शनिवार, २ डिसेंबर, २०१७

माहारकीचे डोहाळे लागतात तेंव्हा...!

Image result for nitin aageकोपर्डी केसचा निकाल व खर्डा केसचा निकाल एकाच महिन्यात लागले. दोन्ही केस खुनाचे होते. कोपर्डीत दलितांनी एका मराठा मुलीचा बलात्कार करुन खून केला होता तर खर्ड्यात मराठ्यांनी जातीयवादातून दलीत मुलाचा (नितीन आगे)चा खून केला. दोन्ही केसेमध्ये प्रत्यक्ष पुरावे नव्हते. दोन्ही केस परिस्थीतीजन्य पुरावे नि साक्षीदार यांच्या भरवश्यावर लढविले गेले. यात कोपर्डी केसमध्ये मराठा लोकांनी जे वादळ उठवून एकूण न्यायव्यवस्था व सरकारवर जो दबाव टाकला त्याची परिणीती म्हणून आरोपींना फाशीची शिक्षा मिळाली. पण हा असा दबाव दलीत समाजाकडून टाकण्याची आमची ना ताकत ना कुवत. त्यामुळे नितीन आगेचे खुनी मोकाट सुटले. त्याहून लज्जास्पद बाब म्हणजे सगळे साक्षीदार नितीनच्या केसमध्ये चक्क पलटले. म्हणजे याचाच अर्थ असा की दलीतांच्या तोंडावर थुकत हे साक्षीदार खुन्यांच्या बाजूने आपला फेवर देतात व आपण सगळे त्यावर ब्र अक्षर उच्चारायची हिंमत दाखवत नाही. तमाम न्यायप्रिय एनजीओ व मराठा समाज जे न्यायाचा आग्रह धरण्याचा आव आणत लाखोचे मूक मोर्चे काढले त्यांनी आपली मर्यादा दाखव त्यांचा न्यायाचा आग्रह फक्त त्यांच्या समाजापुरता आहे हे दाखवून दिले. याचा दुसरा अर्थ असाही निघतो की  त्या त्या समाजाने आपल्या न्यायासाठी रस्त्यावर उतरावे.
महाराष्ट्रात एक अदृश्य शक्ती अस्तीत्वात असून ती सर्वत्र फिरत असते. ती जिथे असते तिथे नसते व जिथे नसते तिथे अधीक जोमात असते असं म्हटलं जातं. पण कोपर्डी व खर्डा प्रकरणी मात्र ही अदृश्य शक्ती (पवार) चक्क उघड उघड कोपर्डीतील मराठ्यांच्या बाजूने पुर्ण शक्ती पणाला लावून उतरली.  केसचा सोक्षमोक्ष लागेस्तोवर पाठपुरावा केला. पण याच पवार शक्तीचा कोणताच अंश खर्ड्याच्या केसमध्ये मात्र दोषी असलेल्या मराठ्यांना शिक्षा झाली पाहिजे म्हणून हालचाल करताना दिसला नाही. थोडक्यात कालवर जे पवार न्यायाच्या बाजूने असण्याचा आव आणत होते ते जातभाईचा प्रश्न येताच चक्क पलटी मारतात. हे असले पुरोगामी दलीतांसाठी खरे घातकी असतात हे आतातरी दलितांनी ओळखावे. पवार व त्यांचे कुटूंब जर खरच न्यायप्रिय व सेक्यूलर असते तर जितका जोर कोपर्डीच्या आरोपींच्या विरोधात लावला, तेवढाच जोर खर्ड्याच्या आरोपींच्या विरोधात लावायला हवं होतं. पण खर्ड्याचे आरोपी जातभाई आहेत हे कळल्यावर पवार व त्यांच्या कन्या सुळे यांनी पद्धतशीरपणे तिथून काढता पाय घेतला. त्यामुळे मराठा आरोपींना निसटण्याची संधी मिळावी याची सोय लागली. जे साक्षीदार कोर्टात उभे झाले ते साक्षीपासून पलटण्याची हिंमत करु शकले. जोडीला पोलिसांवर सुद्धा जबाबदारी पार पाडण्याबाबत कोणी मोठा माणूस दबाब टाकत नसल्यामुळे बेफिकीरपणे या केसचं इन्वेस्टिगेशन तर झालच पण साक्षीदारांना सुद्धा यातून अभय मिळण्याचा संकेत गेला. त्यामुळे नेमक्या वेळी हे सगळे साक्षीदार पलटले. याचा एकूण परिणाम असा झाला की नितीन आगेचे खुनी मोकाट सुटले.
याची दुसरी बाजू अशी की आंबेडकरी चळवळीचं नाव घेऊन मोठे झालेले नेते व अधिकारी तसेच संघटना हे एकतर राजकीय गणितं मांडून गुलाम बनले आहेत किंवा आर्थीक हीताची समिकरणं बिघडू नये म्हणून गप गुमान झाली आहेत. थोडक्यात पराकोटीचे स्वार्थ गाठत हे सगळे तथाकथीत नेते नितीन आगे केसमध्ये दलीताला न्याय मिळाला नाही यावर बोलण्यापेक्षा कोपर्डीत कसा न्याय मिळाला याचा गोंगाट करत सुटले आहेत. यामागे न्याय मिळाल्याचा आनंद असण्यापेक्षा माहारकीचं लक्षणच अधीक आहे.  धर्मांतरापुर्वी आपल्या अंगात असलेला महारकीचा गूण उसळी मारुन आलेमुळे हे तमाम महार मराठ्यांची गुलामी इमाने इतबारे बजावत सुटले असून पुर्वाश्रमीचा नावाला शोभेल असं वागू लागले आहेत. त्यामागील कारण काय.... निव्वड स्वार्थ, बास!
थोडक्यात एकाच महिन्यात एकाच जिल्ह्यात, एकसमान गुन्ह्यासाठी या दोन परस्पर विसंगती असणारे निकाल न्यायालयात लागले. दोन्हीकडे खूनाचे आरोप असतांना मराठा पिडीत केसमध्ये न्याय होतो पण दलित पिडीत केसमध्ये मराठे मोकाट सुटतात. यामागे मराठा मूक मोर्चाचे राक्षसी दडपण कोपर्डीत न्याय घडविण्यात मोलाची कामगिरी बाजावते. पण असलं दडपण निर्माण करण्यास असमर्थ असलेल्या दलित “नितीन आगे” ला मात्र न्याय मिळत नाही. आम्ही परत एकदा गुलामीच्या देशेनी निघालो असून बौद्ध धर्माचा त्याग करुन मराठ्यांची महारकी करावी अशा अवस्थेला पोहचलो की काय असे वाटू लागले आहे. 
संघटीत होऊन स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न मागच्या पाऊन शतकापासून चालू असला तरी काही नेते मंडळी व संघटना यांनी नितीन आगे प्रकरणात ज्या पद्धतीने मौन धरले आहे ते पाहता एवढच म्हणेन... समाजाला  जेंव्हा महारकीचे डोहाळे लागतात तेंव्हा कुठे ना कुठे एका नितीन आगेचा पराभव जरूर होत असतो.

1 टिप्पणी:

  1. हतबलता वाटली वाचून .... आजही जातिव्यवस्था जीवंत आहे ... संस्कार रुपात ... मनाच्या कोपर्यात ... ति पुसटणे अशक्य आहे .

    उत्तर द्याहटवा