शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

मोदी-शहाला रोखायचं कसं?Image result for modi shahमोदी-शहाच्या जोडीने भारतीय राजकारणात जो धुमाकुळ घातलाय त्यातून सगळेच राजकारणी हैराण झाले आहेत. या जोडीला रोखायचं कसं हा सगळ्याच्याच चिंतनाचा विषय बनायला हवा होता पण तो चिंतेचा विषय बनून गेलाय. चिंतेच्या अवस्थेतून बाहेर पडल्याशिवाया चिंतनाकडे जाता यायचे नाही. एकदा चिंतनाच्या टप्यात आलात की विषयाचा निकाल कसा काढायचा याचे मार्ग सापडत जातील. गुजरात सारख्या लहानशा राज्यातून आलेली ही जोडी जो काही हाहाकार उडवून देत आहे त्यातुन बसणारे हादरे तमाम राजकीय धुरंधराना पळताभूई थोडी करुन सोडत आहे. सुरुवातीला यांच्यावर हिंदुत्वाचा ठप्पा मारुन त्याना पिटाळण्याच प्रयत्न झाला. पण त्यातून फायदा होण्यापेक्षा नुकसानच होत गेले. हा हा म्हणता यूपी सारखा सगळ्यात मोठं राज्य हातून निसटलं व काहितरी भूलभूत चूक झाल्याचं लक्षात आलं. त्यात हिंदूत्व हा मुद्दा बदलेल्या समिकरणात राजकारणासाठी मारक नसून प्राप्त स्थितीत तो तारक असल्याचं सिद्ध झालं. हिंदू द्वेषातून होणारी ही हानी टाळण्यासाठी मग थोडा विचार सुरु झाला. आजवर मुस्लीम एकगठ्ठा मतं मिळविण्यासाठी केलेला हिंदु द्वेष आता एका टप्यावर आपल्याच अंगलट येताना दिसल्यावर भुमिका बदलत कॉंग्रेसनी गुजरातेत चक्क भगवे टिळे लावून प्रचार करण्याचा पवित्रा घेतला. हिंदू द्वेष ते सौम्य हिंदूत्व असा झालेला कॉंग्रेसचा प्रवास येणा-या काळात लवचिक राहून राजकारण केले जाईल याची साक्ष आहे.
मोदीनी विकासाच्या नावावर देश ढवळुन काढतांना विरोधक मात्र मोदीतील मुस्लीम द्वेष या एकाच घटकावर फोकस करुन निवडणूका लढल्या व हरल्या. त्यामुळे हारण्याचे कारण नक्की कोणते हे शोधताना गोंधळ उडत आहे. मोदीना विकासामुळे मतं मिळत आहेत की हिंदू मतदारांच्या प्रेमामुळे मोदी जिंकत आहेत हे नक्की सांगता येईनासे झाले. मग त्यातून भलताच मार्ग काढण्यात आला तो म्हणजे तमाम पुरोगाम्यांची मोट बांधून मोदीविरोधी लढा उभारणे. हा लढा तसा बिहार राज्यात यशस्वी झाल्याचं वाटलं खरं पण तो नुसताचा फसवा आभास होता हे उत्तर प्रदेशच्या निवडणूकीत अशा तमाम बळजबरीने बंधालेल्या मोटिनी सपाटून आपटल्यावर सिद्ध झालं. गुजरातेत या मोटबांधणीचा एक नवा प्रयोग करुन पाहण्यात आला पण तिथेही स्वत:ची पाट थोपटून घेण्यापलिकडे फारसं काही करण्यासारखं घ्डलं नाही. या सगळ्यातून एक गोष्ट मात्र अनुत्तरीतच राहिली ती म्हणजे ही मोदी-शहा जोडी जिंकतेय कशामुळे?
खरंतर मोदी-शहाचा विजय हा त्यांचा विजय नाहीच. त्या दोघांमध्ये अशी अचानक कोणतीच कर्तबगारी उफाळून आलेली नाही की ज्यामुळे तमाम मतदार भारावून गेलेत व त्यांना मत देऊ लागलेत. आजही भारतीय राजकारणातील नेत्यांबद्दल मतदाराच्या मनात फारसं विश्वासाचं नातं नाही. नेतेमंडळी म्हणजे लुटारु, बदमाश, गुंड व लबाड ही जनसामान्यात उमटलेली पुढा-यांची प्रतिमा. म्हणजे भारतीय राजकारण्याकडे इथला मतदार लबाड लांडगे म्हणूनच पाहात आला आहे. त्यात मोदी-शहा यांचही नाव यायला हवं होतं, पण त्यांची ब्रॅंडीग भलत्याच बाबतीत झाली... व ती इतकी टोकाची केली गेली की त्यांच्यातील लबाड राजकारनी मतदाराना दिसेनासा झाला. मागच्या तीन वर्षात या दोघानी केलेल्या लबाड्या लोकाना आता मात्र कळू लागल्या आहेत. १५ लाख बॅंकेत जमा करण्याचा वादा असो, आजुन कोणता चुनावी जुमला असो की जय शहाच्या कंपनीने घेतलेली आर्थीक भरारी असो... अशा अनेक घटनांतून ही जोडी लबाड आहे हे लोकांना कळायला लागलय. तरी लोकं मोदी शहाला मतं देत आहेत कारण हे दोघे इतर लबांडांपेक्षा जरा कमी लबाड एवढच काय ते या घटकेला लोकांना वाटतं. यांच्यातील लबाडाला झाकण्याचे काम विरोधकांच्या प्रचारानी बजावलं आहे. या दोघांना हिंदुत्वाची कवचकुंडलं चढविण्याचं पाप विरोधकांच्याच हातून घडत गेल आहे. मागच्या दिड दशकात अखंडपणे मोदीला मुस्लीम द्वेष्टा ठरवितांना अनावधानाने हिंदुचा एकमेव तारणहार अशी प्रतिमा उभी होत गेली. त्यामूळे हिंदूना काही कारण नसताना मोदी-शहा आपलेसे वाटू लागले आहेत. हे दोघे हिंदुत्ववादी आहेत याचा डांगोरा पिटतांना ते राजकारणी म्हणून लबाड आहेत ही गोष्ट सांगायची राहूनच गेली. त्यामुळे त्यांची राजकीय लबाडी सामान्यांच्या मेंदूवर आजूनतरी तेवढ्या तिव्रतेने उमटायची आहे. म्हणून मग ते इतर लबाडांच्या तुलनेत कमी लबाड ठरत गेले. यातुनच मग जनमानसात एक मानसिकता निर्माण झाली की वाईटातूनच निवडायचा आहे तर मग कमी वाईट निवडू या... अन त्यातून मोदी-शहा यांची फत्ते होत गेली.
थोडक्यात मोदी शहाच्या विजयाचं गूढ त्यांच्या कर्तबगारीत (३०%) आहे तर इतरांच्या बेजबाबदार वागण्यात (७०%) आहे. आज पर्यंत भारतीय़ राजकारणात सत्तेत असलेल्या पक्षांना राजकीय तिजोरीवर गायी बैलानी चरावे तसे चरुन घेतले. स्वत: चरताना पोटं भरली म्हणून थांबायला होते पण तसं न होता नातेवाईक, दुरचे नातेवाई, मित्र, व्यापारी पासून अनेकांना राजकीय पैसा चरायला मोकळा करुन देण्यात आला. सर्वत्र राजकीय यंत्रणा अधिकाधीक भ्रष्ट होत गेली. चिंदीचोर नेता राजकारणात गेल्यावर दोनचार वर्षात गडगंज श्रीमंत बनत गेला. त्यातूनच मग गाव गुंड व जमीन माफिया हा नवा प्रकार गल्ली बोळातून दिसू लागला. हे सगळं घडत गेलं राजकीय नेत्यांच्या अंधाधूद कारभारामुळे. दर पाच वर्षांनी मत देणारा मतदार हे सगळं मूक राहून पाहात होता. त्याला योग्य पर्यायाची अशा लागून होती. मधल्या काळात या आशा अपेक्षांना पल्लवीत करणारे अनेक चिरकूट पक्ष व नेते जन्माला आले. त्यानां मतही मिळाली,पण शेवटी हे नवनेते व पक्षा परत त्या पुराण्या पक्षांचं मांडलिकत्व स्विकारत मतदारांची दिशाभूल केली. राजकारण्यांविषयीची आस्था पार धुडीस मिळालेल्या या अवस्थेत मोदी नावाचा तुलनेने कमी भ्रष्ट नेता राष्ट्रीय राजकारणाच्या क्षितीजावर दिसला. मग जणू हाच तो देवदूत ज्याची आपण डोळे लावून वाट पाहत होतो अशा आवेशाने मतदार मोदीला मत देण्यासाठी तुटून पडला.... याच तुटून पडण्याला आपण मोदी लाट म्हणून ओळखतो.
ही मोदी लाट मोदीने निर्माण केलेली नसून सत्तेत बसलेल्या राजकारण्यांनी आपल्या भ्रष्ट कारभारातून व लबाड्या लांड्याच्या व्यवहारातून निर्माण केली आहे. मोदी फक्त त्या परिस्थितीचा लाभार्थी राहीला आहे, बास!
तर... मोदी-शहाच्या विजयाचं गमक त्यांच्या कर्तबगारीत दडलेलं नसून आजवर सत्तेत असलेल्या/उपभोगलेल्या नेत्यांच्या बेफिकीर वृत्तीत आहे, भ्रष्ट कारभारात आहे, गुंडपूंडाना जन्माला घालून सत्ता मिळविण्याच्या क्रिमिनल वृत्तीत आहे. त्यामुळे जर मोदी-शहाला हरवायचे असल्यास आधी जनमानसात निर्माण झालेली आपली ही प्रतिमा पुसावी लागेल. त्यासाठी खूप वेळ द्यावा लागेल. खूप कष्ट उपसावे लागतील. लोकांचा विश्वास जिंकावा लागेल. हे सगळं घळायला जेवढा वेळ द्यावा लागतो तो द्यावाच लागेल. उगीच आततायीपणा करुन भागणार नाही. हा झाला पहिला उपाय. दुसरा उपाय जरा भन्नाट आहे पण आहे खरा. तो म्हणजे मोदी-शहाला रान मोकळे करु द्या. म्हणजे त्यांना कारभार करायला जरा स्पेस द्या. 
मोदी व शहा यांच्यावरील टिका थांबवून तमाम विरोधकांनी त्यांना जरा सत्तेत रमू द्यावे. रोज सगळी उठून त्यांच्या नावानी शिमगा चालू ठेवल्यास त्यातून येणार ताण व पहारा यामुळे ना ते काम करणार, ना चुका घडणार. त्यांना थोडा स्पेस देऊन विरोधक बाजूला झाले की कामात बेफिकीरी येईल व चुका घडतील.. एकदा सत्तेत बसलेल्या माणसावरचा पहारा हटला की प्रमुखांनी नाही केला तरी त्यांची चिल्लेपिल्ले लगेच सोकावतात. मग त्यातून राजकीय चुका घडायला लागतात. या चुका पाहिल्या, दिसल्या तरी दोन तीन वर्षे न दिसल्याचं सोंग करुन प्रत्येक चुकीची नोंद करुन ठेवावी. बेफिकीर राजकारणी एक चूक करुन थांबत नसतो... तो आजून चुकांवर चुका करत जात असतो. हा सत्तेला मिळालेला सर्वात मोठा शाप आहे. अगदी प्राचिन काळापासूनचा इतिहास तपासल्यास हेच दिसते की सत्तेत बसलेल्यांना त्यांच्या चुकाच विध्वंशाकडे घेऊन जातात. विरोधकांनी त्या आजून घडाव्यात म्हणून थोडा सैलपणा दाखवावा. एकदा पुरेशा चुका घडल्या की त्याच मग सत्ताधिशांची नौका बुडवायचे कार्य बजावतात. आपण नुसता हात लावुन हळूच धक्का द्यायचा असतो. पण यासाठी संयम लागतो. या काळात जमल्यास आपली प्रतिमा सुधारण्याचे कार्य अखंडपणे चालू ठेवावे.
पण विरोधकांना तेवढा धीर दिसत नाही. लगेच मोदी-शहाला हरविण्यासाठी जंगजंग पछाडने सुरु आहे. प्राप्त परिस्थिती विरोधकांसाठी येणारे दोन-तीन वर्षे तरी सोयीची नाहीत हे स्पष्ट दिसत आहे. त्या काळात विरोधाचा सूर नको तेवढा ताणून स्वत:चा घसा दुखवून घेण्यापेक्षा गमावलेली प्रतिमा सुधारण्याचे काम चालू ठेवावे. त्याच सोबत सत्ताधीशांच्या चुकांवर लगेच तुटून न पडता चूप राहावे, म्हणजे चुकांची बेरीज वाढत जाईल व योग्य वेळी ती भक्कमपणे वापरता येईल. मोदी-शहाला हरविण्याचा यापेक्षा वेगळा मार्ग होऊ शकत नाही. स्वत:ची प्रतिमा सुधारणे व मोदी-शहाला चुका करु देणे याचं एक उत्तम मिश्रण तयार करावं लागेल. ते संयमानी, धीटाईनी व योग्य नियोजनातूनच होऊ शकतं. उगीची हल्ला-बोल वगैरे खोटा आव आणून होणार नाहीये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा