत:च्या राजकीय हितासाठी वापरत आहेत. राजकीय यश मिळो वा न मिळो... आंबेडकरी चळवळ ना कधी थांबली ना कधी थांबेल. स्थानिक पातळीवर सच्चे सैनिक सदैव चळवळ तेवत ठेवत आहेत ही वस्तूस्थीती असून तीच खरी आंबेडकरी चळवळ आहे.... राजकीय व रिपब्लिकन चळवळ एक लबाडी असून त्याचा ख-या आंबेडकरी चळवळीला काहीच फायदा नाही. जर त्यातून कोणाचा फायदा होत असेल तर बाबासाहेबांच्या नावानी राजकारण करणा-या पोटार्थी नेत्यांचा.

आता निवडणूका तोंडावर आल्या... सगळे नेते बाबासाहेबांच्या नावानी भीक मागायला सज्ज होत आहेत. आता  भीक मागायचे म्हटल्यावर "अल्ला के नाम पे दे दे" टाईप  स्लोगनची गरज आलीच. मग निळ्या लांडग्यानी रिपब्लिकन व बाबासाहेब  नावाचं वापर करुन अनेक स्लोगन तयार केले व भीक मागायला  सुरुवात केली आहे. हा सगळा आटापिटा चळवळीसाठी नसून स्वत:ची खडगी भरण्यासाठी आहे हे याद राखा. हे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते नसून आंबेडकरी चळवळितील लबाड लांडगे आहेत. एवढं आठवण ठेवा.

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०१४

रिपब्लिकन पक्ष : सुनिल खोब्रागडे साहेबांच्या नोट्सवरुन साभार.

सार्वत्रिक निवडणुका आल्या की रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचे ऐक्य करण्याच्या हालचाली सुरु होतात असा आजवरचा अनुभव आहे. यापूर्वी अनेकवेळा रिपब्लिकन ऐक्याचे प्रयत्न करण्यातआले. परंतु आजपर्यंत रिपब्लिकन ऐक्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी ठरलेला नाही. रिपब्लिकन ऐक्याचे हौशी प्रयोग करणारे कवी, लेखक, स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरवादी जनतेला निर्वाण प्राप्त करून देण्याची कामगिरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावरच सोपविली आहे, असे समजणारे फार महान युवक आणि कुडमुडे विचारवंत यांचे उदंड पीक रिपब्लिकन गटांच्या दलदलीत फोफावते आहे. रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांच्या ऐक्याबाबत आंबेडकरवादी समाज अत्यंत संवेदनशील आहे. रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य व्हावे असे आंबेडकरवादी समाजातील लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच वाटते. मात्र, रिपब्लिकन पक्ष का आणि कशासाठी?रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य म्हणजे काय? वास्तवाच्या पायावर रिपब्लिकन ऐक्य शक्य आहे काय?रिपब्लिकन ऐक्य शक्य नसेल तर अन्य कोणते मार्ग चोखाळावे लागतील? या व तद्नुषंगीक इतर प्रश्नासंदर्भात वास्तववादी चिकित्सा अभावानेच केली जाते. समाजाची तीव्र इच्छा आणिभावनात्मक गरज असूनही नेते एकत्र येत नाहीत म्हणून नेत्यांना दोष देत चरफडत राहणे व रागापोटी आणि नैराशापोटी काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप - शिवसेना अथवा बहुजन समाज पार्टी यासारखे आंबेडकर विरोधी पर्याय स्वीकारणे असा आंबेडकरवादी जनतेचा राजकीय आचार सुरुआहे. म्हणून रिपब्लिकन पक्षाची संकल्पना, आवश्यकता, ऐक्य आणि दिर्घकालिन अस्तित्वासाठी आवश्यक धोरण यांची सर्वांगिण चिकित्सा करुन आंबेडकरवादी विचारांशी सुसंगत व्यावहारीक भूमिका ठरविणे गरजेचे आहे.

रिपब्लिकन पक्षाची डॉ. आंबेडकरांची संकल्पना
भारताचे संविधानलागू झाल्यानंतर देशात संसदीय लोकशाही प्रणाली लागू झाली. संसदीय लोकशाहीत राजकीय सत्ता प्रस्थापित करण्यासाठी अथवा संवैधानिक तरतुदीनुसार राज्यकारभार चालावा म्हणून सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी राजकीय पक्ष आवश्यक असतो. यानुसार पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत सहभागी होण्यासाठी विविध विचारांच्या नेत्यांनी राजकीय पक्ष स्थापन केले. देशाची पहिली सार्वत्रिक निवडणुक होण्याच्या वेळी भारतामध्ये गांधीवादी विचाराला मानणारा काँग्रेस पक्ष, ब्राह्मणवादी विचाराला मानणारे हिंदू महासभा, भारतीय जन संघ, कम्युनिस्ट तत्वज्ञानाला मानणारे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सोशॅलिस्ट पार्टी, फॉर्वर्ड ब्लॉक इत्यादी राजकीय पक्ष अस्तित्वात होते. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना यापैकी कोणताही राजकीय पक्ष समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या तत्वत्रयीवर आधारीत भारतीय संविधानाची तंतोतंत अंमलबजावणी करु शकेल असे वाटत नव्हते. यामुळेच 1952 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यात त्यांनी हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच कम्युनिष्ट यांच्याशी कधीच सहकार्य करणार नाही असे स्पष्ट केले आहे. याबरोबरच `जो अन्य पक्षाविरुद्ध पक्षाच्या विकासाला बाधा आणील आणि देशात एकच एक पक्ष राहण्याचे धोरण पत्करील अशा पक्षांशी तर फेडरेशन कधीच सहकार करणार नाही'असे निक्षून सांगितले आहे. (असा पक्ष म्हणजे काँग्रेस आहे हे जाहीरनाम्यातील इतर उल्लेखावरूनसिद्ध होते). 1952 ची सार्वत्रिक निवडणूक तसेच भंडारा लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणूकल ढवितांना उच्च जातीयांनी जातीय मानसिकतेतून शेड्युल्ड कास्टस्  फेडरेशनला एकटे पाडले.या अनुभवातून सर्व जाती धर्मांच्या विवेकशील लोकांचा सर्व समावेशक पक्ष निर्माण करण्याची तयारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केली. रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्याचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी डिसेंबर 1955 मध्ये औरंगाबाद येथील वास्तव्यात पहिल्यांदा बोलून दाखविला होता. भारतीय राज्यघटना खऱयाखुऱया अर्थाने राबविण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षाला भाग पाडणे, काँग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठी सर्व लहानसहान राजकीय पक्षांचे एकीकरण करून प्रबळ विरोधी पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला प्रस्थापित करणे हा रिपब्लिकन पक्षाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. (जनता ः 10डिसेंबर, 1955) त्यानंतर 30 सप्टेंबर,1956 रोजी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी त्यांच्याच अध्यक्षतेखाली घेतलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या केंद्रीय कार्यकारीणीच्या बैठकीत शेकाफे बरखास्त करून`रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' नावाचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानंतर 13 ऑक्टोबर, 1956 रोजी नागपूर येथे `रिपब्लिकन पार्टी स्थापन करण्याचे आपण निश्चित केले आहे काय?' असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देऊन या पक्षाची घटना आपण तयार केल्याचे सांगितले.पक्षाचे तत्वज्ञान कोणते राहील? या प्रश्नाला उत्तर देताना, पक्षासाठी मुख्य गरज असतेती कणखर नेत्याची असे उत्तर त्यांनी दिले. (प्रबुद्ध भारत ः27 ऑक्टोबर, 1956 पृष्ठ.25-26)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या उत्तरांवरून रिपब्लिकन पक्षाची घटना डॉ. बाबासाहेबआंबेडकरांनी स्वतः लिहिली असल्याचे, तसेच, पक्षाच्या यशस्वीतेसाठी कणखर नेता ही मुख्य गरज असल्याचेही स्पष्ट होते. काँग्रेसला विरोध करण्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसमोर होतेहे सुद्धा त्यांच्या वरील उद्गारांवरून स्पष्ट होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीवादी,ब्राह्मणवादी आणि कम्युनिस्ट या तीन विचारधारांना नाकारुन रिपब्लिकन नावाची निखळ लोकशाहीवादी चौथी राजकीय संकल्पना भारतीय राजकारणाच्या पटलावर निर्माण केली. मात्र, त्यांच्या संकल्पनेतील राजकीय कृती प्रत्यक्षात उतरविण्यापूर्वीच त्यांचे परिनिर्वाण झाले.
 रिपब्लिकनपक्षाचा तत्वज्ञानात्मक आधार
रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी30 सप्टेंबर 1956 रोजी घेतलेल्या शेकाफेच्या कार्यकारी मंडळांच्या बैठकीत घेतला होता.या पक्षाची घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून काढली होती. या पक्षात सामील होण्याचे आवाहन भारतीय जनतेला करणाऱया खुल्या पत्रात रिपब्लिकन पक्षाच्या घटनेत नमूद ध्येय्य व उद्दिष्टांचा भाग समाविष्ट आहे. रिपब्लिकन पक्षाच्या घटनेत नमूद पक्षाची ध्येय्य व उद्दिष्टे व तत्वप्रणाली याचा संक्षिप्त आढावा घेतल्यास रिपब्लिकन पक्ष पुढील सात तत्वावर अधिष्ठित आहे हे दिसून येते. ही सात तत्वे अशी
1) समान न्याय ः- समान न्याय व समान दर्जा हा पत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध अधिकार आहे.
2) स्व-विकास ः-पत्येक व्यक्तीला स्वत:च्या मर्जीप्रमाणे स्व-विकास करण्याचा हक्क आहे. स्व-विकास ही जीवनाची सर्वोच्च सार्थकता आहे. 
3) स्वातंत्र्य ः- प्रत्येक व्यक्तीला धार्मिक,आर्थिक व राजकीय स्वातंत्र्याचा हक्क आहे.
4) समान संधी ः- वंचित घटकांना अग्रक्रम देण्याचे तत्व मान्य करून पत्येक भारतीयास समान संधी मिळण्याचा हक्क आहे.
 5) दास्य-भूख-भय मुक्ती ः- पत्येक भारतीयास त्याच्या जीवनातील दास्यता, भूख व भय यापासून मुक्ती मिळवून देणे हे राज्याचे कर्तव्य आहे. याची राज्याला सतत जाणीव करून देण्यासाठी पत्येकाने संघर्षरत राहिले पाहिजे.
6) शोषण मुक्ती ः- एका मनुष्याची दुसऱया मनुष्याकडून,एका वर्ग समूहाची दुसऱया वर्ग समूहाकडून आणि एका राष्ट्राची दुसऱया राष्ट्राकडून होणारी पिळवणूक, शोषण आणि जुलूम यापासून मुक्ती मिळविण्यासाठी  संघर्ष करणे आवश्यक आहे.
7) लोकशाही ः- व्यक्ती आणि समाज यांच्या कल्याणासाठी संसदीय लोकशाही सर्वोत्तम शासनपणाली आहे.

रिपब्लिकन पक्षाचा कार्यक्रम
वरील सात तत्वाबरोबरच रिपब्लिकन पक्ष सात प्रकारचे कार्यक्रम राबवील असे ठरविण्यात आले होते.ते असेः- 
1) मागासवर्गीयांचे संघटन ः- भारतातील दडपलेली जनता विशेषत बौद्ध,अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास वर्ग यांना संघटीत करणे.
2) मजुरांचे संघटन ः- शेतकरी,भूमिहीन शेतमजूर, कारखान्यातील कामगार व दैनिक मजुरीवर काम करणारे मजूर यांना संघटीत करणे.
3) शिक्षण विकास ः- शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण प्रसाराची,कला व धंदे शिक्षण देण्याची व्यवस्था करणे. 
4) नैतिक विकास ः- जनतेच्या नैतिक व सांस्कृतिक विकासासाठी कार्यक्रम राबविणे.
5) अन्यायाविरूद्ध संघर्ष  ः- पिळवणूक व दडपणूक झालेल्यावरील अन्याय व जुलूम जबरदस्तीच्या बाबींची दाखल घेणे. त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडणे, त्याबद्दल दाद मागणे. 
6) पसार माध्यमांची निर्मितीः- मुद्रणालये संचालित करून साहित्य प्रकाशित करणे.
7)ध्येय सुसंगतता ः-पक्षांची तत्वे, ध्येय्य-धोरणे उद्दिष्टे प्रत्यक्षात उतरविण्यासाठी वरील बाबी व्यतिरिक्त अन्य आवश्यक कार्यक्रम हाती घेणे.
रिपब्लिकन पक्षाचा तत्वज्ञानात्मक आधार आणि ध्येय्य-धोरणाशिवाय पक्षाच्या घटनेतील इतर तरतुदींचा अभ्यास केल्यानंतर पक्षाच्या सुदृढतेसाठी एकूण सात पकारच्या कसोट्या आखून दिल्याचे दिसून येते. त्या अशा  ः- 
1) घटनात्मक बांधिलकी- पक्षाची घटना लिखित स्वरूपात मान्य करणे आणि या घटनेनुसारच कार्य करणे.
2) खुले सभासदत्व - पक्षाचे सभासदत्व सर्व भारतीयांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.
3) सत्तेचे विकेंद्रीकरण - ग्राम स्तरापासून ते केंद्र स्तरापर्यंत स्वतंत्र कार्यकारीण्या तयार करणे व पत्येक निर्णय लोकशाही पद्धतीने घेणे हा अधिकार सदस्यांना  देण्यात आला आहे. 
4) नियतकालिक बैठका - पक्षांतर्गत लोकशाहीची  अंमलबजावणी व्हावी यासाठी कार्यकारीणीच्या नियतकालिक बैठका अनिवार्यपणे घेण्यात आल्या पाहिजे अशी तरतुद करण्यात आली आहे. 
5) नियतकालिक अधिवेशने - जनतेला पक्षाच्या कामकाजात सहभागी होता आले पाहिजे व पक्षाला समाजमान्यता मिळाली पाहिजे. यासाठी नियमितपणे अधिवेशने व मेळावे घेण्याची तरतुद घटनेत करण्यात आली आहे.
6) निवडणुक मंडळ - कार्यकर्त्यांना स्वत:ची क्षमता सिद्ध करण्यासाठी निवडणुकांना सामोरे जाण्याची सवय झाली पाहिजे. यासाठी  पक्षांतर्गत निवडणुक मंडळाची तरतुद करण्यात आली आहे.
7) शिस्त - पक्षाच्या परिवारातील इतर सहयोगी संघटनांशिवाय अन्य संघटनांशी संबंध ठेवणे त्याचपमाणे पद स्विकारून पक्षाचे कार्य न करणे हे बेशिस्त वर्तन समजण्यात आले आहे.

रिपब्लिकन पक्षाला नैतिकदृष्ट्या उन्नत व शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचा व सहानुभूतीदारांचा सतत पुरवठा होत रहावा यासाठी रिपब्लिकन परिवारात अंतर्भूत सहयोगी संघटना म्हणून भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल या अराजकीय संघटनांची व्यवस्था करण्यात आली आहे.  रिपब्लिकन पक्षाचा तत्वज्ञानात्मक आधार, पक्षाची ध्येय-उद्दिष्टे व कार्यकम तसेच पक्ष सुदृढतेच्या कसोट्या याचे अध्ययन केल्यास हा पक्ष भारतात अस्तित्वात असलेल्या अन्य कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा सर्वच बाबतीत सरस आहे,हे दिसून येते. मात्र पक्षाच्या या वैशिष्ट्यांची शिकवण सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहचविण्यात रिपब्लिकन पक्षाचे नेते, रिपब्लिकन पक्षाविषयी सहानुभूती असलेले बुद्धीजीवी,विचारवंत, लेखक, सामाजिक कार्यकर्ते कमी पडले असे खेदाने म्हणावेसे वाटते.

रिपब्लिकन पक्षाची फुट व ऐक्याचे प्रयत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय संकल्पना कृतीत उतरविण्यासाठी त्यांच्या सहकाऱयांनी 3 ऑक्टोबर,1957 रोजी रिपब्लिकन पक्षाच्या नावाने राजकीय कार्य सुरु करण्याचा निर्णय घेतला. रिपब्लिकन पक्षाच्या प्रारंभीच्या काळातील पक्षाची कार्यप्रणाली तसेच रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांची लोकसभेतील कामगिरी याचे अवलोकन केल्यास रिपब्लिकन पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय संकल्पनेस पत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसते. रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेनंतर सन 1959 साली ऍड. बी.सी.कांबळे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाचा एक स्वतंत्र गट स्थापन झाला व पक्षात पहिली फुट पडली. त्यानंतर आर. डी. भंडारे यांनी सन1964 मध्ये आपले स्वतंत्र गट स्थापन केला. दादासाहेब गायकवाड यांच्या वृद्धावस्थेमुळे आणि आजारपणामुळे कटकारस्थाने करून पक्षात महत्वाचे स्थान प्राप्त केलेल्या रा.सु.गवई यांनी पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावंत नेते बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांना सरचिटणीस पदावरून दूर करून त्यांच्या जागी ना.ह.कुंभारे यांची नियुक्ती केली. यामुळे बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे पक्षातून बाहेर फेकले गेले. या घटनेमुळे  दुखावले जाऊन त्यांनी सन 1970 मध्ये आपला स्वतंत्र गट स्थापन केला. फाटाफुटीमुळे रिपब्लिकन शक्ती विभागली गेल्याची जाणीव झाल्यानंतर ऍड. बी.सी.कांबळे यांनी 27 नोव्हेंबर,1971 रोजी रिपब्लिकन गटांच्या ऐक्यासाठी पुणे येथे बैठक बोलविली. मात्र त्यास कोणीही प्रतिसाद दिला नाही.दलित पँथरच्या स्थापनेनंतर रिपब्लिकन गटांच्या नेत्याविरूद्ध तरुणांमध्ये पराकोटीचा असंतोष जाहीरपणे व्यक्त होऊ लागला.या पार्श्वभूमीवर 26 जानेवारी 1974 रोजी दिवंगत यशवंतराव आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली तत्कालिन गटप्रमुख बॅ.खोब्रागडे,रा.सू.गवई,ऍड.बी.सी.कांबळे यांच्या उपस्थितीत चैत्यभूमीवर विराट जाहिर सभा घेण्यात आली. सर्व नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन एक होण्याचे व एकी कायम राखण्याचे विशाल जनसमुदायासमोर जाहिर केले.मात्र,त्यानंतर या नेत्यांनी चैत्यभूमीवरील बाबासाहेबांची शपथ विसरुन आपापले गट शाबूत ठेवले. ऐक्याच्या या फसलेल्या प्रयोगानंतर आंबेडकरवादी पक्ष आणि संघटनांच्या विविध गटांचे पेव फुटले.रिपब्लिकन पक्ष व दलित पँथरच्या विविध गटांनी वैयक्तिक लाभासाठी सत्ताधारी पक्षांसोबत चालविलेल्या तत्वशून्य तडजोडींमुळे आंबेडकरवादी जनतेमध्ये वैफल्याची भावना निर्माण होऊ लागली.1995 साली राज्यामध्ये सत्तांतर होऊन शिवसेना-भाजपाचे सरकार स्थापन झाले.काँग्रेसच्या पराभवामागे रिपब्लिकन जनतेच्या मतांचे विभाजन कारणीभूत आहे हा अंदाज आलेल्या काँग्रेसने रिपब्लिकन गटांच्या एकत्रिकरणासाठी पडद्याआडून प्रयत्न सुरु केले.रिपब्लिकन ऐक्यासाठी काही युवक उपोषणास बसले.या उपोषणामुळे व आंबेडकरवादी जनतेच्या वाढत्या दबावामुळे 25 डिसेंबर 1995 रोजी रिपब्लिकन पक्षाची एकी झाल्याचे घोषित करण्यात आले. एकीकृत रिपब्लिकन पक्षाने काँग्रेससोबत युती करु नये यासाठी जनतेचा दबाव असल्यामुळे 1996 साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत रिपब्लिकन पक्षाने स्वबळावर 19 उमेदवार उभे केले.यापैकी एकही उमेदवार निवडून आला नाही.परंतु, रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना लक्षणीय मते मिळाल्यामुळे त्याचा सर्वांधिक फटका काँग्रेस पक्षाला बसला.यानंतर 1998 साली झालेल्या लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीत काँग्रेसने ऍड.प्रकाशआंबेडकर,रा.सू.गवई, प्रा.जोगेंद्र कवाडे व रामदास आठवले या प्रमुख नेत्यांना निवडून आणण्याची हमी दिल्यानंतर काँग्रेसशी निवडणूक युती करण्यात आली व त्या निवडणुकीत हे चारही नेते निवडून आले. यानंतर मात्र, या नेत्यांमध्ये बेबनाव निर्माण झाल्याने त्यांनी आपापले गट पुनर्जिवीत केले.यानंतर रिपब्लिकन पक्षाचे नवनवीन गट तयार होण्याचे प्रमाण वाढले. सद्यस्थितीत रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट कार्यरत आहेत.ब्राह्मणवादी प्रसारमाध्यमांतील पोटार्थी पत्रकार तसेच बहुजन समाज पार्टीसारखे संधीसाधू या गटांची संख्या 50-60 असल्याचेसांगतात. मात्र, ही अतिशयोक्ती आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या अवनतीचे नेमके निदान करणे गरजेचे 
रिपब्लिकन पक्षाच्या ऱहासाची कारणे सांगताना बहुतेक सर्वच अभ्यासक आणि कार्यकर्ते नेतृत्वातील फाटाफूट हे एकमेव कारण सांगतात. भारतातील सत्ताधारी काँग्रेस पक्ष,जनसंघ किंवा आताचा भाजप,कम्युनिष्ट पक्ष, समाजवादी पक्ष या प्रमुख पक्षांच्या नेतृत्वात अनेकदा फाटाफूट झाली आहे. मात्र हे पक्ष पूर्णपणे नामशेष झाले असे दिसत नाही. स्वातंत्र्यानंतर नेहरूच्या नेतृत्वाला काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी विरोध सुरु केला.यातूनच1951 साली आचार्य कृपलानी, एन.जी. रंगा यांनी स्वत:चे पक्ष स्थापन केले. 1959 मध्ये मोहनदास गांधीचे व्याही चक्रवर्ती राजगोपालाचारी उर्फ राजाजी यांनी `स्वतंत्र पक्ष'नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. यानंतरही इंदिरा गांधीच्या नेतृत्वाला विरोध करून कामराज, मोरारजी देसाई, बिजू पटनाईक, चेन्ना रेड्डी, जगजीवन राम, देवराज अर्स, शरद पवार इत्यादी नेत्यांनी स्वत:चे पक्ष स्थापन केले.राजीव गांधीच्या नेतृत्वाला विरोध करीत प्रणव मुखर्जी, व्ही.पी.सिंग यांनीही पक्ष स्थापन केले. त्यानंतरही ममता बॅनर्जी,के.करुणाकरण इत्यादी अनेक नेत्यांनी वेगळे पक्ष स्थापन केले.आताच्या भाजपमध्येही जनसंघाच्या काळातच अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाला विरोध करून बलराज मधोक यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. भाजपमधील वाघेला, केशुभाई, कल्याण सिंग, उमा भारती, येद्दीयुराप्पा इत्यादी अनेक नेत्यांची अनेकदा फाटाफूट झाली आहे. तीच स्थिती कम्युनिष्टांची, जनतादलाची व इत्तर अनेक प्रादेशिक पक्षांची आहे.रिपब्लिकन पक्षाचे ४८ गट आहेत म्हणून असल्या-नसल्या गटांची यादी देणाऱ्या बहुजन समाज पार्टीचे उत्तर प्रदेशात लहान-मोठे १६ गट,पंजाब मध्ये ७ गट,मध्य प्रदेशात ६ गट छतीसगढ मध्ये २ गट कार्यरत आहेत.तरीही हे पक्ष संपले नाहीत.मग नेतृत्वाच्या फाटाफुटीमुळे फक्त रिपब्लिकन पक्षच कसा काय समाप्त होऊ शकतो ? या प्रश्नाचे उत्तर ऐक्यवादी लोकांकडे नाही.रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वातील फाटाफूट हे रिपब्लिकन पक्षाच्या ऱहासाचे एकमेव कारण नाही तर हा पक्ष ज्या तत्वपणालीवर निर्माण करण्यात आला ती तत्वपणाली लोकांमध्ये रुजविण्यास या पक्षाचे पुरस्कर्ते कमी पडले हे रिपब्लिकन पक्षाच्या ऱहासाचे एक अत्यंत महत्वाचे कारण आहे.रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी प्रयत्न करणाऱया बहुसंख्य मंडळींना (वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणाऱया काही सन्माननीय व प्रामाणिक व्यक्ती वगळता) रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य करणे म्हणजे काय करणे याची सुस्पष्ट कल्पना नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते. रिपब्लिकन ऐक्याचा अजेंडा घेऊन विविध ठिकाणी बैठका घेणाऱया तरुणांना रिपब्लिकन पक्षाची तात्विक बैठक काय आहे याबाबत जुजबी माहिती देखील नसल्याचे जाणवले.ऐक्याची भूमिका मांडणाऱया बहुसंख्य कार्यकर्त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या फाटाफुटीला केवळ रिपब्लिकन पक्षाचे नेतेच जबाबदार आहेत असे वाटते.त्यामुळे ऐक्य परिषद घेऊन त्यामध्ये विविध गटांच्या नेत्यांना पाचारण करणे, रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांच्या प्रमुखांची बैठक घेणे, त्यांना एकत्रित बोलावून परस्परांशी युती करुन निवडणुक लढविण्यास सांगणे, रिपब्लिकन गटांनी एक-दुसऱयाच्या विरोधात उमेदवार उभे न करण्यासाठी गटांच्या प्रमुखांचे मन वळविणे, स्थानिक स्तरावर जनतेची आघाडी करून  राष्ट्रीय नेत्यांना बाजूला सारून निवडणूका लढविणे यासारखे वरवरचे उपाय करुन रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य करण्याची स्वप्नाळू धडपड यापैकी अनेकजन करीत आहेत. अशा प्रकारचे प्रयत्न यापूर्वीही अनेक नेत्यांनी आणि संघटनांनी केले आहेत. या प्रयत्नांचे यशापयश सर्वांना माहित आहे. या स्थितीत केवळ नेत्यांचे ऐक्य म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य नव्हे हा धडा ऐक्यवादी तरुणांनी आणि संघटनांनी घेणे आवश्यक आहे. मात्र, जुन्या अनुभवातून शिकण्याची प्रगल्भता तरुणांमध्ये अद्याप आलेली नाही.आणि भावनात्मक्तेच्या पुढे जाऊन व्यवहाराच्या पातळीवर खंबीर भूमिका घेण्याचा धोरणीपणा स्वप्नाळू ऐक्यवाद्यामध्ये आलेला नाही हेच त्यांच्या ऐक्यासाठीच्या   अर्धवट पुढाकारातून दिसून येते.रिपब्लिकन पक्षाच्या अवनतीच्या कारणांचे नेमके निदान करता न आल्यामुळे ही अवनती रोखण्याचे परिणाकारक उपायसुद्धा शोधता आलेले  नाहीत ही ऐक्यवाद्यांची कमजोरी आहे. 
रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचे नेते, प्रवक्ते आणि पुरस्कर्ते आपला पक्ष कसा योग्य हे पटवून देताना आपल्या गटाच्या नेत्याचे नेतृत्वगुण, लढाऊपणा,घराण्याचा वारसा, त्याग, चळवळीतील सहभाग याचीच चर्चा करतात. इतरांनी आपल्या गटात सामील झाले तर आपला गट मुख्य पक्ष म्हणून प्रस्थापित होईल व  इतर सर्व गट नामशेष होतील असा युक्तिवाद करतात. ऐक्यवादी   अथवा स्वयं सर्वोत्तम गटवादी यापैकी कोणीही रिपब्लिकन संकल्पनेचा तत्वज्ञानात्मक आधार, कार्यक्रम, या संकल्पनेच्या यशस्वीतेच्या कसोट्या, पायाभूत संघटनांच्या बांधणीचे आधार या बाबींची चर्चा करीत नाही. प्रत्येक गटाचे नेते व पुरस्कर्ते आपला रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातील तत्वावर आधारित असल्याचे सांगतो.मात्र या खुल्या पत्रात चर्चिल्या गेलेल्या तत्वज्ञानात्मक आधाराची मांडणी कोणीही करीत नाही.यामुळे बामसेफ, बसपासारख्या छद्मी (Psuedo) (फसव्या) आंबेडकरवादीपक्ष संघटनांनी नेतृत्वाच्या गुण-दोषावर टीका करून आंबेडकरवादी जनतेला आंबेडकरवादी तत्त्वज्ञानापासून तोडले आहे.या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी एकीकडे रिपब्लिकन संकल्पनेची तात्त्विक बाजू जनतेला समजावून गांधीवाद,ब्राह्मणवाद,मार्क्सवाद या विचारसरणीमुळे नव्हे तर प्रजासत्ताकवादी रिपब्लिकन विचारसरणीमुळेच भारतातील जनतेचा उद्धार होऊ शकतो हे प्रभावीपणे मांडावे लागेल.दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाच्या घटनेत नमूद तत्वांशी,धेय्य-धोरणांशी व कार्यक्रमाशी सुसंगत असे सर्व जात-वर्ग-धर्मीय जनलढे हाती घ्यावे लागतील.    

------