शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

मराठा मोर्चा: रोग गरिबी व उपचार मागासपणावरचे.मराठा आरक्षणाची मागणी व त्यासाठी निघणारे लाखोचे मोर्चे महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी चळवळीना धडकी भरवून सोडणारी घटना असून धास्तावलेल्या पुरोगामी नेत्यानी व कार्यकर्त्यानी या विरोधात चकार शब्द बोलण्याची हिंमत दाखविलेली नाही. वंचितांसाठीच्या सोयी स्वत:साठी मागणे ते ही न मिळाल्यास हिसकावून घेण्याचा दरारा निर्माण करुन मागणे एका अर्थाने सामाजिक आजार असून या आजाराचे अर्लीस्टेज निदान करुन वेळीच योग्य उपचार न केल्यास यातून समाजाला एक मोठा पॅरेलायसीसचा झटका येणे अटळ आहे. स्वातंत्र्या नंतर या देशाची घडी बसविताना अनेक आव्हानं उभी होती, त्यापैक एक आव्हान म्हणजे ढासळलेले सामाजीक संतूलन. अन ते निर्माण झालं होतं जातीयवादातून. मग तो दूर करण्यासाठी राबविलेला एक कार्यक्रम म्हणजे आरक्षण. हे आरक्षण म्हणजे आजच्या मराठयानी जसा गैरसमज करुन घेतला तसा गरीबी हटाव कार्यक्रम नव्हता तर तो होता प्रतिनिधीत्व नाकारलेल्या समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा कार्यक्रम.  मोठ्या कष्टाने भारतीय समाजातील असंतूलन मिटवत ५०-६० वर्षात प्रवाहाबाहेरील समाजाला आताकुठे उभं राहायला शिकवलं जात आहे तर दुर्दैव असे की खाऊन पिऊन धष्टपुष्ट असलेल्या सामाजानी वेगळ्या पद्धतीने मोर्चेबांधणी करीत या समाजाला परत अधू करण्याचा चंग बाधला आहे.  ज्या आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक संतूलन साधने सुरु होते चक्क ते आरक्षण पळविण्यासाठी तो समाज उभा झाला ज्यानी स्वत: स्वातंत्र्यापुर्वी हजारो वर्षे उच्चवर्णाच्या नावाखाली विविध आरक्षणांचा उपभोग घेतला आहे.

मराठ्यांची आरक्षणाची मागणी चुकच:
मराठा समाज आपल्या मातीत कायम सत्तधीश म्हणून जगला आहे. त्या समाजानी सत्ताधीशाचे सर्वे फायदे कित्येक शतके उपभोगले आहेत. शेतीवाडी व ग्रामीण राजकारणात मराठ्यांचाच दबदबा राहीला आहे. सहकार व शैक्षणीक संस्थामधून मराठ्यांचा सर्वत्र वर्चस्व आजही दिसतोच. एकूण काय तर मराठा समाज एक घटक म्हणून महाराष्ट्राच्या मातीत इतरांच्या तुलनेच सर्व आघाड्यावर उजवा आहे.  ५% अतिबलाढय मराठ्यांकडे बोट दाखवून ’बघा आम्ही किती कमकुवत आहोत’ असं जेंव्हा ग्रामीण मराठा म्हणतो तेंव्हा ते प्राईमा-फेसी (प्रथम दर्शनी ) खरं वाटतं. पण मुळात हा तर्कच फसवा आहे ते लोकांच्या लक्षात येत नाही.  इथे विकासाची तुलना बलाढ्य मराठ्याशी करतात व सवलती मात्र वंचितांच्या मागतात हा आहे सगळ्यात मोठा माईंडगेम. जर सवलत वंचितांची हवी असेल तर मग या ग्रामीण मराठ्याची तुलनाही वंचितांशी व्हावी. म्हणजे ते फेअर कंपॅरिजन ठरेल. ते करुन पाहिल्यास गमतिशीर निकाल मिळतो. अतिबालाढ्य मराठ्यांशी केलेल्या तुलनेत जो मराठा गरीब जाणवतो तोच मराठा वंचित समाजाशी तुलना करता वंचितांपेक्षा उजवा (बलाढ्य) आढळतो. हे म्हणजे असे झाले की एक सामान्य शरीरयष्टीच्या माणसाने आखाड्यातील पैलवानाकडे बोट दाखवून ’बघ मी त्या पैलवानापुढे कसा किरकोळ आहे’ असे म्हणने व कुपोषितांच्या कोट्यातून हळूच शिरायला पाहणे असे झाले. म्हणजे मी किरकोळ आहे हे वदवून घेण्यापुरता पैलवानाकडे बोट दाखविणे व एकदा किरकोळपणाचा दाखला मिळाला की तो घेऊन कुपोषीतांच्या योजनांची मागणी करायचे, अगदी हा गेम मराठा खेळत आहे.  किंवा पैलावानाच्या विरोधात मी कमकुवत ठरतो, म्हणून मला अपंगांच्या कोट्यातून कुस्ती लढू द्या काहीसा असा युक्तीवाद मराठ्यांकडून होत आहे. कारण ५% बलाढ्य मराठा हा पैलवाना सारखा असून त्यापुढे इतर ९५% मराठा डावा ठरत असला तरी दलित-ओबीसीं सारखा तो कुपोषीत व लंगडा नाही. दलित व ओबीसीला हजारो वर्षे त्याचं हक्काचं खाद्य (शिक्षण, राजकारण नि व्यापार इ.) नाकारुन कुपोषीत अवस्थेला नेऊन पोहचविलं गेलं.  जो ९५% मराठा मागास व गरीब असल्याचा आव आणतो, तो ज्या खेड्या पाड्यात राहतो तिथला दलित-ओबीस यांच्याशी तुलना केल्यास हाच मराठा दलित-ओबीसींच्या तुलनेत उजवा असल्याचे सिद्ध होते. थोडक्यत ५% बलाढ्य मराठ्यांच्या तुलनेत ९५% मराठा मागास जाणवला तरी दलित-ओबीसी यांच्याशी तुलना केल्यास हा ९५% मराठा मागास ठरत नाही. त्यामुळे दलित-ओबीसींच्या सोयी जसे की आरक्षण घेण्यास हा समाज नैतिक पातळीवर वा संविधानिक पातळीवर पात्र ठरत नाही.
तरी आज मराठा समाज गरीबिचे निमित्य पुढे करुन जेव्हा आरक्षण मागतो तेंव्हा ती गरज नसून अधिकच्या योजना लाटण्याचा लोभ ठरतो व सामाजिक घडी बसविण्यासाठी अस्तित्वात आलेल्या आरक्षणाचा गैरवापर मराठे करु पाहात आहेत. वंचित व कमकुवत घटकाच्या उपचारासाठी आणलेली औषधी मराठ्या सारख्या धष्टपुष्ठ घटकाने पळविण्याची ही वृत्ती म्हणजे एका अर्थाने सामाजिक आजार होय. या आजाराचे अर्लिस्टेजमध्ये योग्य निदान व अनुषंगाने उपचार न केल्यास यातून आजवर केलेले कष्ट पाण्यात जातील. मराठे, दलित-ओबीसीं सारख्या कमकुवत घटकांना अधिक कमकुवत करत नेतील. राजकारणातील दलित-ओबीसींचा टक्का घटत जाईल, शिक्षण व नोकरितल्या जागा मराठा काबीज करत नेईल. यातून जे समाजिक असमतोल निर्माण होईल तो मिटविण्यासाठी पुन्हा एका फुलेंची, शाहूंची व बाबासाहेबाची वाट पहावी लागेल.  आणि ते करणे अजिबात तर्काला धरुन नाही.
म्हणून समाजातील विचारवंतानी आपला विवेक शाबुत ठेवत मराठा समाजाचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. मराठ्यांची गरिबी व दलित-ओबीसींचे मागासपण या दोन गोष्टी एकच नाहीत हे समाजाला सांगावे लागेल. मागासपणा हा वेगळा आजार आहे व गरिबी हा वेगळा आजार आहे. त्यामुळे त्यावरील उपचारही वेगवेगळे असावेत. मराठ्यांच्या गरीबिवरील उचपार आरक्षण होऊ शकत नाही. मराठ्याची गरीबी त्याला संधी नाकारल्यामुळे आली का याचा तपास करावा. आज पर्यंतचा इतिहास पाहता त्याला कोणतिही संधी नाकराल्याची नोंद नाही. त्यामुळे त्यावर उपचार ’आरक्षण’ असू शकत नाही. मग काय असावे? याचे उत्तर सर्वाना माहित आहे. ते देण्याचे धारिष्ट्य दाखविने गरजेच आहे, एवढेच. पण दलित-ओबीसीना चालू असलेला औषधाचा लेप मराठ्यांना लावून भागणार नाही एवढे मात्र नक्की.
आजारावरील उपचार चुकल्यास होणारे नुकसाना हे कधिही भरुन न निघणारे असते. या देशात असे नुकसान आधी अनेकदा झाले आहे. ते परत होऊ नये असे वाटत असल्यास मराठ्यांच्या आजाराचे योग्य निदान करावे अन अर्लिस्टेजमध्येच त्यावर योग्य उपचार करावा. अन्यथा त्यातुन होणारी हानी भरपाईच्या पलिकडील असेल.
मागासपणा व गिरीबी यातील फरक:
मराठ्याना आरण हवे आहे कारण ते गरिबी आहेत. यातील गंमत अशी की आरक्षण गरिबीसाठी नाही तर मागास समाजासाठी आहे.  काय फरक आहे गरिबी व मागासपणात? गरिबी म्हणजे आर्थीक परिस्थीती हलाखीची असणे. म्हणजे उत्पन्न इतके कमी असणे की त्यातून कुटुंबाच्या किमान गरजा(अन्न, वस्त्र, निवारा) भागविणे शक्य नसते.  तसेच शिक्षणपाण्यासाठी लागणारा खर्च करण्याची कुवत नसणे. एखाद्या कुटुंबाची परिस्थीती वरीलप्रमाणे असणे म्हणजे ते कुटुंब गरिब आहे असे म्हटले जाते वा गरीब ठरते. तर हे झाले गरिबीचे निकष. यातील विशेष बाब अशी की गरिबीत जगणा-या कुटुंबाचे सामाजिक स्थान अत्यंत सन्मानाचे वा कधीकधी ते सर्वोच्चही असू शकते. थोडक्यात आपल्या देशात सामाजिक स्थान माणसाच्या आर्थीक परिस्थीतितून ठरत नसते, एका अर्थाने हे चांगलेही आहे. त्यामुळे माणसाच्या गरिबीचा व सामाजीक स्थानाचं तसं को-रिलेशन नाही.
मागास म्हणजे गरिबीतले सगळे घटक आणि समाजात सन्मानाचे स्थान नसणे. थोडक्यात गरिबी + दुय्यम सामाजिक स्थान = मागास. यात अजून एक महत्वाची बाब अशी की एखाद्या मागास कुटूंबानी अथक परिश्रमातून गरिबी पिटाळून लावली तरी दुय्यम स्थान या घटकाचा प्रभाव इतका असतो की त्याला समाजात बरोबरीचे स्थान कधीच मिळत नाही. थोडक्यात गरिबीवर मात व विद्याप्राप्ती केल्यावरही समाजात सन्मानासाठी डिसक्वालिफाय(अपात्र) असणे म्हणजे मागास. मराठा समाज कुठल्याही पातळीवर सन्मानास डिस्क्वालिफाय नाही. त्यामुळे तो मागास नाही. गरीब जरुर असू शकतो.  अन गरिब व मागास यात असा मुलभूत फरक असून एकात डिग्निटिचा समावेश आहे तर दुस-यात डिग्निटीचा अब्सेन्स आहे. आता गरिबी व मागास या दोन गोष्टी एकच नसतील तर त्यासाठी गरिबीच्या उपचारासाठी मागासपणावरचे औषध कसे काय चालणार? एवढं जरी लक्षात आलं तरी मराठ्याची मागणी कशी चुकीची आहे ते कळणे अवघड नाही. थोडक्यात रोग गरिबी अन उपचार मागताय मागासपणावरचे… तुमचा रोग काय त्याचे अचूक निदान व त्या अनुषंगाने अर्लिस्टेज उपचार होणे गरजेचे आहे. ते करताना इतराना काय मिळते त्यावर डोळा ठेवून मागण्यांची यादी करण्यापेक्षा आत्मचिंतानाची जास्त गरज आहे.  जमलं तर करा, नहीतर चालू द्या!

५ टिप्पण्या:

  1. साडे तीन टक्के वाला मुख्यमंत्री झाला, महाराष्ट्रावर आपलीच मक्तेदारी आहे, समजणाऱ्या काही मराठा नेत्यांना हे पचत नाही आहे. मराठा शिक्षण सम्राटांनी जरी आपल्या शिक्षण संस्थेत मराठा समाजाला सवलती दिल्या असत्या तर मराठा समाज कितीतरी पुढे निघून गेला असता. पण हे नेता फक्त पैशे कमविण्यात मग्न होते. बाकी ज्या भागात विकास होतो, संपूर्ण समाजाला त्याच्या फायदा मिळतो. हरियाना आणि प. उत्तर प्रदेशात मागासवर्गीय पण संपन्न आहेत. ज्या रीतीने जाटांनी हरियाणात उपद्रव केला होता, तसा इथेही हे नेता असा प्रकार करू शकण्याची शक्यता आहे.

    प्रत्युत्तर द्याहटवा
  2. रामटेकेजी आपण चुकीची मांडणी करत आहात.मराठा मोर्चा कोठेही दुसऱ्या जाती धर्माचे आरक्षण मागत नाहीमराठा मोर्चाची सरकारप्राप्त निवदने वाचा आधी. आरक्षण हि फक्त दलित ओबीसी साठी सोय नाहीआणि नैतिक व संवैधानिक पातळीवर आरक्षण घेण्यास मराठा पात्र आहे कि नाही हे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर निर्मित संविधान व तत्सम व्यवस्था ठरविल.. मराठा समाजाने मोर्चे काढून व आरक्षण मागून(दुसऱ्याचे नाही) कोणताही समाज अधु होणार नाही. आपली मराठा विरूध्द दलित ओबीसी मांडणी पूर्ण राजकीय आहे.. मराठा समाज वेगवेगळ्या वर्गात विभागाला आहे हे वास्तव आहे. पैलवानाच्या उदाहरणादाखल आपणही हे मान्य करता मराठा सत्तधिश होता म्हणजे सर्व समाज सत्ता भोगतो असे बिल्कुल हि नाही.तसेच दलित ओबीसींसाठी आरक्षण आहे म्हणून सर्व दलित ओबीसींना आरक्षण उपयोगात आले आहे काय. आजही दलित ओबीसी तसेच इतर मागासलेल्या(सामाजिक) जातीच्या अनेक बहुसंख्य लोकांना आरक्षण मिळेल इतका आर्थिक शैक्षणिक स्तर उंचवला नाही. Example पुण्यात engg. करणाऱा आरक्षण घेनारा दलित ओबीसी ग्रामीण भागातील असेल व गरीबी असेल तर संधी मिळूनही अवाजवी इतर खर्च त्याला झेपु शकत नाही. हे वास्तव आहे. म्हणजे याचा अर्थ आरक्षण मिलु नये घेवु नये असा नाही तर सामाजिक आर्थिक शैक्षणिक सबलीकरण बरोबरीनेच गरजेचे आहे. व मराठा समजात शेतकरी किंवा शेतमजुरांची मुले मुलि यानही आर्थिक अथवा सामाजिक कारणाने संधी मिळत नाही हेही वास्तव आहे. मूठभर सहकार व शैक्षणिक सम्राट पाहुन संपूर्ण मराठा समाज अतिप्रगत आहे असे चुकीचे अन अवास्तविक समज पसरवु नये.. ... टीप........ आपण आंबेडकरवादी आहात व आंबेडकरांना आधुनिक बुद्ध समजता. परिणामी आपण कोणत्याही जाती धर्मापलीकडे जाऊन सखोल तार्किक विश्लेषण करावे हीच अपेक्षा...... आणि आंबेडकर आधुनिक बुद्ध असे समजन्याचे काही कारण नाही. कारन ते आधुनीक बुद्ध आहेतच.. व भारतीय संविधान रुपाने ते आजही आपले मार्गदर्शक आहेत.. एक खराखुरा फुले शाहू आंबेडकरी कार्यकर्ता........

    प्रत्युत्तर द्याहटवा
  3. मराठी में होने की वजह से हम हिंदी भाषी लोग तह ब्लाग नहीं पढ़ पाते ।

    प्रत्युत्तर द्याहटवा