मंगळवार, ८ एप्रिल, २०१४

कॉंग्रेसचा डाव, बाळासाहेब घर जाव!

आंबेडकरी समाजात प्रकाश आंबेडकरांचे एक वेगळे स्थान आहे. बाबासाहेबांचा नातू म्हणून तर आदर नि जिव्हाळा तर आहेच पण त्यापलिकडे एक बाणेदार नि अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणूनही आंबेडकरी जनता बाळासाहेबांवर नितांत प्रेम करते. बाबासाहेब संकल्पित रिपब्लिकन नावाच्या आंबेडकरी चळवळीची शकले उडाली व गल्लो-गल्ली रिपब्लिकनचे गट उदयास आले. स्वयंघोषीत नेते व गल्लीतही अपरिची अशा राष्टीय पक्षांचा पूर वाहू लागला... निळ्या राजकरणाचा बाजार मांडत अनेक नेत्यानी आंबेडकरी मतदारांचा घॊर अपमान केला. त्या नंतर या रिपब्लिकन नावानी जेवढी आंबेडकरी सामाजाची अब्रू घालविली तेवढी आजवर कुणीच घालविली नाही हा इतिहास आहे. भारतीय मिडीया तर फक्त रिपब्लिकनवर कॅमेरा रोखून आंबेडकर चळवळ कशी नेस्तानाबूत झाली याचा ओरडा करायला कायम सज्ज. या मागील मूळ हेतू आंबेडकरी चळवळ्याना हताश करुन गैरराजकीय पातळीवर जे सामाजीक कार्यात मोठी आघाडी घेऊन बाबासाहेबांचा विचार तळागळात नेण्याचे काम अखंडपणे चालवित आहेत त्या समस्त तरुणांचे मानसीक खच्चिकरण करणे हा एक कलमी कार्यक्रम मनासी बाळगून केलेली आमची फसवणूक होय. त्यामुळे भारतीय पत्रकारीतेवर निव्वड पक्षपाताचाच अरोप होतो असे नसून जातीयवादाचाही आरोप आहेच. राजकीय दलाल ठरलेले सगळे रिपब्लिकन नेते निवडणूका आल्या की मोठ्या पक्षाच्या पाय-या झिझवायला सुरुवात करतात व बाबासाहेबांच्या नावानी आपला ईमान विकून तिडीक मिडिक मिळवून मोठ्या अभिमानाने छाती बडवित गल्लीबोळात राष्ट्रीय नेता म्हणून हिंडत असतात. दर वर्षी अशा गल्लीबाज नेत्यांची रिपब्लीकनमध्ये वाढ होत गेली व त्याचा परिणाम असा झाला की आंबेडकरी नेतेच आंबेडकरी नेत्याना पाडण्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कार्य बजावू लागले. अगदी नगरसेवक पदापासून तर आमदारकी पर्यंत सर्वत्र एक रिपब्लिकन गट दुस-या रिपब्लिकन गटाला शह देण्याचे काम करु लागला. त्यातूनच मग रिपब्लिकन ऐक्याचाही प्रयोग झाला... अशा अनेक घडामोडीतून जाताना आंबेडकरी मतदार मात्र निराश होत गेला. अन याचा दुसरा परिणाम म्हणजे कॉंग्रेस बळकट होत गेला.
रिपब्लिकन गटांच्या या स्वार्थी खेळात निळे नेते एकमेकांवर तुफान चिखलफेक करत राहीले व पाडापाडीही चालू होती पण या सगळ्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मी पाहिली ती म्हणजे ऐक्यवाद फसल्यावरही बाळासाहेब आंबेडकरां बद्दलचा आदर कायम राखत आत्मा गहाण टाकलेल्या सर्व गल्लीबाजानी बाळासाहेबांच्या विरोधात मात्र उमेदवार दिला नाही. ही अत्यंत महत्वाची गोष्ट होती. जे नीळे नेते कायम एकमेकांचे पाय ओढण्यास सज्ज असतात ते बाळासाहेबांच्या विरोधात उमेदवार देत नाही याचा काय अर्थ असावा? स्पष्ट आहे... बाळासाहेबां बद्दल जनतेच्या मानात असलेला आदर या निळ्या नेत्याना चांगला माहीत आहे, त्यामुळे आंबेडकरी मतदारांच्या भावनेची कदर करत बाळासाहेबांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आला. थोडक्यात आंबेडकरी नेते कितीही भांडले तरी आंबेडकरी समाजात बाळासाहेबांचे असलेले स्थान खेकडेरुपी निळ्याना चांगले माहित आहे. पण कॉंग्रेस मात्र ना घटनेची दखल घेत ना त्याला महत्व देत... म्हणजे आंबेडकरी मतदार काय विचार करतो, कसा विचार करतो याचे कॉंग्रेसला काही पडले दिसत नाही...
ईकडे २०१४ च्या निवडणूका डोळ्यापुढे ठेवून आठवलेनी थेट भगव्यांपुढे लोटांगण घातल्यावर आंबेडकरी मतदार प्रचंड अस्वस्थ झाला. आठवलेनी कॉंगेसवर अनेक अरोप करत हा पक्ष कसा घातकी आहे वगैरे तोंडसूख घेतले. तसं रामदास आठवलेना कोणी सिरीयसली घेत नसल्यामुळे त्यांच्या जोकरछाप अवताराकडे जसे विनोदानी पाहिले जाते तसेच त्यांच्या वक्तव्याकडेही पाहण्याची सवय झाली. पण बारकाईने निरीक्षण केल्यास या जोकरछापाच्या बोलण्यात काही प्रमाणात का असेना पण तथ्य आढळतो. कसे ते बघू या...
अकोला लोकसभा मतदार संघ:
भारत स्वतंत्र झाल्या पासून १९८९ पर्यंत अकोला लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसची सीट येत असे.  पण १९८९ मध्ये भाजपच्या पांडूरंग फुंडकर यानी कॉंगेसला पिटाळून लावले ते लावलेच. १९८९ पासून आज पर्यंत म्हणजे जवळपास २५ वर्ष झालीत अकोल्यात कॉंगेसचा टीकाव लागत नाहीये.  का येत नाही कॉंगेसची सीट? उत्तर सोपं आहे. तिथे कॉंग्रेसचा मतदार विजयी आकडा प्राप्त करुन देईल एवढा नाही. आणि ही गोष्ट कॉंग्रेसलाही चांगली माहीत आहे. म्हणून १९९८ व १९९९ मध्ये कॉंग्रेसनी भरीपला सपोर्ट केला व बाळासाहेब दोनदा खासदार म्हणून निवडून आले.  थोडक्यात कॉंगेसला हे पक्के माहित आहे की अकोला मतदार संघात कॉंग्रेस कधीच निवडून येऊ शकत नाही. अन या वर्षी तर देशात कॉंग्रेस विरोधी वारे वाहत आहेत, मग अशा वेळी तर  नक्कीच नाही. मग अशा वेळी तर निवडूण येण्याची काहीच शक्यता नाही. पण आपल्या हेकटपणामुळे किमान जातीयवादी उमेदवार निवडूण येणार नाही एवढी काळजी घेण्याची अक्कल कॉंग्रेसला सुचू नये ही सगळ्यात मोठी नवलाई आहे...
हिदायत पटेलची उमेदवारी:
कॉंग्रेस पक्ष हे एक गूढ आहे ही गोष्ट खरीच. “जातीयवाद्याना सत्तेपासून दूर ठेवू” हे घोष्यवाक्य घेऊन रिंगणात उडी टाकणारी कॉंग्रेस तसे वागताना मात्र दिसत नाही. उलट अप्रत्यक्षरीत्या जातीयवाद्याना निवडून देण्याचे पापक कॉंग्रेसच्या कृतीतून घडताना दिसत आहे.  कॉंग्रेसचे बोलणे आणि वागणे यातील विसंगती अकोला मतदार संघातून अधोरेखीत होत आहे.  मागच्या २५ वर्षापासून जिथे कॉंग्रेसचं नावही नाही व गावही नाही तिथे कोणाला पाडण्यासाठी कॉंग्रेसने उमेदवार दिला? जिथे कायम भाजप निवडून येत असून त्याच अकोला मतदार संघात बाळासाहेब आंबेडकर मात्र एक बलाढ्य स्पर्धक आहेत... अशा वेळी आपल्या घोषवाक्याला जागण्याची कॉंग्रेसकडे पुर्ण संधी होती. पण कॉंग्रेस मात्र अकोल्यात आपले घोषवाक्यच विसरतो व जाहिरनाम्यातील भुमिकेपेक्षा विसंगत वागतो. भाजपचे संजय धोत्रे मागच्या वेळेस (२००९ मध्ये) ६४,८६८ मतानी निवडूण आले व बाळासाहेब दुस-या स्थानावर होते. कोणी खाल्ली बाळासाहेबांची मते? कॉंग्रेसनी! या वेळेस सुद्धा बाळासाहेब विरुद्ध संजय धोत्रे अशीच लढत आहे. अन गंमत म्हणजे जातीयवाद्याना सत्तेपासून रोखण्याचा नारा देणारी कॉंग्रेस २०१४ मध्ये सुद्धा आपला हिदायत अली नावाचा उमेदवार उभा केला.  आता हा हिदायत अली कोणाची मतं खाणार आहे हे सांगणे न लगे. भाजपवाले किंवा उच्चवर्णीय लोकं हिदायतला मत देणार नाही हे उघड आहे. हा बाबा ज्यांची मत घेणार ती सगळी दलीत व बहुजन मतदार असणार. म्हणजे हिदायत अलीच्या उमेदवारीमुळे एक सच्चा आंबेडकरी नेता जो खरोखरच जातीयवादा विरुद्ध लढतो तो अडचणीत येणार. यातून जर कोणाचा फायदा होणार असेल तर तो जातीयवादी भाजपाचा.... म्हणजे कॉंग्रेसच्या एकूण वागणूकीतून खरोखर जर कोणाला फटका बसत असेल तर तो आंबेडकीरी नि पुरोगामी नेत्याला. अन कॉंग्रेसच्या या मुर्खपणामुळे जर कोणी निवडून येत असेल तर तो जातीयवादी पक्ष.... मग मला प्रश्न पडतो की कॉंग्रेस जातीयदयाना सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न कुठे करते आहे? तो तर जातीयवाद्याना अप्रत्यक्षरीत्या मदत करत आहे!
थोडक्यात अकोला मतदार संघा पुरते बोलायचे म्हटल्यास कॉंग्रेसचा एकूण डाव हा जातीयवाद्याना रोखण्यापेक्षा बाळासाहेबाना घरी बसविण्याचा दिसतो. या सर्व पार्शभूमीवर यावेळी आंबेडकरी जनतेने मतपेटीतून कॉंग्रेसला जवाब द्यायचे आहे!

-जयभीम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा