मंगळवार, ३१ जानेवारी, २०१७

भ्याड रोहीत वेमुला आंबेडकरी कसा?


Image result for rohith vemulaरोहीत वेमुलाच्या आत्महत्येला एक वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने अनेक पुरोगामी संघटनानी मेणबत्त्या जाळून श्रद्धांजली की आदरांजली वाहिली, अन तमाम मेनस्ट्रीम मिडीयानी आपल्या पुरोगामित्वाच्या जबाबदारीचा भाग म्हणून ही बातमी न चुकता छापली. या सगळया कार्यक्रमांचे आयोजक न चुकता बाबासाहेबांचा वारसा तर सांगतातच पण सोबतच रोहीत वेमुलाची नाड आंबेडकरी विचाराशी व चळवळीशी जोडताना दिसतात मुळात हीच मोठी लबाडी आहे. रोहीत मेला ही गोष्ट वाईटच. एक संवेदनशील माणूस म्हणून (मला सोडून) कोणी जर टाहो फोडत असेल तर ते सोशली करेक्टच आहे. पण झालेल्या त्रासामुळे आत्महत्या करणारा, आत्महत्येमुळे आंबेडकरी कसा काय बनतो हे मला नाही कळत. किंबहूना त्रास झाल्यास आत्महत्या करणे ही बाबच मुळात आंबेडकरी तत्वज्ञाशी विसंगती सांगणारी आहे. तमाम सामाजिक, आर्थीक व जातीयवादी त्रास झेलत पुढे जाण्याचा व तो लढा जिंकण्याचा मूलमंत्र जपणे म्हणजे आंबेडकरवाद. अन हे सगळं झेलत पुढे गेल्यावर त्रास देणा-याना क्षमा करणे हा सुद्धा आंबेडकरवादाचाच भाग आहे. विद्यापिठात जरासा त्रास काय झाला अन स्कॉलरशीपचे पैसे काय न मिळाले तर म्हणून काय चक्क आत्महत्या? नाही बसत हे आंबेडकरी तत्वज्ञानात. अन कहर म्हणजे या भ्याड कृतीचं आंबेडकरवादी म्हणून ब्रॅंडींग चालू आहे, ते तर अजिबातच न पटणारं आहे. रोहीतच्या वाटेवर चालायचं म्हटल्यास ८०% आंबेडकरी विद्यार्थी हा मार्ग स्विकारावा इतकी विदारक परिस्थीती आहे माझ्या समाजाची. पण ते सगळे मोठ्या धैर्याने लढत आहेत. जमेल तसा झगडा चालू आहे. हे अभिप्रेत आहे आंबेडकरवादी म्हणून. करायचच असेल तर अशा झगडणा-या पोरांच्या झगड्याची सालगिराह करा. त्यासाठी कुठे शोधमोहीम चालवायची गरज नाही. कोणत्याही नजिकच्या कॉलेजात जाऊन आंबेडकरी पोरांचा गृप गाठा, अन त्यांची परिस्थीती विचारा. रोहीतची केस चिंदी वाटावी एवढया विदारक परिस्थितीत शिकणारे ढिगानी भेटतील. तरी यातला एकही आत्महत्तेच्या बाता करणार नाही याचीही खात्री देतो. कारण आंबेडकरी समाज मुळात असला भ्याड व माघार घेणारा नाहीच. तो लढणारा आहे. वेमुलानी नेमकं हेच करणं टाळलं. म्हणून तो आमच्या(आंबेडकरी) तत्वज्ञान बसत नाही. म्हणून त्याची ब्रॅंडिंगही नको. रोहीतची आत्महत्या दोन प्रकारे घेता येईल. एक म्हणजे न्यायीक लढ्यासाठी त्याला आत्महत्या म्हणावे. कारण तो लढा सोडता येणार नाही. कायद्याच्या भाषेत अब्यूज ऑफ पॉवर, कोएर्शन वगैरे प्रकारातून घडलेली ही आत्महत्या संबंधीताना शिक्षा व्हावी असा गुन्हा आहेच.  दुसरं म्हणजे आंबेडकरी समाजाने या आत्महत्तेला  आपल्या समाजातील एक अपघात समजून विसरुन जावं. उगीच आत्महत्येचं व छळाचं ब्रॅंडींग करत बसण्याला काही अर्थ नाही. अशाने उलट आपल्या लढणा-या पोरांमध्ये आत्महत्येचं आकर्षण निर्माण होण्याचीच शक्यत अधीक दिसते.
असल्या हाग-या पाद-या त्रासाला आत्महत्या करायची असती तर पहिली आत्महत्या बाबासाहेबांनीच केली असती. अन त्या नंतर त्यांचे वंशज म्हणून माझे पुर्वज अन हा लेख लिहणार मी सुद्धा याच मार्गाने जायला हवं होतं. पण आपल्या बापानी(बाबासाहेबानी) हे असले भ्याड संस्कार नाही केलेत आपल्यावर. आपण तर लढणारी जात आहोत. आपल्या बापानी तर, हे असले लटांबरं असणारच अन त्याचा दटके मुकाबला करायचा हे शिकवलं आहे.
बाबासाहेबांच्या आयुष्यातील एक किस्सा इथे जरुर सांगावासा वाटतो. बडोदे नरेशांच्या स्कॉलरशीपवर बाबासाहेब १९१३ मध्ये अमेरीकेत शिक्षणासाठी गेले होते. तेथील शिक्षण पूर्ण करुन जुलै १९१६ मध्ये अमेरीका सोडली व कायद्याचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटनमध्ये दाखल झाले. लंडनमधील अर्थशास्त्र व कायद्याच्या अभ्यासासाठी बडोदे नरेशांकडून परवानगीसुद्धा मिळविली होती.  मग लंडनमधील ’ग्रेज इन’ संस्थेत आक्टोबर १९१६ ला कायद्याच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला व त्याच बरोबर ’लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स एन्ड पॉलिटिकल सायन्स’ मध्ये अर्थशास्त्रासाठी प्रवेश घेतला.  या दरम्यान इकडे बडोद्याद प्रशासकीय पातळीवर मोठा बदल घडतो. जुने दिवाण जावून नवे दिवाण म्हणून सर मनुभाई मेहता नावाचा माणूस या पदावर रुजू होतो. त्यानी बाबासाहेबांना पत्र पाठवून तत्काळ बडोद्याला यायचे फर्मान तर सोडलेच पण बडोदे सरकारकडून जी स्कॉलरशीप वगैरे मिळत होती ती सर्व रोखली. अगदी वेमुलाटाईप केस घडली होती.  सगळं टाकून बाबासाहेबांना भारतात परत यावं लागलं होतं. ४ वर्षाच्या आत परत येऊन राहीलेला अभ्यास पुर्ण करण्याच्या अटीवर बाबासाहेबाना लंडन मधून सुट्टी मिळाली होती. २१ ऑगस्ट १९१७ रोजी बाबासाहेब मुंबईला परत आले. बडोदे सरकारची नोकरी जॉईन केली पण तिथला जातीयवाद सहन न झाल्यामुळे ती नोकरी कंटीन्यू करणे त्याना जमले नाही. या दरम्यान मुंबईतील ’सिडनहॅम कॉलेजात’ प्राध्यापकाची एक जागा रिकामी झाली. बाबासाहेबांनी मोठी खटपट करुन इथे नोकरी मिळविली. या कमाईतून पैसे साठवून १९२० मध्ये ते परत लंडनला जातात व अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करतात. हा आहे वेमुलाशी डिट्टो मेळ खाणारा बाबासाहेबांचा किस्सा. पुढे थोड्याफार फरकाने ही स्टोरी जवळपास प्रत्येकच आंबेडकरी विद्यार्थ्याशी कधी न कधी (अंशता का असेना) घडत असते हा माझा अनुभव आहे. पण आमची पोरं अशा संघर्षात अधीक बलवान बनुन बाहेर पडात असतात. बाबासाहेबांचं वरील आदर्श पुढे ठेवून अर्धवट शिक्षण स्वकष्टाने पुर्ण करताना अनेकांना मी पाहतो आहे.  आली अडचण की  लटक फासावर हे असले उद्योग आंबेडकरी समाजात नाहीत.
अन वेमुलानी बाबासाहेबांच्या शिकवणीतील हा बेसीक प्रिन्सीपलच आत्मसात न केल्याचं दिसतय. मग तो आंबेडकरवादी कसा? हं फार फार तर त्याला दलीत म्हणता येईल. कारण दलित असणे म्हणजे भीम-रस प्यायलेला असतोच असे नाही. त्यामुळे रोहितला भीम-रस न प्यालेला दलीत म्हणायला काही हरकत नाही. पण त्याला आंबेडकरवादी म्हणने हा वीर आणि लढवैय्या आंबेडकरवादी पोरांचा अपमान आहे. घरात पैसे नसल्यामुळे किराणा व कपड्याच्या दुकानात काम करुन शिकणा-या त्या आंबेडकरी पोरांचा अपमान आहे जे कधीच आत्महत्तेचा विचार करत नाही. आटो चालवून शिकणा-या त्या आंबेडकरी विद्यार्थ्यांचा अपमान आहे जे अनेकवेळा नापास होऊनही परत परत शिकत आहेत. गावच्या पाटलाच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करुन शिकणा-या त्या प्रत्येक आंबेडकरी पोरांचा हा अपमान आहे. एकूण काय तर आत्महत्या करणे हे आंबेडकरी तत्वज्ञानात न बसणारे असल्यामुळे वेमुलाच्या आत्महत्तेला आंबेडकरी किनार देऊन रंगविणे थांबले पाहिजे. कारण आंबेडकरी विद्यार्थी स्कॉलरशीप न मिळाल्यामुळे किंवा विद्यापिठात बिनसल्यामुळे आत्महत्या करणा-या भ्याड मानसिकतेचा नाहीच नाही. तो तर अशा परिस्थीतीत उलट तेजाळून निघत असतो. ही आमची खासीयत आहे. करायचीच असेल तर अशी तेजाळलेली पोरं शोधा अन त्यांची ब्रॅंडींग करा.
जयभीम.