सोमवार, १४ एप्रिल, २०१४

’महापुरुषांचा पराभव’ कधीच होत नसतो.

महापुरुषांचा पराभव... आंबेडकरी जनतेचे मानसीक खच्चिकरण करण्यासाठी  भारतीय माध्यमे व पत्रकारीता नेहमीच सज्ज असते. मग कशातही व कसलाही तत्वज्ञान उगारुन आंबेडकरी समाजाची दिशाभूक करण्यात या दोन्ही संस्था/व्यवस्था कायम आघाडीवर राहिल्या आहेत. आता जोडीला इंटरनेटही दाखल झाले दिसते. जनार्दन वाघमारे लिखीत ’महापुरुषांचा पराभव’ नावाच्या  शालेय पुस्तकातील धड्याचे संदर्भ आजकाल आंतरजालावर महापूर आल्यागत वाहत आहेत. आज जयंतीच्या निमित्ताने तर अनेकानी या धडयातले संदर्भ देऊन आंबेडकरी जनतेच्या वागणूकीमुळे कसा बाबासाहेबांचा पराजय होतो आहे वगैरे डोस पाजणे चालू केले.  जनार्दन वाघमा-यांचा तो धडा मी वाचला नसल्यामुळे त्या धड्यावर कमेंट करणे अयोग्य ठरेल पण त्यातला एक संदर्भ वापरला जात आहे तो म्हणजे "महापुरुषांचा पराजय त्यांचे अनुयायीच करत असतात” याचा समाचार घेणे गरजेचे आहे. बाबासाहेबांच्या महान तत्वज्ञानाच्या नि आदर्श जिवन पद्धतीच्या विसंगत वागून तमाम आंबेडकरी समाज बाबासाहेबांचा पराभव करत आहे अशी जी मांडणी केली जात आहे, ती आंबेडकरी माणसाचे मनोधैर्य खचविण्याच्या उद्देशाने चालविलेले षडयंत्र आहे. बाबासाहेबांचे उदात्त विचार, पराकोटीची सामाजीक बांधिकली नि दैनंदीन जिवनातील वागणूकीत नैतिकतेचा आग्रह... याच्याशी आंबेडकरी जनतेने केलेली प्रतारणा म्हणजे बाबासाहेबांच्या अनुयायानी केलेला बाबासाहेबांचा पराभव आहे... असा एकूण युक्तीवाद दिसतो.
यावर माझा प्रश्न आहे की बाबासाहेबांचा पराजय अनुयायी कसे काय करु शकतात? अनुयायी जर नीट वागत नसतील तर त्यात अनुयायांचा पराभव आहे... बाबासाहेबांचा कसं काय? बाबासाहेबानी त्यांच्या वेळी सामाजीक क्रांतीचा एक विचार मांडला, लढा दिला व तो जिंकला सुद्धा. त्यांचे अनुयायी म्हणून तो विचार पुढे नेताना आज जर आम्ही कमी पडत असलो तर तो आमचा पराजय आहे... बाबासाहेबांचा नाही. पण आमच्या पराजयाला बाबासाहेबांचे पराजय असे म्हणण्याचा खोडसाडपणा का केला जातो तेच कळेना.
समजा तुमच्या मास्तरानी जीव ओतून तुम्हाला शिकवले, अभ्यास करायला सांगितले पण तुमच्या बेफिकीरीमुळे जर परिक्षेत तुम्ही नापास झालात तर  नापास तुम्ही की तुमचा मास्तर? अजुन खोलाता जाऊन बोलायचे म्हटल्यास एका वर्गात शंभर विद्यार्थी असतील व मास्तर सगळ्याना सारखेच धडे देत आहे. पण त्यातली फक्त ५० पास होतात व ५० नापास. मग यात मास्तराचा दोष की अभ्यास न करणा-या त्या पन्नास आळशी ढोण्यांचा? खरंतर मास्तरानी त्याच्या वयात स्वकर्तूत्वाने ही परिक्षा कधीच पास केलेली आहे. आता तो नव्या विद्यार्थ्यांचा मास्तर आहे... त्यामुळे मास्तराला पास नापासाचे निकषच गैरलाऊ आहेत. अगदी तसच बाबासाहेबानी स्वत:चे आचरण अत्यंत उच्च दर्जाचे नि समाजाला आदर्श घालून देणारे ठेवले होते. आता त्यांचा विद्यार्थी म्हणून काही लोकं आज कमी पडत असतील तर तो विध्यार्थ्यांचा/ अनुयायाचा पराजय ठरतो... बाबासाहेबांचा अजिबात नाही. या देशात बाबासाहेबांचा पराजय पाहण्यासाठी आतूर असलेला समाज कायम निराश नि हताश होत गेला... कारण बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक लढा मोठ्या फरकानी जिंकला होता. बाबासाहेबांच्या हयातीत त्याना पराजीत करण्याचे न जमल्यामुळे त्यांच्या नापास अनुयायांकडे बोट दाखवून बाबासाहेब पराजीत झाल्याची बोंब मारणे म्हणजे सडक्या वृत्तीचे प्रदर्शन होय. 
ज्या लोकांकडे बोट दाखवून ही सडकी डोकी बाबासाहेबांचा पराभव झाला म्हणतात... ती लोकं तमाम उच्चशिक्षीत आंबेड्करी जनतेकडे बोट दाखवून एका शब्दानी कधी बाबासाहेबांची स्तूती करत नाहीत. IAS,IPS, IFS,IRS होऊन उच्चस्थानी विराजमान अधिकारी पासून आयटी,फायनान्स, मार्केटींग क्षेत्रात दैदिप्यमान कार्य केलेले तमाम आंबेडकरी तरुण आहेत... पण यातील एकाही गोष्टीत याना बाबासाहेबांच्या अनुयायांची भरारी दिसत नाही. काही हरकत नाही... तुम्ही आजुन किती दिवस अनुल्लेखानी मारणार? आता बाबासाहेबांच्या विचाराला बांधील असणारी नव्या दमाची पिढी उभी होत असून आज ना उद्या याची दखल घ्यावीच लागेल हे याद राखा. दर महिन्याला भरणारी धार्मिक शिबीरे, उन्हाळी व दिवाळी सुट्टीत होणारे बौद्ध बालसंस्कार शिबीरे, प्रत्येक गावातून उभी राहणारी विहारं व तळागळात जाऊन अखंडपणे चालविला जाणारा आंबेडकरी विचार... याच्या जोडीला चळवळीला वाहिलेली अनेक वृत्तपत्रं, मासिके, त्रैमासीके अन कित्येक प्रकाशन संस्था ज्या बाबासाहेबांचे कार्य चालवितात... यातील एकही गोष्ट याना उल्लेखनीय वाटत नाही. का बरं? कारण या गोष्टी लिहल्यास आंबेडकरी समाजाला प्रोत्साहन मिळेल, आम्हाला हुरूप येईल. बाबासाहेबांची लेकरं अजुन जोमाने कामाला लागतील... ते होऊ दयायचे नाही. बास! मग काय... काही दारुड्या लोकांकडे बोट दाखवून बाबासाहेबांचा पराभव म्हणत ओरडा करायचा... बाबासाहेबांच्या पराभवाचं हे लॉजीक कोणाच्या डोक्यातून उगवलं माहित नाही.. पण आहे भन्नाट. आमच्या समाजातिल दारुडे हे परिस्थीतीचे मारे आहेत... त्यांचा नाईलाज होता... ज्या परिस्थीतीत त्यांचा जन्म झाला, त्यांचे जडणघडण झाले हा त्याचा परिणाम आहे. पण त्याच दारुड्याच्या घरातली पोरं शिक्षणाची कास धरत आहेत... हवं तर एखाद्या दारुड्याच्या घरी जाऊन तपासून पहा. मला बौद्ध समाजातील एक दारुडा दाखवा ज्याला हे सांगावं लागतं की बाबारे तुझ्या पोराला शाळेत घाल. अपवादलाही सापडणार नाही याची खात्री आहे. कुठून आली एवढी सजगता माझ्या दारुड्या बांधवांत? बाबासाहेबामुंळे आली. माझ्या समाजातील समस्त दारुड्यांचा नीट अभ्यास केल्यास कालच्या दारुड्यापेक्षा आजचा दारुडा नक्कीच बदलेला दिसेल. बाबासाहेबांच्या विचाराकडे सरकलेला दिसेल ही ग्राउंड लेवलवरची परिस्थीती आहे. तरी सुद्धा कळते पण वळत नाही ही परिस्थीती मोठ्या प्रमाणात आढळेल. यात आमचा दोष आहे... आमच्या बापाचा नाही.    
माझ्या बापानी मला जगण्याचे धडे नि वागण्याचे नियम शिकविले... ते शिकविण्यात त्यानी कसूर केला असता तर एकदा हे मान्यही केले असते. पण शिकविण्यात कुठलाच कसूर नसताना जर मी चांगला वागत नसेन तर तो पराजय बापाचा कसा काय? मास्तरानी २+२=५ शिकवले व विद्यार्थ्यानी तसे लिहल्यास मास्तर नापास म्हणायल हरकत नाही. पण मास्तरानी त्यांची जबाबदारी चोख बजावत २+२=४ शिकवलेल पण विद्यार्थ्यानी २+२=५ असा घोळ घातला... यात मास्तराचा काय दोष? बाबासाहेब आमचे गुरु म्हणून शिकविण्यात कुठेच कमी पडलेले नाहीत. जर कुणी कमी पडला असेल तर आम्ही... शिकणारा विद्यार्थी, बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून आम्हीच कमी पडलो. मग तो पराजय आमचा ठरयला हवा. पण काही दिड शहाणे मात्र तो पराजय बाबासाहेबांच्या माथी मारायला निघालेत. अन दाखला काय देतात तर अनुयायामुळे म्हणे पराजय... कसं काय बुवा?
बाबासाहेबनी माझ्यासाठी निवडलेला मार्ग सर्वोत्तम होता व आहे. त्यानी माझ्या भविष्याची तरतूद म्हणून धम्मरुपी भांडवल दिलं. आज ते वापरण्यात माझा घोळ होत असेल तर तो माझा दोष आहे. बाबासाहेबांचे तत्वज्ञान जर मला कळत नसेल... किंवा कळूनही वळत नसेल तर मी बाबासाहेबांचा गुन्हेगार आहे. यासाठी मी बापाला दोष देणार नाही आणि ईतरानिही देऊ नये... माझ्या चुकीसाठी फक्त मलाच आरोपी ठरवावे. मी सुद्धा मुकाट्यानी माझा दोष मान्य करायला तयार आहे. पण याच्या उलट  जर माझ्या हातून काही चांगले घडत असेल तर ते बाबासाहेबांच्या कृपेमुळे हे मात्र लक्षात ठेवावे. माझ्या हातून घडणा-या प्रत्येक चांगल्या कार्याची प्रेरणा बाबासाहेब आहेत. त्यांच्या शिकवणूकिचा परिपाक म्हणून अशा सर्व चांगल्या कार्याचे श्रेय बाबासाहेबानाच जाते. पण माझ्या हातून जर चूक होत असल्यास मात्र तो माझा गुन्हा आहे. हा फरक त्या सर्व त्रैयस्थानी लक्षात घ्यावा जे माझ्या दोषाचे खापर बाबासाहेबांवर फोडू पाहात आहेत.
बाबासाहेबांचे अनुयायी जे काही करत आहेत त्यात बाबासाहेबांचा प्रत्यक्ष सहभाग नसून त्यानी दिलेल्या उदात्त तत्वज्ञातून प्रत्येक माणूस त्याच्या कुवती प्रमाणे अनुकरण करत असतो. अनुयायांचे आकलन नि उपलब्ध परिस्थीती याचा तो परिपाक असतो. त्यामुळे आनुयायांच्या हातून काही कमी-जास्त घडत असल्यास त्याची १००% जबाबदारी अनुयायाची असून पराभव हा अनुयायांचाच असतो. महापुरुषांचे विचार प्रेरणास्थानी असतात. रचनात्मक कार्यात ते दिशादर्शक ठरतात. त्या विचारांचे अनुकरण करणारे चूकत असल्यास विचार मांडणा-या महापुरुषाला दोषी धरता येणार नाही. कठोर परिश्रमातून व पराकोटीच्या त्यागातून काही लोकं महापुरुषत्वास पोहचलेले असतात. त्यांच्या हयातीत त्यानी स्वत: अनेक जय-पराजय पाहिलेले असतात. पण ज्या दिवशी ते जातात तिथून पुढे त्यांचा पराजयही थांबतो. यापुढे पराजय झालाच तर तो त्यांच्या अनुयायांचा होतो. अन ज्या ज्या वेळी त्यांच्या प्रेरणेतून एखादे उदात्त कार्य घडते तेंव्हा तेंव्हा त्या महापुरुषाचा विजय होत असतो... फक्त विजय..!
बाबासाहेबांच्या लेकरांच्या हातून जर काही चुका होत असतील तर तो अनुयायांचा पराजय आहे... बाबासाहेबांचा नाही. कारण महापुरुषांचा पराजय कधीच होत नसतो.


जयंतीच्या शुभेच्छा

-जयभीम. 

शुक्रवार, ११ एप्रिल, २०१४

मोदीची बायको, इत्ता गहजब कायको?

भारतीय राजकारणात कधी नव्हे तेवढं वादळ उठवून देणारं रांगळं व्यक्तीमत्व म्हणजे नरेंद्र मोदी. खरं तर मोदी विरुद्ध कोणीच नाही... हो मोदी विरुद्ध कोणी नाही असाच हा लढा आहे. मोदी हवा किंवा मोदी नको अशी परिस्थीती आहे. मोदी हवा की राहूल? किंवा मोदी हवा की केजरीवाल किंवा मोदी हवा की ममता? असं कुठलच समिकरण उभं होऊ शकलं नाही एवढी मोदीची लाट या देशात आली. मग ती कोणी मान्य करो अथवा ना करो. भारतीय राजकारणात पहिल्यांदाच अशी स्थीती निर्माण झाली की अमूक एक व्यक्ती हवी किंवा नको अशा दोन मतप्रवाहात उभा देश विभागला गेला आहे. या आधी इंदीरा हटाव म्हणत सतरा टोळक्यानी एकत्र येऊन नारा दिला होता तेंव्हा गरीबी हटाव म्हणत उभ्या ठाकलेल्या इंदिराच्यावेळी जवळपास असाच अनुभव भारतीयानी अनुभवला होता. पण तेंव्हा इंदिराच्या विरोधात तोडीचे विरोधकही दिसले... मोदीच्या बाबतीत तसा तीव्र विरोध करणारा तुल्यबळ नेता विरोधकाना अजुनतरी गवसला नाही. कालच ९१ जागांवर झालेल्या मतदानातील विक्रमी वाढ पाहता विरोधक प्रचंड धास्तावलेले दिसत आहेत. मोदीच्या विरोधात प्रचार करायला गोध्राकांड व्यतिरिक्त दुसरा कुठलाच मुद्दा हाती नसल्याने विरोधक हताश व निराश झाल्याचे दिसत आहेत. नुकत्याच प्रकाशीत जाहिरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा जरी असला तरी भाजपने अत्यंत शिताफिने शब्दाची मांडनी करत “संविधानिक मार्गाने मंदीर बनवू” असे म्हटले. त्यामुळे “बघा... हे मंदिराच्या बाता करत आहेत” वगैरे ओरडा करायलाही स्कोप उरला नाही. कारण ’संविधानिक मार्गाने’ या दोन शब्दानी विरोधकांच्या तलवारींची धार बोथट करुन टाकली. अशा परिस्थीती परवा मोदीनी बडोद्यातून भरलेल्या अर्जात बायकोचे नाव “जशोदाबेन” असे लिहल्यावर कॉंग्रेस व विरोधकानी एकच गिल्ला केला.
मोदी विवाहीत की अविवाहीत या मुद्द्यावर राजकारणी व मिडीयाचे बरेच दिवसापासून रवंथ चालू आहे. ४५ वर्षा पुर्वीच मला बायको नको म्हणून घराबाहेर पडलेल्या मोदीच्या बायकोला शोधून काढून “मोदीची बायको सापडली... मोदीची बायको सापडली” म्हणत माकड उड्या मारणा-या मिडीयाच्या सुरात सूर मिसळणारे राजकारणी म्हणजे नैतिक अध्यपत:नाचा अस्सल नमूना होय.
आज दि. ११ एप्रिल २०१४ च्या टाईम्स ऒफ इंडियाच्या पहिल्या व अकरा नंबर पानावर मिळून(एकत्री) संपुर्ण पान भर होईल एवढी माहिती छापली आहे. या माहिती प्रमाणे जशोदाबेन मोदीचे बंधू कमलेश म्हणतात...  त्यांच्या बहिणीचा विवाह १९६८ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या सोबत झाला. त्या नंतर दोन अडीच वर्षात मोदीनी घर सोडले व तेंव्हा पासून यशादाबेन ही माहेरीच राहते आहे. मोदीनी त्या काळात यशोदाबेनला शिकायला लावले व शिक्षीका म्हणून सरकारी नोकरी करण्यास प्रोत्साहनही दिले. त्या आता ६२ वर्षाच्या असून शिक्षीका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. गंमत म्हणजे यशोदाबेन व त्यांच्या नात्यातल्यांची अजिबात तक्रार नसून सुद्धा मिडीया व राजकारणी मात्र याला चुनावी मुद्दा बनवून कसे मोदीचे नामोहरम करता येईल याच्या प्रयत्नात आहेत. 
नरेंद्र मोदीचा जन्म १७ सप्टे १९५०चा असून कमलेशभाई म्हणतात त्या प्रमाणे लग्न  १९६८ ला झाले. हे लग्न सप्टेबरच्या आधी झाले की नंतर ते लिहलेले नाही... पण जर का लग्न सप्टेबरच्या आधी झाले असेल तर मग मोदीना वयाची १८ वर्षे पुर्ण व्हायची होती. मुलाचे लग्नाचे वय २१ असावे लागते(तेंव्हा किती होते माहित नाही) अन मोदीचे वय तर १८ सुद्धा पुर्ण झालेले नव्हते. म्हणजे मोदीचा यशोदाबेन सोबतचा विवाह बालविवाह ठरतो. जर तो विवाह बालविवाह ठरत असेल तर मोदी कायदेशीररित्या त्या विवाहास बांधील नव्हते व आजही नाहीत. कायद्याच्या भाषेत तो विवाह VOID MARRIAGE म्हणून बाद ठरतो.  ही झाली एक बाजू...
या लग्नाची दुसरी बाजू अशी की १९६८ मध्ये लग्न झाले व दोन अडीच वर्षात मोदी घर सोडून निघून गेले. तेंव्हा पासून आजवर जवळपास ४५ वर्ष मोदी व यशोदाबेन यांच्यात कोणतेच संबंध नाही. आजच्या घडीला मोदी रोज पेपरातून व टी.व्ही.तून झडकत असतात पण त्या काळात मात्र ते असे झडकत  नव्हते. तीन वर्षे हिमालयात काढली व उरलेली वर्षे संघाच्या प्रचारात... या दरम्यान घराशी संपुर्ण नाते तोडले होते. म्हणजे एकूण परिस्थीती पाहता त्या काळात मोदी कुठे आहे, कसा आहे, जिवंत आहे की मेला याचा कुठलाच पत्ता जशोदाबेनला नव्हता अशी शक्यता आहे. तसे असल्यास सलग सात वर्षे नव-याचा ठावठिकाणा नाही या ग्राउंडवर यशोदाबेनला बायडिफॉल्ट घटस्फोट मिळून विवाह बाद ठरला.  अन जर पत्ता असला नि यशोदाबेनला मोदीशी संसार करायचा होता असे गृहीत धरले तरी वयाची २१ पुर्ण झाल्यावर १८ व्या वर्षी आई-वडलानी लावून दिलेलं लग्न नाकारण्याचा मोदीला संविधानिक अधिकार होता व आहे. त्यामुळे मोदीनी बालिग झाल्या नंतर हा विवाह नाकारल्यास सर्व ग्राउंड्सवर कायदा मोदीच्या बाजूनेच उभा राहतो. हा झाला कायद्याच्या भाषेतील युक्तीवाद...
आता नैतिक बाजूचा बाऊ करणा-यांचे मत बघू या...
मिडीया व दिग्गीराजे मिळून मोदीविरोधी दळण दळतच आहेत. काल एका मिडीयावाल्याने दिग्गीसमोर माईक धरुन मोदीच्या विवाहा बद्दल तुमचे काय म्हणणे आहे असे विचारल्यावर दिग्गी म्हणाले “मोदीनी आपल्या विवाहीत पत्नीला जी वागणूक दिली व ज्या प्रकारे ते आजवर खोटे बोलत राहिले ते पाहता भारतीय स्त्री मतदारांचा मोदीवरील विश्वास उडाला आहे” वगैरे झाडून मोकळा. अरे दिग्गीभाऊ... भारतीय स्त्री मतदाराना काय मोदीशी लग्न करायचे आहे का? दिग्गीचं प्रचंड कन्फ्यूजन झालेलं दिसतेय. भारतीय स्त्रीया मतदान करताना संबंधीत उमेदवारातील नवरोबाचे गूण तपासतात की नेतोबाचे हेच दिग्गीला कळलेले दिसत नाही. अन नैतिकता म्हणाल तर बालिग(मेजर) झाल्यावर बालविवाह नाकारण्याचा मोदीला संविधानिक अधिकारही आहे व नैतिक अधिकारही. उलट मी म्हणतो समस्त स्त्री मतदाराना मोदी बद्दल सहानुभूती वाटायला हवी.  कारण समाजिक चालिरीतीच्या नावाखाली एका १७ वर्षाच्या पोराचा लग्नाच्या नावाने बळी देण्यात आला. या लग्नामुळे जशोदाबेनचे आयुष्य उध्वस्थ झाले असे जरी प्राथमिक चित्र दिसले तरी एका मोदी नावाच्या तरुणाचेही आयुष्य तेवढेच उध्वस्थ झाले ही बाजूही तेवढीच खरी आहे. ते मोदी होते म्हणून दोन अडीच वर्शानेच का असेना पण हा विवाह झुगारण्याची हिंमत दाखविली... त्या बद्दल आपण सर्वानी मोदीचे स्वागतच केले पाहिजे. वयाच्या १९ व्या वर्षी मोदीनी दाखविलेल्या या हिंमतीच्या नि सामाजीक रुढीच्या विरोधातील विद्रोहाच्या मुळाशी पराकोटीची देशभक्ती होती हे सुद्धा एक  निर्विवाद सत्य आहे. 

बरं त्या जशोदाबेनला मिडीयाने विचारले की तुमची मोदी बद्दल काय तक्रार... बिक्रार?  तेंव्हा मोदी पंतप्रधान व्हावे अशी माझी ईच्छा असून मी त्यासाठी एक वेळचा उपवास करत आहे. आमच्यात कुठलीच वितुष्टी नसून ४५ वर्षा आधीचे लग्न व तेंव्हाची ताटातूटी याला आता काही अर्थ नसून मी स्वत:चे आयुष्य सुखाने जगत आहे असे उत्तर दिले. अन प्रॅक्टीकली ४५ वर्षा पुर्वीचा बालविवाह आणि तेंव्हाचा गृहत्याग... हा विषय आज कुठल्याही एंगलनी स्टॅंड करत नाही हेच खरे. पण राजकीय डुक्कराना चिखलात लोळणे प्रचंड आवडत असल्यामुळे मोदीला चिखलात ओढण्याची मल्लीनाथी सुरु आहे... अजुन काय!

अन हो... सगळ्यात महत्वाचं... मोदीचं लग्न ही त्यांची वयक्तीक बाब असून त्यात नाक खुपसण्याची काही गरज नाही. म्हणून म्हणतो... मोदीची बायको, इत्ता गहजब कायको?

-जयभीम

गुरुवार, १० एप्रिल, २०१४

टोपीसूर - विलास मुत्तेमवार

हिंदू धर्मग्रंथ व पुराणांमधून दिसणारे समाजघातकी प्राणी जसे की बकासूर, मैशासूर वगैरे होते तसे आजच्या काळात पक्षासूर(हायकमांड) व टोपीसूर(नेते)  आपल्या आसपास पहायला मिळतात. सध्या असाच एक टोपीसूर नागपुरात हिंडतो आहे... तो म्हणजे विलास मुत्तेमवार.  मुस्लीम मतदाराना आकर्षीत करण्यासाठी अशा अनेक टोपीसुरांचा निवडणूकीच्या काळात अनौरस जन्म होत असतो. सध्या नागपुरात अशाचा एका अनौरस इस्लामपुत्राचा जन्म झाला असून तो नमाजाची टोपी घालून तुफान पळतो आहे. नागपुरातील मुस्लिमांचे वोट डोळ्यापुढे ठेवून जन्म घेतलेला हा अनौरस मुस्लीमपुत्र जिंकण्याचा दावा करतो आहे. गंमत म्हणजे आपण सगळे मुर्खासारखे अशा अनौरसाना  मत देतो व स्वत:ची लूट करण्याची सनद बहाल करुन "हाय मै लुटगयी" टाईप किंचाळत पुढचे पाच वर्षे काढतो. खरं तर अशा पक्षासुराना व टोपीसुराना ठेचण्याचे काम करायला हवे पण आपल्याला कीस सापने सुंघा अल्ला जाणे... आम्ही याना सत्तेत बसवून मोकळे होते. मग हातात काहीच नाही म्हटल्यावर शिव्याशाप करण्याची पंचवार्षीक योजना दर पाच वर्षानी रिपीट करत बसतो.  
खरंतर मुत्तेमवारनी कुठली टोपी घालावी हा त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याशी निगडीत वयक्तीक विषय आहे. तरी लोकप्रतिनिधी म्हणून मत मागताना गैरमुस्लीमांबद्दल दाखविलेली ही बेफिकीरी नागपूरकर खपवूनच कसे घेतात?  यातील एक गोष्ट मला अजिबात कळत नाही ती म्हणजे मुस्लीमांची टोपी घातल्यास गैर मुस्लीम (हिंदू, बौद्ध, शीख, ख्रीश्चन इ.)मतदार नाराज होतील ही गोष्ट मुत्तेमवारना शिवतही नाही याला जबाबदार कोण? एखाद्या राजकारण्यामध्ये एक विशिष्ठ समाजाप्रती एवढे उमाळे फुटावे नि इतर समाजाप्रती पराकोटीची बेफिकीरी असावी हे कशामुळे घडत असेल? शांतपणे विचार केल्यास याच्या मुळाशी मतदार म्हणून सर्वसाधारण माणूसच जबाबदार असल्याचे दिसते. मुस्लीमांचे लाड करणा-या राजकारण्यांचे आपण सर्वानी जे लाड चालविले आहे त्यामुळे हे राजकारणी असा मस्तवालपणा करण्याची हिंमत दाखवू शकतात. आपण सर्वानी लाड बंद केले की ही बेफिकीरी व मस्तवालपणा एका झटक्यात उतरेल.  भारतीय राजकारणातील सर्वात मोठे दुर्दैव काय तर ईथे लोकशाही असली तरी त्याला कायम जातीची व धर्माची  किनार राहिलेली आहे. त्यामूळे लोकशाहीच्या शुद्ध कसोट्या लावल्यास भारतीय लोकशाही ही लोकशाही ठरतच नाही. ब्रिटीशांच्या आधी धर्मपंडीत व पुरोहितांच्या कंपुने हा देश चालविला... ब्रिटिशांच्या काळात कंपनी व नंतर ब्रिटीश सरकारने चालविला तर स्वातंत्र्योत्तर काळात जातीच्या कंपुनी व पक्षांच्या हायकमांडसनी हा देश चालविला.
विलास मुत्तेमवार सारखे लोक जेंव्हा मुस्लीमांची टोपी घालून हिंडतात तेंव्हा खरे तर आमच्यापेक्षा मुस्लीम समाजानीच पुढाकार घेऊन त्याचा निषेध करायला हवा. कारण ती टोपी म्हणजे उन्हाच्या चटक्यांपासून बचावासाठी घातलेली टोपी नसते काही... मुस्लीम समाजात असा समज आहे की इस्लामचे संस्थापक मो. पैगंबर यांचं डोकं कायम कापडानी बांधलेलं असे. त्यातूनच या टोपीची प्रथा पडली. त्यामुळे इतर वेळी नसली तरी पाच वेळा नमाज पडताना मुस्लीम बांधव ही टोपी आवर्जून घालतात.  अल्लाच्या बंधगीचं प्रतिक म्हणून घातली जाणारी ही टोपी धार्मिकतेच्या नि थेट पैगंबरांच्या मुळाशी नेऊन जोडणारी आहे. ही टोपी घालताना अल्लाच्या प्रती असलेली भावना सच्ची असावी ही त्यातील पहिली अट असून अल्लाच्या नियमांचे पालन करण्यास कटीबद्द असणेही तेवढेच अनिवार्य असते. एकूण काय तर मुस्लिमांची ही टोपी नुसती टोपी नसून अल्लाचा सेवक म्हणून आतून सच्चा असल्याचा बाह्य पुरावा असतो. ती घातलेला माणूस हा अल्लाच्या नियमांचे पालन व इस्लामिक पद्धतीचे जिवन जगत असल्याची जाहीर कबूली असते. इस्लामच्या जाडजूड धर्मग्रंथातील तत्वज्ञानाचा बाह्याविष्कार व त्यांच्या प्रतिची कटिबद्धता अधोरेखीत करते ही टोपी... 
पण लांड्या लबाड्या करणारे राजकारणी मात्र त्या मागची ना भावना जाणून घेत ना इतिहास... त्यान फक्त मतांचे समिकरण तेवढे दिसते. मग काय उचलली टोपी अन घातली डोक्यावर... ती टोपी डोक्यात घातल्यावर कसे वागावे? काय करावे? कसे बोलावे? याशी काही देणंघेणं नसतं. बरं मुस्लीम नेत्यानी व धर्मगुरुनी यावर मौन बाळगताना स्वत:च्या समाजाच्या पदरी काहीतरी पडते तर पडू दे... अशी भावना मनाशी बाळगून ही लबाडी खपवून घेतलेली असते. पण नेमका ईथेच त्यांचा घात होतो हे त्याना कळत नाही हे दुर्दैव. कारण एखादया राजकारण्याला तुमच्या दारात येताना तुमची टोपी घालावी लागते याचा अर्थ तुमच्या समाजाच्या उत्कर्षासाठी त्यानी काहीच केलं नसते हा त्याचा पुरावा असतो. अन गंमत म्हणजे मुस्लीमांसाठी काहीच केले नाही असा जो पुरावा देतो त्यावरच  मुस्लीम मतदार भाळतो हा अजुन एक विनोद. 

मुस्लीम समाजाचा उत्कर्ष व्हावा अशा योजना, तरुणाना शिक्षण व रोजगाराच्या संध्या, स्त्रीयांना सुरक्षा, गरीबाला अन्न व तुमच्या वस्तीतील पायाभूत सुविधा या सर्व आघाड्यावर काम करुन त्या भांडवलावर जर कोणी तुमचे मत मागायला येत असेल तर त्याला टोपीची गरज पडणार का? अजिबात नाही. अन असा माणूस टोपी  घालत नसला तरी आपला प्रतिनिधी म्हणून निवडून द्यायला मुस्लीमाना आवडायला हवा. पण या सगळ्या कसोट्या नदीत बुडवून टोपीसूराना निवडून देताना मुस्लीम समाज स्वत:चे वर्तमान तर खराब करतोच पण अनावधाणानेच का असेना, येणा-या पिढ्यांसाठी उध्वस्थ भविष्याची तरतूद करुन ठेवतो आहे. जगातील प्रत्येक माणसाची आपल्या अपत्यासाठी एक नैसर्गिक भावना असते ती म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या पुढच्या पिढीचे आयुष्य सुसाह्य असावे... नव्या पिढीच्या हातात मी सुदॄढ व्यवस्था देऊन जाईन. माझ्या वाट्याला आलेले दु:ख व कष्ट माझ्या पुढच्या पिढीच्या वाट्याला येऊ नये...वगैरे भावनेने प्रत्येक माणूस वर्तमानाशी झगडत  असतो. पण भविष्यातील या गोंडस स्वप्नाला सुरुंग लावणारा राक्षस मात्र मतदानाच्या रुपातून पोसत असतो. त्यामुळे आज स्वातंत्र्या नंतर तीन पिढ्या उलटल्या तरी नव्या पिढीच्या हातात एक सुदृढ देश नि प्रभावी व्यवस्था देण्यात मागच्या पिढ्या अपयशी ठरल्या आहेत. आम्ही असेच उदासीन राहिलो तर पुढच्या पिढ्या भिकेला लागल्या शिवाय राहणार नाही एवढं मात्र खरं.

मुत्तेमवार सारखा माणूस जेंव्हा गोल टोपी घालतो तेंव्हा फक्त तोच अपराधी असतो असे नाही. तर मुस्लीमांच्या स्वार्थी वृतीला राजकारण्यानी दिलेला तो प्रतिसाद असतो. भ्रष्ट व जातीयवादी नेत्यांच्या मुळाशी स्वार्थी नि एकगठ्ठा मतदानाचे समिकरण आहे. अन हे एकगठ्ठा मतदानाचे निर्माते कोण आहेत ते सांगणे न लगे... म्हणजे राजकारण्याचे  जातीयवादी वागणे वरवर तो कसा वाईट आहे असे दिसणारे असले तरी मुस्लीम मतदारांच्या स्वार्थी वृत्तीने जन्मास घातलेले हे मुस्लीमांचेच पाप आहे. आतातरी मुस्लीमानी असा स्वार्थ पेरू नये ज्यातून भ्रष्ट राजकारण्यांचा जन्म होईल. हीच गोष्ट एकगठ्ठा मतदान करुन तिडीक मिडीक मिळविणा-या आंबेडकरी समाजालाही लागू आहे. सामाजिक धृवीकरणातून मुस्लीम व आंबेडकरी समाज असुरक्षीततेच्या जाणेवेतून जात असतो. त्यातूनच मग एकगठ्ठा मतदान होत असते. राजकारण्यानी नेमकं हेच हेरलं असून या दोन समाजाना जास्तीत जास्त असुरक्षीततेच्या जाणिवेत जगायला भाग पाडत आहेत. याचा परिणाम काय तर... या दोन्ही समाजाच्या पुढच्या पिढ्यांचे भविष्य अंधकारमय होत आहे. आता मात्र ही असुरक्षीतता झटकून उभे राहण्याची वेळ आली आहे. एकदा हा मतदार ताठ उभा राहिला कि सगळे लबाड-लांडगे एका झटक्यात व्यवस्थे बाहेर फेकले जातील. एकदा हे लांडगे पिटाळले गेले की विकास होणारच.... नागपुरात आज मतदान होत आहे... नागपुरची जनता या टोपीसुराला निवडते की लाथ घालते ते १६ मे ला कळेलच.

-जयभीम

मंगळवार, ८ एप्रिल, २०१४

ग्रेट माडिया : गायीचे दूध न काढणारा समाज.

जगाच्या पाठीवर असा देश नसेल जो गायीचे दूध काढत नाही. किंबहूना गायीचे दूध काढणे म्हणजे आपला अधिकारच आहे असा समज व्हावा इतपत आपण दूधावर डल्ला मारणारी चोरटी जात बणून गेलो आहोत. ईतक्यावरच गोष्ट थांबली असती तर निराळं पण दुधाची तहान एवढी वाढत गेली की हातानी नाही तर चक्क मशीन लावून दूध काढण्याचं तरंज्ञान विकसीत करावा लागला एवढी आपली दुधाची भूक. नैसर्गीक रित्या मिळणारं दूध कमी पडू लागल्यावर तर माणसानी चक्क विज्ञानाला कामाला लावत गायींच्या हायब्रिड जाती जन्माला घालून दूधाचं उत्पाद(?) वाढवीत नेलं व आज जगात सर्वत्र दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आढळतो. नुसतं दूध पिणे ईथवर मर्यादीत न राहता हा व्यवसाय अनेक फूड प्रोडक्टसच्या रुपात फोफावत गेला असून डेअरी प्रोडक्टचा सर्वत्र भडीमार दिसतो आहे. डेअरी व डेअरी प्रोडक्ट ही जगातील एकमेव इंडस्ट्री असेल जी जिवंत प्राण्यांच्या शरीरातून काढलेल्या रॉ मटेरीअलवर चालते. मला अजुन दुसरी कुठलीच इंडिस्ट्री दिसत नाही जी जिवंत प्राण्यांच्या रॉ मटेरीअलवर चालत असेल... अन ही इंडस्ट्री चालविणा-याना तसे करणे भुषणावह वाटणे अजुनच बुचकळ्यात टाकणारी गोष्ट आहे... किमान माझ्यासाठी तरी आहेच.
आमच्या कुडकेल्लीत १००% समाज शेतकरी आहे. जवळपास सगळ्यांकडेच गुरं-ढोरं  व गायी असायचे व आहेत. लहानपणी आमच्या घरीही गुरं ढोरं व गायी होत्या. वडील गेल्यानंतर आईला शेती करणे शक्य नसल्यामुळे आता नाहीत. मला आठवतं आम्ही लहान असताना गाय गाभन झाल्यापासून वीई पर्यंत आम्ही सगळी भावंडं जमेल तशी गायीची काळजी घ्यायचो... म्हणजे फार असं काही नाही हो... इतर गुराना चरण्यासाठी रानात मोकाट सोडून दिल्यावर दोनचार दिवस ती गुरं ढोरं घरी आली नाही तरी शोधायला रानात जात नसायचो पण गाभण गाय असल्यास दुस-या दिवशी रानात जाऊन  शोधून आणायचो... एवढेच. 
आमच्या रानात जुलै ते आक्टोबर एवढे चारच महिने काय ते गुरं चारायची पद्धत आहे. नोव्हेंबर मध्ये एकदा घरात धान्य येऊन पडलं की पुढचे आठ महिने गुरं चारणे बंद... आम्ही गुराना मोकाट सोडून देतो. त्याना वाट्टेल तिथे जाऊन चरता यावं  नि मूड होईल त्या दिवशी गावात परतात. परतले तर गोठ्यात बांधायचे नाही तर आम्ही गुरांची  साधी आठवणही काढत नाही. कारण पावसाळ्यातील चार महिन्यात शेतांमुळे गुरांच्या चरण्यांवर ज्या मर्यादा येतात त्याच्या बदलयात पुढचे आठ महिने त्याना उभ्या रानाचं स्वातंत्र्य बहाल करण्याची आमची पद्धत आहे असं समजा. एवढं स्वातंत्र्य तर स्वातंत्र्याचा बाऊ करणा-या अमेरीकेतही नसावा... नै...! मग गुरं सुद्धा स्वत:चं चरण्याचं स्वातंत्र्य भरभरुन उपभोगतात. मग काही गुरं तर  आठ आठ दिवस गावात येतच नाहीत. अशावेळी मात्र वाघानी झडप बिडप घातली की काय म्हणून रानात शोधायला जावे लागते. मग कोणीतरी रानात भेटून “तूझी गुरं  अमूक तमूक ठिकाणी दिसली रे...” म्हणून हमखास सांगतो. तर अशी ही आमची शोध मोहीम...
फरक काय तर गाभण गायीला आठ दिवसा ऐवजी दुस-या दिवशी शोधणे एवढाच काय तो जिव्हाळा. गायीचे दिवस भरले व एकदाची गाय वीली की दूध सुरु... जगातल्या कुठल्याही कोप-यात अशी गाय विल्यावर घरचे सगळे दुधावर डल्ला मारतात. पण आमच्याकडे मात्र तशी पद्धत नाही. गायीचे दूध हे वासराचेच... च.. असते अशी ठाम शिकवण आहे. त्यामुळे ना आमच्याकडे चीक दूध काढले जात ना त्या नंतर गायीचे दूध काढले जात. तर गायीच्या दुधावर पहिल्या दिवसा पासून दूध संपेपर्यंत फक्त अन फक्त वासराचा अधिकार असतो. गायीच्या दूधाला हात लावायचे नाही ही आमच्या रानातल्या लोकांची हजारो वर्षाची प्रथा आहे. माडिया समाजाच्या या प्रथेला पाहून मी थक्क होतो. बाहेरून रानात शिरलेला बौद्ध (पुर्वाश्रमीचा महार समाज) खरं तर तेलगू किंवा मराठी समाज आहे. बौद्धांचे नातेवाईल जे आजच्या घडीला झाडिपट्टीत किंवा शहरात राहतात ते गायीचे दूध काढतात... पण माडिया सोबत रानात राहणारा बौद्ध  (काही अपवाद वगळता) मात्र गायीचे दूध काढताना दिसत नाही. रानातला बौद्ध माडिया संस्कृतीशी ईटका एकरूप होऊन गेला. कारण मुळात जी गोष्ट चांगली आहे तीचा प्रभाव पडतोच अन रानातल्या बौद्धांवर तो पडल्याचे ठळकपणे दिसते. 
मधल्या काळात मात्र रानातला माणूस शिकून बाहेर पडू लागला. शहरी वास्तव्यात अनेक नवीन गोष्टी कळू लागल्या. या शिकलेल्या माणसानी शहरातल्या सुशिक्षीताला गायीचे दूध पिताना पाहिले ही त्यातलीच एक गोष्ट.  आम्हाला ब-याच गोष्टी कळल्या त्यातली एक गोष्ट म्हणजे वासराचे दूध पळवायचे ही... मग शहरातून गावात गेल्यावर काही पोरानी हे प्रयोग करुन पाहिले. बिचारी वासरं ज्यानी हे कधीच पाहिलं/ऐकलं नव्हतं की आपलं दूध ही माणसं पळवतात... ती अस्वस्थ झालीत. माणूस शिकल्यावर किती नालायकपण करतो अशा चर्चा त्यांच्या भाषेत नक्की झडल्या असाव्यात. मधल्या काळात गावातल्या गायी सुशिक्षीत माणसांकडे तुच्च कटाक्ष टाकू लागल्या. बंड, विद्रोह, निषेध यातलं काहीच न करता मूक्या गाय वासरानी सुशीक्षीतपणाच्या झडा सोसल्या. पण  हे फार दिवस चाललं नाही कारण, आमच्या रानातल्या माणसाच्या रक्तातच तो संस्कार नसल्यामुळे वासराचे दूध पळविण्याचा उत्साह फार दिवस काही टिकला नाही. उर दडपून टाकणा-या दंडकारण्यात जिवाची बाजी लावून एक दिवसाचं जेवणं मिळविणा-या माडीया जिन्सला ही दुधाची चोरी रुचली नाही. अन समस्त दंडकारण्यातील वासरं जी सुशिक्षीत दूधचोरांना पाहून अस्वस्थ झाली होती त्यांचा जिव भांड्यात पडला. भामरागडच्या रानातली वासरं परत एकदा भयमुक्त झाली... त्यांच्या दुधावरचा अधिकार अबाधीत राहिला.  आजही आमच्या कुडकेल्लीतला माडिया समाज गायीचे दूध काढत नाही... याचा मला अभिमान वाटतो.

टीप: निर्वासीत बंगाली व तेलगू व्यापारी याला अपवाद आहेत कारण ते रानातले नाहीत व १९८० च्या काळात ही लोकं रानात उतरलीत.


कॉंग्रेसचा डाव, बाळासाहेब घर जाव!

आंबेडकरी समाजात प्रकाश आंबेडकरांचे एक वेगळे स्थान आहे. बाबासाहेबांचा नातू म्हणून तर आदर नि जिव्हाळा तर आहेच पण त्यापलिकडे एक बाणेदार नि अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणूनही आंबेडकरी जनता बाळासाहेबांवर नितांत प्रेम करते. बाबासाहेब संकल्पित रिपब्लिकन नावाच्या आंबेडकरी चळवळीची शकले उडाली व गल्लो-गल्ली रिपब्लिकनचे गट उदयास आले. स्वयंघोषीत नेते व गल्लीतही अपरिची अशा राष्टीय पक्षांचा पूर वाहू लागला... निळ्या राजकरणाचा बाजार मांडत अनेक नेत्यानी आंबेडकरी मतदारांचा घॊर अपमान केला. त्या नंतर या रिपब्लिकन नावानी जेवढी आंबेडकरी सामाजाची अब्रू घालविली तेवढी आजवर कुणीच घालविली नाही हा इतिहास आहे. भारतीय मिडीया तर फक्त रिपब्लिकनवर कॅमेरा रोखून आंबेडकर चळवळ कशी नेस्तानाबूत झाली याचा ओरडा करायला कायम सज्ज. या मागील मूळ हेतू आंबेडकरी चळवळ्याना हताश करुन गैरराजकीय पातळीवर जे सामाजीक कार्यात मोठी आघाडी घेऊन बाबासाहेबांचा विचार तळागळात नेण्याचे काम अखंडपणे चालवित आहेत त्या समस्त तरुणांचे मानसीक खच्चिकरण करणे हा एक कलमी कार्यक्रम मनासी बाळगून केलेली आमची फसवणूक होय. त्यामुळे भारतीय पत्रकारीतेवर निव्वड पक्षपाताचाच अरोप होतो असे नसून जातीयवादाचाही आरोप आहेच. राजकीय दलाल ठरलेले सगळे रिपब्लिकन नेते निवडणूका आल्या की मोठ्या पक्षाच्या पाय-या झिझवायला सुरुवात करतात व बाबासाहेबांच्या नावानी आपला ईमान विकून तिडीक मिडिक मिळवून मोठ्या अभिमानाने छाती बडवित गल्लीबोळात राष्ट्रीय नेता म्हणून हिंडत असतात. दर वर्षी अशा गल्लीबाज नेत्यांची रिपब्लीकनमध्ये वाढ होत गेली व त्याचा परिणाम असा झाला की आंबेडकरी नेतेच आंबेडकरी नेत्याना पाडण्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कार्य बजावू लागले. अगदी नगरसेवक पदापासून तर आमदारकी पर्यंत सर्वत्र एक रिपब्लिकन गट दुस-या रिपब्लिकन गटाला शह देण्याचे काम करु लागला. त्यातूनच मग रिपब्लिकन ऐक्याचाही प्रयोग झाला... अशा अनेक घडामोडीतून जाताना आंबेडकरी मतदार मात्र निराश होत गेला. अन याचा दुसरा परिणाम म्हणजे कॉंग्रेस बळकट होत गेला.
रिपब्लिकन गटांच्या या स्वार्थी खेळात निळे नेते एकमेकांवर तुफान चिखलफेक करत राहीले व पाडापाडीही चालू होती पण या सगळ्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मी पाहिली ती म्हणजे ऐक्यवाद फसल्यावरही बाळासाहेब आंबेडकरां बद्दलचा आदर कायम राखत आत्मा गहाण टाकलेल्या सर्व गल्लीबाजानी बाळासाहेबांच्या विरोधात मात्र उमेदवार दिला नाही. ही अत्यंत महत्वाची गोष्ट होती. जे नीळे नेते कायम एकमेकांचे पाय ओढण्यास सज्ज असतात ते बाळासाहेबांच्या विरोधात उमेदवार देत नाही याचा काय अर्थ असावा? स्पष्ट आहे... बाळासाहेबां बद्दल जनतेच्या मानात असलेला आदर या निळ्या नेत्याना चांगला माहीत आहे, त्यामुळे आंबेडकरी मतदारांच्या भावनेची कदर करत बाळासाहेबांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आला. थोडक्यात आंबेडकरी नेते कितीही भांडले तरी आंबेडकरी समाजात बाळासाहेबांचे असलेले स्थान खेकडेरुपी निळ्याना चांगले माहित आहे. पण कॉंग्रेस मात्र ना घटनेची दखल घेत ना त्याला महत्व देत... म्हणजे आंबेडकरी मतदार काय विचार करतो, कसा विचार करतो याचे कॉंग्रेसला काही पडले दिसत नाही...
ईकडे २०१४ च्या निवडणूका डोळ्यापुढे ठेवून आठवलेनी थेट भगव्यांपुढे लोटांगण घातल्यावर आंबेडकरी मतदार प्रचंड अस्वस्थ झाला. आठवलेनी कॉंगेसवर अनेक अरोप करत हा पक्ष कसा घातकी आहे वगैरे तोंडसूख घेतले. तसं रामदास आठवलेना कोणी सिरीयसली घेत नसल्यामुळे त्यांच्या जोकरछाप अवताराकडे जसे विनोदानी पाहिले जाते तसेच त्यांच्या वक्तव्याकडेही पाहण्याची सवय झाली. पण बारकाईने निरीक्षण केल्यास या जोकरछापाच्या बोलण्यात काही प्रमाणात का असेना पण तथ्य आढळतो. कसे ते बघू या...
अकोला लोकसभा मतदार संघ:
भारत स्वतंत्र झाल्या पासून १९८९ पर्यंत अकोला लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसची सीट येत असे.  पण १९८९ मध्ये भाजपच्या पांडूरंग फुंडकर यानी कॉंगेसला पिटाळून लावले ते लावलेच. १९८९ पासून आज पर्यंत म्हणजे जवळपास २५ वर्ष झालीत अकोल्यात कॉंगेसचा टीकाव लागत नाहीये.  का येत नाही कॉंगेसची सीट? उत्तर सोपं आहे. तिथे कॉंग्रेसचा मतदार विजयी आकडा प्राप्त करुन देईल एवढा नाही. आणि ही गोष्ट कॉंग्रेसलाही चांगली माहीत आहे. म्हणून १९९८ व १९९९ मध्ये कॉंग्रेसनी भरीपला सपोर्ट केला व बाळासाहेब दोनदा खासदार म्हणून निवडून आले.  थोडक्यात कॉंगेसला हे पक्के माहित आहे की अकोला मतदार संघात कॉंग्रेस कधीच निवडून येऊ शकत नाही. अन या वर्षी तर देशात कॉंग्रेस विरोधी वारे वाहत आहेत, मग अशा वेळी तर  नक्कीच नाही. मग अशा वेळी तर निवडूण येण्याची काहीच शक्यता नाही. पण आपल्या हेकटपणामुळे किमान जातीयवादी उमेदवार निवडूण येणार नाही एवढी काळजी घेण्याची अक्कल कॉंग्रेसला सुचू नये ही सगळ्यात मोठी नवलाई आहे...
हिदायत पटेलची उमेदवारी:
कॉंग्रेस पक्ष हे एक गूढ आहे ही गोष्ट खरीच. “जातीयवाद्याना सत्तेपासून दूर ठेवू” हे घोष्यवाक्य घेऊन रिंगणात उडी टाकणारी कॉंग्रेस तसे वागताना मात्र दिसत नाही. उलट अप्रत्यक्षरीत्या जातीयवाद्याना निवडून देण्याचे पापक कॉंग्रेसच्या कृतीतून घडताना दिसत आहे.  कॉंग्रेसचे बोलणे आणि वागणे यातील विसंगती अकोला मतदार संघातून अधोरेखीत होत आहे.  मागच्या २५ वर्षापासून जिथे कॉंग्रेसचं नावही नाही व गावही नाही तिथे कोणाला पाडण्यासाठी कॉंग्रेसने उमेदवार दिला? जिथे कायम भाजप निवडून येत असून त्याच अकोला मतदार संघात बाळासाहेब आंबेडकर मात्र एक बलाढ्य स्पर्धक आहेत... अशा वेळी आपल्या घोषवाक्याला जागण्याची कॉंग्रेसकडे पुर्ण संधी होती. पण कॉंग्रेस मात्र अकोल्यात आपले घोषवाक्यच विसरतो व जाहिरनाम्यातील भुमिकेपेक्षा विसंगत वागतो. भाजपचे संजय धोत्रे मागच्या वेळेस (२००९ मध्ये) ६४,८६८ मतानी निवडूण आले व बाळासाहेब दुस-या स्थानावर होते. कोणी खाल्ली बाळासाहेबांची मते? कॉंग्रेसनी! या वेळेस सुद्धा बाळासाहेब विरुद्ध संजय धोत्रे अशीच लढत आहे. अन गंमत म्हणजे जातीयवाद्याना सत्तेपासून रोखण्याचा नारा देणारी कॉंग्रेस २०१४ मध्ये सुद्धा आपला हिदायत अली नावाचा उमेदवार उभा केला.  आता हा हिदायत अली कोणाची मतं खाणार आहे हे सांगणे न लगे. भाजपवाले किंवा उच्चवर्णीय लोकं हिदायतला मत देणार नाही हे उघड आहे. हा बाबा ज्यांची मत घेणार ती सगळी दलीत व बहुजन मतदार असणार. म्हणजे हिदायत अलीच्या उमेदवारीमुळे एक सच्चा आंबेडकरी नेता जो खरोखरच जातीयवादा विरुद्ध लढतो तो अडचणीत येणार. यातून जर कोणाचा फायदा होणार असेल तर तो जातीयवादी भाजपाचा.... म्हणजे कॉंग्रेसच्या एकूण वागणूकीतून खरोखर जर कोणाला फटका बसत असेल तर तो आंबेडकीरी नि पुरोगामी नेत्याला. अन कॉंग्रेसच्या या मुर्खपणामुळे जर कोणी निवडून येत असेल तर तो जातीयवादी पक्ष.... मग मला प्रश्न पडतो की कॉंग्रेस जातीयदयाना सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न कुठे करते आहे? तो तर जातीयवाद्याना अप्रत्यक्षरीत्या मदत करत आहे!
थोडक्यात अकोला मतदार संघा पुरते बोलायचे म्हटल्यास कॉंग्रेसचा एकूण डाव हा जातीयवाद्याना रोखण्यापेक्षा बाळासाहेबाना घरी बसविण्याचा दिसतो. या सर्व पार्शभूमीवर यावेळी आंबेडकरी जनतेने मतपेटीतून कॉंग्रेसला जवाब द्यायचे आहे!

-जयभीम

मंगळवार, १ एप्रिल, २०१४

स्वराज : जाती बळकटीकरणाचा जाहीरनामा (भाग- १)

केजरीवालचं स्वराज वाचतोय... पुस्तक लहानसच आहे... फक्त १५१ पानाचं अन त्यातही कित्येक पानामध्ये कार्टुन्स काढली असल्यामुळे वाचताना भरभर पुढे सरकत राहतो. अण्णा हजारेची व स्वत:ची प्रस्तावना झाल्यावर पुस्तकाची सुरुवात होते ती आयकर विभागातील नोकरीतील सुरुवातीच्या दिवसांतील आठवणीने... केजरीवाल सांगतात की त्या काळात आम्ही कोणा एका बड्या उद्योगपतीकडे रेड मारली असता त्यानी आम्हाला धमकी दिली की तुमची बदली करेन वगैरे अन  काही दिवसात ती करुन दाखविली. त्या नंतर असे अनेक अनुभव येत गेले ज्यातून हे सिद्ध होत गेलं की  या देशाला लोकानी निवडूण दिलेले खासदार चालवित नसून त्यांच्या आडून भांडवलदार नि उद्योगपती चालवित आहेत. अशी  या पुस्तकाची सुरुवात आहे. मग अनेक विषयावर बोलत केजरीवाल अगदी तामिळनाडू पर्यंतचे उदाहरण देतात. त्याच बरोबर गरीब लोकांचा आपण कर भरत नाही असा जो समज आहे तो पुसून काढताना केजरीने सोप्या भाषेत कर प्रणालीचे विश्लेषण केले आहे...     कर प्रणाली:- या पुस्तकातील पृ.  क्र. १२ वर केजरीने एक छान उदाहरण दिलय ते म्हणजे या देशातील एक मध्यम वर्गीय कुटुंब महिन्याला साधारण रु. ३०००/- ( रुपये तीन हजार) घरखर्चासाठी व इतर खरेदीसाठी खर्च करतो. अन या वस्तूंवरील सरासरी कर १०% म्हणजेच ३०० रुपये होतो. म्हणजे एक मध्यम वर्गीय कुटूंब वर्षाला करापोटी ३६०० रुपये सरकारला कर म्हणून भरत असतो. मग एका गावात जर १००० कुटूंबं राहात असतील तर वर्षाला हे सगळे मिळून जो कर भरतात तो ३६,००,०००/- एवढा होतो असं साधं सुधं समीकरण या पुस्तकातून मांडलेलं आहे. अन या आपल्याच पैशातून राजकारणी व सरकारी बाबू कशी मजा मारतात असा निष्कर्ष काढत केजरीवाल पुढे सरकतात. मग बीपीएल वर कमेंट करत सरकारचं कसं कशावरच नियंत्रण नाही वगैरे सांगत केजरीवालचं पुस्तक ब-याच गोष्टींचं चांगलं नि तटस्थ विश्लेषण करत पुढे जातं. यातील महत्वाचं नि माझा स्वत:चा अनुभव असलेला एक किस्सा केजरीच्या या पुस्तकात पान नं. २४ वर फोरेस्ट या नावानी येतो. रानात राहणा-या माणसाचं जगणच रानावर असल्यामुले दिल्लीत बसून कायदे करणा-यांच्या अज्ञानामुळे रानातील माणसावर कसा घोर अन्याय होतो हे केजरीवालने छान विश्लेषीत केले आहे. मी स्वत: रानातला असल्यामूळे केजरीच्या या लिखानाशी मी रिलेट होऊ शकलो. आमच्या राना बद्दल आपलं मत व्यक्त केल्या बद्दल केजरींचे आभार.
या नंतर केजरीवाल लोकशाहीवर बोलतात... लोकशाही आपण बाहेरुन आयात केली नसून बुद्धाच्या काळापासून ती आपल्या देशात होती असे केजरीवाल म्हणतात (पृ. क्र. ३१). त्याच बरोबर आत्ताची लोकशाही कशी कमकुवत आहे हे सांगताना त्यावर तोडगा म्हणून ग्रामसभेचं समर्थन करत आजच्या निर्णय प्रक्रियेतील दोषांवर बोट ठेवत ग्रामसभेच्या निर्णयांचं महत्व पटवुन देण्यासाठी जीव ओतून प्रयत्न केल्या गेला आहे. ग्रामसभा कशी प्रभावी आहे हे सांगताना केजरीवाल एक किस्सा सांगतात तो असा...
...वैशाली नावाचं एक नगर होतं. तिथे एक प्रसिद्ध राजा राज्य करत होता. राजा असला तरी तो नावाचा होता कारण  आपल्या देशात  तेंव्हा  लोकशाही होती. ग्रामसभेला प्रचंड अधिकार होते. सगळे निर्णय ग्रामसभा घेत असे. अन ग्राम सभेनी घेतलेले निर्णय राजाला स्विकारणे बंधनकारक असे. मग एके न्यायसभेत काही लोकांची नजर एका सुंदर मुलीवर पडते. मग हे सगळे त्या मुलीला म्हणतात की तू आता वेश्या बन... मुलगी म्हणते की मी वेश्या बनते पण माझी एक अट आहे. सांग पोरी तुझी अट पुर्ण केली जाईल.... असं आश्वासन दिल्यावर मुलगी म्हणते की मला आपल्या राजाचा राजमहल दिल्यास मी वेश्या बनयला तयार आहे. मग लगेच ग्रामसभा भरते व लोकं आपल्या राजाचा राजमहल तीला देण्याचा निर्णय घेतात. राजा तिथेच असतो व तो विरोध करतो. पण ग्रामसभावाले राजावरच खेकसतात व म्हणतात की तुझा राजमहाल आमच्या पैशातून आला आहे, त्यामुळे आमचा निर्णय तुला मानावाच लागेल. ग्रामसभेचा अधिकार एवढा मोठा की राजा बिच्चारा  मुकाट्याने त्या पोरीला आपला राजमहल देऊन टाकतो. मग ती मुलगी  छान पैकी त्या राजमहालात वेश्या व्यवसाय करु लागते. तर ही होती ग्रामसभेची ताकद... (पृ. क्र. ३१)... 
(छी... ही काय कथा आहे वगैरे ज्याना प्रश्न पडलेत त्यानी कृपया केजरीनाच प्रश्न विचाराव. मी त्यावर काही बोलणार नाही. मी फक्त पुस्तकातला संदर्भ दिलाय)
तर...कथा सांगुन झाल्यावर केजरी म्हणतात की अशी ताकद ग्रामसभेला असावी.... केजरीवालची मुख्य तक्रार ही आहे  की आजच्या लोकशाहीत सगळे निर्णय जिल्हाअधिकारी वा त्याच्याही वरील अधिकारीवर्ग घेत असतो. त्यामुळे ग्रामसभेल आपल्या गरजानुरुप निर्णय घेत येत नाही. हा आजच्या लोकशाहितील सर्वात मोठा दोष असून त्यामुळे  देशाचे प्रचंड नुकसान व सामान्याची लूट सुरु आहे. त्यामुळे स्वराज आल्यास निर्णय प्रक्रियेचं विकेंद्रीकरण करत ती  गाव पातळीवर नेऊ असं केजरीवाल म्हणतात. आमच्या गावाला काय हवे काय नको हे दूर कुठेतरी बसलेल्या शहरी बाबूनी वा राजकारण्यानी न ठरवता आम्हालाच ते ठरवू द्या. मग ते ठरविण्याची प्रक्रीया काय तर ग्रामसभेतील प्रतिनिधी-सदस्य मिळून हे निर्णय घेतील. पण  असे केल्यास गावातील बहुसंख्य... जे सरंजामशाही वृत्तीनी व पाटीलकीनी झपाटलेले आहेत  ते इतरांवर अत्याचार करणार नाही अशी योजना मात्र केजरीवाल यांच्या स्वराज मध्ये दिसत नाही. जातीयवाद्यांच्या हातून अधिकार काढून घेऊन ते शासनाच्या हाती दिल्यामुळे आज गाव पातळीवर जो बदल घडला तो उलट फिरविण्याचा संपुर्ण कार्यक्रम या पुस्तकात आखलेला आहे.  

माझं म्हणंण हे आहे की भारतातील गावं जातीयवादानी बरबटलेली असून समतेचा अतीव अभाव आहे. जातीसाठी माती खाण्याची वृत्ती खोल खोल रुजली असल्यामुळे ग्रामसभेचे निर्णय जाती व संख्याबळ या समिकरणातून नि विशिष्ट लोकांचे हीत डोळ्यापुढे ठेवून घेतले जातील. त्यातून दलितांची व अल्पसंख्यांकाची प्रचंड ससेहोलपट होत जाऊन देश परत एकदा अंधाराच्या खाईत ढकलला जाईल. तसे झालेच तर  यादवी होऊन देश भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. केजरीच्या भाषेत म्हणायचे झाल्यास "ये देश बचेगा नही जी" अन या विध्वंसाची मुळं रोवण्याचे काम केजरीचे स्वराज करणार. ग्रामसभेला जास्तीत जास्त अधिकार द्यावे ही मागणी लावून धरताना ते अधिकार बजावणारे ग्रामसभेचे सदस्य हे जातीयवादाच्या आजारानी ग्रस्त आहेत याचा केजरीला विसर पडला दिसतो.  जातीयवादी ग्रामसभेच्या प्रत्येक निर्णयात या विकाराचा विष कालवलेला असेल ज्यातून मोठ्या कष्टानी निर्माण झालेले सामाजीक संतूलन एका झटक्यात मान टाकेल हे केजरीच्या लक्षात येत नाहिये. ज्यांच्या हाती सत्तेची व निर्णय प्रक्रियेची सुत्रे देण्याचा केजरी हट्ट करतात त्या लोकांची सामाजिक एकोप्याच्या मोजपट्टीत अर्हता काय याचे विश्लेषण केजरीवाल करीत नाहीत. त्यामुळे ग्रामसभेला तो अधिकार दिलाच तर समाजाचे भले होण्यापेक्षा नुकसान होण्याचेच आसार अधिक आहेत.  थोडक्यात गावातली उच्चवर्णीय जाती व त्यांची सरंजामशाही वृत्ती बळकट करण्याचा आधुनिक जाहिरनामा म्हणजे अरविंद केजरीवालचे "स्वराज" हे पुस्तक होय.

-जयभीम

टीप: हे निव्वड पुस्तक परिक्षण असून वयक्तीक पातळीवर अरविंद केजरीवाल नि योगेंद्र यादव यांच्या बद्दल आदरच आहे.


आपचा देडफुट्या : अरविंद केजरीवाल!

आप... म्हणजे आम आदमी पार्टी. अण्णांच्या चळवळीतून बाहेर पडलेल्या काही नौटंकीबाज टवाळखोरानी दिल्लीत धरणा नवाचा हौदोस सुरु केला. दिल्लीतल्या लोकाना तो उपद्रव आवडला व त्यातून एक राजकीय पर्याय उदयास आला... मग त्या पर्यायाचं बारसं झालं नि त्याचं नाव ठेवण्यात आलं आम आदमी पार्टी (आप). सामाजीक लढ्यापासून सुरुवात करणारा हा आप राजकारणात उतरला. हा हा म्हणता थेट दिल्लीतले लोकल तख्त आपच्या पायाखाली आले. हा एका अर्थाने चमत्कार होता. अन हा चमत्कार घडविणारा व राजकीय लढा जिंकणारा माणूस होता एक दिडफूट्या सेनापती... अरविंद केजरीवाल! बरं सत्ता मिळाल्यावर काम करायला नको का... पण मूळ स्वभाव टवाळखोरीचा, तो स्वस्थ बसू देईना. त्या तख्तालाही लाथ घालून शेवटी ही टोळी राष्ट्रीय टवाळखोरी करायला निघाली. मग अंबानीच्या खोड्य़ा काढ, गडकरीचा चिमटा घे, राहुलचा गालगुच्चा घे... असले प्रकार चालू झाले. त्यातल्या त्यात यांचा आवडता बाहूला कोण तर मोदी. मग आपची अख्खी टीम मोदीच्या खोड्या काढत थेट गुजरात ते वाराणसी असा प्रवास करत टवाळखोरीचा महासंग्राम वाराणसीत खेळण्याचं घोषीत केलं. मग देशाचा मिडीया वाराणीसीत मिळेल त्या कोप-यात आपले कॅमेरे बसवून आपच्या खोड्या रेकॉर्ड करण्यास सज्ज झाला.  खेळ आजुन रंगात यायचा असल्यामुळे प्रेक्षकाचं मनोरंजन म्हणून आपनीच आपली टीम बी निर्माण करुन स्वत:वर शाई फासून घेण्याचा कार्यक्रम खेळला. या टीम बीच्या मदतीने टाकलेले फासे भाजपवर जाऊन आपटतील अशीही व्यवस्था करण्यात आली. अरोप प्रत्यारोप सुरु झाले. मिडीयाला मात्र बसल्या ठिकाणी ढीगानी इनपुट मिळू लागला. या सर्व प्रकारात जर सगळ्यात जास्त कोणी खुष असेल तर तो म्हणजे मिडीया.
बरं कालवर जो मोदी ५६ इंच छातीची बढाई मारत देशभर डरकाळ्या फोडत होता त्याला मात्र दिडफुट्या व  २६ इंच छातीचा केजरीवाल  दिसला की घाम फुटू लागला.  केजरीवालचं आवडतं वाक्य म्हणजे “मेरी क्या औकात हैं जी!” अन गंमती गंमती मध्ये त्यानी अनेकाची औकात काढली.  केजरीने आजवर जे जे डाव खेळले त्यात राष्ट्रीय पक्ष म्हणवणा-या  व दिग्गज नेते म्हनून मिरविणा-या अनेकांची अवकात निघाली. मोदी नावाची लाट देशभर उसळली आहे म्हणना-याना आता झक मारत (हा सुद्धा केजरीचा आवडता शब्द) ती लाट केजरीने थोपविली असे म्हणावे लागत आहे. एवढेच नाही तर ५६ इंच छातीचा वीर २६ इंचाला घाबरुन घामाघूम झाला... चक्क लढाई हारतो की काय असे वाटल्यामुळे दुसरा अर्ज गुजरात मधून भरला.... यातच सगळं आलं. कोणाची औकात काय आहे ते परत एकदा सिद्ध झालं. दिडफुट्या सेनापतीने ५६" छातीत धडकी भरवून सोडली एवढे मात्र खरे.  

मुळात केजरीवालनी राजकीय उडी  टाकली ती भ्रष्टाचाराच्या विरोधात बोंब मारत. त्यामुळे देशातील लोकं जी भ्रष्टाचाराला पार कंटाळून गेली होती त्यानी केजरीवालच्या या उडीला लांबउडी, उंचउडी किंवा अजुन कोणती असेल ती मानत भरभरून टाळ्या वाजवल्या. तरुण वर्गाला तर आजही केजरीवालमध्ये एक मसीहा दिसतो वगैरे. पण याची दुसरी बाजू अशी की केजरीनी चक्क रिव्हर्स उडी मारुन जगाला चकीत केले. काही लोकं या उडीला पळपुटेपणा म्हणतात तर काहींचे म्हणणे आहे की मोठ्या टप्प्याची लांब उडी टाकण्यासाठी दोन पावलं मागे सरकलेली ही एक अवस्था असून ४० आमदारांचा टप्पा गाठण्यासाठी वापरलेलं हे तंत्र आहे वगैरे... एका अवस्थेवर जाण्यापेक्षा त्यामागचा उद्देश जाणून घ्या वगैरे डोस पाजण्यात आपचे समर्थक आता तरबेज झालेत.

सध्या केजरीवाल हे मिडीयाच्या टीआरपीचं पर्फेक्ट मटेरीयल असून भारतीय मिडीया केजरीला कव्हर करण्याची एकही संधी सोडत नाही. पण एक गोष्ट मात्र कोणीच विचारत नाही ती म्हणजे केजरीचा लढा भ्रष्टाचारा विरुद्ध होता... अन भ्रष्टाचार कोण करतो? तर सत्ताधारी! विरोधी पक्ष अप्रत्यक्षपणे यात सहभागी असतो. म्हणजे केजरीचा थेट  लढा सत्ताधा-यांच्या विरोधात असायला हवा होता... किंबहुना दिल्लीच्या निवडणूकीच्या वेळी तो तसा होता. पण लोकसभा निवडणूकीत केजरीचा एकून रोख भाजपच्या विरोधात दिसतोय. म्हणजे केजरीनी आतून काही समझौता केला की कसे? सोनीया गांधीच्या विरोधात मात्र केजरीने बडा उमेदवार न देण्याचे ठरविले दिसते. याला पॅस्सीव्ह सहकार्यच म्हणावे लागेल. 

आज नाही म्हटलं तरी भाजप, कॉंग्रेस या दोन प्रमुख पक्षा नंतर राष्ट्रीय पातळीवर जर कुणाची हवा (किमान शहरी भागात व तरुणांमध्ये तरी) असेल तर ती आहे आपची. आपच्या मागे तरुणांचे लोंढे जरी धावत नसले तरी तो पक्ष तरुणाना लुभावतो आहे ही बाब नाकारता येत नाही.  आपचे कर्तेधर्ते केजरीवाल यांचं “स्वराज” नावाचं पुस्तक नुकतच आणलं आहे. सुरुवातीची काही पानं चाळलीत... केजरीची एकून भुमिका व पुस्तकाची सुरुवात चांगली आहे. संपुर्ण पुस्तक वाचून झाल्यावर पुढचा लेख टाकेणच...

सध्यातरी केजरीवाल हे माझ्यासाठी एक अस्पष्ट व गूढ राजकीय व्यक्तीमत्व आहे. मेरी क्या औकात है म्हणत ५६ इंच छातीच्या गुज्जूला घाम फोडणारा देडफुट्या केजरी साधासुधा नाही व दिसतो तेवढ सरळही नाही एवढं मात्र नक्की! केजरीचं मुल्यांकन केलच पाहिजे पण ते मिडीयाच्या बातम्यांवरुन नाही तर त्यानी ’स्वराज’ पुस्तकातून मांडलेल्या मुलभूत विचाराचा व त्याच्या सध्याच्या वाटचालीचं ऑडीट करुन दोघातील विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवत केजरीवालचा खरेखोटेपण तपासता येईल! 


-जयभीम