शुक्रवार, ९ मे, २०१४

पहिला पुरस्कार!

माझ्या आम्ही माडिया पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार जाहीर झाला. अत्यंत आनंद होत आहे. माझे हे पुस्तक आक्टोबर २०१३ मध्ये प्रकाशित झाले. आज सात महिने उलटून गेले तरी एकाही प्रमुख वृत्तपत्राने पुस्तक परिक्षण छापले नाही. आतातरी छापतील अशी आशा बाळगतो.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आभारी आहे.

हे पुस्तक खरं तर माझं पुस्तक नव्हेच. हे पुस्तक त्या रानात जिवन जगणा-या माडिया माणसाचं आहे. मी त्यांचं आयुष्य रेखाटलं एवढच. साहित्य परिषदने या पुस्तकाला पुरस्कार देऊन लेखक म्हणून माझा तर सन्मान केलाच आहे, पण त्याच बरोबर त्या माडिया माणसाचाही सन्मान झाला, ज्याचे जिवन मी रेखाटले आहे.  या  पुस्तकातील जवळपास ८०% पात्रं आजही जिवंत आहेत. आता मात्र मी कुडकेल्लीला जाऊन त्या सगळ्यांचे वयक्तीकरित्या आभार मानणार आहे. पुस्तकात आलेल्या प्रत्येक पात्राचा मी आभारी आहे.
त्याच बरोबर समकालीन प्रकाशन, सुहास कुलकर्णी व गौरी कानेटकर ज्यांनी ’आम्ही माडिया’ वर प्रचंड मेहनत घेऊन पुस्तक प्रकाशीत केलं त्यांंचाही आभारी आहे.

धन्यवाद!

मंगळवार, ६ मे, २०१४

ग्रेट माडिया : आत्महत्या न करणारा शेतकरी!

आजच्या घडीला तरी शेतकरी म्हटलं की आत्महत्या आठवतात. शेतक-यांची आत्महत्या व त्या नंतर सरकारचे अनुदान हे आता रोजचं गाणं होऊन बसलं. पीक बुडालं म्हणून आत्महत्या करणारा शेतकरी मिडीयासाठी तर चवीने चघळल्या जाणारा विषय. शेतकरी आत्महत्या करतो हा विषय पुढे करुन  बडेसे बड्या नेत्याला चोपून काढताना पत्रकार व इंटेलेक्चुअल वर्ग आनंदानी उड्या मारतो. बिचा-या नेत्यानाही आपलं काहितरी चुकतं असच वाटतं अन मग ते सुद्धा स्वत:ला सावरत मी शेतक-यांच्या बाजूनेच आहे वगैरे घोषणा देत फिरतात. हा सगळा मिडियाच्या दबावाचा प्रताप असतो. शेतक-याची आत्महत्या म्हणजे सरकारचा दोष हे गल्ली बोळातल्या पोरांनाही ठामपणे वाटू लागलय. सुरुवातील हे नुसतं वाटायचं, पण पेपरातून सातत्याने त्याचा मारा करुन या मताला ठामपणा आणून देण्याचे काम मिडियाने पार पाडले. त्यासाठी पेपरातून पानच्या पानं भरुन छापले जाते की कसं सरकारी धोरणं शेतक-याला मारक ठरत असून तो आत्महत्या करतो आहे वगैरे. अन उभ्या देशाची सहानुभूती शेतक-याला मिळू लागली. बरं आत्महत्या करण्यात नंबर वन शेतकरी कुठला तर आमच्या विदर्भातला...
पण याच विदर्भात भामरागडच्या रानात आमचा माडिया शेतकरी हजारो वर्षापासून राहतो आहे. सिंचनाची सोय नाही, आधुनिक बी-बियाणे नाही, फवारणी-किटकनाशके काय असतं ते ही माहित नाही. शेती संबंधी एवढं सगळं अज्ञान असताना जगण्याचं साधन मात्र शेती आहे. ही माडियाच्या जिवनातील सगळ्यात मोठी विसंगती. आधुनिक शेतीतलं माडियाला कळत नाही हे जरी खरं असलं तरी शेतीतलं कळतं हे ही तेवढच खरं. प्रत्येक माडियाकडे स्वत:ची शेती आहे. माडिया माणूस शक्यतो दुस-याकडे नोकरी वगैरे करत नाही. स्वत: शेताचा मालक असणे हा माडियाचा स्थायीभाव आहे. माडिया माणूस हजारो वर्षा पासून शेतकरी आहे. पण दुर्दैव म्हणजे ही शेती फक्त वरच्या पाण्यावर अवलंबून असते. मग पावसानी दडी मारली की पिकं बोंबलतात. अन पाऊस दर वर्षा-दोन वर्षा आड लपाछपी खेळतोच खेळतो. म्हणजे दुष्काळ हा माडियाच्या आयुष्यात नित्याचा होऊन बसला आहे. 
पराकोटीचे दारिद्र्य, आधुनिक जिवनाचे अज्ञान व रानातलं आयुष्य यातून माडिया माणूस अक्षरश: खंगून गेला आहे. शेताला आग लागावी नि पिकं भस्म होऊन जावी असा प्रकार दर दोन वर्षानी घडत असतो. मग पोटाची आग शमविण्यासाठी माडिया माणूस रानात झेपावतो... कंदमुळे, मासे, प्राणी व मुंग्या माकोडे खाऊन जगतो... पण पीक बुडालं म्हणून आत्महत्या मात्र कधीच करत नाही. आजवरच्या इतिहासात दुष्काळ पडला म्हणून माडियानी आत्महत्या केलेली एकही घटना ऐकिवात नाही. पराकोटीचे दारिद्र्य वाट्याला येऊन रोजचे जगणे सर्वार्थाने अशक्य झाल्यावरही, पाण्याच्या थेंबा थेंबासाठी लढावे लागल्यावरही कधीच खचून गेला नाही तो म्हणजे माडिया. माझ्या लहानपणी कुडकेल्लीत अनेक दुष्काळं पडलीत. माडिया माणसे दुष्काळाच्या काळात घरातील मोहू खाऊन, कण्याची आंबिल पिऊन जगताना मी पाहिले आहे. आमच्या कुडकेल्लीतील पारसा गायतावारसे गायता हे दोन धनाढ्य माडिया. सलग दोन वर्षे दुष्काळ पडला की ही गायता लोकं हमखास राखीव ढोल्या फोडत व जुणे धान सर्वाना वाटून देत. मग जेंव्हा पीक येई तेंव्हा हे कर्जाचे धान परत केले जाई. कधी कधी तर तीन तीन वर्ष हे कर्ज फेडणे जमायचे नाही. हिशेबाची वही नाही, कर्जाची कुठेच नोंद नाही... पण जेंव्हा पीक येई तेंव्हा कर्ज घेतलेल्या माणसाने  आठवणीने फेडणे हा तिकडचा संस्कार. आमचा माडिया शेतकरी अत्यंत प्रामाणिक. हे सगळं कधीतरी घडायचं असं नाही. दंडकारण्यात दुष्काळाचा दुष्काळ कधीच नव्हता. आईनी पोटभर जेवण द्यावं तसं निसर्गानी रानाला जर काही दिलं असेल तर तो म्हणजे दुष्काळ. पण यातून माडिया माणूस खचण्यापेक्षा अधिक धीट होत गेला.    
मी नेहमी म्हणतो की माडिया हा जगातील सर्वात श्रीमंत समाज आहे... कारण संपुर्ण पृथ्वीतलावर हाच एक असा समाज आहे जो १००% भूधारक आहे. तंत्रज्ञान व आधुनिक शेतीचे ज्ञान याच्या अभावामुळे भिकेला लागला हे त्याचं दुर्दैव. रानातलं जगणं प्रचंड कष्टाचं जरूर आहे, पण माडियाच्या छातीत नैराश्य मात्र नाही. य़ेईल त्या परिस्थीशी भिडण्याचा गूण ऊर दडपणा-या रानातून हिंडताना कधी विकसीत होतो ते त्यालाही कळत नाही.
तसं पाहता विदर्भातला शेतकरी व माडिया शेतकरी एकाच भागातले. पण विदर्भातला शेतकरी मात्र पीक बुडालं की आत्महत्या करतो, माडिया मात्र अजुनतरी असल्या गोष्टीना भीक घालत नाही. आत्महत्या करणारा शेतकरी माडियापेक्षा जास्त हुशार आहे, मराठी भाषा जानणारा आहे, सरकारी योजनांचा लाभ घेणारा आहे. आपली व्यथा अधिका-यांसमोर नि समाजा समोर मांडण्यास समर्थ आहे. त्याच्याकडॆ जगण्यासाठी माडियापेक्षा नक्कीच दोन साधनं अधिकची आहेत. तरी तो पीक बुडालं की चक्क जिव देतो. याच्या अगदी उलट माडियाचं आहे. त्याला मराठी येत नाही त्यामुळे संवादाची नुसती बोंब, शासकीय सोयींचा गंध नाही, आधुनिक शेती माहित नाही, जगण्याची किमान साधनं उपलब्ध आहेत. तरी सुद्धा माडिया शेतकरी निसर्गाशी रोजचा झगडा झगडत असतो.  रोज सपाटून आपटला तरी उठून उभे राहणे सोडत नाही. एकाच प्रांतातील दोन शेतक-यांमधील ही विसंगती थक्क करणारी आहे.   
पराकोटीच्या दारिद्र्यात जगताना अनेक दुष्काळं सोसून सुद्धा आजवर एकही आत्महत्या न करणारा हा माडिया शेतकरी संपुर्ण भूतलावरील शेतक-याना धैर्याचे धडे देतो हेच खरे. समस्त शेतक-याना माडिया सारखे धैर्य लाभो एवढीच सदिच्छा!