मंगळवार, ८ एप्रिल, २०१४

ग्रेट माडिया : गायीचे दूध न काढणारा समाज.

जगाच्या पाठीवर असा देश नसेल जो गायीचे दूध काढत नाही. किंबहूना गायीचे दूध काढणे म्हणजे आपला अधिकारच आहे असा समज व्हावा इतपत आपण दूधावर डल्ला मारणारी चोरटी जात बणून गेलो आहोत. ईतक्यावरच गोष्ट थांबली असती तर निराळं पण दुधाची तहान एवढी वाढत गेली की हातानी नाही तर चक्क मशीन लावून दूध काढण्याचं तरंज्ञान विकसीत करावा लागला एवढी आपली दुधाची भूक. नैसर्गीक रित्या मिळणारं दूध कमी पडू लागल्यावर तर माणसानी चक्क विज्ञानाला कामाला लावत गायींच्या हायब्रिड जाती जन्माला घालून दूधाचं उत्पाद(?) वाढवीत नेलं व आज जगात सर्वत्र दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आढळतो. नुसतं दूध पिणे ईथवर मर्यादीत न राहता हा व्यवसाय अनेक फूड प्रोडक्टसच्या रुपात फोफावत गेला असून डेअरी प्रोडक्टचा सर्वत्र भडीमार दिसतो आहे. डेअरी व डेअरी प्रोडक्ट ही जगातील एकमेव इंडस्ट्री असेल जी जिवंत प्राण्यांच्या शरीरातून काढलेल्या रॉ मटेरीअलवर चालते. मला अजुन दुसरी कुठलीच इंडिस्ट्री दिसत नाही जी जिवंत प्राण्यांच्या रॉ मटेरीअलवर चालत असेल... अन ही इंडस्ट्री चालविणा-याना तसे करणे भुषणावह वाटणे अजुनच बुचकळ्यात टाकणारी गोष्ट आहे... किमान माझ्यासाठी तरी आहेच.
आमच्या कुडकेल्लीत १००% समाज शेतकरी आहे. जवळपास सगळ्यांकडेच गुरं-ढोरं  व गायी असायचे व आहेत. लहानपणी आमच्या घरीही गुरं ढोरं व गायी होत्या. वडील गेल्यानंतर आईला शेती करणे शक्य नसल्यामुळे आता नाहीत. मला आठवतं आम्ही लहान असताना गाय गाभन झाल्यापासून वीई पर्यंत आम्ही सगळी भावंडं जमेल तशी गायीची काळजी घ्यायचो... म्हणजे फार असं काही नाही हो... इतर गुराना चरण्यासाठी रानात मोकाट सोडून दिल्यावर दोनचार दिवस ती गुरं ढोरं घरी आली नाही तरी शोधायला रानात जात नसायचो पण गाभण गाय असल्यास दुस-या दिवशी रानात जाऊन  शोधून आणायचो... एवढेच. 
आमच्या रानात जुलै ते आक्टोबर एवढे चारच महिने काय ते गुरं चारायची पद्धत आहे. नोव्हेंबर मध्ये एकदा घरात धान्य येऊन पडलं की पुढचे आठ महिने गुरं चारणे बंद... आम्ही गुराना मोकाट सोडून देतो. त्याना वाट्टेल तिथे जाऊन चरता यावं  नि मूड होईल त्या दिवशी गावात परतात. परतले तर गोठ्यात बांधायचे नाही तर आम्ही गुरांची  साधी आठवणही काढत नाही. कारण पावसाळ्यातील चार महिन्यात शेतांमुळे गुरांच्या चरण्यांवर ज्या मर्यादा येतात त्याच्या बदलयात पुढचे आठ महिने त्याना उभ्या रानाचं स्वातंत्र्य बहाल करण्याची आमची पद्धत आहे असं समजा. एवढं स्वातंत्र्य तर स्वातंत्र्याचा बाऊ करणा-या अमेरीकेतही नसावा... नै...! मग गुरं सुद्धा स्वत:चं चरण्याचं स्वातंत्र्य भरभरुन उपभोगतात. मग काही गुरं तर  आठ आठ दिवस गावात येतच नाहीत. अशावेळी मात्र वाघानी झडप बिडप घातली की काय म्हणून रानात शोधायला जावे लागते. मग कोणीतरी रानात भेटून “तूझी गुरं  अमूक तमूक ठिकाणी दिसली रे...” म्हणून हमखास सांगतो. तर अशी ही आमची शोध मोहीम...
फरक काय तर गाभण गायीला आठ दिवसा ऐवजी दुस-या दिवशी शोधणे एवढाच काय तो जिव्हाळा. गायीचे दिवस भरले व एकदाची गाय वीली की दूध सुरु... जगातल्या कुठल्याही कोप-यात अशी गाय विल्यावर घरचे सगळे दुधावर डल्ला मारतात. पण आमच्याकडे मात्र तशी पद्धत नाही. गायीचे दूध हे वासराचेच... च.. असते अशी ठाम शिकवण आहे. त्यामुळे ना आमच्याकडे चीक दूध काढले जात ना त्या नंतर गायीचे दूध काढले जात. तर गायीच्या दुधावर पहिल्या दिवसा पासून दूध संपेपर्यंत फक्त अन फक्त वासराचा अधिकार असतो. गायीच्या दूधाला हात लावायचे नाही ही आमच्या रानातल्या लोकांची हजारो वर्षाची प्रथा आहे. माडिया समाजाच्या या प्रथेला पाहून मी थक्क होतो. बाहेरून रानात शिरलेला बौद्ध (पुर्वाश्रमीचा महार समाज) खरं तर तेलगू किंवा मराठी समाज आहे. बौद्धांचे नातेवाईल जे आजच्या घडीला झाडिपट्टीत किंवा शहरात राहतात ते गायीचे दूध काढतात... पण माडिया सोबत रानात राहणारा बौद्ध  (काही अपवाद वगळता) मात्र गायीचे दूध काढताना दिसत नाही. रानातला बौद्ध माडिया संस्कृतीशी ईटका एकरूप होऊन गेला. कारण मुळात जी गोष्ट चांगली आहे तीचा प्रभाव पडतोच अन रानातल्या बौद्धांवर तो पडल्याचे ठळकपणे दिसते. 
मधल्या काळात मात्र रानातला माणूस शिकून बाहेर पडू लागला. शहरी वास्तव्यात अनेक नवीन गोष्टी कळू लागल्या. या शिकलेल्या माणसानी शहरातल्या सुशिक्षीताला गायीचे दूध पिताना पाहिले ही त्यातलीच एक गोष्ट.  आम्हाला ब-याच गोष्टी कळल्या त्यातली एक गोष्ट म्हणजे वासराचे दूध पळवायचे ही... मग शहरातून गावात गेल्यावर काही पोरानी हे प्रयोग करुन पाहिले. बिचारी वासरं ज्यानी हे कधीच पाहिलं/ऐकलं नव्हतं की आपलं दूध ही माणसं पळवतात... ती अस्वस्थ झालीत. माणूस शिकल्यावर किती नालायकपण करतो अशा चर्चा त्यांच्या भाषेत नक्की झडल्या असाव्यात. मधल्या काळात गावातल्या गायी सुशिक्षीत माणसांकडे तुच्च कटाक्ष टाकू लागल्या. बंड, विद्रोह, निषेध यातलं काहीच न करता मूक्या गाय वासरानी सुशीक्षीतपणाच्या झडा सोसल्या. पण  हे फार दिवस चाललं नाही कारण, आमच्या रानातल्या माणसाच्या रक्तातच तो संस्कार नसल्यामुळे वासराचे दूध पळविण्याचा उत्साह फार दिवस काही टिकला नाही. उर दडपून टाकणा-या दंडकारण्यात जिवाची बाजी लावून एक दिवसाचं जेवणं मिळविणा-या माडीया जिन्सला ही दुधाची चोरी रुचली नाही. अन समस्त दंडकारण्यातील वासरं जी सुशिक्षीत दूधचोरांना पाहून अस्वस्थ झाली होती त्यांचा जिव भांड्यात पडला. भामरागडच्या रानातली वासरं परत एकदा भयमुक्त झाली... त्यांच्या दुधावरचा अधिकार अबाधीत राहिला.  आजही आमच्या कुडकेल्लीतला माडिया समाज गायीचे दूध काढत नाही... याचा मला अभिमान वाटतो.

टीप: निर्वासीत बंगाली व तेलगू व्यापारी याला अपवाद आहेत कारण ते रानातले नाहीत व १९८० च्या काळात ही लोकं रानात उतरलीत.


२ टिप्पण्या:

 1. What you are saying? I am confused. You are proud of people who dont use cow milk and fed it to calves. But at the same time you like beaf which is basically killing cows and calves. (In one of your earlier blogs you have mentioned that you love beaf Biryani) So what are you hinitng at? People should feed calves and then kill and eat them?

  उत्तर द्याहटवा
 2. अमित,
  दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
  गाय मारुन खाणे हा रानातल्या आयुष्यातील एक विधीचा भाग असल्यामुळे गायीचे मटन खाणे व त्या चवीची आवड/ओढ निर्माण होणे क्रमप्राप्त आहे. आमच्याकडे तेरवीच्या विधीला फक्त अन फक्त गाय/बैल मारला जातो. त्यामुळे त्या मटनाची चव आवडते... लहानपणात डेव्हलप झालेल्या चवीला जगात उपाय नसतो.

  दुसरा मुद्दा असा की गायीच्या वासराच्या वाट्याचे दूध पळविणे आमच्या रानटी संस्कृतीप्रमाणे अपराध ठरतो.

  वरील दोन गोष्टींचा परस्पर काही संबंध आहे असे मलातरी वाटत नाही.

  उत्तर द्याहटवा