गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०१४

रिपब्लिकन पक्ष : सुनिल खोब्रागडे साहेबांच्या नोट्सवरुन साभार.

सार्वत्रिक निवडणुका आल्या की रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचे ऐक्य करण्याच्या हालचाली सुरु होतात असा आजवरचा अनुभव आहे. यापूर्वी अनेकवेळा रिपब्लिकन ऐक्याचे प्रयत्न करण्यातआले. परंतु आजपर्यंत रिपब्लिकन ऐक्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी ठरलेला नाही. रिपब्लिकन ऐक्याचे हौशी प्रयोग करणारे कवी, लेखक, स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरवादी जनतेला निर्वाण प्राप्त करून देण्याची कामगिरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावरच सोपविली आहे, असे समजणारे फार महान युवक आणि कुडमुडे विचारवंत यांचे उदंड पीक रिपब्लिकन गटांच्या दलदलीत फोफावते आहे. रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांच्या ऐक्याबाबत आंबेडकरवादी समाज अत्यंत संवेदनशील आहे. रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य व्हावे असे आंबेडकरवादी समाजातील लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच वाटते. मात्र, रिपब्लिकन पक्ष का आणि कशासाठी?रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य म्हणजे काय? वास्तवाच्या पायावर रिपब्लिकन ऐक्य शक्य आहे काय?रिपब्लिकन ऐक्य शक्य नसेल तर अन्य कोणते मार्ग चोखाळावे लागतील? या व तद्नुषंगीक इतर प्रश्नासंदर्भात वास्तववादी चिकित्सा अभावानेच केली जाते. समाजाची तीव्र इच्छा आणिभावनात्मक गरज असूनही नेते एकत्र येत नाहीत म्हणून नेत्यांना दोष देत चरफडत राहणे व रागापोटी आणि नैराशापोटी काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप - शिवसेना अथवा बहुजन समाज पार्टी यासारखे आंबेडकर विरोधी पर्याय स्वीकारणे असा आंबेडकरवादी जनतेचा राजकीय आचार सुरुआहे. म्हणून रिपब्लिकन पक्षाची संकल्पना, आवश्यकता, ऐक्य आणि दिर्घकालिन अस्तित्वासाठी आवश्यक धोरण यांची सर्वांगिण चिकित्सा करुन आंबेडकरवादी विचारांशी सुसंगत व्यावहारीक भूमिका ठरविणे गरजेचे आहे.

रिपब्लिकन पक्षाची डॉ. आंबेडकरांची संकल्पना
भारताचे संविधानलागू झाल्यानंतर देशात संसदीय लोकशाही प्रणाली लागू झाली. संसदीय लोकशाहीत राजकीय सत्ता प्रस्थापित करण्यासाठी अथवा संवैधानिक तरतुदीनुसार राज्यकारभार चालावा म्हणून सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी राजकीय पक्ष आवश्यक असतो. यानुसार पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत सहभागी होण्यासाठी विविध विचारांच्या नेत्यांनी राजकीय पक्ष स्थापन केले. देशाची पहिली सार्वत्रिक निवडणुक होण्याच्या वेळी भारतामध्ये गांधीवादी विचाराला मानणारा काँग्रेस पक्ष, ब्राह्मणवादी विचाराला मानणारे हिंदू महासभा, भारतीय जन संघ, कम्युनिस्ट तत्वज्ञानाला मानणारे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सोशॅलिस्ट पार्टी, फॉर्वर्ड ब्लॉक इत्यादी राजकीय पक्ष अस्तित्वात होते. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना यापैकी कोणताही राजकीय पक्ष समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या तत्वत्रयीवर आधारीत भारतीय संविधानाची तंतोतंत अंमलबजावणी करु शकेल असे वाटत नव्हते. यामुळेच 1952 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यात त्यांनी हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच कम्युनिष्ट यांच्याशी कधीच सहकार्य करणार नाही असे स्पष्ट केले आहे. याबरोबरच `जो अन्य पक्षाविरुद्ध पक्षाच्या विकासाला बाधा आणील आणि देशात एकच एक पक्ष राहण्याचे धोरण पत्करील अशा पक्षांशी तर फेडरेशन कधीच सहकार करणार नाही'असे निक्षून सांगितले आहे. (असा पक्ष म्हणजे काँग्रेस आहे हे जाहीरनाम्यातील इतर उल्लेखावरूनसिद्ध होते). 1952 ची सार्वत्रिक निवडणूक तसेच भंडारा लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणूकल ढवितांना उच्च जातीयांनी जातीय मानसिकतेतून शेड्युल्ड कास्टस्  फेडरेशनला एकटे पाडले.या अनुभवातून सर्व जाती धर्मांच्या विवेकशील लोकांचा सर्व समावेशक पक्ष निर्माण करण्याची तयारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केली. रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्याचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी डिसेंबर 1955 मध्ये औरंगाबाद येथील वास्तव्यात पहिल्यांदा बोलून दाखविला होता. भारतीय राज्यघटना खऱयाखुऱया अर्थाने राबविण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षाला भाग पाडणे, काँग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठी सर्व लहानसहान राजकीय पक्षांचे एकीकरण करून प्रबळ विरोधी पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला प्रस्थापित करणे हा रिपब्लिकन पक्षाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. (जनता ः 10डिसेंबर, 1955) त्यानंतर 30 सप्टेंबर,1956 रोजी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी त्यांच्याच अध्यक्षतेखाली घेतलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या केंद्रीय कार्यकारीणीच्या बैठकीत शेकाफे बरखास्त करून`रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' नावाचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानंतर 13 ऑक्टोबर, 1956 रोजी नागपूर येथे `रिपब्लिकन पार्टी स्थापन करण्याचे आपण निश्चित केले आहे काय?' असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देऊन या पक्षाची घटना आपण तयार केल्याचे सांगितले.पक्षाचे तत्वज्ञान कोणते राहील? या प्रश्नाला उत्तर देताना, पक्षासाठी मुख्य गरज असतेती कणखर नेत्याची असे उत्तर त्यांनी दिले. (प्रबुद्ध भारत ः27 ऑक्टोबर, 1956 पृष्ठ.25-26)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या उत्तरांवरून रिपब्लिकन पक्षाची घटना डॉ. बाबासाहेबआंबेडकरांनी स्वतः लिहिली असल्याचे, तसेच, पक्षाच्या यशस्वीतेसाठी कणखर नेता ही मुख्य गरज असल्याचेही स्पष्ट होते. काँग्रेसला विरोध करण्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसमोर होतेहे सुद्धा त्यांच्या वरील उद्गारांवरून स्पष्ट होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीवादी,ब्राह्मणवादी आणि कम्युनिस्ट या तीन विचारधारांना नाकारुन रिपब्लिकन नावाची निखळ लोकशाहीवादी चौथी राजकीय संकल्पना भारतीय राजकारणाच्या पटलावर निर्माण केली. मात्र, त्यांच्या संकल्पनेतील राजकीय कृती प्रत्यक्षात उतरविण्यापूर्वीच त्यांचे परिनिर्वाण झाले.
 रिपब्लिकनपक्षाचा तत्वज्ञानात्मक आधार
रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी30 सप्टेंबर 1956 रोजी घेतलेल्या शेकाफेच्या कार्यकारी मंडळांच्या बैठकीत घेतला होता.या पक्षाची घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून काढली होती. या पक्षात सामील होण्याचे आवाहन भारतीय जनतेला करणाऱया खुल्या पत्रात रिपब्लिकन पक्षाच्या घटनेत नमूद ध्येय्य व उद्दिष्टांचा भाग समाविष्ट आहे. रिपब्लिकन पक्षाच्या घटनेत नमूद पक्षाची ध्येय्य व उद्दिष्टे व तत्वप्रणाली याचा संक्षिप्त आढावा घेतल्यास रिपब्लिकन पक्ष पुढील सात तत्वावर अधिष्ठित आहे हे दिसून येते. ही सात तत्वे अशी
1) समान न्याय ः- समान न्याय व समान दर्जा हा पत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध अधिकार आहे.
2) स्व-विकास ः-पत्येक व्यक्तीला स्वत:च्या मर्जीप्रमाणे स्व-विकास करण्याचा हक्क आहे. स्व-विकास ही जीवनाची सर्वोच्च सार्थकता आहे. 
3) स्वातंत्र्य ः- प्रत्येक व्यक्तीला धार्मिक,आर्थिक व राजकीय स्वातंत्र्याचा हक्क आहे.
4) समान संधी ः- वंचित घटकांना अग्रक्रम देण्याचे तत्व मान्य करून पत्येक भारतीयास समान संधी मिळण्याचा हक्क आहे.
 5) दास्य-भूख-भय मुक्ती ः- पत्येक भारतीयास त्याच्या जीवनातील दास्यता, भूख व भय यापासून मुक्ती मिळवून देणे हे राज्याचे कर्तव्य आहे. याची राज्याला सतत जाणीव करून देण्यासाठी पत्येकाने संघर्षरत राहिले पाहिजे.
6) शोषण मुक्ती ः- एका मनुष्याची दुसऱया मनुष्याकडून,एका वर्ग समूहाची दुसऱया वर्ग समूहाकडून आणि एका राष्ट्राची दुसऱया राष्ट्राकडून होणारी पिळवणूक, शोषण आणि जुलूम यापासून मुक्ती मिळविण्यासाठी  संघर्ष करणे आवश्यक आहे.
7) लोकशाही ः- व्यक्ती आणि समाज यांच्या कल्याणासाठी संसदीय लोकशाही सर्वोत्तम शासनपणाली आहे.

रिपब्लिकन पक्षाचा कार्यक्रम
वरील सात तत्वाबरोबरच रिपब्लिकन पक्ष सात प्रकारचे कार्यक्रम राबवील असे ठरविण्यात आले होते.ते असेः- 
1) मागासवर्गीयांचे संघटन ः- भारतातील दडपलेली जनता विशेषत बौद्ध,अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास वर्ग यांना संघटीत करणे.
2) मजुरांचे संघटन ः- शेतकरी,भूमिहीन शेतमजूर, कारखान्यातील कामगार व दैनिक मजुरीवर काम करणारे मजूर यांना संघटीत करणे.
3) शिक्षण विकास ः- शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण प्रसाराची,कला व धंदे शिक्षण देण्याची व्यवस्था करणे. 
4) नैतिक विकास ः- जनतेच्या नैतिक व सांस्कृतिक विकासासाठी कार्यक्रम राबविणे.
5) अन्यायाविरूद्ध संघर्ष  ः- पिळवणूक व दडपणूक झालेल्यावरील अन्याय व जुलूम जबरदस्तीच्या बाबींची दाखल घेणे. त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडणे, त्याबद्दल दाद मागणे. 
6) पसार माध्यमांची निर्मितीः- मुद्रणालये संचालित करून साहित्य प्रकाशित करणे.
7)ध्येय सुसंगतता ः-पक्षांची तत्वे, ध्येय्य-धोरणे उद्दिष्टे प्रत्यक्षात उतरविण्यासाठी वरील बाबी व्यतिरिक्त अन्य आवश्यक कार्यक्रम हाती घेणे.
रिपब्लिकन पक्षाचा तत्वज्ञानात्मक आधार आणि ध्येय्य-धोरणाशिवाय पक्षाच्या घटनेतील इतर तरतुदींचा अभ्यास केल्यानंतर पक्षाच्या सुदृढतेसाठी एकूण सात पकारच्या कसोट्या आखून दिल्याचे दिसून येते. त्या अशा  ः- 
1) घटनात्मक बांधिलकी- पक्षाची घटना लिखित स्वरूपात मान्य करणे आणि या घटनेनुसारच कार्य करणे.
2) खुले सभासदत्व - पक्षाचे सभासदत्व सर्व भारतीयांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.
3) सत्तेचे विकेंद्रीकरण - ग्राम स्तरापासून ते केंद्र स्तरापर्यंत स्वतंत्र कार्यकारीण्या तयार करणे व पत्येक निर्णय लोकशाही पद्धतीने घेणे हा अधिकार सदस्यांना  देण्यात आला आहे. 
4) नियतकालिक बैठका - पक्षांतर्गत लोकशाहीची  अंमलबजावणी व्हावी यासाठी कार्यकारीणीच्या नियतकालिक बैठका अनिवार्यपणे घेण्यात आल्या पाहिजे अशी तरतुद करण्यात आली आहे. 
5) नियतकालिक अधिवेशने - जनतेला पक्षाच्या कामकाजात सहभागी होता आले पाहिजे व पक्षाला समाजमान्यता मिळाली पाहिजे. यासाठी नियमितपणे अधिवेशने व मेळावे घेण्याची तरतुद घटनेत करण्यात आली आहे.
6) निवडणुक मंडळ - कार्यकर्त्यांना स्वत:ची क्षमता सिद्ध करण्यासाठी निवडणुकांना सामोरे जाण्याची सवय झाली पाहिजे. यासाठी  पक्षांतर्गत निवडणुक मंडळाची तरतुद करण्यात आली आहे.
7) शिस्त - पक्षाच्या परिवारातील इतर सहयोगी संघटनांशिवाय अन्य संघटनांशी संबंध ठेवणे त्याचपमाणे पद स्विकारून पक्षाचे कार्य न करणे हे बेशिस्त वर्तन समजण्यात आले आहे.

रिपब्लिकन पक्षाला नैतिकदृष्ट्या उन्नत व शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचा व सहानुभूतीदारांचा सतत पुरवठा होत रहावा यासाठी रिपब्लिकन परिवारात अंतर्भूत सहयोगी संघटना म्हणून भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल या अराजकीय संघटनांची व्यवस्था करण्यात आली आहे.  रिपब्लिकन पक्षाचा तत्वज्ञानात्मक आधार, पक्षाची ध्येय-उद्दिष्टे व कार्यकम तसेच पक्ष सुदृढतेच्या कसोट्या याचे अध्ययन केल्यास हा पक्ष भारतात अस्तित्वात असलेल्या अन्य कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा सर्वच बाबतीत सरस आहे,हे दिसून येते. मात्र पक्षाच्या या वैशिष्ट्यांची शिकवण सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहचविण्यात रिपब्लिकन पक्षाचे नेते, रिपब्लिकन पक्षाविषयी सहानुभूती असलेले बुद्धीजीवी,विचारवंत, लेखक, सामाजिक कार्यकर्ते कमी पडले असे खेदाने म्हणावेसे वाटते.

रिपब्लिकन पक्षाची फुट व ऐक्याचे प्रयत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय संकल्पना कृतीत उतरविण्यासाठी त्यांच्या सहकाऱयांनी 3 ऑक्टोबर,1957 रोजी रिपब्लिकन पक्षाच्या नावाने राजकीय कार्य सुरु करण्याचा निर्णय घेतला. रिपब्लिकन पक्षाच्या प्रारंभीच्या काळातील पक्षाची कार्यप्रणाली तसेच रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांची लोकसभेतील कामगिरी याचे अवलोकन केल्यास रिपब्लिकन पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय संकल्पनेस पत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसते. रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेनंतर सन 1959 साली ऍड. बी.सी.कांबळे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाचा एक स्वतंत्र गट स्थापन झाला व पक्षात पहिली फुट पडली. त्यानंतर आर. डी. भंडारे यांनी सन1964 मध्ये आपले स्वतंत्र गट स्थापन केला. दादासाहेब गायकवाड यांच्या वृद्धावस्थेमुळे आणि आजारपणामुळे कटकारस्थाने करून पक्षात महत्वाचे स्थान प्राप्त केलेल्या रा.सु.गवई यांनी पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावंत नेते बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांना सरचिटणीस पदावरून दूर करून त्यांच्या जागी ना.ह.कुंभारे यांची नियुक्ती केली. यामुळे बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे पक्षातून बाहेर फेकले गेले. या घटनेमुळे  दुखावले जाऊन त्यांनी सन 1970 मध्ये आपला स्वतंत्र गट स्थापन केला. फाटाफुटीमुळे रिपब्लिकन शक्ती विभागली गेल्याची जाणीव झाल्यानंतर ऍड. बी.सी.कांबळे यांनी 27 नोव्हेंबर,1971 रोजी रिपब्लिकन गटांच्या ऐक्यासाठी पुणे येथे बैठक बोलविली. मात्र त्यास कोणीही प्रतिसाद दिला नाही.दलित पँथरच्या स्थापनेनंतर रिपब्लिकन गटांच्या नेत्याविरूद्ध तरुणांमध्ये पराकोटीचा असंतोष जाहीरपणे व्यक्त होऊ लागला.या पार्श्वभूमीवर 26 जानेवारी 1974 रोजी दिवंगत यशवंतराव आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली तत्कालिन गटप्रमुख बॅ.खोब्रागडे,रा.सू.गवई,ऍड.बी.सी.कांबळे यांच्या उपस्थितीत चैत्यभूमीवर विराट जाहिर सभा घेण्यात आली. सर्व नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन एक होण्याचे व एकी कायम राखण्याचे विशाल जनसमुदायासमोर जाहिर केले.मात्र,त्यानंतर या नेत्यांनी चैत्यभूमीवरील बाबासाहेबांची शपथ विसरुन आपापले गट शाबूत ठेवले. ऐक्याच्या या फसलेल्या प्रयोगानंतर आंबेडकरवादी पक्ष आणि संघटनांच्या विविध गटांचे पेव फुटले.रिपब्लिकन पक्ष व दलित पँथरच्या विविध गटांनी वैयक्तिक लाभासाठी सत्ताधारी पक्षांसोबत चालविलेल्या तत्वशून्य तडजोडींमुळे आंबेडकरवादी जनतेमध्ये वैफल्याची भावना निर्माण होऊ लागली.1995 साली राज्यामध्ये सत्तांतर होऊन शिवसेना-भाजपाचे सरकार स्थापन झाले.काँग्रेसच्या पराभवामागे रिपब्लिकन जनतेच्या मतांचे विभाजन कारणीभूत आहे हा अंदाज आलेल्या काँग्रेसने रिपब्लिकन गटांच्या एकत्रिकरणासाठी पडद्याआडून प्रयत्न सुरु केले.रिपब्लिकन ऐक्यासाठी काही युवक उपोषणास बसले.या उपोषणामुळे व आंबेडकरवादी जनतेच्या वाढत्या दबावामुळे 25 डिसेंबर 1995 रोजी रिपब्लिकन पक्षाची एकी झाल्याचे घोषित करण्यात आले. एकीकृत रिपब्लिकन पक्षाने काँग्रेससोबत युती करु नये यासाठी जनतेचा दबाव असल्यामुळे 1996 साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत रिपब्लिकन पक्षाने स्वबळावर 19 उमेदवार उभे केले.यापैकी एकही उमेदवार निवडून आला नाही.परंतु, रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना लक्षणीय मते मिळाल्यामुळे त्याचा सर्वांधिक फटका काँग्रेस पक्षाला बसला.यानंतर 1998 साली झालेल्या लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीत काँग्रेसने ऍड.प्रकाशआंबेडकर,रा.सू.गवई, प्रा.जोगेंद्र कवाडे व रामदास आठवले या प्रमुख नेत्यांना निवडून आणण्याची हमी दिल्यानंतर काँग्रेसशी निवडणूक युती करण्यात आली व त्या निवडणुकीत हे चारही नेते निवडून आले. यानंतर मात्र, या नेत्यांमध्ये बेबनाव निर्माण झाल्याने त्यांनी आपापले गट पुनर्जिवीत केले.यानंतर रिपब्लिकन पक्षाचे नवनवीन गट तयार होण्याचे प्रमाण वाढले. सद्यस्थितीत रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट कार्यरत आहेत.ब्राह्मणवादी प्रसारमाध्यमांतील पोटार्थी पत्रकार तसेच बहुजन समाज पार्टीसारखे संधीसाधू या गटांची संख्या 50-60 असल्याचेसांगतात. मात्र, ही अतिशयोक्ती आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या अवनतीचे नेमके निदान करणे गरजेचे 
रिपब्लिकन पक्षाच्या ऱहासाची कारणे सांगताना बहुतेक सर्वच अभ्यासक आणि कार्यकर्ते नेतृत्वातील फाटाफूट हे एकमेव कारण सांगतात. भारतातील सत्ताधारी काँग्रेस पक्ष,जनसंघ किंवा आताचा भाजप,कम्युनिष्ट पक्ष, समाजवादी पक्ष या प्रमुख पक्षांच्या नेतृत्वात अनेकदा फाटाफूट झाली आहे. मात्र हे पक्ष पूर्णपणे नामशेष झाले असे दिसत नाही. स्वातंत्र्यानंतर नेहरूच्या नेतृत्वाला काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी विरोध सुरु केला.यातूनच1951 साली आचार्य कृपलानी, एन.जी. रंगा यांनी स्वत:चे पक्ष स्थापन केले. 1959 मध्ये मोहनदास गांधीचे व्याही चक्रवर्ती राजगोपालाचारी उर्फ राजाजी यांनी `स्वतंत्र पक्ष'नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. यानंतरही इंदिरा गांधीच्या नेतृत्वाला विरोध करून कामराज, मोरारजी देसाई, बिजू पटनाईक, चेन्ना रेड्डी, जगजीवन राम, देवराज अर्स, शरद पवार इत्यादी नेत्यांनी स्वत:चे पक्ष स्थापन केले.राजीव गांधीच्या नेतृत्वाला विरोध करीत प्रणव मुखर्जी, व्ही.पी.सिंग यांनीही पक्ष स्थापन केले. त्यानंतरही ममता बॅनर्जी,के.करुणाकरण इत्यादी अनेक नेत्यांनी वेगळे पक्ष स्थापन केले.आताच्या भाजपमध्येही जनसंघाच्या काळातच अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाला विरोध करून बलराज मधोक यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. भाजपमधील वाघेला, केशुभाई, कल्याण सिंग, उमा भारती, येद्दीयुराप्पा इत्यादी अनेक नेत्यांची अनेकदा फाटाफूट झाली आहे. तीच स्थिती कम्युनिष्टांची, जनतादलाची व इत्तर अनेक प्रादेशिक पक्षांची आहे.रिपब्लिकन पक्षाचे ४८ गट आहेत म्हणून असल्या-नसल्या गटांची यादी देणाऱ्या बहुजन समाज पार्टीचे उत्तर प्रदेशात लहान-मोठे १६ गट,पंजाब मध्ये ७ गट,मध्य प्रदेशात ६ गट छतीसगढ मध्ये २ गट कार्यरत आहेत.तरीही हे पक्ष संपले नाहीत.मग नेतृत्वाच्या फाटाफुटीमुळे फक्त रिपब्लिकन पक्षच कसा काय समाप्त होऊ शकतो ? या प्रश्नाचे उत्तर ऐक्यवादी लोकांकडे नाही.रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वातील फाटाफूट हे रिपब्लिकन पक्षाच्या ऱहासाचे एकमेव कारण नाही तर हा पक्ष ज्या तत्वपणालीवर निर्माण करण्यात आला ती तत्वपणाली लोकांमध्ये रुजविण्यास या पक्षाचे पुरस्कर्ते कमी पडले हे रिपब्लिकन पक्षाच्या ऱहासाचे एक अत्यंत महत्वाचे कारण आहे.रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी प्रयत्न करणाऱया बहुसंख्य मंडळींना (वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणाऱया काही सन्माननीय व प्रामाणिक व्यक्ती वगळता) रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य करणे म्हणजे काय करणे याची सुस्पष्ट कल्पना नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते. रिपब्लिकन ऐक्याचा अजेंडा घेऊन विविध ठिकाणी बैठका घेणाऱया तरुणांना रिपब्लिकन पक्षाची तात्विक बैठक काय आहे याबाबत जुजबी माहिती देखील नसल्याचे जाणवले.ऐक्याची भूमिका मांडणाऱया बहुसंख्य कार्यकर्त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या फाटाफुटीला केवळ रिपब्लिकन पक्षाचे नेतेच जबाबदार आहेत असे वाटते.त्यामुळे ऐक्य परिषद घेऊन त्यामध्ये विविध गटांच्या नेत्यांना पाचारण करणे, रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांच्या प्रमुखांची बैठक घेणे, त्यांना एकत्रित बोलावून परस्परांशी युती करुन निवडणुक लढविण्यास सांगणे, रिपब्लिकन गटांनी एक-दुसऱयाच्या विरोधात उमेदवार उभे न करण्यासाठी गटांच्या प्रमुखांचे मन वळविणे, स्थानिक स्तरावर जनतेची आघाडी करून  राष्ट्रीय नेत्यांना बाजूला सारून निवडणूका लढविणे यासारखे वरवरचे उपाय करुन रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य करण्याची स्वप्नाळू धडपड यापैकी अनेकजन करीत आहेत. अशा प्रकारचे प्रयत्न यापूर्वीही अनेक नेत्यांनी आणि संघटनांनी केले आहेत. या प्रयत्नांचे यशापयश सर्वांना माहित आहे. या स्थितीत केवळ नेत्यांचे ऐक्य म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य नव्हे हा धडा ऐक्यवादी तरुणांनी आणि संघटनांनी घेणे आवश्यक आहे. मात्र, जुन्या अनुभवातून शिकण्याची प्रगल्भता तरुणांमध्ये अद्याप आलेली नाही.आणि भावनात्मक्तेच्या पुढे जाऊन व्यवहाराच्या पातळीवर खंबीर भूमिका घेण्याचा धोरणीपणा स्वप्नाळू ऐक्यवाद्यामध्ये आलेला नाही हेच त्यांच्या ऐक्यासाठीच्या   अर्धवट पुढाकारातून दिसून येते.रिपब्लिकन पक्षाच्या अवनतीच्या कारणांचे नेमके निदान करता न आल्यामुळे ही अवनती रोखण्याचे परिणाकारक उपायसुद्धा शोधता आलेले  नाहीत ही ऐक्यवाद्यांची कमजोरी आहे. 
रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचे नेते, प्रवक्ते आणि पुरस्कर्ते आपला पक्ष कसा योग्य हे पटवून देताना आपल्या गटाच्या नेत्याचे नेतृत्वगुण, लढाऊपणा,घराण्याचा वारसा, त्याग, चळवळीतील सहभाग याचीच चर्चा करतात. इतरांनी आपल्या गटात सामील झाले तर आपला गट मुख्य पक्ष म्हणून प्रस्थापित होईल व  इतर सर्व गट नामशेष होतील असा युक्तिवाद करतात. ऐक्यवादी   अथवा स्वयं सर्वोत्तम गटवादी यापैकी कोणीही रिपब्लिकन संकल्पनेचा तत्वज्ञानात्मक आधार, कार्यक्रम, या संकल्पनेच्या यशस्वीतेच्या कसोट्या, पायाभूत संघटनांच्या बांधणीचे आधार या बाबींची चर्चा करीत नाही. प्रत्येक गटाचे नेते व पुरस्कर्ते आपला रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातील तत्वावर आधारित असल्याचे सांगतो.मात्र या खुल्या पत्रात चर्चिल्या गेलेल्या तत्वज्ञानात्मक आधाराची मांडणी कोणीही करीत नाही.यामुळे बामसेफ, बसपासारख्या छद्मी (Psuedo) (फसव्या) आंबेडकरवादीपक्ष संघटनांनी नेतृत्वाच्या गुण-दोषावर टीका करून आंबेडकरवादी जनतेला आंबेडकरवादी तत्त्वज्ञानापासून तोडले आहे.या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी एकीकडे रिपब्लिकन संकल्पनेची तात्त्विक बाजू जनतेला समजावून गांधीवाद,ब्राह्मणवाद,मार्क्सवाद या विचारसरणीमुळे नव्हे तर प्रजासत्ताकवादी रिपब्लिकन विचारसरणीमुळेच भारतातील जनतेचा उद्धार होऊ शकतो हे प्रभावीपणे मांडावे लागेल.दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाच्या घटनेत नमूद तत्वांशी,धेय्य-धोरणांशी व कार्यक्रमाशी सुसंगत असे सर्व जात-वर्ग-धर्मीय जनलढे हाती घ्यावे लागतील.    

------कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा