सोमवार, ६ ऑक्टोबर, २०१४

विधानसभा २०१४ - महाराष्ट्र कोणाचा !

सेना भाजपनी आघाडीच्या विरोधात आघाडी उघडण्याच्या आतच युतीत बिघाडी झाल्यामुळे मागच्या पाच सहा महिन्यात आखलेली रणनिती अचानक बदलावी लागली. आजच्या घडीला भगव्या प्रचाराच्या तोफा दादा व आबावर धडाडताना दिसणार होते पण जागावटपाचा तिढा सुटू न शकल्याने तोफांची तोंड एकमेकांवर रोखण्याची नामुश्की समस्त भगव्या परिवारावर ओढावली. मग कोण गद्दार तर कोण खंडणीखोर ईथून सुरु झालेली चिखलफेक ही थेट शिवाजी महाराजांच्या वाड्यात जाऊन पोहचली. महाराजांच्या दारी दोन्ही गटातल्या भगव्यानी कोण मोठठा शिवभक्त नावाचाही एक खेळ खेळला. हे  सगळं करुनही मन न भरल्यामुळे शेवटी गाडी पंतप्रधानावर घसरली व मराठी-भगवे विरुद्ध गुज्जू-भगवे ईथ पर्यंत थयथयाट करुन झाले.  या सगळ्या प्रकारातून दोन गोष्टी नमूद झाल्या. एकतरी या भगव्यांकडे ना नितीमत्ता आहे ना एक ठोस राजकीय अजेंडा. कालवर जे एका ताटात बसून कडीभार ओरपत होते आज तेच युती तुटल्यावर एकमेकांचे रक्त ओरपायला निघालेत. अशा लोकांच्या हाती सत्ता देणे कितपत योग्य राहील हे सुजाण मतदाराने ओळखावे. यातला दुसरा मुद्दा असा की जर २५ वर्षातली मैत्री ही मैत्री नव्हती पण ओरपण्याचा अजेंडा होता तर याचा अर्थ असा निघतो की कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधातली ओरोळी सुद्धा तशीच अस्सल खोटी व बनावटी मोहीम होती. म्हणजे भगव्या राजकारण्याना एकूण सत्तेत यायचे आहे हे एकमेव सत्य आहे.
शिवसेनेच्या एकूण जाहीरातींचा रोख पाहता असे दिसते की महाराष्ट्र हा बाळ ठाकरेंची वयक्तीक संपत्ती असल्याचा सेनेनी गैरसमज करुन घेतला आहे. प्रत्येक भाषणातून ’बाळासाहेबांचा महाराष्ट्र’ असा उल्लेख होताना दिसत आहे. मला प्रश्न पडतो की ज्या बाळ ठाकरेनी हारण्याच्या भितीपोटी साधी नगरसेवकाची निवडणूक कधी लढविली नाही तो बाळ ठाकरे महाराष्ट्राचा कसा काय झाला? त्याचे निकष काय?  आता कोणी म्हणेल की मुंबई-ठाण्यातली महापालीकेची सत्त्ता ठाकरेंमुळेच होती. हे जर खरे असेल तर मग त्याच मुंबई-ठाण्यात जेंव्हा लोकसभा-विधानसभा होत तेंव्हा सेना का बरं सपाटून आपटत असे. कॉंग्रेसच्या अनेक सीटा मुंबईतून अनेक वर्षे अभेद्य राहिल्या याचा अर्थ काय घ्यावा? याचा अर्थ एवढाच आहे की मुंबई-ठाण्यातल्या महानगर पालीकेतील सत्ता ही नगरसेवकांच्या स्थानीक नेटवर्कचा कमाल असे. त्यात बाळ ठाकरेचा काहीच करिश्मा नसायचा. पण नगरसेवकाचा हा आवाका लोकसभेच्यावेळी कमी पडायचा व तिथे जनाधार असणा-या नेत्याची गरज भासायची. मग जनाधार नसलेला बाळ ठाकरे येऊन भाषण द्यायचा खरा पण सिटा मात्र कॉंग्रेस मारुन नेत असे. यातून बाळ ठाकरेना कळायचं की आपल्या भाषणाला टाळ्या पडतात मत नाही. अन पालिकेतील सत्तेचे खरे कर्ते स्थानीक पातळीवर राबणारे नगरसेवक असून जनमत उभं करण्यात आपण कमी पडतो हे ठाकरेनी पक्कं ओळखलं होतं. म्हणून बाळ ठाकरेनी उभ्या आयुष्यात निवडणूक लढविण्याची जोखीम उचलली नाही. यातून झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणत स्वत:ची एक भाषणबाज ईमेज कशीबशी राखता आली.
बरं १९९५ मध्ये सेना सत्तेत आली याचा हवाला देत काही हलदीराम हळकूंड घेऊन रंगोटीदार युक्तीवाद करतात की तो बाळासाहेबांचा करिश्मा होता.  बाळासाहेब हे लोकनेते होते वगैरे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. पण ते हे विसरतात की १९९५ मध्ये सुद्धा युतीला महाराष्ट्रानी बहूमत दिले नव्हते. युतीला एकूण १३८ जागा मिळाल्या होत्या. त्यात सेनेला ७३ तर भाजपला ६५ जागा मिळाल्या होत्या. १४४ च्या आकड्यापासून युती काही पावलं दूर होती. नंतर घोडेबाजार करत युती सत्तेत बसली होती. अन गंमत म्हणजे कॉंग्रेस पक्षाला या निवडणूकीत सर्वा जास्त ८० जागा मिळाल्या होत्या.  परसेंटेजमध्ये सुद्धा युती कॉंग्रेसपेक्षा मागेच होती. कॉंग्रेसला एकूण ३१ % मतदान मिळाले होते तर युतीला २९.१९ % (सेना १६.३९% तर भाजप १२.८०%) मत घेऊन सत्तेत बसली होती.  ही सगळी आकडेवारी हेच सांगते की महाराष्ट्राने बाळ ठाकरे व त्यांच्या सेनेला कायमच नाकारले आहे. यातली अजून एक बाब अशी की त्या वेळेस कोकणचे लोकनेते नारायण राणे युती सोबत होते.  सेनेचा मुंबई बाहेर प्रचार व प्रसार करण्यात भुजबळ व राणे यांचा सिंहाचा वाटा होता. त्यातून सेनेची बांधणी होत गेली व नाव मात्र बाळ ठाकरे यांचे होत गेले.  आज ती दोन्ही सिंह सेनेच्या विरोधात डरकाळ्या फोडत मैदानात उतरली आहेत. त्यामुळे सेनेला टिकाव ठरता येईल की नाही ते निकाला नंतरच कळेल.
याच्या अगदी उलट पवार साहेब, अजित दादा, आबा, भुजबळ, प्रफुल पटेल अशी अनेक नावं घेता येतील जी खरीखुरी जनाधार असलेली माणसं आहेत. ही लोकं अनेक वर्षांपासून थेट लोकांद्वारे निवडली जात आहेतच पण त्यानी उभे केलेले सदस्यही निवडले जात आहेत. गाव पातळीवर यांचे चाहते व मतदार दिसतात. अनेक वर्षापासून ज्यांच्या कामावर लोकांचा विश्वास आहे अशी अशी ही  नेते मंडळी असून मराठी मतदारानी कायम याना सत्तेत पाठविले आहे. पण यातून कोणीही उठून दावा करत नाही की महाराष्ट्र त्यांचा आहे.
पण ज्यानी कधी साधी नगरसेवकाची निवडणूल जिंकली नाही, कधी विधानसभेची भींत आतून पाहिली नाही. १९९५ मध्ये लोकानी बहूमतापासून दूर ठेवल्यावरही घोडे बाजार करत सत्ता बळकावली असे  जनाधार नसलेले पक्षप्रमूख... महाराष्ट्रानी कायम नाकारलेले बहुजन द्वेष्टे  बाळ ठाकरे... म्हणे महाराष्ट्र यांचा... कसं काय बुवा? महाराष्ट्र हा बाळासाहेबांचा आहे असं म्हणताना उद्धव ठाकरे व समस्त सेना नेत्याला लाजा वाटत नाही. वाटणारही नाही. कारण सेना ही राडेबाज व निर्लज्ज लोकांची संघटना आहे.
हा महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांचा असून येत्या १९ ला महाराष्ट्र कोणाचा ते सेनेला परत एकदा कळेलच.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा