सोमवार, १७ फेब्रुवारी, २०१४

रिपब्लिकन पक्ष : आंबेडकरी चळवळितील लांडगे.

सध्या आंबेडकरी समाजातील नेते राजकीय मोजपट्टीने उभ्या समाजाचे मुल्यांकन करुन आंबेडकरी समाजाचा कसा पाडावा झाला याचा प्रचार करत आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या विघटनेतून व टोळीबाजीतून आंबेडकरी समाज निष्प्रभ झाला हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत आहेत. पण माझ्या मते ही पोटार्थी राजकारण्यांची लबाडी आहे. कारण रिपब्लिकनचा पराजय म्हणजे आंबेडकरी समाजाचा पराजय हे समिकरणच मुळात चुकीचे आहे. मिडीयानी तसे ओरडून आमचे खच्चिकरण करावे एकदा मान्य आहे, पण स्वत:च्या हितासाठी निळ्या नेत्यांनिही लबाड मिडीयाचा राग आवळावा ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी आहे. राजकारणात पाय रोवण्यासाठी कुठल्याही स्थाराला जाऊन समाजाची फसवणूक करणा-या या रिपब्लिकन नेत्याना कशाचीच लाज लज्जा राहिली नाही.
राजकारण हे आंबेडकरी चळवळीचे एकमेव उद्दिष्ट  आहे का? अजिबात नाही. किंबहूना आंबेडकरी चळवळीत राजकारणाचे स्थान गौण आहे, नगण्य आहे.  स्वातंत्र्य, समता व बंधुता हा आंबेडकरी चळवळीचा मूलमंत्र असून राजकारणातून तो कसा साधता येईल हे आजवर एकाही लांडग्याने सिद्ध केले नाही. पण प्रचारात मात्र प्रत्येकच लांडगा वरील वचन आवर्जून म्हणत असतो. आता जनतेनी अशा लांडग्याना सवाल करावा की तुम्ही स्वत:च गहान पडत असता मग वरील बदल कसे काय घडविणार? बघा काय उत्तर येतं त्यांच्याकडून! आंबेडर चळवळ चालविण्यासाठी  राजकारणात यश मिळालेच पाहिजे ही गोष्ट गैरलागू नि अनावश्य असून आजवर राजकीय पराजया नंतरही आंबेडर चळवळ कायम यशस्वी राहिली आहे ही वस्तुस्थीती आहे. आता ही वस्तुस्थीती मिडीया दडपून टाकते वा अनुल्लेखानी मारते ही गोष्ट वेगळी. पोटार्थी राजकारणी मात्र आंबेडकरी चळवळीला नेहमी राजकारणाच्या मोजपट्टीने मोजत असतात व लोकांची दिशाभूल करत असतात.
आंबेडकरी समाजाचा विकास साधण्यासाठी राजकीय यश आवश्यक आहे अशी आवई उठवून समाजात संभ्रम निर्माण करण्याची सध्या लाट उसळली आहे, कारण पुढे निवडणूका आहेत. त्यांचे म्हणणे जर खरे असते तर स्वातंत्र्यापासून राजकारणात सत्ता बळकावून बसलेल्या मराठा समाजाची अवस्था आज एवढी बिकट नसती... राजकारणात बसलेल्या मराठा समाजाची भरभराटी व्हायला हवी होती, पण तसे झाले नाही. म्हणजे राजकारणातून समाजाचे हीत साधता येते ही गोष्ट चक्क खोटी असून फक्त मत मिळविण्यासाठी असे फंडे वापरले जातात हे सिद्ध होते. म्हणजे आंबेडकरी विचारवंत व राजकारणी सत्तेत बसण्यासाठी समाजाची चक्क फसवणूक करत आहेत.
आंबेडकरी चळवळीची राजकीय आघाडी फसली पण सामाजीक व धार्मिक आघाडी प्रकाशझोतापासून दूर राहून ग्राउंड लेवलवर सातत्याने काम करत आहे. गावा-गल्लीत अनेक सामाजीक संघटना असून स्थानिक पातळीवर आंबेडकरी विचाराचा नि बौद्ध आचाराचा अखंड प्रचार नि प्रसार चालू आहे. दर वर्षी अनेक बुद्ध विहारांची निर्मीती होत आहे. आमच्या गडचिरोलीचंच घ्या... १९९० मध्ये अहेरीत एकमेव बुद्ध विहार होतं. मागच्या वीस वर्षात एका अहेरी तालुक्यात वीस बुद्ध विहारं झाली. कोणी उभारली ही विहारं? ग्राउंड लेवलवरच्या कार्यकर्त्यानी! मी भामरागडच्या दंडकारण्यात वाढलो. माडिया गांवदेवी आव्वालची पुजा करत माझी पिढी मोठी झाली. आज भामरागडच्या रानातील प्रत्येक बौद्धाच्या घरात बाबासाहेब पोहचले आहेत. कोणामुळे? ग्राउंड लेवलवर काम करणा-या चळवळीमुळे. ही गोष्ट अत्यंत आशादायी असून भारतात सर्वत्र बौद्ध धम्माची शिबीरं नि व्याख्यानाद्वारे नव्या दमाचे नवे उपासक निर्माण करणे चालू आहे. अनेक संघटना स्थानिक पातळीवर धम्माचा प्रसार करणारे मासिकं व साप्ताहिकं चालवित आहेत. ही सगळी चळवळ जी स्थानिक पातळीवर कार्यरत आहे ती मुख्य प्रवाहाच्या मिडीयापासून दूर आहे. आंबेडकरी चळवळीच्या सामाजीक व धार्मिक आघाड्या कधीच प्रकाश झोतात येत नाही... पण त्यांचं कार्य अखंडपणे चालू असतं. अन सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चळवळीचा ग्राफ कायम वरच्या दिशेनी चढता आहे.
पण लबाड मिडीया कधी यावर प्रकाश टाकत ना्ही अन ज्याची शकले उडाली त्या रिपब्लकनवर सारखा कॅमेरा ताणून "बघा आंबेडकरी चळवळीचं काय झालं" असं म्हणत आमच्या कार्यकर्त्यांना नाउमेद करण्याचे काम करत असते. अन आता तर पोटार्थी राजकारणी सुद्धा हाच सूर लावताना दिसत आहेत. ही स्थानिक पातळीवर कार्य करणा-या व प्रकाश झोतापासून दूर राहून धम्माची सेवा करणा-या लोकांशी केलेली लबाडी आहे.
मी एकच सांगू इच्छितो...

रिपब्लिकन नेत्यांच्या नादी लागू नका. सगळे नेते लबाड लांडगे असून रिपब्लिकन हे नाव स्वत:च्या राजकीय हितासाठी वापरत आहेत. राजकीय यश मिळो वा न मिळो... आंबेडकरी चळवळ ना कधी थांबली ना कधी थांबेल. स्थानिक पातळीवर सच्चे सैनिक सदैव चळवळ तेवत ठेवत आहेत ही वस्तूस्थीती असून तीच खरी आंबेडकरी चळवळ आहे.... राजकीय व रिपब्लिकन चळवळ एक लबाडी असून त्याचा ख-या आंबेडकरी चळवळीला काहीच फायदा नाही. जर त्यातून कोणाचा फायदा होत असेल तर बाबासाहेबांच्या नावानी राजकारण करणा-या पोटार्थी नेत्यांचा.

आता निवडणूका तोंडावर आल्या... सगळे नेते बाबासाहेबांच्या नावानी भीक मागायला सज्ज होत आहेत. आता  भीक मागायचे म्हटल्यावर "अल्ला के नाम पे दे दे" टाईप  स्लोगनची गरज आलीच. मग निळ्या लांडग्यानी रिपब्लिकन व बाबासाहेब  नावाचं वापर करुन अनेक स्लोगन तयार केले व भीक मागायला  सुरुवात केली आहे. हा सगळा आटापिटा चळवळीसाठी नसून स्वत:ची खडगी भरण्यासाठी आहे हे याद राखा. हे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते नसून आंबेडकरी चळवळितील लबाड लांडगे आहेत. एवढं आठवण ठेवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा