सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

"बंधू आणि भगिनिनो"च्या पलिकडेही काही आहे का?


११ सप्टेंबर १८९३ रोजी म्हणजे बरोबर आजच्या दिवशी स्वामी विवेकानंदाने अमेरीकेत जाउन "बंधू आणि भगिनिनो” म्हटले अन त्याचा जगभर गाजावाजा होऊन तमाम भारतीयांचे ऊर ५६ इंची होऊन गेले. ही कथा मी लहानपणापासून  ऐकत आलो अन माझेही लहानसे ऊर दर वर्षी आहे त्यापेक्षा कित्येक इंचाने मोठे होत जायचे. मग शाळेत दर वर्षी विवेकानंद जयंती/पुन्यतिथी व आजुन कोणते निमित्य होऊन यावर बोलायची संधी मिळाली की गुरुजींच्या मदतीने एखादे भाषण लिहून घेऊन मग ते शाळेच्या व्यासपिठावरुन(?) ठोकायचे हे माझे नित्याचे झाले होते. मग त्यावर पडणा-या टाळ्य़ा व नंतर शिक्षकांकडून होणारं कौतूक पाहिल्यावर तर हे विवेकानंद प्रकरण वर्षातून जास्तीत जास्त वेळ का रिपीट होत नाही म्हणून दु:खही वाटायचं. तर हे झालं शालेय जिवनातील विवेकानंद. पण मग जरा मोठा झाल्यावर मी कॉलेजात दाखल झालो व माझ्या वक्तृत्व कलेला अजून झाळाळी येत गेली व मी विवेकानंदाच्या मर्यादीत साठ्याच्या बाहेर पडून आपला वकृत्व साठ्याचा आवाका वाढविण्याच्या नादात मग टिळक, सानेगुरुजी, गांधी, नेहरू ते अगदी कम्युनिजम व मार्क्स, लेनीन व माओ पर्यंतचे जुगाडू भाषण ठोकायला लागलो. यात त्या आयडिओलॉजिशी काही देणं घेणं नसायचं, टाळ्या मिळविणे हा एकमेव उद्देश असायचा.
पण याच काळात माझी आंबेडकरी चळवळीशी नाड जुडली नि वैचारीक जडणघडण होताना वक्तृत्व कला अधिक तेजाळत गेली त्यातून मला अनेक नव्या दिशा सापडल्या. मग एखादे वाचन हे नुसते कौतूक करवुन घेण्यासाठी करायचे नसते तर त्यातील गाभा समजून घ्यायचा असतो हा नविनच प्रकार अनुभवत गेलो. हा टप्पा ख-या अर्थाने माझ्या वैचारीक मशागतीचा होता. त्यामुळे तमाम आंबेडकरी साहित्याचा व लेखकांचा मी सदैव ऋणी राहिन.
पण एकदा या टप्यातून गेल्यावर मग जेंव्हा मी स्वामी विवेकानंद वाचला तेंव्हा मला माझीच गंमत वाटली. कारण विविकानंदाच्या बुद्धिमत्तेचा जो प्रचार मी लहानपणापासून ऐकत आलो त्याची पडताळणी करत वाचणे सुरु झाले. आणि मग मला माझेच हसू यायचे. कारण विवेकानंद यांची किर्ती फक्त “बंधू आणि भगिनिनो” या दोन शब्दानी दिलेली असून त्यापलिकडे त्यांचं स्वत:चं असं फारसं काहीच नाही हे सत्य उमगत गेलं. गंमत म्हणजे वरील दोन  शब्द म्हणजे विवेकानंदाची निर्मिती नसून माझ्या पुर्वजांचा वारसा आहे. थोडक्यात काय तर विवेकानंद हे माझ्या पुर्वजांचा वारसा वापरुन किर्तीमान झालेत. कारण बंधू आणि भगिनिनो या पलिकडे विवेकानंदाची अजून एखादी कर्तबगारी असावी हे मलातरी दिसलेले नाही. असल्यास प्लीज सांगा!
तर स्वामी विवेकानंद म्हणजे आपल्या पुर्वजांनी पारंपारिक पद्धतिने जपलेल्या बंधू आणि भगिनिनोचं एनकॅशमेंट करणारे चतूर स्वामी होते. त्या चतूरपणाचं मी कौतूक करतो व त्या आजच्या शिकागो भाषणाच्या १२४ व्या वर्षपुर्तीच्या शुभेच्छा देतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा