गुरुवार, १० जुलै, २०१४

ग्रेट माडिया : जेवणातील अळी आणि त्याचा बाऊ!आज फेसबुकवर अनिकेत आमटेनी टाकलेले फोटो पाहून मला लहानपणचे वसतीगृहाचे दिवस आठवले. सन १९८६-८७ चा काळ. मी एटापल्लीच्या समूह निवासी वसतीगृहात (स.नि.व.) होतो. साधारण १५०-२०० मुलं-मुली एवढी संख्या पटावर असायची. त्यातले तीस-चाळीस दिवाळी पर्यंत पळून जायचे. रानात मोकाट फिरणा-या जिवाना वसतीगृह व शाळा हे बंदीस्त, शिक्शा व नीरस आयुष्य वाटे... एवढ्या मुलांचा स्वयंपाक करायला चैतू नावाचा एक हेड कूक होता/आहे व सोबतीला दोन स्त्रीया मदतनीस म्हणून असायच्या. रोजचा जेवणाचा मेनू ठरलेला... दोन पोळ्या, वरन आणि भात, बास! बिचारे तीन जण मिळून करुन करुन करणार काय... जेवणात अळ्या असायच्या. खास करुन भातात. आम्ही पोरं रानातली… मुंग्या माकोळे खात जगलेली... मग त्या अळ्या काढून बाजूला ठेवत जेवण करायचो. आम्हाला काहीच वाटत नसे. एकदा जेवण झालं की शेजारी ठेवलेल्या अळ्या उचलून ताटात टाकायचो व नळावर जाऊन ताट धुवायचो. अळ्या बाजूला काढत जेवण करणे हा प्रकार नित्याचा...
एटापल्ली पासून जवळ गेदा नावाचे गाव आहे. तिथे मात्र तेली समाज मोठ्या प्रमाणात आहे. आमच्यावेळी स.नि.व. मध्ये गेद्याची किमान १०-१५ तरी तेल्याची मुलं शिकायला असायची. हा तेली समाज अत्यंत पुढारलेला. म्हणजे आमच्या मोजपट्टीत. तर ही सग्ळी पुढारलेल्या समाजाची पोरं मात्र अळ्या मिळाल्या की दंगा करायची. थेट चैतूशी जाऊन भांडायची. चैतू मात्र शेरास सव्वाशेर होता... मग ही वरात वार्डनकडे जायची. पोरं अळ्यांची तक्रार कराय्चे... तर चैतू तीन माणसांकडून यापेक्षा जास्त काय अपेक्षा करता म्हणून त्याची बाजू मांडायचा. मग यावर तोडगा काढण्यात आला तो म्हणजे स्वयंपाकाच्या कामात पोराना मदतीला घ्यायचं. मग पद्दतशीरपणे पाच पाच पोरांची यादीच लावण्यात आली. पण परिक्षेच्या काळात पोरं चॅट मारायचे. मग काय नेमकं अडचणीच्या वेळी अळ्यांचे भात वाढल्या जाई... परत तेल्यांची तक्रार...
आम्हाला मात्र तेल्यांचा अतिरेक वाटे. अरे भातात अळ्या असतील तर त्या बाजूला काढून जेवा ना! असं आमचं साधं तत्वज्ञान होतं. स.नि.व. मध्ये शेकडो मुलं शिकायची. त्यातली ९०% ही माझ्या सारखी रानातून आलेली होती. जेवनात अळ्या सपडणे वगैरे आमच्यासाठी अगदी सामान्य गोष्ट होती. त्यामुळे रानटी मुलांची त्या बद्दल कधीच तक्रार नसायची. कारण आम्ही सगळी अत्यंत गरीबितून आलेली पोरं. शेतात काम करताना दुपारचा नाश्ता म्हणून आंबिल बनविली जाते. ही आंबिल शेतात एखाद्या झाडाखाली ठेवून त्यावर पानाचे झाकान अन उडू नये म्हणून त्यावर काठी ठेवली जाते. दिवसभर शेतात राबून जेंव्हा आंबिल प्यायला झाडाखाली येतो तेंव्हा बरेचवेळा या आंबिलीत झुरळ किंवा एखादा रानटी किडा पडलेला असतो. मग तो किडा बाजूला काढून आंबिल पिली जाते.... किडे बाजूला काढून आंबिल पिण्याचा अनुभव जवळपास प्रत्येकाला ते ही अनेकवेळाचा असतो. त्यामुळे या गोष्टीचा मला कधीच बाऊ करावासा वाटला नाही. अन अगदी माझ्यासारखे विचार करणारे सनिव मध्ये ९०% होते. त्यामुळे तेल्यांची मागणी कायमच अतिरेकी वाटायची.  मी स्वत: अनेकवेळा किडे बाजूला काढून आंबिली पिली व परत शेतात कामावर हाजर...!
आमचं तत्वज्ञान अगदी सोपं... 
"अळी बाजूला काढून जेवल्यास मरत नाही ना... मग जेवा" 
माझ्या जेवणात आजही माशी पडली, किंवा एखादी अळी सापडली वा झुरळ मिळाला तर मी त्याला  छानपैकी ताटाच्या बाजूला काढून ठेवतो... व पोटभर जेवून घेतो. त्या दिवशी बायकोचं जेवण मात्र बोंबलतं!

२ टिप्पण्या:

  1. Magachi amitchi commentsvar hech samarpak utter ahe. Karan bahujan samaj khup garibititun ani adchanivar mat karun shikshan ghetala. Kahi lower caste sriyana nahi milala te hyach Ramteke siranchya varil sangitlelya paristitimule. Ek adarsha sri hya mulansamor asel trr mala khatri ahe samajala khup abhiman ani kshikshanatahi (sriya) samaj bharpur pragati Karel.

    प्रत्युत्तर द्याहटवा