सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४

सत्तेचा माज आणि हिंदुत्वाची खाज!

खाज येणे हा तसा शरीराचा धर्मच, पण यात एक गंमत आहे, तुम्ही शरीराची जास्तीत जास्त काळजी घेत असाल व ते स्वच्छ ठेवत असाल तर खाज येत नाही, पण याच्या उलट जर शरीराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलात व शरीर घाण करत गेलात तर खाजही वाढत जाते. थोडक्यात खाज येणे हे शरीराच्या दुषीत व दुर्गंधीचे लक्षण आहे.  मग ही घाण वाढत गेली की नुसती खाजच येत नाही तर गजखरण होते. त्याचाही पुढचा टप्पा म्हणजे खरुज होते. तर अशा नाना आजाराची सुरुवात होते ती मात्र खाजेतून... अन खाच येण्याच्या मुळाशी असते ती म्हणजे घाण!
अशीच खाज सध्या वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजाना येऊ लागली आहे. ही खाज जरी आज आली तरी खाजेच्या मुळाशी असलेली घाण अनेक दिवसांपासून साफ न केल्याच्या हा परिणाम आहे.  शरीराची घाण साफ करणे जसे गरजेचे असते अगदी तसेच विचाराची/मनाची घाणही साफ करायची असते. ती वेळीच केली नाही तर कधी ना कधी त्याची खाज व नंतर दाद (म्हणजेच गजकरण) होऊन बसते. मग हे खाजग्रस्त व दादग्रस्त लोकं आपला आजार इतराना लावत फिरतात. मग अनेक दादग्रस्त एकत्र येऊन एखादी सभा घेऊन दादग्रस्त असणे हेच खरे मणूष्य असण्याचे लक्षण असल्याचा दावा करतात. सध्या असा दावा करत फिरणारे दादग्रस्त इसम म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  सर्वेसर्वा मोहन भागवत होत ज्याना हिंदुत्वाची खाज सुटली असून सगळा भारत हिंदू असून ईथला प्रत्येक माणूस हिंदू असल्याचा दावा ते आपल्या खाज सभांमधून करत आहेत.
मोदी निवडूण आल्या पासून संघाला मोठा चेव आला असून नको त्या कागाड्या करण्याची दुर्बुद्धी उसळी मारुन येताना दिसते आहे. मागच्या काही दिवसात संघाच्या एकूण वागण्याचा पॅटर्न अभ्यास केल्यास हा मोदीच्या निवडीचा परिणाम आहे असे दिसते. निवडणूक जिंकल्याचा आनंद होण्यापेक्षा जातीय मग्रूरीचे दर्शन संघाच्या सर्व पातळीवर अधोरेखीत होऊ लागले आहे. मोदीची सर्वोच्च पदी निवड म्हणजे भारतीयानी संघीय विचारधारेवर केलेला शिक्कामोर्तब असा गैरसमज संघाने करुन घेतला हे स्पष्ट दिसते आहे. याच्या जोडीला मुस्लीम आतंकवाद नि कट्टरपंथीय ईस्लामीकता याच्या विरोधात रान उठविल्यास हिंदूत्वाची गाठ अधिक घट्ट होत जाईल हा सुद्धा संघाच्या गोटातील एक वर्केबल तर्क आहे. थोडक्यात भाजपच्या विजयानी संघाचा आत्मविश्वास बळावला असून भारतीयानी हिंदुत्वाला मान्यता दिली असा गोड गैरसमज संघाने करुन घेतला आहे.
त्यातूनच हिंदूत्वाचा अजेंडा आता मोठ्या जोमाने चालविला जात असून अनेक आघाड्यावर जिथे जे प्रभावी साधन वापरता येईल ते वापरले जात आहे. सुब्रम्हणीयम स्वामिने ’शंखनाद’ नावाची संघटना उभी करुन देश पातळीवर हिंदुत्वाचा प्रचार चालविला आहे. अत्यंत कडवे हिंदूत्ववादी तयार करण्याची जबाबदारी या शंखनादने उचलली असुन सुब्रम्हणीयम सारख्या प्रचंड ताकदिच्या व्यक्त्याने हिंदुत्वाच्या पुनर्बांधणीसाठी अक्शरशा स्वत:ला झोकून दिले आहे. तोगडीया व सिंघलच्या संघटना तर आहेतच पण त्याच्या जोडीला  फेसबूक व ट्विटर वरुन  अनेक हिंदुत्ववादी मोहीमा उघडण्यात आल्या. या सगळ्याचा एकत्रीत परिणाम म्हणून मोदी निवडून आले असा या सगळ्या हिंदुत्ववाद्यांचा समज आहे. म्हणून त्याना असेही वाटू लागले  आहे की हा देश आता हिंदूत्वाकडे झुकू लागला असून मोदीची निवड ही त्याची पहिली पायरी आहे.  अन त्याचाच परिणाम म्हणून मोहन भागवत सारखे हिंदुत्ववादी नेत्याना हिंदूत्वाची खाज सुटली आहे. मग हे नेते जे आजवर बंद दरवाजातील मिटींगामधून खाजवून घेत असत आता खुल्लम खुल्ला सभांमधून हिंदूत्वाची खाज खाजवून घेताना दिसू लागली.
मोदीच्या विजयामुळे हिंदुत्वाची खाज सुटलेले हे नेते जो काही तर्क लावत आहेत तो अतिउत्साहाचा परिणाम आहे. मोदीच्या विजयात हिंदुत्ववाद्यांचा नक्कीच वाटा आहे पण याआधीही या सर्व हिंदुत्ववादी संघटना भाजपसाठी काम करायच्याच की? तेंव्हा तर असे यश कधीच आले नाही. मग अचानक असा कोणता बदल झाला ज्यामुळे भाजप रेकॉर्डब्रेक विजय मिळवून गेला? याचा जरा शांत डोक्याने विचार केल्यास विजयाचे गमक कळेल. भारतीय जनता कॉंग्रेसच्या भ्रष्ट व उदासीन राजकारणाला विटून गेली होती. घराणेशाहीमुळे संसदीय प्रणालीची रोज होणारी कत्तल व असंवेदनशील शासन यातून मतदारानी स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी मोदीला मत दिले हे आहे खरे कारण. म्हणजे भाजप वा मोदीची निवड हा हिंदुत्वाला दिलेला कल नसून कॉंग्रेसच्या विरोधातील रोषप्रकटीकरण होते. पण हिंदुत्ववाद्यानी मात्र उलटाच अर्थ लावला. त्यांचे तर्कशास्त्र असे सांगते की भाजपच्या अजेंड्यावर विकास तर होताच, पण राममंदीरही होते. म्हणजे  मोदीनी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊनच निवडणूक लढवली व जनतेने मत दिले... याचा अर्थ हे मतदान हिंदुत्वाच्या समर्थनार्थच आहे असा गोड निष्कर्ष हिदूत्ववाद्यानी काढला आहे.
मग हिंदुत्वाची साचलेली घाण काही पटीत वाढते व त्याचा परिणाम म्हणून हे हिदूत्ववादी नेते जागोजागी खाजवताना दिसतात. मोहन भागवतानीसुद्धा नेमका वरील गैरसमज करुन घेतल्यामुळे ते जातील  तिथे खाजवून घेताना दिसत आहेत. मग त्यांच्या विचाराना व तत्वज्ञानाला आदर्श मानणारे चिल्ले पिल्लेही या  घाणीत मनसोक्त लोळल्यामुळे सर्वत्र खाजवत हिंडताना दिसत आहेत. एकुण काय तर हिंदुत्ववादाची खाज सर्वत्र पसरविण्याचे काम संघ व संघाची पिल्लावळ मोठ्या जोमाने करत आहेत. ही खाज जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहचेल तेवढा संघाचा फायदा असा गैरसमज करुन घेतलेले नेते खुद्द रिंगणात उतरुन खाजेचा प्रचार करत आहेत. मोदी सत्तेत आल्या नंतरच अचानक ही जी खाज सुटली ती सुटलीच मुळात चुकीच्या गृहितकावर. हिंदुत्ववाद्यानी मांडलेले तर्कशास्त्रच मुळात चुकले असून तेच त्यांचा घात करुन जाणार आहे. मोदीला मिळालेले बहुमत म्हणजे हिंदूत्वाचे समर्थन ही खिचडी संघाच्या भटारखाण्यात रांधली गेली. मग संघाच्या भटारखाण्यातून ज्यांच्या मेंदूला खाद्य मिळते त्याना ही खिचडी खाऊन आनंदाच्या उकड्या फुटू लागल्या. त्यामुळे मग भागवता सारखे अर्धे हळकुंडाने रंगणारे हा देश हिंदूचाच म्हणायला मोकळे झालेत.

मोदीला मिळालेले जनमत हिंदुत्वाच्या समर्थनार्थ नसून ते एका निष्क्रीय शासनाच्या विरोधातील रोषप्रकटीकरण होते हे हिंदुत्ववाद्यानी ओळखावे. न ओळखता आपल्याच गुर्मीत हिंदुत्वाची खाज खाजवत बसलात तर मात्र सत्तेचा माज व हिंदुत्वाची खाज उतरविण्याचे काम जनता करेल. 

शुक्रवार, १ ऑगस्ट, २०१४

अजितदादा पवार : सर्व पक्षांचा कॉमन टार्गेट!

Image result for ajitdada pawarमहाराष्ट्राच्या राजकारणात स्थानिक पक्षांची एकूण अवस्था पाहता कोणत्याही पक्षाची एकलाचलोची ताकद नाही हे जाहीर आहे. आघाड्या-युत्या आता ईथल्या राजकारणाचा स्थायीभाव झाला असून त्याशिवाय रिंगणात उतरण्याची कोणाचीच छाती होत नाही हे अगदी कित्येक दशकापासून पाहतो आहे. पण याआधीच्या आघाड्या-युत्या मित्रपक्षा बद्दल बोलताना विधीनिषेढ व किमान काही मर्यादा पाडताना दिसत.  कुठल्यातरी समान अजेंड्यावर एकत्र येणारे हे पक्ष एकदुस-याना मित्रपक्ष असे संबोधत असत. मित्रपक्ष व त्यांचे सदस्य यांच्याशी व यांच्या बद्दल बोलताना किमान तोंड सांभाळून बोलण्याचे नैतिक बंधन पाळताना दिसत. पण आता मात्र हा सगळा प्रकार हद्दपार होताना दिसत आहे.  यावेळेस सगळा उलटा प्रकार अनुभवास येत आहे. दोन्ही कॉंग्रेस एकमेकांच्या विरुद्ध तुफान शेरेबाजी करत हिंडत असून सेना भाजपवाले परस्पर स्वत:चे मुख्यमंत्री घोषीत करुन मोकळे झालेत. तिकीटावरुन होणा-या खडाजंगीत आम्हाला एवढ्या जागा हव्या तर त्याना तेवढ्याच जागा देऊ असा दोन्हीकडून शेरा-प्रतिशारा चालू आहे. बाळासाहेब असेपर्यंत ज्या तक्रारीना नुसते कुरुबरीचे रुप होते त्या आता चक्क महामेळाव्यातील गर्जना बनताना पहायला मिळत असून याला दबाव तंत्र असे गोंडस नाव देण्यात आले. या नंतर तेवढ्याच जोरात कुंथणारा वाघाची कातडी पांघरलेला मेंढाही पाहायला मिळाला.  आजवर ज्याला वाघ समजून बक-या दूर धावत होत्या त्याना नुकतच या मेंढ्याच्या कातडीचे राज उलगडल्यामुळे यांच्यात चक्क मैत्रीही घडून आली.  आता निळे बकरे नकली वाघाच्या कळपातून मोठ्या ऐटीत हिंडताना दिसू लागले. मग जोडीला शेतकरी म्हणजे बैलही दाखल झाले. फक्त या बैलाला जेवणात उस लागतो एवढेच. आजवर स्वत:ला जातीवंत म्हणविणारे व नुकतच स्वत: आदीवासी असल्याचा साक्षात्कार झालेले असे एका मागून एक  वाघाच्या गटात सामिल झाले.  पण निवडणूकीच्या तोंडावर  जागांच्या संख्येवरुन रान पेटणार असे दिसते किंबहुना नाही पेटले तरी ते पेटविण्याचा आव मात्र आणला जात आहे.  ही झाली परस्परां बद्दलची कुरबूर. पण या सगळ्य़ांचे भाषण, दौरे व एकूण शेरेबाजीचे सुक्ष्म निरिक्षण केल्यास एक गोष्ट अधोरेखीत होते ती म्हणजे या सर्व लोकांचा एक कॉमन टार्गेट आहे तो म्हणजे अजितदादा पवार...
तमाम मराठी राजकारणी ज्याच्या मागे हात धुवुन लागले आहेत तो म्हणजे अजित पवार. दादाच्या मागे लागलेला सर्वात मोठा नेता(दुर्दैवाने ते आज नाहीत) म्हणजे मुंडे साहेब. नुकतीच पार पडलेली लोकसभा  निवडणूक संपूर्ण दादा विरोधी मोहीम होती.  गोपिनाथ मुंडे तर बीड मधून लढूया म्हणून दादाना मधेच उचकवून देत. आता मुंडे बीडलाच का बोलावत आहेत हे समजून नये एवढे दुधखुळे बारामतीकर थोडीच आहेत? पण मुंडेची खूमखुमी काही थांबेना... ऐकून ऐकून थकल्यावर दादाही एकदा हळूच किंचाळले... की बीड नको नि बारामती नको... लढायचंच तर तिस-याच ठिकाणाहून लढूया. दादा कितीही हळू किंचाळले तरी पत्रकाराना ऐकू जातच... ते गेलच. मग शेवटी नित्यनियमानी ही बातमी मुंडेनाही ऐकू गेली. आता बीडच्या बाहेर दादाशी कुस्ती म्हणजे केवढ्या जिवावरचं काम हे मुंडेना  चांगल माहीत होतं... मुंडेना असा घाम फुटला की त्यानी चक्क निसर्गोपचार आश्रमात जाऊन घाम पुसून घेतला. अन तेंव्हापासून मुंडे असे भेदरले की त्यानंतर पुन्हाकधी त्यानी तसला प्रस्ताव दादापुढे ठेवला नाही.
अगदी असाच दादाद्वेष करण्यात पटाईत आहेत ते म्हणजे उद्धव ठाकरे.  उद्धव ठाकरेंच्या भाषणांचा संपुर्ण रोख हा दादाविरोधात असतो. सेना सत्तेत आल्यास दादाचं काय करेल  याची उद्धवाकडे एक यादी आहे. त्या यादीप्रमाणे दादाना उपाशी ठेवणे, तंगड्या तोडणे, झोप उडविणे, पाणी न देणे असे नाना प्रकार करुन शेवटी बेड्या ठोकणे असा एकूण कार्यक्रम आखलेला आहे. दादासाठीची यादी धरुन हिंडणा-या उद्धवकडे राज्यासाठीची यादी मात्र दिसत नाही. त्यांच्याकडे महाराष्ट्रसाठी काय आराखडा आहे ते कधी भाषणांतून मांडताना दिसले नाही. थोडक्यात अजितदादाचा सूड घेण्यासाठी सत्ता द्या अशी यांची मागणी दिसते. मग दादावर अनेक आरोपा प्रतिआरोप झडतात व एवढेच नाही तर सेना निवडून आल्यास पवाराना कशा बेड्या ठोकणार याची हमीच दिली जाते. आणि समस्त सैनिक टाळ्या पिटतात.
पण एक साधी गोष्ट यांच्या लक्षात येत नाही की दादाना बेड्या ठोकायच्या म्हणजे त्याना कोर्टात दोषी ठरवावे लागेल. अन कोर्टात दोषी ठरविण्यासाठी सत्तेची गरजच काय? आरोप सिद्ध करणारे पुरावे द्या म्हणजे झाले. जर तुमच्याकडे ते पुरावे असतील तर आजही  दादाना बेड्या ठोकता येतील. नसतील तर तुम्ही आज जो दावा करता तो बिनबुडाचा नाही का? मग असे बिनबुडाचे आरोप करुन कोणाला शेंड्या लावताय? दादाना दंड देण्यासाठी सत्तेची अजिबात गरज नाहीये. पण हे लोकं जर बेड्यासाठी सत्ता मागत असतील तर त्यातून दोन अर्थ निघतात. एक तर सत्ता मिळाल्यावर सत्तेचा दुरुपयोग करत दादाना बेड्या ठोकणार की कसे? जर सत्तेचा दुरुपयोग करणार नसतील  व अरोप सिद्ध करणारे पुरावे असतील तर मग आजच का नाही कोर्टात ते सिद्ध करत? सेना आज कोर्टात ते सिद्द करत नाही ही गोष्ट पाहता यांच्याकडे पुरावा नाही हे जाहीर आहे.  माहितीच्या अधिकारात पुरावे गोळा करुन अरोप सिद्ध करण्याचा मार्ग खुला असताना ते सिद्ध होत नाही हेच सिद्ध होते. याचाच अर्थ सेनावाले जो काही दावा करत आहेत तो खोटा असून साप म्हणून भूई थोपटण्याचा हा यांचा जुना धंदा आहे. दादा अरोपी असेलही, पण या घडीला तरी उद्धवची लबाडी बाहेर पडते... सत्ता हातात घ्या व खोटे पुरावे तयार करुन बेड्या ठोका असा कार्यक्रम ठरला असावा ही शंका घ्यायला वाव आहे.
म्हणजे सेना भाजपाच्या हातात सत्ता गेल्यास दोन शक्यता आहेत. एकतर ही लोकं खोटे पुरावे उभे करणार किंवा आजच्या पोकळा बाता विसरुन जनतेला शेंड्या लावल्याचा आनंद साजरा करुन म-हाटी तिजोरीची लूट सुरु करणार. हा सगळा तर्क  व एकूण परिस्थीती पाहता अजितदादाच्या विरुद्ध यानी कितीही रान उठविले तरी यांच्याकडे सबळ पुरावा नाही हेच सिद्ध होते.  ही झाली एक बाजू...
आता दुसरी बाजू अशी की अजित पवारांचे विरोधक फक्त विरोधी पक्षातच नाही तर ज्यांच्याशी राष्ट्रवादीचे मागच्या दहा-पंधरा वर्षा पासून मैत्रीचे नाते आहे, जे सत्तेतील सोबती आहेत व महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांची साथ अत्यंत महत्वाची आहे ते कॉंग्रेसी सुद्धा मधूनच दादाच्या विरोधात शेरेबाजी करताना दिसतात. जागावाटपावरुन तर अनेक रुप पाहायला मिळत आहेत. अगदी एकलाचलो वगैरेचे नारे देताना सगळा रोख दादाविरोधी दिसला.  कॉंग्रेस हा पक्ष राष्ट्रवादीला सोडून काहीच करणार नाही हे जाहीर आहे तरी सुद्धा अधून मधून कॉंग्रेसचा राग उसळतो तेंव्हा तो अजितदादांवर जाऊन आपटतो.  म्हणजे कॉंग्रेसी हे सत्तेतले मित्र असले तरी त्यांच्या मनात अजितदादांबद्दल कायम एक खदखद असते याचे अनेक अनुभव आहेत.
पवार पुराणाची तीसरी बाजू तर अजुनच अवाक करणारी असून खुद्द राष्ट्रवादीमधील जेष्ठ नेत्यांचा दाबून ठेवलेला  दादाद्वेषे अधेमधे निसटत असतो. मग लगेच सारवासारव करुन प्रकरण दडपले जाते खरे पण स्वपक्षातही दादाचे विरोधक काही कमी नाहीत.
वरील एकूण परिस्थीतीचा नीट अभ्यास केल्यास दोन शक्यता दिसतात.
एकतर अजितदादा खरोखरच वाईट व्यक्ती असून जातील तिथे विरोधक निर्माण करतात. जर हे खरे असेल तर त्यांची राजकीय कारकिर्द फार काळ टिकणार नाही.
दुसरी शक्यता म्हणजे ते अत्यंत मुरलेले व धोरणात्मक राजकारणी असून सर्वाना पुरुन उरणारा मुरब्बीपणा त्यांच्या ठायी ठासून भरलेला आहे.
अजितदादा नव्वदीमध्ये राजकारणात आले. आज त्याला जवळपास २५ वर्षे होत आलीत. दिवसागणीक त्यांचं राजकीय वजन वाढत गेलेलं दिसते. अनेक अरोप प्रतिआरोपातून ते सुटत गेले व आज उपमुख्यमंत्रीपदा पर्यंत जाऊन बसले आहेत. ही संपुर्ण वाटचाल पाहता पहिली शक्यता टिकत नाही. अनेक अडचणीवर मात करत अजितदादानी आज जे काही गाठले  ते पाहता ते एक मुरलेले राजकारणी असून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं वजन इतकं जास्त आहे की विरोधक तर सोडाच पण मित्रपक्षातील नेत्यानाही न्यूनगंड येऊन दादाच्या विरोधात शेरेबाजी घडून जाते.  मागच्या महिनाभरातील सगळे पेपर चाळल्यास एक गोष्ट स्पष्ट दिसते की महाराष्ट्रातील सगळं राजकारण दादाच्या विरोधात उभं होत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जी काही व्युहात्मक आखणी चालू आहे त्यातील सगळा रोख दादाना परास्त करण्याच्या बाजूने लावला जात आहे. प्रचारसभा सुरु व्हायच्या असल्या तरी पेपरातून होणारे आरोप दादाना घेराव टाकण्याचे मनसूबे स्पष्ट करतात. युती, महायुती, डावे, उजवे, हिरवे, निळे व खुद्द मित्रपक्ष या सगळ्यांचा कॉमन टार्गेट कोण तर अजितदादा पवार...  

जागावाटपावरुन सध्या सर्वच आघाड्यात अंतर्गत धुसफूस सुरु आहे. कोणाचे कोणाशी वाजून काय फायनल चित्र असेल ते येत्या काही दिवसात कळेलच. पण जर का आहे तसेच चित्र राहिले तर मात्र अजितदादावर सर्व दिशानी प्रहार होणार व त्यात कदाचीत त्याना मातही खावी लागेल. सध्या जनमानसात असलेला शासनविरोधी रोष पाहता दादाचा धुव्वा उडाला तरी फारसे नवल वाटणार नाही.  पण सर्वांचा शत्रू फक्त अजितदादा ही गोष्ट दादांचं पोटेन्शिअल अधोरेखीत करते. राष्ट्रवादीचा पराभव झालाच तर ती घटना अजितदादासाठी सर्वात मोठी संधी असेल. आजवर त्यांच्या कर्तुत्वाला काकाच्या कर्तुत्वाचे आवरण झाकोळत राहिले. दारुण पराभव झाल्यास पुढच्या पाच वर्षात पुन्हा एकदा काका पुतण्याच्या प्रयत्नातून जे काही पक्षबांधणीचे काम होईल त्यात वयामुळे थोरल्या पवारांवर मर्यादा पडून अजित पवारांचे कर्तूत्व ठसठशीत उमटेल... त्यातुन जो अजित पवार उभा होईल तो निर्विवाद कर्तूत्ववान दादा असेल. या निवडणूकीत दादा हे सर्वांचे कॉमन टार्गेट असणे हेच सांगून जाते की पुढल्या काळात महाराष्ट्राचा सत्ताधीश कोण असेल!!!