सोमवार, ९ जून, २०१४

विक्तू बाबा (विदर्भीय बौद्धांचा संत)

आंबेडकरी सामाजाचा धम्मांतरा नंतर प्रचंड मानसिक गोंधळ उडाला. रातोरात हिदंत्व झटकून बौद्धत्व स्विकारताना दमछाक झाली. हिंदुत्वाचा राग म्हणून व बाबासाहेबांवर प्रगाढ श्रद्धा म्हणून नागपूरात येऊन दिक्षा घेतली खरी पण बौद्ध धम्माचे पालन करताना मात्र अजुनही तारांबळ उडते. तीन पिढ्या उलटल्या तरी धम्माचं बस्तान बसेना... धम्म अगदी प्राथमिक अवस्थेतच अडकून पडला आहे.  हे सगळं चालू असताना तू कट्टर की मी कट्टर असा नवा ट्रेंड उभा झाला.  कोण कट्टर आंबेडकरवादी हा निकष लावून प्रत्येक महार दुस-या महाराची आंबेडकर निष्ठा तसापसत असतो. बाबासहेबांच्या प्रति निष्ठा व बौद्ध धम्माचे अनुकरण हे प्रमुख दोन निकष असले तरी जोडीला अजुन दोन निकष लावण्याची पद्धत आहे ते म्हणजे २२ प्रतिज्ञांचे पालन व नास्तीकतेचा पुरावा. एकदा २२ प्रतिज्ञा नाही पाळल्या तरी फार काही रोष ओढावत नाही पण नास्तिक नसाल म्हणजेच आस्तिक असाल तर पुढचा आंबेडकरी खर्रडपट्टी काढतो. यातली गंमत काय तर बिचारा आस्तिक स्वत:चा दोष लगेच मान्य करतो व देवाची पुजा लपून करण्याची जाग्यावर शपथ घेऊन मोकळा होतो. त्यातूनच आंबेडकरी माणसाच्या घरी बाहेर बाबासाहेब तर किचनमध्ये देवघर असा प्रकार उदयास आला. ही झाली अगदीच प्राथमिक गंमत... यात खोलात गेल्यावर असे दिसते की आमचे नागपूरकर आंबेडकरी पश्चीम महाराष्ट्रीय आंबेडकरवाद्याना तुच्छ लेखतात. अन कळस म्हणजे पश्चिम महाराष्ट्रीय आंबेडकरवादी “हो रे बाबा, ते नागपूरवाले फार कट्टर असतात” म्हणत आपलां कमी आंबेडकरवादीपणा मान्यही करतात... कारण काय? तर पश्चिम महाराष्ट्रीय बौद्ध तुलनेने कमी नास्तिक आहेत एवढच....! नास्तिक नसणे हे आंबेडकरावादातून बाद करण्याचं एक निकष ठरत गेलं.

प्रश्न असा पडतो की नागपूरकर जातीवंत आंबेडकरवादी तर पश्चिम महाराष्ट्रातले हलके... हे का? तर ईकडे आंबेडकरवादी गौरी गणपती करतात, सत्यनारायण घालतात, देवाला नवस बोलतात... अगदी काही लोकं तर निमंत्रण पत्रिकेवर गणपती छापतात. माझ्या ओळखितल्य एकाने असेच गणपती छापल्यामुळे समाज खवळून उठला, सम्राट पेपरात बातमी छापून जाहीर बहिष्कार घातला... अन गणपती छापणा-यानी हा बहिष्कार मान्य करुन त्याच वृत्तपत्रातून जाहीर माफीही मागितली. थोडक्यात आस्तिक आंबेडकरवादी नास्तिक आंबेडकरवाद्याला प्रचंड घाबरतो... अगदी जिल्हाधिकारी सारख्या पदावर असलेले आस्तिकही नास्तिकाचा धसका घेतात. अन या नास्तिकवादात नागपूरी माणूस पुढे आहे... तर एकूण काय आहे तर आंबेडकरवादी समाजात नागपूरकर समाज वरचा तर बाकीचे खालचे असं खुल्लम खुल्ला मत समाजात रुजलेला आहे...तो टोकाच्या नास्तिकवादामुळे. अन इतराना तो मान्यही आहे. कारण आंबेडकरवाद म्हणजे नास्तिकवाद असं पक्कं ठसलेलं आहे. तर नागपूरकर आंबेडकरवादी देवाच्या बाबतीत कट्टर नास्तिक असून ते सर्वमान्य झाले आहे. पण देवाच्या बाबतीत नागपूरकरांचा एक मोठा वीक पॉईंट आहे तो म्हणजे विक्तू बाबा....
नागपूरकरा कितीही नास्तिक असला तरी याच नास्तिकाच्या कुटूंबात एकतरी असा माणूस सापडतो जो विक्तू बाबाचा भक्त असतो. खुद्द माझ्या घरात मी सोडलो की सगळे कट्टर बौद्ध असूनही विक्तू बाबाचे भक्त आहेत. उभ्या विदर्भात थोड्याफार फरकानी प्रत्येकाच्या घरी हीच कथा...  देशातील सगळे संतमहंत वर्ज्य, देवीदेवता वर्ज्य...  पण विक्तू बाबा मात्र चालतो... का? तर विक्तू बाबा आपल्या जातीचा आहे म्हणून...
कट्टर बौद्द ज्याना बाबासाहेबही प्रिय आहेत व बुद्धही... यानी चक्क विक्तू बाबाच्या आरत्या रचल्या, केसेट व सीडीज बनवून बाजारात आणल्या. त्याच बरोबर विक्तू बाबाची नित्य पुजाअर्चा सुद्दा केली जाते... एवढच नाही तर चक्क उपवासही धरल्या जातो. वर्षातून एकदा कधीतरी विक्तूबाबाची खास यात्राही भरते. हे सगळं करुनही विदर्भीय बौद्धांचं बौद्धत्व मात्र अबाधीत राहतं. कारण एकच... संत आपल्या जातीचा. बास!

मी लहानपणा पासून विक्तू बाबाचं ऐकतो आहे, पण कधीच गेलो नाही. या दिवाळीत नक्की जाईन. आल्यावर फोटो सकट अजुन एक पोस्ट टाकेनच. तोवर जोरसे बोलो... विक्तू बाबा....

खालील धाग्यावर विक्तूबाबाची आरती ऐका!

https://www.youtube.com/watch?v=e_448syTVfo


विक्तू बाबा की जय!
विक्तू बाबा की जय!
विक्तू बाबा की जय!

टीप: पश्चिम महाराष्ट्रीय बौद्धानो... आता घाबरायचं नाही बरं का... नागपूरकराना!