मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०१४

फेक नक्षलवादी व फेक चकमकी

शक्यतो मी नक्षलवादावर लिहणे/बोलणे टाळतो, कारण तसे करणे म्हणजे पायावर धोंडा मारुन घेणे होय. आपल्या वाक्यातून कुठलेही दोन शब्द बाजूला काढून तुम्ही नक्षलवाद्यांच्या बाजूनी बोललात म्हणून बळवायला पोलिस तयार असतात व पोलिसांच्या बाजूनी बोलतोस का म्हणून बळवायला तिकडे निक्षलवादिही तयार असतात. दोघांचीही कटकट नकॊ म्हणून मी त्या विषयावरच बोलत वा लिहत नाही. पण आज थोडसं लिहावं म्हणतो. आजच्या पेपरात बातमी आली की आमच्या गडचिरोलीच्या रानात पोलिस-नक्षलवाद्यांत चकमक उडाली व सात नक्षलवादी मारले गेलेत. हल्ली पोलिस नक्षलवाद्यांच्या चकमकी म्हणजे रुटीन भाग झालाय. दर पंधरा वीस दिवसातून एकदा अशी बातमी वाचायला मिळते. त्यामुळे आजकाल मी तिकडच्या बातम्या वाचतच नाही...तर, फक्त मेलेल्या माणसांची नावं वाचून यात आपला कोणी ओळखिचा/नात्यातला नाही ना याची खात्री करुन घेतो. माझ्यासाठी बातमितला फक्त तेवढाच भाग महत्वाचा असतो. पण आजच्या बातमीत एक नाविन्य आहे ते म्हणजे या चकमकीत  एकही पोलिस मारला गेला नाही. मग प्रश्न पडतो की हे शक्य आहे का? अजिबात नाही. नक्षलवादी म्हणजे कोणी शेंबळी पोरं नाहित की त्यांची सात माणसं मारेस्तोवर ते उत्तर देणार नाहीत . पण आजची बातमी तर तेच सांगते आहे. त्यामुळे मला फेक नक्षलवादी व फेक चकमकींची आठवण झाली. मागच्या दोन तीन वर्षातले नक्षलवाद्यांचे हल्ले जरा बारकाईने तपासल्यास असे आढळेल की नक्षलवादी हे अत्यंत कुशल व प्रशिक्षीत लढवय्ये (किंवा लाल सैनिक) आहेत. मग ७ लाल सैनिकांचे मुडदे पडेस्तोवर एकही लाल गटातील गोळी पोलिसांचा समाचार घेत नाही म्हणजे दाल मे कुछ काला है.  इथे नक्षलवाद्यानी पोलिसाना मारावे ही इच्छा नसून दोन सशस्त्र गटात झालेल्या गोळीबारात एका गटाला खरचटतही नाही हा  मुख्य मुद्दा आहे. गडचिरोलीतील पोलिस काय उपद्रव करतात हे शहरात बसलेल्या पत्रकाराना कधीच कळत नाही व त्यामुळे तिथली खरी बातमीही बाहेर पडत नाही. भामरागडच्या रानात नक्षलवादी जितक्या पोलिसाना मारतात त्याच्या कित्तेक पट आदीवासीना पोलिस मारत असतात व त्यावर लेबल चिटकवतात की अमुक तमुक तो नक्षलवादी होता. अशीच एक गाजलेली केस म्हणजे आमच्या कुडकेल्लीच्या रेडी गायत्याची (एडका आत्राम)ची.  रेडीला पोलिसांनी धरुन नेलं व इतकं मारलं, इतकं मारलं की रेडीदादा (हा नात्यानी मला भाऊ लागायचा) जाग्यावर मेला. त्या नंतर आमची अवस्था काय झाली विचारायची सोय नाही. एडक्याची केस सुदैवाने मिडीयानी उचलली व पोलिसांचा बुरखा फाडला. पण असे अनेक एडके पोलिसानी आजवर मारले व त्याना नक्षलवादी घोषीत करुन मोकळे झालेत. आजची बातमी वाचून त्यातलाच एक प्रकार घडला असावा असे वाटते. तसं नसल्यास दुसरी शक्यता ही आहे की या नक्षलवाद्याना आधीच कधितरी धरलं असावं किवा नक्षलवादी शरण आले असावेत. अन आज पद्दतशीरपणे कट रचून त्यांचा गेम करण्यात आला असावा...पण खरीखुरी चकमक झाली, सात नक्षली मेले व पोलिसांना खरचटतही नाही ही गोष्ट मात्र केवळ अशक्य वाटते.
मी आमच्या कुडकेल्लीची अजुन एक बातमी आज फोडतोय ती म्हणजे  पेडू वड्डे नावाच्या तरुणाची. हा पेडू नावाचा तरुण  कुडकेल्ली फाट्यावर उतरुन गावात येत होता. रानात गस्तीवर असलेल्या पोलिसानी त्याला धरुन नेले व नक्षलवादी म्हणून घोषीत केले. आम्ही इकडे आवाक. कारण पेडूचं व नक्षलवाद्यांचं काहीच संबंध नाही हे उभ्या गावाला माहित होतं. पण आम्ही रानातली माणसं, पोलिसाना जाब विचारण्याची हिंमत कुणात नव्हती. आम्ही सगळी गप्प बसलो. तिकडे नक्षलवाद्याला धरले म्हणून पोलिसांचा सत्कार झाला व अधिका-यांचाही. अन एक फेक नक्षलवादी जगाच्या पुढे उभं  करुन पोलिसानी स्वत:ची पाठ थोपटून घेतली. आपल्याकडे वकिल नाही, केस लढायला पैसे नाही व शहरात येऊन एखाद्याला भेटून व्यथा मांडायची सोय नाही... हे सगळं नाही म्हणून पेडू नक्षलवादी ठरला तो ठरलाच. थोडक्यात साधनांचा अभाव तुम्हाला नक्षलवादी ठरवू शकतो हे मी डोळ्यानी पाहिले आहे.

पेडू वड्डॆची केस काय तर नुकतच ताडगावात नवीन पोलिस चौकी सुरु झाली होती. मग ताडगावचे पोलिस दुडेपल्ली-कुडकेल्ली-केडमारा या रानात नेहमी गस्त घालत असत.  नुसतं गस्तच नाही तर पोलिसांच्या या सशस्त्र फौजा कुडकेल्लीत अनेक वेळा तळ ठोकून राहू लागल्या. मग हे पोलिस कुडकेल्लीच्या कट्ट्यावर बसून दारु ढोसत व गस्त पुर्ण केल्याची रिपोर्टींग करत. काही दिवसानी कुडकेल्लीतच नाही तर दुडेपल्ली-ताडगाव इथेही पोलिस लोकं दारु  ढॊसू लागली. मग काय, दररोज नवीन दारुचे अड्डे शोधने व दारु ढोसने सुरु झाले. असच एकदा दारुचा अड्डा शोधताना ताडगावचे पोलिस एक बाईच्या दारु-अड्ड्यावर जाऊन धडकले. सुरुवातीला फुकट, मग पैशानी, नंतर उधारीवर अशा टप्प्यातून गेल्यावर तिथे मैत्रीही झाली.  मग मित्र पोलिसाना रात्री अपरात्री उठून दारु देण्याचे काम बाई चोख बाजावू लागली. 
काही पोलिसाना मात्र शराब-शवाबची सोय एकाच ठिकाणी होईल असे वाटले व तसे प्रयत्न करुन झाले. पण तिनी दाद दिली नाही, कारण त्या बाईचा धंधा दारु विकणे होता, शरीर नाही.   शेवटी एकानी प्रेमाचे फासे फेकले व बाई  फसली.  मग अजुन एकाने फासे फेकले तेंव्हा मात्र बाई गोंधळली. मग फासे फेकणारे दोन पोलिस एकमेकाचे शत्रू बनले. दोघानाही दारुवाल्या बाईवर ताबा मिळवायचा होता. बायका पोराना दूर शहरात ठेवून गडचिरोलीच्या रानात असणा-याना तेवढीच तात्पुरती सोय होताना दिसली असावी. पण इथे प्रेमाचा त्रिकोण तयार झाला. मग एकाच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली व त्यानी दुस-याचा खून करण्याचा कट रचला. पण खून करायचा कुठे हा प्रश्न होताच. मग एके दिवशी ही टीम आमच्या कुडकेल्लीच्या रानात गश्तीवर असताना प्रेमी नंबर एकने प्रेमी नंबर दोनचा काटा काढायचा ठरवला. कुडकेल्लीच्या रानातील एका ठिकानी जेंव्हा ही गस्त पोहचली तेंव्हा सोमरुन पेडू वड्डे येताना दिसला. हीच ती संधी साधून प्रेमी नंबर एकनी आपली बंदूक उचालली व प्रेमी नंबर दोनच्या छातीत गोळ्या उतरविल्या. पेडूला लगेच ताब्यात घेतलं व नक्षलवादी घोषीत करुन खुनाच्या आरोपात बेड्या ठोकल्या. बिचारा पेडू त्याचा काहिही दोष नसताना नक्षलवादी ठरला.

आजही कोणात हिंमत असेल तर आमच्या पेडू वड्डॆची केस रिओपन करावी अन पोलिसांचे करनामे पहावे.  ही माझ्या गावची घटना आहे.  भामरागडच्या रानात प्रत्येक गावातून अशा घटना घडल्याचे तुम्हाला दिसतील. एडका आत्रामचा पोलिसानी केलेला खून व पेडू वड्डेला नक्षलवादी घोषीत करणे... या दोनच घटनाच नाही तर अशा अनेक घटना आहेत ज्या गडचिरोली पोलिसांच्या फेक चकमकींचा पुरावा आहेत. का कुणास ठाऊक पण आजची चकमकही मला फेकच वाटते आहे. 

-जयभीम


३ टिप्पण्या:

  1. हे वास्तव आहे सर
    आज असाच गोरगरीबांचा पेडू वड्डेला केला जातोय

    उत्तर द्याहटवा
  2. भयानक आणि भीषण . कुणाचे सरकार आल्यानंतर यात बदल होणार आहे कुणास ठाऊक ?????

    उत्तर द्याहटवा