शुक्रवार, ५ डिसेंबर, २०१४

सेनेची भूक : वाटचाल आत्मघाताकडे.सेना भाजपला मिळालेलं यश दोघानाही एक धुंद चढवून गेला. माकडाच्या हातात शॅंपेन म्हणतात तशी उद्धवची अवस्था बघायला मिळाली तर भाजप मात्र दोन चोरानी चोरीचा माल वाटणीवरुन एकमेकाचा गळा कापतात त्या कथेतील चोरांप्रमाणे सेनेचा सत्तेतून पत्ता कापण्याचा अथक  परिश्रम घेतला. पण चोर तो शेवटी चोर. बाकी कुठेच आपला थारा लागत नाही असे दिसल्यावर परत एकदा सेनेच्या चोराकडे धाव घेतली. अन युतीची गाठ परत एकदा बांधताना दोन्ही चोरानी ओरडून सांगितले की आम्ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र येत आहोत... आहे की नाही गंमत.
मुळात भाजप व सेनाला मिळालेली मतं त्यांच्या कुठल्याही कर्तुत्वाची पावती म्हणून मिळालेली नाहित हे दोघानिही ध्यानात ठेवायला हवे. आघाडी सरकारच्या उदासीन धोरणाचा धिक्कार म्हणून भाजप सेनेला मतदारानी कौल दिला. कोणाचातरी तिटकारा म्हणून तुमची निवडी  ही बाब आणि तुमचं कर्तूत्व म्हणून तुमची निवड या दोन गोष्टीतील फरक आधी सेना-भाजपनी समजून घ्यायला हवा. पण तसं होताना दिसले नाही. भाजपनी मोदी लाटेचा सहारा घेतला तर उद्धव ठाकरेनी भाजपला शिव्या हासडत सभा घेतल्या. भाजपनी ठरल्याप्रमाणे सेनेवर टीका करणे टाळले पण उद्धवला मात्र ते जमले नाही. शेवटी निकाल हाती आल्यावर सेनेला सत्तेत सहभाही करुन घेण्याचे ठरले तेंव्हा उद्धवनी मलाईदार खात्यांची मागणी करत स्वत:चा हलकटपना व सत्तेची हाव याला चक्क महाराष्ट्राचा अभिमान व स्वाभिमान असे नाव देऊन टाकले. अमूक खाती मिळाली तरच सत्तेत सहभागी होऊ या वाक्यातून महाराष्ट्राचा व मराठी माणसाचा स्वाभिमान नि मान कसा काय राखल्या जातो हे उद्धवनी एकदा उलगडून दाखवावे. उपमुख्यमंत्री पदासाठी बालहट्ट करणारे उद्धव आज देवेंद्रच्या मांडिला मांडी लावताना जेंव्हा असे म्हणतात की आम्ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र  आलो आहोत तेंव्हा एकतर त्यानी तमाम मराठी माणसाना बेअक्कल व दुधखुळे समजले किंवा आपण काय बोलतोय याचे त्यानाच भान नाही. एकदा त्याना भान नसेल तर चालेल पण मतदाराना दुधखुळे समजणे म्हणजे केवढा मोठा धोका असतो ते कॉंग्रेस-राष्ट्रवादीला जाऊन विचारा म्हणा...
भाजप सेनेला सोबत का घेत आहे हे सांगण्यासाठी कोण्या विद्वानाची गरज नाही. आवाजी मतदानाने मिळविलेला पाठींबा जनतेसमोर जाताना अपराधी भावना जागवते आहे याची जाण झाल्यावर भाजपनी हा निर्णय घेतला ही एक बाजू असून दुसरी बाजू अशी आहे की जर मध्यवधी निवडणूका झाल्याच तर मधल्या काळातील सत्तापिपासूपणाचा जो काही एपिसोड चालला त्याचा तिटकारा म्हणून मतदारराजा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूने मतदान करेल ही धास्ती आहे. याचाच अर्थ भाजपला मतदाराच्या मनाचा अंदाज आला आहे. मतदाराला भाजपचा राग येईल अशा प्रकारे आपण वागून गेलो हे भाजपला कळले आहे. या सगळ्यावर तत्काळ उपचार काय तर हे असले बालिश वागणे तात्काळ थांबविणे. मग त्यासाठी भाजपला सेनेची गरज पडली. भाजपचा थिंकटॅंक खूप पुढचा व अनेक अंगानी विचार करतो हे ईथे सिद्ध होते.
सेनेचा प्रोब्लेम वेगळाच आहे. त्यांच्याकडे थिंकटॅंक वगैरे प्रकारच नाही. धोरनात्मक आखणी सेनेच्या गावीच नाही. सेना ही रस्त्यावरील राडेबाजांची संघटना असून आजही त्यांचात तोच एकमेव गुण आहे अन वरुन हा उद्धव... मुळात उद्धव हा काही कर्तुत्ववानही नाही व हुशार, अभ्यासू व एक दांडगा संगठक किंवा नेताही नाही.  वारसा म्हणून मिळालेल्या पक्षाचं नेमकं बळ किती याची अजिबात जाणीव नसलेला हा माणूस सुरुवातीला १५१ च्या आकड्यावर अडून बसला. सेनेला आहे त्यापेक्षा मोठी समजण्याच्या या चुकीमुळे युती तुटली. उद्धवच्या आकलन शक्तीचा व ईतर सगळ्या कुवतीच्या मर्यादा तेंव्हाच उघड पडल्या. पण आघाडीचा रोष म्हणून ६३ जागा निवडून आल्यावर उद्धवनी याला स्वत:चे कर्तूत्व समजण्याचा गैरसमज करुन घेतला. त्यातूनच मग सत्ता सहभागात सेनेला दूर रहावे लागले. हा सगळा तमाशा तमाम मराठी माणसानी पाहिला. उद्धवनी सत्तेत सहभागी होण्यासाठी महत्वाच्या खात्यांची मागणी लावून धरली. ही मागणी लोकांचा विकास करण्यासाठी की तिजोरी लुटण्यासाठी होत आहे हे जनतेच्या नजरेतून सुटले नाही. जेवढी मागणी ताणून धरली तेवढी उद्धवची लुटारु वृत्ति अधोरेखीत होत गेली. तसं भाजपही लुटारूच आहे, पण ईथे सेनेची वृत्ती ठसठशीत उमटण्यामागे एक तर्कशास्त्र आहे.
देणारा व मागणारा यांच्यात जेंव्हा जुंपली जाते व मागणारा हट्ट करु लागतो तेंव्हा देणा-यापेक्षा मागण-याचा हट्ट ठसठशीत उमटतो. भाजप देणारा होता तर सेना मागणारी, त्यामुळे सेनेचा दुर्गूण ठळकपणे उमटला. कुठे उमटला? मतदारांच्या मेंदूत उमटला. उभ्या महाराष्ट्राला सेनेचा सत्तासहभाग हा फक्त लूटीसाठी असून याना लोकांच्या विकासाशी काही देणेघेणे नाही हे कळून चुकले. १२ मंत्रीपदे मिळवून बार्गेनिंगमध्ये जिंकल्याची भावना उद्धव नि सेनेत जरुर असेल, पण हीच बार्गेनींग मतदाराच्या पातळीवर सेनेचा पराभव करुन गेली आहे, त्याचा प्रतिध्वनी उमटायला पुढची निवड्णूक यावी लागेल एवढेच. एक दिड महिन्यात सेनेनी  मलाईदार खात्यांसाठी केलेला हट्ट व शेवटी सत्तेतील सहभाग यातून सेना विश्वासार्हता गमावून बसली आहे. उद्या जर सेनेच्या एखाद्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेच तर कोणत्याही पुराव्या शिवाय जनतेचा चटकन विश्वास बसणार. मग न्यायालयात काहिही सिद्ध होवो पण जनता मात्र सेनेला भ्रष्ट मानेल. याचा थेट फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मिळणार आहे. पुढच्या निवडणूकित विरोधकाच्या माध्यामातून सेनेला बेअब्रू करण्याचे काम आजची बार्गेनिंग बजावणार आहे.   
नाही म्हटले तरी सेनेनी भाजपसोबतची सौदेबाजी जिंकली, पण मतदारांचा विश्वास गमावून बसली. हा निकाल जेंव्हा मतपेटीतुन येइल तोवर सेनेसाठी वेळ गेलेली असेल. याला मी कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सबलिकरणात सेनेने दिलेले पहिले योगदान मानतो.