मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०१७

सुप्रिया सुळे, तुम्ही चुकताय!

...तर मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, सुप्रिया सुळेंचा इशारासध्या भाजप सत्तेत असल्यामुळे विरोधकांना काही ना काही मुद्दा उकरुन भाजपाला भंडावून सोडण्याचे काम सातत्याने चालू ठेवावे लागते. सध्या या कामात कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस जन्मा पासूनच सत्तेत असल्यामुळे पक्षात बरीच सुस्ती व मरगळ आली. ती झटकून भाजपला धारेवर धरण्यासाठी अजितदादा व सुप्रिया ताई कामाला लागलेत हे बरेच झाले. पण यावेळेस ताईकडून व पवार कुटूंबा कडून एक चूक होत आहे ती म्हणजे मराठ्यांची सहानुभूती मिळविण्यासाठी ते जे काही करत आहेत त्यातून दलित समाजावर अन्याय होण्य़ाची पूर्ण शक्यता आहे. कारण कोपर्डी प्रकरणाला तापवून मराठा मते वळविण्याच्या उद्देशाने जो काही प्रकार चालविला आहे त्यातून खालील प्रश्न उभे राहतात.

१) खैरलांजी प्रकरणात पवार कुटूंबानी अन्यायाच्या विरुद्ध एवढी तत्परता नि उत्साह का दाखविला नाही.
२) रमाबाई हत्याकांड घाटकोपर च्या बाबतीत पवार कुटूंब उदासीन का होते?
३)  नितीन आगेची मराठा लोकांनी हत्या केल्या तेंव्हा पवार कुटूंबीयांची न्यायप्रियता कुठे गेली होती?

मराठ्यांनी केलेली नितीन आगेंची हत्या असो वा दलितांनी केलीलं कोपर्डीचं पाप असो... दोन्ही घटनांमध्ये गुणात्मक फरक नाहीच. त्या दोन्ही घटना समान समाजघातकी आहेत. तरी सुळेताईंनी कधी नितीन आगेच्या बाजूने कोणते आंदोलन वगैरे केलेले ऐकीवात नाही. पण त्याच नगर जिल्ह्यात जेंव्हा मराठा मुलीवर अत्याचार होतो तेंव्हा सुळेताई आंदोलनावर उतरतात. ही ख-या अर्थांने दुटप्पी वागणूक असून मराठ्यांना चुचकारण्याची लबाडी आहे. तुम्हाला न्याय प्रीय नसून त्या आडून राजकीय पोळी भाजणे सुरु आहे एवढाच त्याचा अर्थ निघतो. पण हा डाव फार काळ दलितांच्या लक्षात येणार नाही असे समजू नका. कोपर्डीच्या घटनेत सुळेताईंनी चालविलेली चळवळ न्याय मिळावा येपेक्षा पक्षाची बांधणी व्हावी या उद्देशांनी चालविली जात आहे. पक्ष बांधणीसाठी वापरण्यात येत असलेलं कोपर्डी प्रकरण नैतीकतेच्या निकषावर पवार कुटूंबाची शालीनता घटविणारी ठरते. 
राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष आम्हाला  कायमचे जवळचे पक्ष वाटत राहिले आहेत. दलीत समाजाचं अधिकांश मतदान एकतर राकॉ ला जातं किंवा कॉंग्रेसला जातं हा इतिहास आहे. याचा दुसरा अर्थ असा की आमचं मतदान या दोघांना हवं असतं. पण सध्या आलेल्या मराठा लाटेत मात्र पवार कुटूंबीयांनी मराठ्यांची बाजू लावून धरताना कोपर्डी प्रकरणातून जे काही चालविले आहे ते तर्काला  आणी नैतीकतेला धरून नाही.
कोपर्डीची घटना दुर्दैवी नि असमर्थनीय़ आहेच. आरोपींवर केस दाखल झाली असून ती कोर्टात चालू आहे. न्यायपालीका आपल्या पद्धतीने ते  काम पाहात आहे. या केस मधील आरोपी हे दलित समाजाचे आहेत तर पिढीत कुटूंब हे मराठा समाजाचे आहे. इथे मराठा समाज पिढीत कुटूंबाला न्याय देण्यासाठी एकवटला ते स्तूत्यच आहे. पण आता केस न्यायालयात गेलेली असताना सुप्रिया सुळेनी कोपर्डीत जाऊन न्याय मिळावा म्हणून जो काही प्रकार चालविला आहे तो मात्र चोमडेपणा ठरतो. मराठा मतांचं गणीत डोळ्यापुढे ठेवून केलेली ही चापलूसी आहे. तसं पवार कुटूंबा बद्दल मला खूप आदर आहे, पण सत्तेची खुर्ची डगमगल्यावर त्यांनी चालविलेली ही मराठा चापलुशी मला अजिबात आवडलेली नाही. न्यायालय आपले काम चोख पद्धतीने बजावत असतांना सुळेताईंनी कोपर्डीत गावात डरकाड्या फोडत हिंडण्याचे कारणच नाही. फडणविसांवर दबाव टाकल्यामुळे प्रशासन घाबरून गेले अन मराठा धाकापायी पोलिस यंत्रणेवर दबाब पडून पुराव्यांमध्ये नको ते फेरफार घडवून बायस निर्णय घेतलाच (किंबहूणा सुळेंचा दबाव पाहता तसा निर्णय होण्याची शक्यताच अधीक आहे) तर तो आमच्या दलीत मुलांवर अन्याय ठरणार नाही का? सुळेताईला काय गरज आहे तिथे जाऊन नाचायची? बरं फडणवीसांवर दबाव आणायला मिळून मिळून काय मुद्दा मिळाला तर म्हणे कोपर्डी प्रकरण... अरे काय कहर करता यार तुम्ही? दुसरे कोणतेच मुद्दे नाहीत का? तुमच्या कोपर्डी प्रकरणातून मराठा सुखावतो हे जेवढे सत्य आहे तेवढेच सत्य दुसरी बाजू आहे ती म्हणजे प्रशासन, पोलिस यंत्रणा व इतर न्यायप्रक्रियेतील घटकांवर दबाव निर्माण होतो आहे. अन दबावात  निर्णय देतांना चुका होण्याची शक्यात अधीक असते. सुळेंच्या कोपर्डी प्रकरणातील लुडबुड पिढीतेला न्याय देण्यापेक्षा आरोपींवर अन्याय होण्यास हवे असलेले वातावरण निर्माण करत आहे... न्यायप्रविष्ठ प्रकरणात असं नाक खुपसायचं नसतं इतका साधा संकेत पवार सुळेताईनी पाळू नये ही शोकांतीका ठरते.  
कारण मराठ्यांचं फेवर मिळविण्यासाठी जी स्पर्धा सुरु झाली आहे ती जिंकण्यासाठी तमाम राजकीय धुरंधरानी मौन पाळायचे ठरविले आहे. पण यातून लिटिगेंटींग प्रोसेसवर ताण पडत असून तो अधीक पडला की निर्णयावर परिणाम होणार व त्यातून आरोपींवर अन्याय होणार ही बाब विसरून चालणार नाही. सुळेताईनी चालविलेली तथाकथीत मोहीम अरोपींवर अन्याय करो व न करो... पण न्यायपलिकेच्या कामात स्वर्थापायी चालविलेली ही लुडबुड नक्कीच स्पृहनीय़ नाही.  यापेक्षा क्रुर बलात्कार व हत्या खैरलांजीत झाली होती. तेंव्हा मात्र कधी सुळेताई तिकडे फिरकल्यासुद्धा नाही. याच नगर जिल्ह्यात नितीन आगेच मराठा समाजाकडून हत्या होते तेंव्हाही ताईनी कोणते आंदोलन केलेले नाही किंवा न्यायालयाच्या दारावर हट्ट धरला नाही. पण मराठा मुलगी बळी पडल्या पडल्या मात्र यांना ऊतू जावू लागलय. ही बाब निश्चीतच दलीत समाजानी दखल घ्यावि अशी आहे. नगर जिल्ह्यातील दोन घटना कोपर्डी व खर्डा... दोन्ही घटना सारख्याच... पण माणसं बदललं की तुमचा स्टान्स बदलतो हे मला नाही पटत.  हा मराठा फेवर कुणाला नडो वा ना नडो... पण एक दिवस तुम्हालाच नडणार एवढं नक्की. कारण सुज्ञ मतदार जरी बोलत नसला तरी त्याचं निरिक्षण चालू असतं. अन शेवटी तो दर पाच वर्षातून एकदा मतपेटीतून बोलत असतो.

नुकतचं तलवार कुटूंबाच्या केसवर अलाहाबाद कोर्टाने निकाल दिला. त्यात खालच्या कोर्टाने दबावात येऊन कसं सिनेमाच्या स्क्रिप्टप्रमाणे काम केलं अन आरोपींना शिक्षा ठोठावली याचा उल्लेख करत खालच्या कोर्टाचे कान उपटले. या ताज्या उदाहरणाला पाहता सुळेताईची कोपर्डी चळवळ खालच्या कोर्टावर अन न्यायव्यवस्थेवर दबाव निर्माण करत असून त्यामुळे न्याय होण्यापेक्षा अन्याय घडण्याची शक्यताच अधीक आहे. कारण फेअर ट्रायल होणे अत्यावश्यक असते. ती होत असतांना बाहेर एखाद्या समाजाच्या झुंडीने गगनभेदी आरोळ्य़ा देणे म्हणजे न्यायपालिकेवर दबाव निर्माण करुन निर्णयाला प्रभावीत करणे असा अर्थ होतो. अन सुळेताई आत्ता जे काही करत आहेत, त्यातून न्यायालयीन निर्णय प्रभावीत होण्याची पुर्ण शक्यता आहे. त्यामुळे ताईंना विनंती आहे, त्यांनी खुशाल राजकारण करावं... पण न्यायव्यवस्थेत लुडबुड ठरणार असं काही करु नये. 

-जयभीम

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०१७

मोदीपर्व- नोटीसा... अस्ताचा एक संकेत!

Image result for narendra modiमोदीपर्व... पर्व हा शब्द मुद्दाम वापरला कारण मोदीची राजकीय वाटचाल सुरु झाली ती सन. २००२ मध्ये. तेंव्हा पासून २०१९ पर्यंतची (या लोकसभेचा कालावधी धरुन) राजकीय वाटचाल पाहिल्यास सलग सत्तेत राहण्याचा त्यांचा हा विक्रम प्रचंड वादग्रस्त तर आहेच. पण विरोधकांचा टोकाचा मोदी द्वेष या सगळ्यातून त्यांनी प्रसिद्धीची व यशाची जी नवी गाथा लिहली ती प्राप्त परिस्थीतीत एक पर्वच ठरते. नरेंद्र मोदीची आजवरची वाटचाल पाहता तो माणुस पराकोटीची राजकीय सुझबुझ बाळगतो यावर माझा ठाम विश्वास आहे. गुजरात ते दिल्लीचा एकूण प्रवास तसा सोपा नव्हता पण या सुझबुझतेनी तो प्रवास सोपा करून दिला. बाहेरचे तर सोडाच पण पक्षात सुद्धा आडवाणी पासून स्वराज पर्यंत अनेकांची मोदीला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून नापसंदी होती.  मग त्यांनी मिळेल तिथे जमेल तसा विरोध केलाच पण सगळ्यांवर मात करत मोदीनी जे गाठायचं ते गाठलच. या सगळ्या प्रवासाचं नीट अवलोकन केल्यास मोदी तसा खूप हलका फुलका नेता नाही हे स्पष्ट होतं.  पण हलललीचं वागण पाहता ती सुझबुझ हरवल्याचं जाणवतं. गोरक्षकांचा हौदोस सुरू असताना बाळगलेलं मौन असो वा बेताल वक्तव्य करणा-या कार्यकर्त्यांवर कारवाई न करण्याची उदासीणता असो वा सोशल मीडियावर लिहणा-यांना धाडलेल्या नोटीसा असो. या सगळ्या घटना स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेणा-या  आहेत. मला प्रश्न हा पडतो की मोदीसारखा इतका चाणक्ष माणूस कसं काय असं स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतोय?  त्यामागे काही धोरण आहे की ही चुकच आहे ते अनाकलनीय आहे, न पटणारं आहे.
मोदी विरोधात सोशल मीडियावर लिखाण करणा-यांना थेट नोटीसा धाडण्यात आल्या. ही कृती खुपच हास्यस्पद आहे. राजकारणी म्हणून पराकोटीची टीका पचवून घेण्याचे धडे अगदी प्राथमीक अवस्थेत घ्यायचे असतात. मोदीतर गोद्रा प्रकरणी वीष पचवून तग धरलेले धुरंधर आहेत. मग असा माणूस सोशल मीडियाच्या टिकेला घाबरुन नोटीसा धाडतो हे जरा पचायला जड जातय. असल्या  चिंदी कारणावरून नोटीसा धाडणे मला कळतच नाहीये..  एकहाती सत्ता आल्यामुळे बहुतेक डोक्यात हवा गेली किंवा काहीतरी अंदाज बांधणीत चुका होत आहेत असं वाटतं.  कारण काहिही असो. मोदी व टीम मात्र बेताल वागायला लागली आहे एवढं मात्र नक्की.
मोदीचा पक्ष व त्यांची मातृसंस्था संघ हे सत्तेची फळ तसं फार कमी चाखलेले आहेत. आता कुठे एकहाती सत्ता आलीय. अन एकदा सत्तेची चटक लागली की माणसातील कडवेपणा हळूहळू कमी होत जातो. भाजप व संघ तसे दोघेही कडवेच... पण सत्तेची लालसा यांच्यातील कडवेपणा कमी करुन दाखवेल यावर मी ठाम आहे.  तुमच्यात कोणतीही धुंधी असो, तिला सत्तेची धुंधी एका झटक्यात उतरवून टाकते. मोदी व संघाला आत्ता सत्ता मिळून तीन वर्ष झालीत. आता पर्यंत सत्तेची धुंधी चढायला हवी होती. अन ती चढली की कडवेपण बाजूला सारून सत्तेला चिकटून राहण्याचा विकार जडायला हवा होता. मग त्याची प्रचिती तुमच्या एकूण वर्तनात कशी अधीक व्यापकता आली याचं प्रदर्शन मांडून केल्या जातं. हे करताना मतदार दुखावणार नाही ही गोष्ट अग्रस्थानी असावी लागते.
सामान्य नागरिकांना त्यांच्या अधिकारावर बाधा घातली जात आहे असे वाटू नये ही दुसरी बाब सांभाळायची असते. पण मोदी व टीम मात्र नेमकं उलटं करत आहे. पहिल्यांदा खाण्यापिण्यावर बंदी घातली. त्यातुन तमाम भारतीय मतदार दुखावले गेले. नंतर फ्रिडम ओफ एक्स्प्रेशनवर यांची करडी नजर पडू लागली.  त्यातून तरुण मतदार दुखावत गेला किंवा पुढे मागे नक्कीच दुखावणार. मग आता तर चक्क सोशल मीडियावर सरकार विरोधी लेकन करणा-यांना थेट नोटीसा धाडण्यात आल्या. म्हणजे हे सगळे उद्योग स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेणारे आहेत.  मोदी व भाजप यांच्या अशा वर्तनानी एक गोष्ट स्पष्ट होत आहे. भलेही ते सत्तेत आले पण सत्तेत येण्याचं अचूक आकलन करण्यात त्यांची चूक झाली आहे. लोकांनी सत्ता सुपूर्द करण्याचं कारण त्यांना कळलेलं नाही.  हे आकलन न होणं भाजपचा आत्मघात करायला पुरेसं आहे. आपल्यालाच निवडून देणा-या नागरीकांवर नांगर फिरविण्याचे जे कृत्य भाजप करत आहे, त्यातून ते स्वत:चा विनाश लिहत आहेत. त्याची प्रचिती यायला  फार काळ लागणार नाही.

बाकी काही असो, सरकारनी धाडलेल्या नोटीसा भाजपाच्या अस्ताचा संकेत घेऊन आल्या आहेत. मोदीपर्व अस्ताला लागलेय एवढं नक्की! हा अस्त मोदीच्या दिशेनी येतोय की मोदीच अस्ताच्या दिशेनी धावत सुटलेत ते लवकरच कळेल.

चिल्लर राजकरणी - बच्चू कडू

Image result for bacchu kaduमहाराष्ट्रातील राजकारणाचा इतिहास अगदी तसाच आहे जसा अजून कोणत्याही राज्याचा आहे. म्हणजे जातींचा, धर्माचा, देवांचा व बाबा बुवांचा.  हे सगळे घटक कमी अधिक प्रमाणात इतरांप्रमाणे इथल्याही राजकारणात आहेतच. नाही ती फक्त सिनेमावाल्यांची घुसखोरी... एवढा तो अपवाद. यात एक गोष्ट सुटली ती म्हणजे चिल्लर राजकारण्याची. इथे नाक्यावर बसून टवाळक्या करणारे थिल्लर व चिल्लर कधी राजकारणात येतात याचा पत्ता लागत नाही. मग ते राजकारणाला त्याच्या कट्याप्रमाणे समजुन नागडं नाचायला लागतात. आमदार खासदार पदाची शालीनता कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळावी तसं गुंडाळतात. असच एक डोक्याला गुंडाळण्यासाठी प्रसिध्द नाव म्हणजे बच्चू कडू.
हा माणूस सुरुवातीला शिवसेनेत होता. त्यामुळे बाळ ठाकरेचे बूडशेंडा नसलेली वृत्ती याच्यातही उतरली.  उतरलेल्या गुणातील सगळ्यात लक्षणीय गुण म्हणजे राडा संस्कृती. त्याच्या जोडीला नौटंकई. या माणसांनी सेना सोडून स्वत:ची ’प्रहार’ नावाची संघटना सुरु केली. मग काय प्रहारच्या नौटंक्या सुरु झाल्या. सेना सोडल्यावर याचे छोटेमोठे आंदोलन चालू होते पण गाजलेलं पहिलं आंदोलन म्हणजे शोलेवालं. डिसेंबर २००६ मध्ये हे आंदोलन केलं...आंदोलन कसलं, नौटंकीच ती, म्हणजे शोले स्टाईल पाण्याच्या टाकीवर चढून उडी घेण्याची धमकी देणारं आंदोलन ते मिडीयांनी देशभर दाखवून बच्चूला प्रसिद्धी दिली हा आपल्या पत्रकारांचा करंटेपणा. मग त्या नंतर बच्चूची राजकीय भरारी होत गेली पण मिळणा-या आमदार सारख्या पदाला शोभेल अशी शालीनता काही बच्चूच्या अंगात येईना... मग त्याचे राडे चालूचे होते.  दरम्यान त्यानी प्रहार नावाची संघटना वाढवत नेली व नव्या पोरांची व कार्यकर्त्यांची टीम तयार केली. पण स्वत:च्या अंगात कोणतीच शिस्त व शालीनता नसल्यामुळे व जमवलेली पोरांची टीम नुसती बच्चूसारखीच टपोरी व नौटंकीबाज बनत गेली. मग या टीमला धरून बच्चूनी बरेच बचपने केलेत. त्यात कधी कोण्य़ा अधिका-याच्या कानाखाली मार, तर कोण्या बाईची खिल्ली उडव तर कधी मंत्रालयात धुडघूस घाल असे विविध उद्योग बच्चूनी सुरु ठेवले. यातील काही खास नमुणे म्हणजे  जानेवारी २०११ मध्ये सी. हगवणे नावाच्या अधिका-याला बच्चूनी मारलं अन अख्खं मंत्रालय बच्चूच्या विरोधात संपावर गेलं. तेंव्हा बच्चू कोणत्या गुणाचा आहे उभ्या महाराष्ट्राला कळलं.  त्याच बरोबर निवडणूकांच्या प्रचारा दरम्यान वसूधा देशमुख नावाच्या एका स्त्रीला मारहाण केली तो ही मुद्दा बराच गाजला. अन नुकतच नाशिकात एका अधिका-याच्या कानाखाली लावण्याचा उद्योग बच्चू कडूनी केला. थोदक्यात बच्चू कडूचे उद्योग पाहता हा माणूस विधानसभेत नाही तर जेलात असायला हवा होता. पण आपले दुर्दैव असे की आमच्या व्यवस्थेतील कमजोर धागे अशा लोकांना बळ देतात व ही गुंड प्रवृत्तीची माणसं खुलेआम हौदोस घालत फिरत असतात. बच्चू कडू अशाच गुंडांपैक एक गुंड आहे.
याचं वोटबॅंक जपण्याचं तंत्रही भारी आहे. रक्तदान शिबीरे भरविणे, आजारी लोकांना मुंबईत उपचाराची सोय लावून देणे वगैरे प्रकार करत असतो. गिरीब लोकांना हे उपकार वाटतात व त्यातून वोटबॅंक तयार होत जाते... अन बच्चूला अधीक चेव चढत जातो व मग त्याचा हौदोस अधूनमधून मीडियातून वाचायला मिळतं. हल्ली त्यांनी नवा प्रकार सुरु केलाय तो म्हणजे अपंगाना मदत देण्यात यावे ही. सुरुवातीला कडून शेतक-यांचे मुद्दे धरुन राजकारणात उतरले व आपली मतदाराचा आवाका वाढवित नेताना काही जबरी गेम टाकलेत. दुर्दैवाने ते यशस्वीही झालेत. सध्या अपंगना मदत हा बच्चूचा नवा फासा आहे. अपंगाना मदत मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे. पण त्यासाठी अधिका-यांना मारहाण वगैरे करणे म्हणजे अतिरेकीपणा झाला. पण तेवढं कळायला वरचा खोका नीट असावा लागतो. कडूच्या बाबतीत वरच्या खोक्याची नुसती बोंब आहे. या माणसाला मीडिया अटेन्शनची मोठी हौस.. त्यासाठी मागे त्यानी चक्क हेमामालिनीवर शिंतोडे उडविले होते. बाईनी याच्याकडे ढुंकुनही बघीतलं नाही ती गोष्ट वेगळी. एकदातर चक्क बॉम्ब फेकायच्या बाता केल्या या माणसांनी. तेंव्हा मात्र हे प्रकरण नुसतं रिकाम्या खोक्याचं नसून संतुलन बिघडलेली केस असल्याची खात्री झाली. तरी नशीब हा माणूस आजून बाहेरच आहे. आता म्हणे अमरावतीत उपोषण सुरू केलय. आहे की नाही कहर. काही दिवस गेले की मीडिया अटेन्शनसाठी जीव तळमळतो याचा. मग असले उद्योग चालतात. चालू द्या... आपल्याला काय... तेवढच मनोरंजन!
दर थोड्या दिवसांनी कडूची नौटंकी चालू असते... आता उपोषणाची नौटंकी चालू झाली. एका थिल्लर माणसाचं चिल्लर राजकारण... आजुन काय!

शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

हिंदी भाषा मराठीचं रिप्लेसमेंट म्हणून येत आहे!

हिंदी भाषा ज्या वेगाने पसरत आहे ते पाहता या भाषेचं करायचं काय? असा प्रश्न पडतो.  खरं तर मी कोणत्याच भाषेचा द्वेष करत नाही. अगदी त्याच न्यायाने हिंदीचाही द्वेष करत नाही. हिंदी उत्तरभारतीयांची भाषा आहे, ती असावी अन तिकडे फुलावी फलावी. मला त्यात आनंदच आहे. पण तिला तमाम देशाची भाषा म्हणून इतरांवर लादले जावे ही बात मात्र अजिबात रुचत नाही. कारण देशाची भाषा म्हणून लादताना नुसता हिंदीचा आवाका नि व्यापकता वाढत नाही तर या विस्तारात स्थानिक भाषांची हळूहळू कत्तल घडत जाते. मग काही कारण नसतांना मराठी (वा इतर कोणतीही स्थानिक भाषा) हिंदीचा बळी पडावा हे मलातरी अमान्य आहे. बरं मराठी भाषा आमच्या पुर्वजानी हजारो वर्षाच्या कष्टातून कला, साहित्य, संस्कृती, तत्वद्न्यान, राजकारण  नि व्यावार या सर्व क्षेत्रातून समृध्द करत नेली. आज काही कारण नसतांना राजकारण्यांच्या सोयीसाठी म्हणून हिंदीला वाढवत नेऊन मराठीचा गळा घोटायचा हे अजिबात पटणारं  नाही. हिंदीला खुशाला वाढवा पण मराठीचा बळी देऊन नाही. पण काय आहे ना, महाराष्ट्रात जर हिंदी वाढविली तर मराठी जाणारच, हेही तेवढेच सत्य आहे.
बरं हिंदीची उपयोगीता किती? त्या भाषेत कोणता ज्ञानसाठा आहे ज्यामुळे तिची गरज पडावी. कोणतं असं अभूतपुर्व तत्वज्ञान हिंदी साहित्यात आहे ज्याची मराठी भाषीकांना गरज पडावी? या सगळ्या निकषावर तपासल्यास हिंदीची तशी अजिबात गरज नाही. तरी मग हिंदीचा हट्ट का? उत्तर तेच.... राजकारण्यांच्या सोयीसाठी. याच्या अगदी उलट इंग्रजी, फ्रेंच, जर्मनी, स्पॅनीश, जापनीज, चायनीज या भाषांची उपयोगीता Business व Technology च्या दृष्टीकोनातून अफाट आहे. त्याच बरोबर हिंदी ऐवजी या भाषा शिकविल्यास पुढच्या पिढीला रोजगाराच्या संध्या वाढतील. म्हणजे हिंदीवर वेळ घालविण्यापेक्षा या भाषांवर घालविल्यास तरुणाना खरोखर फायदा होणार. तरी आम्ही या भाषांपेक्षा हिंदीवरच भर देतोय. रेल्वे स्टेशन, बॅंका, केंद्र सरकारच्या कचे-यात तर हिंदी आमच्या मानगुटीवर बसविलीच पण शाळांमधून हिंदी हा विषय कंपलसरी करुन  हिंदी भाषा वाढविण्याचा पध्दतशीर घाट घातलाय.  का, तर राजकारण्यांच्या सोयीसाठी.

इतर कोणतिही वेदेशी भाषा शिकल्यास स्थानिक भाषेला धक्का लागत नाही अन रोजगार मिळतो. पण अगदी याच्या उलट हिंदी भाषा जितकी स्थिरावेल तितकं स्थानिक भाषांचा बळी जाणे अटळ आहे. कारण हिंदी भाषा रोजगाराचा पर्याय म्हणून जागा व्यापत नाही, तर स्थानीक भाषेचं रिप्लेसमेंट म्हणून जागा घेत आहे, हा भूलभूत फरक समजून घेतला पाहिजे.  मग हा बळी देताना परतावा किंवा मोबदला म्हणून भरीव असं काही मिळताना दिसत आहे का, तर तसही काही नाही. तर मग नक्की कशासाठी आपण स्थानीक भाषेची कत्तल करून हिंदीला प्रस्थापीत करायचं. हिंदी स्विकारल्याने होणारे फायदे नक्की कोणाला मिळणार आहेत? कोणत्या तरूणांसाठी रोजगाराचा स्पेस अधिक विस्तारणार आहे? अफकोर्स उत्तरभारतीयांचा. मग उत्तरभारतीय तरुण आपल्या स्थानिक रोजगारांवर हक्क सांगू लागले तर साहाजीकच स्थानिकांचा स्पेस वा संध्या कमी होत जाणार. एकूण काय तर हिंदीची तशी कोणतीच गरज नसताना व उपयोगीता नसताना तिला स्थानिकांच्या उरावर बसविण्याचे कारण काय?
मला हिंदी बद्दल अजिबात आकस नाही, पण मराठी वा स्थानिक भाषेची कत्तल करुन ती येत असेल तर मात्र हिंदीचं येणं किंवा वाढणं स्थानिक भाषांसाठी धोक्याचं आहे एवढच सांगायचय. हा धोका वेळीच ओळखून हिंदीला पिटाळून लावलं नाही, तर मराठी भुमीत मराठीचं पतन होतांना पाहावं लागणार आहे. थोडक्यात हिंदी भाषा जितकी वाढत जाईल तितकं स्थानिक भाषांचं भवितव्य अंधाराच्या दिशेनी पळत सुटणार. कारण हिंदी भाषा रोजगाराच्या संध्या घेऊन येत नाही, तर ती मराठीचं रिप्लेसमेंट म्हणून येत आहे!

-जयभीम

सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

स्वतंत्र विदर्भ चळवळीला हिंदीचा शाप

स्वतंत्र विदर्भ चळवळ तेवढीच जुनी आहे जेवढं आजच्या महाराष्ट्राचं आयुष्य. पण या चळवळीने कधीही पाहिजे तेवढा जोर धरला नाही हे या चळवळीचं दुर्दैव. शेजारचा तेंलगाना वेगळं होण्यासाठी पेटून उठला व हा हा म्हणता वेगळाही झाला. पण स्वतंत्र विदर्भ चळवळ मात्र नुसती वळवळ बनून राहिली आहे. ही चळवळ ख-य़ा अर्थाने भडका घेऊन उसळायला पाहिजे होती पण तसं होताना दिसत नाही.  नुसतीच कधीतरी गोंगाट होतो पण त्याचं उपद्रव मुल्य इतकं हलकं आहे की कोणी काळं कुत्रही इकडे ढुंकून बघत नाही. विदर्भवादी चळवळ म्हणजे नुसता मजाक बनून गेला आहे. पश्चीम महाराष्टीय नेते तर नुसती खिल्ली उडवित नाही तर मनोरंजन म्हनून या चळवळीकडे पाहतात. जरा खोलात जाऊन विचार केल्यास चळवळ फसण्याची जी काही कारणं सापडतात त्यात मुख्य कारण दिसतं ते म्हणजे हिंदी भाषा. स्वतंत्र विदर्भ चळवळीस मारक ठरलेल्या काही महत्वाच्या घटकांपैकी हिंदी भाषा ही सर्वात वरच्या क्रमांकावर आहे.  कारण या चळवळीचे खरे कर्ते धरते शहरी भागातील व्यापारीलोकं असून हे सगळे सत्तेला हपापलेली पिल्लावळं आहेत. ग्रामीण मराठी तरुणांचा व शेतकरी व इतर विदर्भीय समाजाच्या उत्थानाचा कार्यक्रम विदर्भवादी चळवळीच्या अजेंड्यावर अजिबात दिसत नाही. थोडक्यात ही चळवळ हिंदी भाषीक व्यापारी वर्गानी सत्तेच्या लालसेपोटी सुरु केली असा एकूण समज विदर्भीय मराठी तरुणांनी करुन घेतला आहे व ते खरेही आहे.  त्यामुळे ग्रामीण मराठी तरूणाला ही चळवळ कधीच भावली  नाही, अपील झाली नाही. अन जोवर ग्रामीण तरूण उडी घेत  नाही तोवर कोणत्याच चळवळीला धार येत नाही हे चळवळ इतिहासातील वास्तव कोणीच नाकारु शकत नाही. स्वतंत्र विदर्भ चळवळ व्यापा-यांच्या व हिंदी भाषेच्या कवेत गेल्यामुळे मराठी तरूण चळवळीप्रती उदासीन होत गेला. मराठी तरूणाला या चळवळी बद्दल कधीच आस्था वाटली नाही. उलट सगळे हिंदी साईडर सत्तेत बसतील व मराठी माणूस आहे त्यापेक्षा आजून दुय्यम स्थानी फेकला जाईल असे वाटून मराठी तरूणानी स्वत:ला या चळवळी पासून दूर ठेवले.
ख-या अर्थाने जर वेगळा विदर्भ हवा असेल तर मराठी तरूणाला या चळवळीत उतरविणे अत्यंत गरजेचे आहे. पण त्याआधी उत्तरभारतीय शहरी व्यापारी नि हिंदी भाषा यांचा संभाव्य धोखा पिटाळून लावणे तेवढेच गरजेचे आहे. ते केल्याशिवाय चळवळीत मराठी तरुण उतरणार नाही, म्हणजे चळवळीला धार येणार नाही.  मातृभाषा व मराठी माणसाचं स्थान याची शाश्वती जोपर्यंत चळवळ देणार नाही तोवर  तमाम मराठी तरूण (खास करून ग्रामीण) या चळवळीपासून अंतर राखून राहील. कारण आजची विदर्भवादी चळवळ व्यापारी, हिंदी भाषीक नेते व काही स्वार्थी लोकांची असून मराठी माणसाच्या हिताची अजिबात नाही. म्हणून ही चळवळ मराठी तरूणाला परकी वाटते. थोडक्यात स्वतंत्र विदर्भ चळवळीला हिंदीचा शाप आहे. हिंदी भाषीक अन व्यापारी वर्ग जोवर या चळवळीचा मुख्य अंग आहे, तोवर स्वतंत्र विदर्भ चळवळ नुसतीच वळवळ असणार आहे.