मंगळवार, १९ डिसेंबर, २०१७

राहूल - गांधीमुक्त कॉंग्रेसची सुरुवात झालीय!Image result for rahul gandhiगुजरातच्या निवडणूकांचा निकाल लागून एक दिवस उलटला व आता मुख्यमंत्री कोण यावर चर्चा सुरु झाल्यात. यात भाजपच्या जागा कमी झाल्या तरी त्यांना मिळालेली मतांची टक्केवारी मागच्यापेक्षा वाढलेली आहे. त्यामुळे कमी झालेल्या जागांवरुन कितीही कल्ला केला तरी भाजपचा मतदार निसटून गेलेला नाही याची ही साक्ष आहे. याच्या अगदी उलट कॉंग्रेसच्या जागाही वाढल्या व मतदारांची टक्केवारीही वाढली यात मात्र घोळ आहे. तो घोळ म्हणजे मिळालेलं यश ही निव्वड कॉंग्रेसची कमाल नसून हार्दीक-अल्पेश-जिग्नेश या तिकडीच्या मदतीतून मिळालेली उभारी आहे. याचा अर्थ राहूलची जादू चालली असा निघत नसून स्थानीक पातळीवरील नेत्यांनी राहूलच्या लढाईत कॉंग्रेसचे स्थान भक्कम करुन दिले असा होतो. पण तमाम बुद्धीवादी मात्र या तिकडीचं योगदान दुय्यम स्थानी ढकलत राहूलचा ढोल बडवायला लागले आहेत. म्हणजे परत एकदा प्राप्त परिस्थीतीचं चुकीचं अवलोकन व चुकीचं चित्रण सुरु झालय. काही वृत्तपत्रांनी तर चक्क राहुलचं व्यक्तिमत्वच बदललं, तो खूप भारी झालाय, लढावू झालाय वगैरे स्तुती आजच्या वृत्तपत्रातून पहिल्या पानावर छापलीये. याला भाटगिरीचा अस्सल नमूना म्हणतात. अन याच भाटगिरीने कॉंग्रेसला वास्तवापासून कायम दूर नेले व त्यातूनच मग कॉंग्रेसला मारक असलेली परिस्थीती निर्माण झाली तरी वरिष्ठांना त्याची भनक लागत नव्हती. मग सुरु झाला कॉंग्रेसचा पाडाव. तो पाडाव कॉंग्रेसला इतका पोखरत गेला की आज कॉंग्रेस फक्त ४ राज्यां पुरती नाममात्र होऊन बसली आहे.
गुजरातच्या विजयात दोन संदेश आहेत. एक म्हणजे भाजपचे दिवस भरत आलेले आहेत. अन दुसरं म्हणजे राहूल गांधी कायम पप्पूच राहणार आहे. पहिला संदेश भाजप कसं घेतो ते येणा-या काळात कळेलच. कारण मिळालेली टक्केवारी जरी जास्त असली तरी जिंकणा-या जागांमुळे तुमचं स्थान ठरत असतं. ते गुजरातेत डगमगायला लागले हे वास्तव आहे. १५० जागांची बढायी मारणारा अमीत शहा तसा शाहणा आहे. १५०चं  ९९ होणं तो किती सिरियसली घेतो व पुढे काय नियोजन करतो ते कळेलच, त्यावर आताच मतप्रदर्शन करणं योग्य ठरणार नाही. पण हे जर असच चाललं तर भाजपचा अतिआत्मविश्वास त्यांना नडणार व त्याची सुरुवात त्यांच्याच गृहराज्यातून झाली एवढं मात्र नक्की.
मोदी व काही गिनेचुने नेते सोडले की भाजप हा तसाही लोकांना आवडणारा पर्याय नक्कीच नाही. तरी त्यांना सत्ता मिळत आहे याची दोन कारणं एकतर कॉंग्रेस व टीमचा मागील १०-१५ वर्षाचा सत्तेचा अनुभव येथील मतदाराला फारसा आवडलेला नाही. व दुसरं कारण म्हणजे कॉंग्रेस आजही लोकांना आवडेल असा पर्याय देण्यात अपयशी ठरत आहे. या दोन कारणामुळे लोकं भाजपला मत देत आहेत. इथे गुजरात हे एकमेव निकष न मानता इतर राज्यात भाजपला मिळणारा कल पाहता असा निष्कर्ष काढत आहे. याचा दुसरा अर्थ असा निघतो की भाजपला मिळणारं मत हे भाजपच्या कर्तबगारीमुळे मिळत नसून कॉंग्रेसचे वरील दोन घटक त्यास कारणीभूत आहेत. त्यातला पहिला घटक “कॉंग्रेस बद्दलची नाराजी” ही तात्पुरती असून काही काळानंतर लोकं ती विसरुन जातील. पण दुसरं कारण मात्र दुर्लक्षीत ठेवून चालणार नाही. कॉंग्रेसला सत्तेत येण्यासठी मतदाराला भाजपच्या सत्तेचा कंटाळा येईस्तोवर वाट पहावी लागेल किंवा तुल्यबळ चेहरे नि भाजपला पुरुन उरतील असे पर्याय जागोजागी उभे करावे लागतील.
यात पहिल्याच झटक्यात कॉंग्रेस मात खाते. कारण कितीही आव आणला तरी राहूल गांधी हा काही मोदीला पर्याय ठरु शकत नाही. म्हणजे मोदी जोवर राष्ट्रीय राजकारणात आहेत तोवर राहूल व त्याची कॉंग्रेस यांचा राष्ट्रीय राजकारणात काही टिकाव लागू शकणार नाही. म्हणजे मोदी आहे तोवर राहूल हा राष्ट्रीय पप्पू ठरलेला आहे. त्याची कायमच टिंगल टवाळी होत राहील. कारण राहूल गांधी कुठल्याही अर्थाने खूप सिरियसली घेतल्या जावं असं व्यक्तीमत्व नक्कीच नाही. बाप-आजोबाच्या आशिर्वादाने जेवढी मजा करता येते त्यापेक्षा कैक पटीने अधीक मजा त्यानी करुन घेतली आहे. आता इथून सुरु होतो त्याचा पाडाव. हा पाडाव राहुलचा तर सत्यानाश करणारच पण तो जेवढा जास्त काळ कॉंग्रेसची सुत्रे हातात ठेवेल तितकं जास्त कॉंग्रेस पोखरुन निघेल. म्हणजेच तेवढाच  जास्त काळ भाजप हा सत्तेत टिकून राहण्याची शक्यता वाढत जाईल. राष्ट्रीय राजकारणात राहूल हा ख-या अर्थाने भाजपसाठी फायद्याचा माणूस आहे. राहूल गांधी पक्षाचा अध्यक्ष असणे व पंतप्रधान पदाची स्वप्ने पाहणे म्हणजे भाजपची केंद्रातील सत्ता अधीक बळकट होत जाणे असं ते समिकरण असेल. हे जितकं दिघकाळ चालेल तितकीच भाजपची सत्ता दिर्घायू बनत जाईल. अंगात कोणतीच कर्तबगारी नसतांना राष्टीय पक्षाचा हेड बनणे म्हणजे त्या पक्षाची व तमाम कार्यकर्त्यांची वाट लावणे होय. ती राहुलबाबा पद्धतशीरपणे लावत असून सध्याचे कॉंग्रेसी ती लावू देत आहेत. कारण या कणा नसलेल्या कॉंग्रेसींमध्ये स्वबळावर पक्षात जान फुंकण्याची धमक नाही. व बाहेर पडून काही करण्याची कुवत नाही. मग राहुलमुळे काही मिळालं तर मिळालं... या भावनेतून गुपचूप बसलेले हे कॉंग्रेसी एका टप्प्यावर सगळं असाह्य झालं की बंडावर उतरतील. ती वेळ किती वर्षानी येईल ते आता तरी सांगता येणार नाही. पण नव्या दमाचे कॉंग्रेसी जेंव्हा केंव्हा बंडावर उतरतील तेंव्हा नुसतं राहुलला कॉंग्रेस बाहेर काढून फेकतील असं नाही.... तर राहूल गांधी हा कॉंग्रेसवर हक्क सांगणारा शेवटचा गांधी असेल.
नव्या पिढीला तसही घराणेशाही फारशी पसंद नाही. तरी जुन्या कॉंग्रेसीना त्याची सवय झाल्यामुळे राहुल गांधी यावेळेस पक्षाध्यपद मोठ्या लबाडीने घश्यात घालून बसलाय. पण पुढच्या ५ ते १० वर्षात येणारा नवा कॉंग्रेसी कार्यकर्ता यापेक्षा अगदी वेगळ्या मेंटालिटीचा असेल. त्याला कॉंगेसमध्ये गांधी या नावापेक्षा कर्तबगारीची असलेली गरज अधीक जाणवेल. मोदी व टीमची विजयी घोडदौड हे कर्तबगारीला मिळालेला कल आहे हे उमगलेला नवा कॉंग्रेसी, पक्षातील घरणेशाहीला नापसंद करणारा असेल. या विचाराला दुस-या बाजूनी नव्या मतदाराचीही जोड मिळत जाईल. हा नवा मतदार मत देताना आजच मोठा चोखंदळ बनलाय, येणा-या काळात तो अधीक सजग नि परिपक्व असेल. या सगळ्याचा एकूण परिणाम म्हणून कर्तबगारी नसलेले सगळे नाममात्र नेते बाहेर फेकले जातील. यात सगळ्यात वरच्या क्रमांकावर ते असतील जे घराणेशाहीतून राजकारणात शिरकाव करुन बसलेले आहेत. राहूल गांधी हे नाव अशा यादीत सगळ्यात वरच्या क्रमांकावर असेल. एकदा मतदारांनी नाकारले की गांधी नावातील जादू शुन्यावर जाऊन पोहचेल. एकदा गांधी या नावाचं मुल्य शुन्यावर गेलं की राहुलची कॉंग्रेसमधून हाकलपट्टी अटळ असेल. ते व्हायला फार फार तर पुढच्या दोन निवडणूका पुरुन उरतील.
अंगात कुठलिही कर्तबगारी नसताना केवळ गांधी हे नाव धारण करुन कॉंग्रेसचे अध्यक्ष बनून बसलेला हा पप्पू हा कॉंग्रेस पक्षाचा गांधी घराण्यातून बनलेला शेवटचा अध्यक्ष असून त्याला पिटाळण्याची प्रोसेस खरतर सुरु झाली आहे. ती आता इतक्या प्राथमिक अवस्थेत आहे की ती सुरु झाली हे कोणाला पटणारच नाही. पण गांधीमुक्त कॉंग्रेसची सुरुवात झालीय एवढी मात्र नक्की!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा