रविवार, ५ ऑक्टोबर, २०१४

विधानसभा २०१४ - महत्व आंबेडकरी मतदाराचे

जागा वाटपाचे प्रचंड घोळ सुरु असताना स्थानिक पातळीवरील नेतेमंडळीनी आपापले फार्मं भरुन घेतलेत. युतीने अखेरच्या दिवसापर्यंत फार्मुले-फार्मुले नावाचा खेळ खेळत सर्व ईच्छूकाना वेंटीलेटरवर ठेवल्यामुळे शेवटच्या क्षणी ताप नको म्हणत घटक पक्षातल्या नेत्यानी आपापली उमेदवारी दाखल केली. वेळ आलीच तर शेवटी फॊर्म परत घेऊ पण उगीच रिस्क नको असा त्यामागचा हेतू होता. अगदी आघाडीनेही असाच घोळ शेवट पर्यंत चालू ठेवल्यामुळे दोन्ही कॉंग्रेसमध्येही प्रचंड गोंधळ चालू होता. अर्ज परत घेतल्यावर तरी हा घोळ संपेल असे वाटत होते पण आता तर अधीकच चक्रावून टाकणारी स्थीती निर्माण झाली आहे. स्थानिक पातळ्यांवरील युत्या आघाड्यांच्या ज्या चर्चा कानी पडत आहेत ते पाहता यावेळेस नक्की कोण कोणाच्या विरोधात लढतोय  याचा थांगपत्ता लागत नाही. आता निकाल हाती येण्याची वाट पाहण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नाही. अशा विचित्र निवडणूकीचा मतदार म्हणून स्वत:ची फजिती होताना पहावं लागत आहे.  तरी मतदानाच्या दिवशी तो अधिकार बजावायचा आहेच पण मनात उत्साह उरला नाही हे एक वास्तव आहे.
आजवरच्या जवळपास सर्वच निवडणूकीत आंबेडकरी मतदार हा सेना-भाजपच्या विरोधात मत टाकायचा. हिंदूत्वाच्या विरोधात पडणारं हे आंबेडकरी मत उचलण्याचं काम कॉंग्रेस-रा. कॉंग्रेस  नित्याने करत आले आहेत. त्यासाठी मग गटातटात विभागलेले रिपब्लीकन नेते पदाच्या आमिषानी बांधून ठेवण्याचीही मोठी परंपरा चालविली गेली.  कोणाला मत द्यावे यापेक्षा हिंदुत्ववादी शक्तीना मत देऊ नये हा प्रचार आंबेडकरी मतदाराना आकर्षीत करणारी हुकूमी युक्ती ठरत गेली. त्यामुळे आपला माणूस सत्तेत यावा ही महत्वकांक्षा हळू हळू विरून गेली व आंबेडकरी मतदान हे जातीयवाद्याना सत्तेपासून रोखण्यचा एक कलमी कार्यक्रम बनून गेला. जातीयवाद्याना सत्तेपासून रोखण्याच्या जल्लोषात आंबेडकरी नेतृत्व सत्तेपासून दूर फेकल्या जात आहे याकडे दुर्लक्ष होत गेले. महाराष्ट्राच्या राजकारणात रिपब्लीकन हे नाव एक मत्सर नि विनोद बनून गेला. आंबेडकरी समाजाच्या राजकीय –हासातून दोन्ही कॉंग्रेसची विजयाची समिकरणे मात्र पक्की होत गेली.
अशातच एक दिवस रामदास आठवले उठून थेट जातीयवाद्यांच्या गटात जाऊन बसले.  आजवर ज्याना शिव्या हासडत आठवलेनी राजकारणात बस्तान बसविले थेट त्याच्या मांडीला मांडी लावल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून टीकेची झोड उठविली गेली.  याच दरम्यान खडकवसल्यातील पोट निवडणूकीत आठवलेच्या मदतीने तापकीरानी राष्ट्रवादीचा पाडाव करत कमळ फुलवून दाखविले. हा भीम टोला दोन्हीकडच्या राजकरण्याना एक संकेत होता. समान राजकीय अजेंड्यावर निळा मतदार जातीयवाद्यांच्या बाजूने उभा राहू शकतो हा तो संदेश होता. यातून दोन्ही कॉंग्रेसला घाम फुटला तर हिंदूत्ववाद्याना व्यापक भुमीका घेत समावेशक राजकारणाची कास धरावी लागली. त्याचाच परिणाम म्हणून नंतर जाणकर, शेट्टी व मेटे अशा बहुजन नेत्याना एकत्र धरुन नवी मोट बांधण्यात आली.
सेना, भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादी या चारही प्रमूख पक्षाचे पारंपारीक मतदार प्रत्येक मतदार संघात आहेत. आंबेडकरी समाजाचा प्रमुख असा कोणताच पक्ष नसल्यामुळे स्थानीक प्रभावातून निळा मतदार जिकडे फिरेल तिकडे विजय असं एकंदरीत चित्र असेल. हे जाणून असलेल्या धूर्त नेत्यानी यंत्रणेला त्या पद्धतीने कामाला लावले सुद्धा. याचाच एक भाग म्हणजे शिवसेनेतील अर्जून. आमच्याकडेही आंबेडकरी चेहरा आहे या चढाओढीतून उद्धवनी आठवलेचा अर्जून पळविला व भर सभेत माझ्याकडे अर्जून आहे अशी घोषणा देत आंबेडकरी मतदाराच्या दारी जायची सोय करुन घेतली. कॉंग्रेस राष्ट्रवादीनेही गल्ली बोळातले नेते हुडकून काढून प्रचारापुर्ती निळा झेंडा सोबत राहील याची व्यवस्था केली. सर्व प्रमूख म्हणविल्या जाणा-या पक्षांची निळी शोधमोहीम पाहता आंबेडकरी मतदाराचे महत्व राजकारण्याना बरोब्बर कळले, अगदी तोच अर्थ आता आंबेडकरी मतदाराला कळावे म्हणजे झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा