शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

मराठा मोर्चाची प्रेरणा: सामाजिक उत्थान की, राजकीय बस्तान!मराठा समाजाच्या लाखोच्या मोर्च्याने सध्या महाराष्ट्र हादरला असून प्रतिक्रिया नोंदविताना विचारवंतांचा प्रचंड गोंधळ उडाल्याचे दिसत आहे. या मराठा मोर्च्याला राजकीय किनार नसल्यामुळे बहुतेकांचे म्हणणे असे पडले आहे की ५% विकसीत मराठा सोडला की बाकी वर्षानुवर्षे शोषित राहिलेल्या तळागळातल्या मराठा समाजाचा हा एल्गार आहे.  दर दोन तीन दिवसानी निघणारे लाखोचे मोर्चे हे उत्स्फुर्त आहेत व ही एका नव्या क्रांतीची  चाहूल आहे वगैरे लोकाना वाटत आहे. पण मला तसे अजिबात वाटत नाही. ना हा तळागळातल्यांचा मोर्चा आहे ना उत्स्फूर्त आहे. दलिताना मिळणा-या विशेष  सोयी (आरक्षण, अट्रोसीटी कायद्याचे कवच इ.) व ओबीसीना मंडल आयोगाद्वारे खुल्या झालेल्या नव्या संध्या यातून मराठा समाजातील ग्रामीण राजकारणाला एका अर्थाने नव्वदीपासून आव्हान उभे झाले व या समाजातील ग्रामीन नेत्यांमध्ये तेंव्हापासूनच अस्वस्थता सुरु झाली. पण त्यातून उद्रेक व्हावा एवढ्या प्रमाणात संत्तांतर झाला नसल्यामुळे ती  खदखद सुप्त अवस्थेत होती. पण मागल्या काही वर्षात ग्रामीण मराठ्याच्या हातची सत्ता पुरती निसटताना दिसत आहे. त्यात ओबीसींचा वाटा वाढू लागला आहे. त्याच बरोबर इतर समाज जो कायम मराठ्याच्या दावणीला बांधला होता तो सुद्धा मराठ्याच्या विरोधात उभा ठाकू लागला आहे. या बदलाचे अग्रणी सैनिक दलित व ओबिसी असून ग्रामिन पातळीवर मराठा समाज जमेल तसे ठोकशाही पद्धतीने या सैनिकांना मार्गी लावत असतो. पण अट्रोसीटी नावाच्या कायद्याने यात मराठ्यांची गोची करुन सोडली असून दंडेलशाहीला अटकाव घालण्याचे काम बजावले. थोडक्यात दलित व ओबीसी हा मराठ्याच्या हातून सत्ता हिसकावू नेताना मराठा हतबल होऊन पाहण्या पलिकडे फारसं काही करु शकत नाही हे नवीन डेव्हलपमेंट आहे. व त्यातून मराठा समाज अस्वस्थ होत गेला. अशाच अस्वस्थतेच्या संचयातून उसळला तो लाखोंचा मराठा मोर्चा. त्याला निमित्त ठरली बलात्काराची एक दुर्दैवी घटना.
प्रेरणा काय आहे?:
लाखोंच्या मोर्च्याची प्रेरणा काय आहे हे या घडीला नक्की कळत नसले तरी मागासलेपणाच्या विरोधात आलेला हुंकार नक्कीच नाही एवढे मात्र ठामपणे सांगता येईल. मोदी लाटेत भुईसपाट झालेलं मराठा राजकारण यामागची प्रेरणा असावी असा माझा अंदाज आहे. परत उठून राजकीय मैदानात उभं राहताना भक्कम तयारी म्हणून सर्व पातळीवर मराठ्यांची मोर्चेबांधणी करण्यासाठी  आखलेला एक डाव आहे. त्याची फळे चाखणारे चेहरे समाजात नव्या चळवळीचा मुखवटा घेऊन फिरत आहेत एवढेच. लाखोच्या मोर्च्या मागील प्रेरणा ग्रामीण पातळीवर मराठ्याना हवी असलेली अमर्याद सत्ता ही असून त्यासाठी सगळी धडपड सुरु आहे. थोडक्यात सत्तेची लालसा हीच या चळवळीची प्रेरणा आहे.
फाशीची शिक्षा मागणे चुकच आहे. त्यासाठी न्यायपालिका आहे:
अत्यंत परिपक्वता दाखवत दाखल होणारा मराठा  मोर्चा जेंव्हा आपल्या मागण्यांच्या यादित हे म्हणतो की आरोपीला फाशीचीच शिक्षा द्या, तेंव्हा नवल वाटतं. कायद्यात काय तरतूद आहे त्याला काही अर्थ असतो की नाही. की मराठ्याना वाटतं म्हणून फाशी द्यावं? न्यायपालिका काम करत आहे ना, ते करू द्यावं.  बरं हेच मराठे खैरलांजी घडते तेंव्हा मग फाशीची शिक्षा का मागत नाही? तेंव्हा का नाही उतरले मराठे रस्त्यावर? याचाच अर्थ मराठ्याना ’बलात्कार’ हा गुन्हा फाशीस पात्र वाटला नव्हता. तो मराठा मुलीवर झाला की मग फाशी दयावी इतका टोकाचा गुन्हा ठरतो. हा आहे दुटप्पीपणा. या मागणीच्या मानसीकतेचं अवलोकन केल्यास मराठा मोर्चा म्हणजे एका पिढितीच्या निमित्ताने उसळलेली मराठा अरेरावी असून सामाजिक आत्मभान वगैरे बाबिशी काही सोयरसुतक नाही हेच खरे. मोर्च्यात दाखविलेली शिस्त व परिपक्वता मागण्यांमधुनही दिसायला हवी होती, पण ती दिसत नाही. धोरनात्मक व दूरदर्शी कार्यक्रम आणि त्यासाठीच्या मागण्या असं कोरिलेशन दिसत नाही. दुसरं म्हणजे आरोपीला फाशी व अट्रोसिटीत बदल यातून मराठ्यांचा विकास कसा होणार ते मला कळत नाही. अन त्यासाठी निघत आहेत लाखोचे मोर्चे… थोडक्यात मागण्यांचं व मराठा उत्थानाचं को-रिलेशन बसत नाहीये. म्हणजे नक्की कुठेतरी घोळ आहे. मोर्चात शिस्तबद्द वागणारा मराठा वेगळा आहे व मागण्याची आखणी करणारा मराठा वेगळा आहे. वरील सगळा प्रकार ताकाला जाऊन भांडं लपविण्यासारखा वाटतो.
अट्रोसिटीचा गैरवापर थांबविणे  म्हणजे नक्की काय?
मराठा  मोर्चाची एक प्रमुख मागणी म्हणजे अट्रोसिटी कायद्याचा गैरवापर थांबला पाहिजे. म्हणजे नेमकं काय? ही मागणीच लबाड व खोडसाड आहे. कारण आरोप खोटे असतील तर ते कोर्टात सिद्ध होणार नाही. म्हणजे घाबरायचं कारणच नाही. बरं हा गैरवापर थांबावा म्हणून मराठ्यानी लाखोचा मोर्चा काढावं एवढ्या प्रमाणात याचा वापर गावात होत आहे असे एकानेही सिद्ध केले नाही. निव्वड मोघम प्रचार केला जात असुन या कायद्या बद्धल गैरसमजूत पसरविण्याचे काम सुरु आहे. बरं मान्य जरी केलं की गैरवापर होत आहे तर मग प्रश्न पडतो की मराठ्यांच्याच विरोधात गैरवापर का होत आहे? इतर समाजही गावात राहतो त्यांच्या विरोधात का होत नाही?
की मराठ्यांच्या मते अट्रोसिटीचा वापर करणारा सोडला की दुसरा फक्त मराठाच राहतो ग्रामीण भागात? म्हणजे  इतर समाज राहातच नाही की काय?  बरं आपल्या देशात अनेक कायदे आहेत व त्यातील अनेक कलमांचा विविध प्रकारे गैरवपर होत असतो. मग इतर कायद्यातील कलमांच्या गैरवापरा बद्दल मराठा चकार शब्द बोलायला तयार का नाही? RTI नावाच्या कायद्याचा अनेक पातळ्यांवर सर्रास गैरवापर होताना दिसतो. ग्रामिण पातळीवर विरोधकांना शह देण्यासाठी आरटीया एका शस्त्राप्रमाणे वापरला जात आहे. त्यातून अनेकांची कारकिर्द संपविण्यात आल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यावर का मराठ्यांचा रोष नाही. एवढेच नाही तर अगदी आय.पी.सी. मधील चोरी, दरोडा, धमकी पासून तर किडनॅपिंग पर्यंतचे कलम गैर व सैर पद्धतिने वापरताना दिसतात मग त्या विरोधात मराठ्यांचा रोष का बरं नाही. त्यातल्या त्यात तरुण पोरगी प्रियकरासोबत पळून गेली की लगेच किडनॅपिंगचं कलम लावल्या जातं. मग याच्या गैरवापरा बद्दल मराठा लाखोचा मोर्चा कधी काढणार आहे ते सांगावं. नसेल काढणार तर  त्यांचा नुसतं अट्रोसिटीवर विशेष रोष का आहे ते स्पष्ट करावं. जो कायदा स्वत:साठी सोयीचा आहे तो याना गोड वाटतो. पण जो कायदा यांच्या सत्तेवर व अहंकारावर टाच आणतो त्याच्या विरोधात लगेच कांगावा करायचा… हे दुटप्पी धोरण झाले. अट्रोसिटीनी मराठ्यांचं कोणतं घोडं मारलं ज्यामुळे हे सगळे एवढ्या मोठ्या प्रमाणात हात धुवून त्या कायद्याच्या मागे लागलेत? मला विचाराल तर एवढच म्हणेन… यांचं सत्तेचं घोंड मारलं, बास!
मराठा आरक्षण:
मराठा मोर्च्याची अजून एक मागणी म्हणजे ’मराठा आरक्षण’. ही सुद्धा एक पोरकट मागणी आहे. त्यांच्या कोअर कमिटीत जे बसले त्यांनी किमान विधीतज्ञांचं मार्गदर्शन घ्यायला हवं होतं. मराठा समाजाला  आरक्षण मिळण्याच्या कोणत्या तरतूदी व शक्यता संविधानात आहेत हे तपासायला हवं होतं. किंबहूना त्याना हे ठावूकही आहे की अशी कोणतीच तरतूद नाही व शक्यताही नाही. हे सगळं माहित असताना केवळ झुंडशाही व संख्येचा दरारा दाखवून आरक्षण मिळविण्यासाठी पुकारलेला एल्गार म्हणजे एका अर्थाने शिस्तीत चालणा-या मोर्चाची बेशिस्त मनोवृत्ती आहे. कारण आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नसून ज्या समाजाला प्रतिनिधित्व नाकारल्या गेलं त्याला प्रतिनीधित्व देण्याचा कार्यक्रम आहे. दलित व ओबीसी समाजाच्या सगळ्या संध्या हिरावून मराठ्या व इतर उच्चवर्णीच्याना हजारो वर्षे आयत्या वाढून देण्यात आल्या होत्या. त्यातून एक मोठं सामाजिक असंतूलन निर्माण होत गेलं. दलित व ओबीसी मुख्य प्रवाहातून बाहेर फेकल्या गेला होता. त्याला मुख्य प्रवाहात आणन्यासाठी प्रतिनिधित्व देण्याचा जो कार्यक्रम राबविण्यात येतो तो म्हणजे आरक्षण. म्हणजेच आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नसून तो प्रतिनिधित्व नाकारलं गेलेल्या समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा कार्मक्रम आहे.  मराठ्यांचं समाज म्हणून सर्वत्र प्रतिनिधीत्व असताना त्याना परत विशेष तरतूदीतून वाढीव प्रतिनिधीत्व देणे मुळात तर्कविसंगत तर आहेच पण संविधानात न बसणारं आहे. त्यामुळे ही मागणीसुद्धा पोरकटपणाच ठरते. हे वाढीव प्रतिनिधीत्व संख्याबळाचा दरारा दाखवून मिळविण्याचा मानस असेल तर मग त्यावर न बोललेलं बरं.
मराठ्यांच्या मागासपणाचे  दोषी कोण:
मराठा समाजाला हजारो वर्षापासून या मातीत सर्व संध्या होत्या. शेकडो वर्षा पासून हा समाज इथला राज्यकर्ता आहे. अगदी ब्रिटीशांना पिटाळल्यावरही मराठा मात्र गादीला चिकटून राहिला. शेतीवाडीतील मराठ्यांची मक्तेदारी प्राचीन काळापर्यंत मागे जाते. आधुनिक काळातही व्यापार, शिक्षण व राजकारण सारख्या क्षेत्राचा ताबा मराठ्यानीच घेतला आहे.  तरी काही प्रमाणात तो विकासापासून दूर राहिला असेल तर याचा अर्थ संधीचा उपयोग करण्यात तो वयक्तिक पातळीवर नापास आहे, त्याला दलित व ओबीसी सारखी सामाजिक भेदभावाची किनार अजिबात नाही. त्यामुळे मराठ्याच्या मागासपणास इतर कोणीच जबाबदार ठरत नाही. दलितांची व ओबीसींची परिस्थीती मात्र अगदी उलट आहे. अनेक शतकं त्यांची संधीच हिरावून घेतली गेली व ती ज्याला दिली त्यात मराठा होता हे विशेष. त्यातून सामाजिक असंतूलन निर्माण होत गेलं. आता हे असंतूलन मिटविणे गरजेचं असून त्यामुळे दलित-ओबीसीला विशेष संधी मिळावी हे जस्टीफाय होतं. मराठ्याला मात्र ही संधी देता येणार नाही. त्याना देता का, मग आम्हालाही द्या असं म्हणताना त्यांची व आमची सामाजीक स्थिती यातील फरक समजावून घ्यावा लागतो. मराठा मोर्चाचे लोक ती समजावून घेण्याच्या मूडात(मूड मध्ये) नाहीत असे दिसते.
मराठा समाजाचे निघणारे लाखोचे मोर्चे ही सत्ता गमावलेल्या समाजाची अस्वस्थता सांगणारे मोर्चे असून त्याला सामाजिक मागणीचा मुखवट चढविलेला आहे. तो आज ना उद्या गडून पडेल. कारण त्यांच्या मागण्यांची बारकाईने चिकित्सा केल्यास सामाजिक उत्थानाच्या पायाभरणीसाठीचा मटेरिअल त्याच्यात मिसींग असल्याचे दिसते. त्यामुळे या मोर्च्यांची प्रेरणा सामाजीक उत्थान की राजकीय बस्तान असा प्रश्न पडतो. बाकी काय ते येणारा काळच सांगेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा