सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

स्वतंत्र विदर्भ चळवळीला हिंदीचा शाप

स्वतंत्र विदर्भ चळवळ तेवढीच जुनी आहे जेवढं आजच्या महाराष्ट्राचं आयुष्य. पण या चळवळीने कधीही पाहिजे तेवढा जोर धरला नाही हे या चळवळीचं दुर्दैव. शेजारचा तेंलगाना वेगळं होण्यासाठी पेटून उठला व हा हा म्हणता वेगळाही झाला. पण स्वतंत्र विदर्भ चळवळ मात्र नुसती वळवळ बनून राहिली आहे. ही चळवळ ख-य़ा अर्थाने भडका घेऊन उसळायला पाहिजे होती पण तसं होताना दिसत नाही.  नुसतीच कधीतरी गोंगाट होतो पण त्याचं उपद्रव मुल्य इतकं हलकं आहे की कोणी काळं कुत्रही इकडे ढुंकून बघत नाही. विदर्भवादी चळवळ म्हणजे नुसता मजाक बनून गेला आहे. पश्चीम महाराष्टीय नेते तर नुसती खिल्ली उडवित नाही तर मनोरंजन म्हनून या चळवळीकडे पाहतात. जरा खोलात जाऊन विचार केल्यास चळवळ फसण्याची जी काही कारणं सापडतात त्यात मुख्य कारण दिसतं ते म्हणजे हिंदी भाषा. स्वतंत्र विदर्भ चळवळीस मारक ठरलेल्या काही महत्वाच्या घटकांपैकी हिंदी भाषा ही सर्वात वरच्या क्रमांकावर आहे.  कारण या चळवळीचे खरे कर्ते धरते शहरी भागातील व्यापारीलोकं असून हे सगळे सत्तेला हपापलेली पिल्लावळं आहेत. ग्रामीण मराठी तरुणांचा व शेतकरी व इतर विदर्भीय समाजाच्या उत्थानाचा कार्यक्रम विदर्भवादी चळवळीच्या अजेंड्यावर अजिबात दिसत नाही. थोडक्यात ही चळवळ हिंदी भाषीक व्यापारी वर्गानी सत्तेच्या लालसेपोटी सुरु केली असा एकूण समज विदर्भीय मराठी तरुणांनी करुन घेतला आहे व ते खरेही आहे.  त्यामुळे ग्रामीण मराठी तरूणाला ही चळवळ कधीच भावली  नाही, अपील झाली नाही. अन जोवर ग्रामीण तरूण उडी घेत  नाही तोवर कोणत्याच चळवळीला धार येत नाही हे चळवळ इतिहासातील वास्तव कोणीच नाकारु शकत नाही. स्वतंत्र विदर्भ चळवळ व्यापा-यांच्या व हिंदी भाषेच्या कवेत गेल्यामुळे मराठी तरूण चळवळीप्रती उदासीन होत गेला. मराठी तरूणाला या चळवळी बद्दल कधीच आस्था वाटली नाही. उलट सगळे हिंदी साईडर सत्तेत बसतील व मराठी माणूस आहे त्यापेक्षा आजून दुय्यम स्थानी फेकला जाईल असे वाटून मराठी तरूणानी स्वत:ला या चळवळी पासून दूर ठेवले.
ख-या अर्थाने जर वेगळा विदर्भ हवा असेल तर मराठी तरूणाला या चळवळीत उतरविणे अत्यंत गरजेचे आहे. पण त्याआधी उत्तरभारतीय शहरी व्यापारी नि हिंदी भाषा यांचा संभाव्य धोखा पिटाळून लावणे तेवढेच गरजेचे आहे. ते केल्याशिवाय चळवळीत मराठी तरुण उतरणार नाही, म्हणजे चळवळीला धार येणार नाही.  मातृभाषा व मराठी माणसाचं स्थान याची शाश्वती जोपर्यंत चळवळ देणार नाही तोवर  तमाम मराठी तरूण (खास करून ग्रामीण) या चळवळीपासून अंतर राखून राहील. कारण आजची विदर्भवादी चळवळ व्यापारी, हिंदी भाषीक नेते व काही स्वार्थी लोकांची असून मराठी माणसाच्या हिताची अजिबात नाही. म्हणून ही चळवळ मराठी तरूणाला परकी वाटते. थोडक्यात स्वतंत्र विदर्भ चळवळीला हिंदीचा शाप आहे. हिंदी भाषीक अन व्यापारी वर्ग जोवर या चळवळीचा मुख्य अंग आहे, तोवर स्वतंत्र विदर्भ चळवळ नुसतीच वळवळ असणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा