सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

मायावी अंत, बुद्धचरणी!Image result for mayawatiकाल दि. १० डिसे. २०१७ दिवस रविवारला कस्तूरचंद पार्क नागपूर येथे मायावतीची सभा झाली. नेहमीप्रमाणे या सभेची दोन वैशिष्टे होती ते म्हणजे बोलणारे वक्ते दलीत व ऐकणारे श्रोतेही दलीत. तसही मायावतीच्या, त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या सभांना प्रामुख्यांने दलीतच असतात. आजून खोलात जाऊन पाहिल्यास दलितांमध्येही एक खास वर्ग म्हणजे बौद्ध समाज बहुसंखेने असतो. तर एकूण काय तर बोलणारे वक्ते व ऐकणारे श्रोते दोन्ही बहुसंखेने शक्यतो बौद्धच असतात. इतर समाज अगदीच नाममात्र असतो. अशा समाजाच्यापुढे भाषण ठोकतांना मायावती म्हणतात की “धर्मप्रमूख व शंकराचार्यानी सुधरावे, अन्यथा मी हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धर्माचा स्विकार करेण” अन कहर म्हणजे यावर तमाम बौद्ध श्रोते मुर्खासारखं टाळ्या पिटतात. मागच्या काही महिन्यांपासून मायावतीने ही घोषणा सातत्याने चालविली आहे. धम्म स्विकारणे वगैरे नुसत्या थापा असून दुरावलेला बौद्ध मतदार परत मिळविण्यासाठी बाईची सगळी खटाटोप सुरु आहे.  बाईनी कोणता धर्म स्विकारावा हा जरी तिचा खाजगी मामला असला तरी  तो ज्या पद्धतीने वापरला जात आहे ते पाहता या मामल्याचा खाजगीपणा तसा खाजगी न राहता सामाजीक मुद्दा बनतो. त्याचं अजून थोडं खोलात जाऊन विश्लेषण केल्यास एक स्वार्थी डाव, तो ही अत्यंत नीच पातळीवरचा जातीयवादी खेळ असल्याचे दिसते. बघा मायावतीची राजकीय कारकिर्दच सुरु झाली आंबेडकरी विचाराच्या पायावर. बाबासाहेब व बुद्धाचे फोटो लावून, त्यांच्या विचाराचे अनुकरण करत असल्याचा सर्वत्र आभास उभं करुन त्यांनी आजवरचा राजकीय प्रवास केला. हे सगळं करताना धर्माने हिंदू राहिल्या मात्र राजकीय लाभासाठी बाईनी आंबेडकरी विचाराची पाईक असल्याचं कायम कृतीतून दाखवत राहिल्या. त्यामुळे तमाम दलित व खास करुन बौद्ध समाज बाईच्या पाठीशी उभा राहात गेला व ती अनेक पदं उपभोगत गेली. जवळपास दोन दशकं बाईनी सत्ता किंवा सत्तेत महत्वाचा वाटा राखला होता. या काळात ना तिला हिंदू असल्याचं आठवलं, ना बौद्ध धम्म स्विकारणे गरजेचे वाटले. कारण सगळं मस्त चालू असतांना असल्या वैचारीक उचापतीची गरजच भासत नव्हती. बाई पार विसरून गेल्या की त्या इथवर कशा आल्या? त्यांनी  जे काही मिळविलं ते कोणत्या विचारधारेमुळे मिळालं याचाच विसर पडला. मग त्यातूनच तिचा मतदार दुरावत गेला व बाई गाफील राहिली. यातच मग आली मोदी लाट अन चक्क तिच्या बालेकिल्ल्यतच तिचा पक्ष भुईसपाट झाला. मग मात्र बाईला खाटकन जाग आली व ज्यांच्यामुळे इथवर पोहचलो त्यांनी साथ सोडल्याचा कळलं. तेंव्हा कुठे मग बाईला बौद्ध धम्माचा परत एकदा साक्षात्कार झाला. पण आजचा मतदार हुशार आहे. तो लबाड्या लांड्याना ओळखून आपलं मत देत असतो. मग लोकसभेत मिळालेला फटका विधानसभेतही मिळाला व बाई पार तुटून गेल्या. तिथून सुरु झाला नवा राग.... "मै बौद्ध बनुंगी" पण मतदार आता बाईची लबाडी ओळखून आहे. तू बन किंवा नको बनू आम्हाला काय त्याचं... अशी मतदाराची मानसिकता झालेली आहे.  
मजेची बाब म्हणजे पहिल्यांदा बाईवर अशी वेळ आली आहे की राज्यसभेत जाण्यासाठी आवश्यक असलेला आकडा यावेळेस बाईकडे नाही. चार वेळा मुख्यमंत्री पद भुषविलेल्या व एका मोठ्या पक्षाच्या प्रमुखावर अशी वेळ येणे म्हणजे तिच्या राजकीय धोरणात काहितरी प्रचंड घोळ होत असून त्याला वेळीच सुधारण्याची गरज असल्याचा हा संकेत होय. पण स्वतच्या मस्तीत असणा-या लोकांना असले संकेत वगैरे कळत नसतात व त्यातून ते स्वत:ला आहे त्या स्तिथीतून आणखी वाईट स्तिथीकडे लोटत नेत असतात. मायावतीचं अगदी हेच सुरु आहे. माणसाच्या आयुष्यात अवलोकन हा एक असा गूण आहे, की त्याचं योग्यवेळी वापर न केल्यास होणारं नुकसान उगीच चारपट जास्त विध्वंस करु जातो. योग्य अवलोकनानी मात्र नुसतं विध्वसांची तिव्रताच कमी होत नसते तर प्रसंगी येणा-या संकटाला योग्य नियोजनातून थेट बायपासही केलं जाऊ शकतं. पण हे सगळं तेंव्हा होतं जेंव्हा माणूस अवलोकनातून आपल्या चुका मान्य करण्यास तयार असतो. त्याच बरोबर त्या सुधारण्याची तयारी ठेवतो. मायावती बाबतीत ही शक्यता अजिबात नाही. बाईला वाटतं की आली वाईट वेळ की घ्या आंबेडकराचं नाव... पण हे नेहमी नेहमी करुन चालणार नाही. एका टप्प्यावर लोकं तुम्हाला ओळखू लागलीत की मग कोणाचही नाव घ्या, तुमच्या मागे कोणीच उभं राहात नाही. त्यासाठी उमेदीचा काळात तुम्ही विश्वासार्हता कमवायची असते. मायावतीनी नेमकी तिचं कमावली नाही. उलट असली नुसली गमावली आहे. 
पारंपारीक राजकारणात व मतदारांत मागच्या चारपाच वर्षात जो बदल घडत आहे त्याची चाहूल सगळ्यात आधी भाजपला लागली व त्यांनी त्याचं भरपूर फायदा उठविला आहे. डावे, कॉंग्रेस नि आंबेडकरी मात्र आजही गाफिलच आहे. मायावतीला तर या बदलाचा अजून गंधही लागला नाहीये. ती आजूनही नव्वदीच्या दशकातील पॅटर्नला अशी काही कवटाळून आहे की ती बुडती नव्वदीतली नाव पुरती समुद्राच्या तळाला लागलीतरी बाईचं कवटाळणं काही संपेना. उलट अधीक करकचून धरणे चालू असल्यामुळे बसपाचं पुढे काय होणार हे सांगायची गरज उरत नाही. कट्ट्रर जातीयवादी मतदारांनी उत्तर प्रदेशात घडविलेला बदल पाहता वा-याची दिशा ओळखून पारंपारीक साच्यातून बाहेर पडत पक्षाला नव्या वैचारीक साच्यात बसविण्याची गरज आहे. ते करतांना जातीय समिकरणाला अग्रक्रमावरुन जरा दोन-तीन क्रमांक खाली ढकलत पक्षाचा मुख्य फोकस नव्या पिढीच्या गरजेनुसार आखायला हवा. पण ते करण्याची अजूनही काही पक्षांना गरज वाटत नाही. बसप त्यातलाच एक पक्ष.

बौद्ध धम्म
मायावतीच्या राजकारणात आजवर बौद्ध धम्म सायलेंट फिचर होता, तो आता सालियंट(महत्वाचा) फिचर बनवून नव्याने उभारी घेण्याचा डाव दिसतोय, पण मतदार अधीक परिपक्व नि सुजाण झालाय याचा बाईला अंदाज आलेला दिसत नाही.  आज पर्यंत तमाम राजकीय पुढा-यांनी बौद्धांना हवे तसे हवते तिथे राजकीय स्वार्थापायी वापरुन घेतले आहे. पण मागच्या १०-१२ वर्षात बौद्ध मतदार सुजाणपणा दाखवत सगळ्यांनाचा धूळ चारत आहे. अगदी झोपडपट्टीतील पैसे घेऊन मत टाकणारा बौद्ध मतदारही राजकीय पुढा-यांची लबाडी ओळखून आहे. त्यातूनच मग महाराष्ट्रातील सगळ्या रिपब्लीकन गटांची दाणादाण तर उडालीच पण आठवले सारखा जोकरही (जो कधीकाळी निवडून यायचा) थेट निवडून येण्याचे थांबले. आजच्या घडीला एकही बौद्ध पुढारी बसप/रिपब्लीकनच्या वगैरे तिकीटावर थेट लोकांतून निवडून आल्याचा पुरावा नाही. विदर्भात आंबेडकरी मतदार मोठ्या प्रमाणात असूनही या पक्षांच्या उमेदवारांना ज्या प्रकारे बौद्धानी नाकारले त्याचं कारण एकच... बौद्ध पुढा-यांनी विश्वासार्हता गमावली, एवढच.
अशा दारूण परिस्थीतीत विश्वासार्ह वाटणा-या पुढा-याचा उदय होणे गरजेचे आहे. पण प्राप्त पुढा-यांना मात्र ही नवी डिमांड दिसतच नाही. ते आजूनही याच भ्रमात आहेत की आपण बाबासाहेब ब दुद्धाचं नाव घेऊन राजकारण खेळू शकतो. काल मायावतीने कस्तूरचंद पार्क, नागपुरात याचंच दर्शन घडवलं. बाई म्हणली की मी हिंदू धर्म सोडेन... कोणाच्या पुढे तर, बौध्दांच्या... म्हणजे बाई आजही किमाण ३० वर्षे काळाच्या मागे चालत आहेत. तीस पसतीस वर्षा आधी अशा वाक्यांनी पुढे बसलेला बौद्ध भारावून जात असे व कोणीतरी नवा हीरा आपल्यात येणार म्हणून मग त्याला राजकीय शक्ती प्रदान करत असे. त्यातूनच मग आंबेडकरी विचाराचा आव आणणारे लबाड लांडगे मोठ्या पदावर बसत गेले. पण मागच्या तीस पस्तीस वर्षात आंबेडकरी विचाराचा आव आणण्याचा खेळ नेमका कोणत्या हेतूने खेळला जातो हे आंबेडकरी जनतेस अचूक ओळखले आहे. आता कोणी भारावून बिरावून जात नाही. आजचा बौद्धा खूप हुशार असून निळे झेंडे नुसतेच नावाचे आहेत हे ओळखून आहे. म्हणून मग नागपूर सारख्या शहरात जिथे आंबेडकरी मतदार मोठ्या प्रमाणात आहे तिथे निळे सरदारांची दाणादाण उडत असते.... अन ही कोणी त्रैयस्थ उडवत नाही तर आपलेच निळे सैनिक जे त्या झेंड्याला आतून सलाम करतात तेच झेंडा धरुन हिंडणा-याचा पाडाव करत असतात. कारण निळा सैनिक झेंडा धरुन हिंडणा-या पुढा-याची लबाडी ओळखून आहे.
त्यामुळे मायावती बाईनी हिंदू धर्मात राहिलं काय... किंवा बौद्ध धम्म स्विकारलं काय... दोन्ही केसमध्ये आता निळा सैनिक यांच्या लबाड्यांना फसणे तसे अवघड आहे. तो फसत नाही हे कळायला आजून दोन निवडणूका जावे लागतील बहुतेक. अन तोवर मायावती सुधारल्या नाही तर तिचा पूर्णपणे राजकीय़ अस्त झालेला असेल. राहिला प्रश्न तिच्या बौद्ध धम्माचा.... अशा लबाड बाईचं तसही बौद्ध धम्मात काही काम नाही. तरी हा मायावी अंत बुद्ध चरणी होतो की नाही ते काळच सांगेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा