मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

तलाक ! काळाच्या २०० वर्षे पुढील विचार (तरतूद).सध्या भारतात तीन तलाक वरून बरीच चर्चा चालू आहे व त्या त्या क्षेत्रातील तज्ञ आपलं मत मांडताना विविध वाहिन्यांवरून दिसत आहेत. बरं यात सर्वात मजेदार गोष्ट अशी दिसते की जवळपास सगळेच ३ तलाकला अमानवी नि स्त्रीवर अन्याय करणारी एक अघोरी प्रथा/व्यवस्था असल्याचा ठपका ठेवून मोकळे होताहेत. परंतू तीन तलाचा खोलात जाऊन विचार केल्या व त्यावर थोडे चिंतन केल्यास असे दिसते की ही तर जगातील सर्वात आधुनिक व अत्यंत प्रगत तरतू असून १५००वर्षाआधी इतका आधुनिक विचार मांडल्या बद्दल पैगंबराचे आपण सर्वानी आभार मानायला हवे. आज आपल्याला हा तीन तला अन्यायकारक वाटणे हे निव्वड आपला मागासलेपणा असून माणू म्हणून विकसीत होताना आपण आजूनही रानटी अवस्थेत असल्याचं  लक्षण आहे. आजच्या आपल्या अवस्थेचं अवलोकन केल्यास तीन तलाक पध्दत ही येणा-या दिड-दोनशे वर्षानंतरच्या आधुनिक समाजासाठी मांडलेली व्यवस्था असल्याचे सिद्धा होते. म्हणजे आपण इतक्या आधुनिक विचाराला स्विकारण्यास आजतरी अपुरे पडत असून दोष तीन तला पद्धतीत नसून आपल्या अविकसीत अवस्थेत आहे, एवढेच म्हणेन.
सातव्या शतकात पैगंबरानी मांडलेला हा विचार जो पुढे जाऊन मुस्लिम कायद्यात रुपांतर झाला व आज सर्वदूर मुसलमानांद्वारे घटस्फोटासाठी वापरला जातो आहे ही अत्यंत क्रांतीकारी तरतूद आहे पण आपणाला मात्र हा घोळ वाटतो. या घोळ वाटण्या मागचे नेमके कारण काय याचा शोध घेऊ या.
निकाह सिव्हिल कॉंट्रक्ट आहे.
मुस्लिम कायद्यात विवाहाला ’सिव्हील कॉंट्रक्ट’ (करार) मानल्या जातं. म्हणजे दोन पक्ष ए विशिष्ट हेतूसाठी एकत्र येतात व ’निकाह’ नावाचा करार करतात ज्याचा उद्देश १) सेक्सची गरज पुरविणे २) संतती निर्माण करणे ३) व संसार सांभाळणे  असा आहे. मुस्लिम कायद्याची विशेषता अशी आहे की यात इमोशनल घोळ दिसत नाही तर उद्देशांची सुस्पष्टता नेमक्या शब्दात मांडलेली दिसते. निकाह म्हणजे पवित्र बंधन, मोक्षप्राप्तीचा विधी वगैरे घोळ मुस्लीम कायद्यात दिसत नाही. त्यामुळे निकाहची गरज, उद्देश, परिणाम वगैरे अगदी सुस्पष्ट आहेत. म्हणजेच याचा दुसरा अर्थ असा निघतो की वरील उद्देशातील एखादी गोष्ट निकाहातून दिली जात नसल्यास तो निकाह तसा कराराचे उल्लंघन करत असून मोडण्याच्या अवस्थेला जाऊन पोहचला असा होतो. मग जी गोष्ट बिनकामाची आहे त्याला  जिवंत ठेवून आयुष्य कुजवत जगण्यापेक्षा ती विनाविलंब संपुष्टात आणून पुढे चांगलं जिवन जगणे हे अधिक तर्कसुसंगत आहे नि पैगंबरानी त्यामुळेच या अवस्थेला पोहचलेलं नातं रेटत नेण्यापेक्षा वा फरफटत जाण्यापेक्षा लवकरात लवकर तोडून टाकण्याचा व दोघानी परत मुक्त जिवन जगण्याचा जो पर्याय दिला तो अत्यंत आधुनिक असाच पर्याय आहे.

तलाकाचे  प्रकार सांगितले आहेत ते येणेप्रमाने
१)     अतिपवित्र:
या तलाकात एकदा तलाक म्हटल्यावर तीन महिने वाट पाहणे. या दरम्यान बाईच्या  तीन पाळ्या येऊन गेल्या व दरम्याना शारिरीक संबंध ना घडल्यास हा तलाख ग्राह्य धरला जातो.
२)     पवित्र:
या तलाकात एक-एक महिन्याच्या अंतरानी तीन वेळा तलाख म्हणायचे असते. दरम्यान बायकोच्या तीन पाळ्या येऊन जायला हव्यात. तसेच या काळात शारिरीक संबंध घडायला नको. तो घडल्यास तलाक पुर्ण न होऊ देता पुरुषानी मोडला असे मानल्या जाते.
३)     अपवित्र तलाख:
या तलाकात स्त्रीला कोणताही वेळ न देता एकाच झटक्यात तीन वेळा तलाक…तलाक….तलाक म्हणायचे असते व निकाह संपुष्टात येतो.
तर ही झाली तलाक बद्दलची माहिती. 
थोडक्यात निकाहला कुठलाही इमोशनल डायमेन्शन न देता मोडता येतो ते अपवित्र तलाकपद्धतीत म्हणजेच तीन तलाक पद्धतीत. पण तीचा वापर किती होतो हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे. वरील दोन तलाक मात्र तीन महिन्याचा काळ घेत असल्यामुळे विवाह  ताडकन तुटणार नाही याची पुरेशी खबरदारी घेतली  गेली आहे.  यातिल वैशिष्ट्य म्हणजे खरच नकोसं झालेलं नातं खूप रेटून नेत आयुष्य कुजणार नाही याचाही ताळमेळ ठेवण्यात आला आहे. म्हणून मुस्लिम तलाक वा घटस्फोट पद्धती ही जगातील सर्वात सुंदर तरतूद ठरते व आज ना उद्या जगातल्या सर्व धर्माना अशा फास्ट-ट्रॅक पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे.  त्याला पुढचे ५०० वर्ष लागतील की १००० वर्ष लागतील हे सांगणे कठीण आहे. पण एवढं नक्की की तुटलेल्या नात्याचं ओझं फार दिवस वाहायला आधुनिक पिढी तशी तयार नसणार व तलाक सारखा तीन महिन्यात सोक्षमोक्ष लावणारा विचार नव्या पिढीला जास्त तर्कसुसंगत वाटणार हे निर्विवाद सत्य आहे. म्हणून या विचाराचा जनक पैगंबर किमान या बाबतीत तरी सगळ्यांचा  पितामाह ठरतो. आज न्यायपालिकाही फास्ट-टक पद्धतीचा आग्रह धरत असून सिव्हिल मॅटरमध्ये कोर्टाचा रोल कमी करत फ़ॅमिली कोर्टची स्थापना केली. ट्रिब्युनल्सची निर्मीतीही याच गरजेतून झाली आहे. एवढच नाही तर आता तर गावो गावी जाऊन सामुहिकरित्या निवाडे देणे चालू झाले आहे. हे सगळं पाहता सिव्हील प्रकरणात कोर्टाचं रोल कमी करणे ऑलरेडी चालू झाले आहे. मग पैगंबारानी यापेक्षा वेगळं काय सांगितलं आहे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. सिव्हिल मॅटर कोर्टाच्या बाहेर तडकाडकी मार्गी लावण्यासाठी जी आज आपण धडपड करत आहोत त्याची तरतूद पैगंबरानी दिहजार वर्षाधीच लावून दिली आहे. मग खरा धुनिक कोण?

हिंदू मानसिकता व घटस्फोट
तीन तलाकची बदनामीचे दुसरे कारण म्हणजे हिंदू मानसिकता व त्यांची वेळखाऊ घटस्फोट पद्धती. खरंतर हिंदू धर्मशास्त्रात घटस्फोटाची तरतूदच नाही. म्हणजे बाईनी एकदा लग्न केलं की सासरहून तीची अर्थीच उठेल… बाकी जग इकडचं  तिकडे होऊन जाऊद्या, बाईला मुक्ती नाही. पण इंग्रजी राजवटींनि आम्हाला ’रिफॉर्म’ नावाचा शब्द शिकविला व त्यातूनच १९५६ साली हिंदू विवाह कायदा अस्तित्वात आला. या कायद्यात घटस्फोटाची तरतूद घातल्यामुळे हिंदू स्त्रीला विवाहातून मुक्त होण्याचा मार्ग सापडला. १९५६ पर्यंत हिंदू स्त्रीला घटस्फोट काय असतो हे पृथ्वीच्या जन्मापासून कधीच माहित नव्हते. ते १९५६ साली पहिल्यांदा कळले. पण हा मार्ग दोन गोष्टींनी खडतर करून ठेवला. एक म्हणजे विवाह हे पवित्र बंधन असून बायको ही अर्धांगिनी असते व तिच्याविना मोक्ष नाही या हिंदू मान्यतेने. अन दुसरं म्हणजे आपली वेळखाऊ न्यायव्यवस्था. पहिल्या गोष्टितील पवित्र बंधनानी बायकांवर मानसिक गुलामगिरी बळकट करत नवरोबाचा देवोबा असं भलतच खुळ डोक्यात भरलं तर दुस-या बाबिनी नको बा ती कोर्टाची पायरी म्हणत त्या विलंब वेदनेपेक्षा या देवोबाची वेदना बरी असा विचार करायला भाग पाडले. आता पुरुषांची गोची होण्याचं कारण म्हणजे सो कॉल्ड पवित्र बंधन तोडल्याचा ठपका घेऊन समाजात जगणे तेवढं सोपं नाही ही पहिली अडचण, अन दुसरं म्हणजे कोर्टात गेलं तरी घटस्फोट किती वर्षानी मिळणार याचा काहिच अंदाज नाही. मग कोण करणार उद्योग? त्यापेक्षा राहू द्या हिच. मधेच गचकलो बिचकलो तर किमान मोक्षतरी मिळेल. म्हणजे दोन्ही गोष्टीतून हे सिद्ध होते की हिंदू घटस्फोटेच्छूकाना तो घेण्यासाठी फेअर चॉन्स देण्यात आलेला नाही. त्या मानाने मुस्लिमाना तो घेण्यासाठी दिलेला चॉन्स हा तीन मासिक पाळ्यांचा म्हणजेच तीन महिन्याचा असून तो फेअर आहे व जस्टिफायसुद्धा होतो.
याचाच अर्थ असा आहे की आमच्या धार्मिक समजुती व प्रथांचा घोळ त्या अर्थाना बराच मागासला नि अविचारी असल्यामुळे मुस्लिमांची तीन तलाक पद्धत आपल्याला अन्यायकारक वाटते.
पण विवाहाचा उद्देश व त्याची उपयोगिता लक्षात घेतल्यास त्यातील पवित्र बंधन व मोक्ष या दोन गोष्टी तद्दन फसवे नि मानवी समाजाची दिशाभूल करणारे असल्याचे सिद्द होते. त्या आधारे नाते रेटत नेणे हा सुद्धा मग अघोरीपणाच ठरतो. त्या बाबतीत मुस्लिम आपल्यापेक्षा कैक पटिने आधुनिक ठरतात. ते कसे आधुनिक ठरतात हा प्रश्न सोडवायचा असल्यास आधी आपल्याला वरील दोन समजुती ’पवित्रबंधन’ व ’मोक्ष’ हे डिफेक्ट्स रिमुव्ह करावे लागतील.

भावनात्मक गुंतवणुकीचं काय? असा प्रश्न पडू शकतो. त्यावर खूप मोठी चर्चा होऊ शकते पण थोडक्यात बोलायचं झाल्यास असं म्हणेन की तलाकची वेळ आली म्हणजे नात्याला एका बाजूनी तडा गेलेलं आहे. हे वास्तवं दुस-या पक्शानी मान्य करणे गरजेचं आहे. एकदा ते मान्य केलं की भावनांचं काय करायचं याचा मार्ग सापडू लागतं. मग दिलेला तीन महिन्याचा काळ तसा पुरेसा नसला तरी अगदीच कमी आहे असे नाही. कारण नात्याचं -हास नक्कीच यापेक्षा धीच सुरु झालेलं असेल. खूप वेळ घेण्यात अर्थ नाही कारण वर्षोन वर्षे केस चालून जेंव्हा घटस्फोटाचा कागद हातात येतो तेंव्हा वयानी कूस बदललेली असते. नव्या विवाहाच्या शक्यता शंकेच्या ट्प्प्यात आलेल्या असतात. मग नाकं मुरडत तडजोड करावी लागते. हे सगळं ज्या व्यवस्थेतून घडतं ती व्यवस्था नक्कीच समर्थनीय होऊ शकत नाही. पण मुस्लिम कायद्यातील तीन तलाकातून हे सगळं सहज टळतं व तुटलेल्या नात्याचं ओझं वेळीच उतरुन जातं. पुनर्विवाह नाही केला तरी उरलेलं आयुष्य स्वत:च्या अटीवर जगण्याचा दिवस दुस-या पाऊलावर तुमची वाट बघत असतो. तो कसा असतो ?(चांगला/ वाईट) हा प्रश्न गैरलागू आहे. अजून एक बाब म्हणजे पोटगीवर जगणा-या बायका बदलत्या समाज व्यवस्थेमेळे कमी होताना दिसत आहेत. (त्याचा टक्का किती याचं दळण दळण्यात अर्थ नाही) हा बदल अधिक व्यापत जाईल याचा विचार होणे गरजेचे आहे.  म्हणजे आधुनिक काळात स्त्रीचं होत चाललेलं सक्षमिकरण, तिची आर्थीक धास्तिही पिटाळून लावत आहे. येणा-या २०० वर्षात हा बदल इतका टोकदार होत जाईल की जगातील सर्व घटस्फोट कायद्यातून ’पोटगी’ नावाचा शब्द हद्दपार होईल आणि तेंव्हा आपल्याला हे कळेल की पैगंबरानी दिलेली व्यवस्था किती आधुनिक होती.  

खुला:
बरं ट्रिपल तलाकवर तोंडसुख घेणारे खुला बद्दल चकार शब्द बोलायला तयार नाहित. काय आहे खुला? तर मुस्लिम स्त्रीला ्वेच्छेनी घटस्फोट घेण्याची मुस्लिम कायद्यातील तरतूद आहे. आता ही बाब वेगळी की खुला वापरण्यात मुस्लीम बायका पुढे सरसावताना दिसत नाही. पण त्या कायद्यात नुसतं पुरुषाना नाही तर स्त्रीयांनाही हवं तेंव्हा तलाक घेण्याचा अधिकार आहे. एवढच नाही तर नव-याच्या गैरहजेरीत काजीच्या साक्षीने हा तलाक देता येतो. आता बोला. नव-याची संमती असावी असा आजवर समज होता पण नुकत्याच घडलेल्या एका केसमध्ये त्याची गरज नसल्याचे सिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे घटस्फोटाचा कायदा आता जगातील सर्वात धुनिक कायदा बनला  असे म्हणायला हरकत नाही. ज्याना लेटेस्ट केस लॉ वाचायची असेल त्यानी दि. ११ सप्टेबर २०१६ रोजीचा टाईम्स ऑफ इंडिया, पृ.११(नागपूर) वाचावा. मुंबईतील वकील निलोफर अख्तरनी खुला कसा मुस्लीम कायद्याला धरून आहे हे सिद्ध करून दाखविले आहे.

थोडक्यात काय तर तीन वेळा तलाक हा नव-याला दिलेला अधिकार असून खुला हा बायकोला दिलेला कायदेशिर अधिकार आहे. काळाची गरज पाहता हे दोन्ही तरतुदी अत्यंत प्रगत असून मुस्लीमच नाही तर इतर समाजातील सर्वांसाठी लागू करावेत असे आहेत. आज नाही तरी अजून १५०-२०० वर्षानी येणारी पिढी याची मागणी करेल एवढे नक्की.