बुधवार, १३ डिसेंबर, २०१७

गुजराती मनातील गूढ!Image result for bjp gujratसध्या गुजरात निवडणूकीवरुन सर्वत्र संभ्रम वाढविण-या बातम्या येत आहेत. कॉंग्रेस व रागा पार्टीला असे वाटते की यावेळेस गुजरातेत कॉंग्रेस नक्की निवडून येईल. तर भाजपवाल्यांना भीती वाटत आहे की यावेळेस निवडून येऊ की नाही नक्की सांगता येण्यासारखी परिस्थीती नाही. थोडक्यात दोन्ही पक्षाना जे वाटते त्या बद्दल दोघेही संभ्रवास्थेत आहेत. दोघांनाही ना जिंकायची खात्री आहे ना हरायची. या अशा परिस्थीतीत मीडिया मात्र अजून ती संभ्रावस्था वाढवित नेताना दिसतो. म्हणजे मीडियाला नक्की कळत नाहीये की गुजरातेत नेमकं काय घडणार आहे. मत चाचण्या व एक्झीट पोलची विश्वासार्हता मोदीच्या एन्ट्रीने मागच्या दोन तीन वर्षात अशी काही वाहून गेली की आजचे दर्शक हा सगळा प्रकार निव्वड मनोरंजन म्हणुन बघायला तयार नाहीत. तर एकूण परिस्थिती अशी असतांना माझ्या सारख्या दूर बसलेल्या माणसाला मात्र गुजरातेत नक्की काय होणारा यांची कुठूनही नेमकी बातमी कळने अवघड होऊन बसले आहे.
गुजरातेत मागील २२ वर्षापासून भाजप सलग सत्तेत आहे. त्यामुळे “Anti-incumbency” म्हणजे सत्तेत असलेल्या पक्ष व मशीनरीज विरोधात जनतेनी रोष प्रकट करणे अपेक्षीत आहे व ते नैसर्गीक आहे. म्हणजे यावेळेस “Anti-incumbency” फॅक्टर गुजरातेत नक्की चालायला हवे. पण ते खरच चालेल की नाही याची एकालाही खात्री नाही. म्हणायला भाजपला तशी थोडी भिती जरुर आहे व अमीत शाह ने तसे बोलूनही दाखविले आहे. पण खरच हा फॅक्टर चालेल का? यावर कोणीच ठाम नाही. खरतर पक्ष कोणताही असो, तो प्रदीर्घ काळ असत्तेत असला की कामात एक उदासीनता येते. बेफिकीरी व थोडा उर्मटपणाही येतो. अन भ्रष्टाचारही होतो. या सगळ्याचा परिणाम ज्याला भोगावा लागतो तो मतदार असतो. मग दोन-तीन टर्म सलग सत्तेत असलेल्या पक्ष्याला मतदार कंटाळून जातो व जो काही नवा पर्याय उपलब्ध असतो त्याला निवडून देतो. त्यामुळे  या अशा विजयात जिथे “Anti-incumbency” घटकांनी सत्ताधीशांना हटविलेलं असतं तिथे निवडूण आलेल्यांनी हरकून जाण्याचे कारण नसते. कारण यात जिंकणा-यांची कर्तबगारी नसते तर सत्तेत असलेल्या पक्षाला कंटाळून लोकांनी उपलब्ध पर्यायातून एकाला सत्तेपर्यंत पोहचविले असते, एवढाच त्याचा अर्थ असतो.  अन निवडणूकीच्या आधीपासून या बदलाची चाहूल सगळ्यांना लागलेली असते. तसेच सत्तेत बसलेल्या पक्षालाही याची जाणीव असते.
पण गुजरातचे राजकारण मात्र भलतेच गूढ बनत चालले आहे. एवढ्या वर्षे सत्तेत असुनही भाजपच्या विरोधात गुजरात खूप तापले असे दिसत नाहीये. सत्तापक्षाच्या विरोधात मतदान होईल याची खात्री कोणालाच न वाट्णे आवाक करणारे आहे. त्याच बरोबर “Anti-incumbency” घटक नावाचा जो प्रकार असतो जो सत्ताधीशांचा वीट आल्यामुळे सत्तापालट घडवत असतो तो गुजरातच्या बाबतीत कुठेच ठळकपणे अधोरेखीत न होणे बुचकळ्यात टाकणारं आहे. गुजरातचा मतदार भाजपला कंटाळला नाही असे अजिबात नाही. तरी तो दुसरा पर्याय निवडण्यास फार उत्सूकता दाखवत नाही किंबहुना तशी हवा तयार होत नाहीये याचा नेमका अर्थ काय? एकतर गुजराती माणूस मुर्ख आहे किंवा त्याची हुशारी कळावी इतकी हुशारी आपल्याकडे नाही. जे काही असो... गुजरातच्या निवडणूकीचे प्रचार थांबले असून मतदानाला शेवटचे दोन दिवस असताना सलग सत्तेचा मतदाराला वीट आला की नाही किंवा आला, हे न कळणे म्हणजे फक्त तेवढेच न कळणे नसून आपल्याला अजून बरेच काही कळत नाहीये असा त्याचा अर्थ निघतो. मग हे नकळालेले बरेच काही म्हणजे नेमके काय? याचा मीडियाला पत्ताच नाही असे होवू शकत नाही. हे न कळलेले बरेच काही नेमके काय आहे ते मीडिया जाणून आहे, फक्त सत्य न सांगण्याची लबाडी मीडियाकडून होत असावी एवढच म्हणता येईल.
यात आजून एक महत्वाची बाब म्हणजे समजा कॉंग्रेस जिंकलीच... तर तो कॉंग्रेसचा विजय नसणार तर गुजरातेत सलग सत्तेत असल्यामुळे लोकांनी भाजपला बाजूला सारले एवढाच त्याचा अर्थ निघतो. राहूल व त्याची टीम गुजरातेत ठाण मांडून बसली व जे काही वादळी प्रचार करत आहे तो निव्वड प्रचारा पुरतीच मर्यादीत राळ असून त्यामुळे अचानक कॉंग्रेसच्या कर्तबगारीत काहीतरी भरीव वाढ झाली असा अर्थ होत नाही. किंवा अचानक कॉंग्रेसमध्ये काहीतरी गुणात्मक बदल घडला, ज्यामुळे गुजरातेत त्याला लोकांनी पसंदी दिली असाही अर्थ होत नाही. तर कॉग्रेस विजय झाल्यास त्याचा एकच अर्थ निघतो किंवा मीडियांनी काढायला पाहिजे तो म्हणजे सलग सत्तेत असलेल्या भाजपवर मतदारांनी रोष व्यक्त केल्याचा परिणाम म्हणून कॉंग्रेस आली... ना की कॉंग्रेसची कर्तबगारीमुळे. हा एवढा जरी प्रामाणीकपणे दाखविला, तरी मीडिया तत्वाला जागली असे म्हणता येईल.   
असो गुजराती गूढकथा कोणत्या दिशेनी चालली आहे ते आज नाही कळले तरी १८ ला कळणार आहे. बघू या...गुजराती मनातील गूढ काय आहे ते!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा