बुधवार, १० जानेवारी, २०१८

लाल सलाम-४ : क्रांती अटळ आहे!Image result for lal salamभीमा कोरेगावच्या निमित्ताने सध्या लाल सलामला देशभर तात्पुरती उभारी मिळाली असून त्याला पूर्णपणे एन्कॅश करण्याचं काम कमुनिस्टांनी चालविलं आहे. लोहा गरम है हतोड मारदो तत्वाला धरुन मग जिग्नेश मेवानीने ९ जानेवारीला दिल्लीत मोर्चा काढला तर त्याच पुण्यात परत एकदा यांच्या चिल्ले पिल्ले संघटनांनी  जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात आता कन्हैया कुमारला बोलविण्याचे जाहीर केले आहे. हा सगळा प्रकार आततायीपणाचा असून संघटनेची मरगळ झटकण्यासाठी सध्याच्या परिस्थीतीचा व सामाजीक असंतोषाचा वापर करुन घ्यायची कोणतीच कसर लाले सोडणार नाही असे दिसते. शनिवारवाड्याची “एल्गार परिषद” झाल्यावर आयोजक नि वक्ते यांचा संबंध नक्षलवाद्यांशी जोडला गेला. तसा तपासही सुरु झाला, पण बुद्धीजिवी लोकं मात्र हे साफ  नाकारत असून नक्षलवादाचं सोयीचं Interpretation करुन लाल्यांना निर्दोषत्व बहाल करत आहेत.मुळात नक्षलवादी म्हणजे रानात बंदूका धरुन लढणारा असं interpretation केलं जातं पण ते चूक आहे. नक्षलवादी म्हणजे रानात उभा असलेला सशस्त्र लढवय्या नाहीच मुळी. रानातला बंदुकधारी हा नक्षल चळवळीचा सगळ्यात खालचा सदस्य आहे. शस्त्रधारी सदस्याला नक्षल चळवळीत ना निर्णय घेण्याचा अधिकार असतो ना विचार करण्याचा अधिकार असतो. तो तर संघटनेतील वरच्या सदस्यांच्या आदेशाचे पालन करणारा एक खालच्या पातळीवरचा चळवळ्या आहे. मग प्रश्न उठातो की रानात बंदूक धरुन हिंडणारा नक्षली जर या चळवळीतला सर्वात खालचा सदस्य आहे व त्याला चळवळीतल्या एकूण निर्णयात कोणताच अधिकार नसतो वा सहभाग नसतो तर मग नक्षल चळवळ नक्की आहे तरी काय?
नक्षलवाद हे कमुनिस्ट चळवळीचं भारतीय वर्जन आहे.
मुळात नक्षलवाद ही मुख्य चळवळ नसून ती जागतीक पातळीवर चालविल्या जाणा-या कमुनिस्ट चळवळीची भारतीय आवृत्ती (वर्जन) आहे. जगात कमुनिस्ट चळवळीचा पाया कार्ल मार्क्स नावाच्या विचारवंतानी घातला. त्यात त्यानी स्पष्ट लिहलं की कामगारांची हुकूमशाही आणणे हा या चळवळीचा उद्देश असून संपत्तीचे समान वाटप हे ध्येय आहे. त्यातून वर्गभेद मिटून समाजाचा दुखणं जाईल अशी त्याची मांडणी आहे. मग त्यातून प्रेरीत होऊन जगभरातील कामगारांनी कमुनिस्टचा लाल झेंडा हाती घेऊन लढा उभारला व त्यात पहिलं यश रशियात मिळविलं गेलं.
रशियन आवृत्ती: कामगार चळवळ
लाल लढ्याची मांडणी कार्ल मार्क्सनी केली तरी त्याची खरी अमंलबजावनी लेनीनने केली. लेनीनने लाल लढा उभारतांना रशीयातील तमाम कामगारांना एकत्र करुन लढा उभारला. एवढच पुरेसं नव्हतं हे ओळखलेल्या लेनीनने कामगारांना भांडवलदाराच्या विरोधात भडकवितांनाच राजकीय आघाडी उघडून झारच्या विरोधात भडकवत नेलं. लाल लढा जरी कामगारांच्या नावाने उभा झाला तरी त्याचा उद्देश सत्ता होता व त्यासाठी दुसरी आघाडी होती.  झार नि भांडवलशाही असे दोन शत्रू व त्यांच्याशी लढण्यासाठी कामगार नि राजकीय पक्ष असे दोन आघाड्या उघडण्यात आल्या व रशियात क्रांती घडवून आणली गेली. या एकूण लढ्यात सर्वात महत्वाची गोष्ट ही होती की लेनीनच्या लढ्यात रशियातील शेतकरी याचा सहभाग नव्हता. लेनीन तर शेतक-यांना चक्क शिव्या हासडायचा. रशियन लढ्यात शेतकरी लाल-सलाम वाल्यांचा विरोधक जरी नसला तरी सोबती नव्हता. शेतकरी हा लेनीन व त्याच्या लाल्यांद्वारे सर्वाधिक तिरस्कार केल्या गेलेला गट होता. त्यामुळे रशियन क्रांतीत रशियन शेतक-याचं कोणतच योगदान नव्हतं ही नोंद करुन ठेवणारी बाब आहे. तर हे झालं रशियन मॉडेल.
चीनी आवृत्ती: शेतकरी चळवळ
लेनीनच्या लढ्याचं व कमुनिस्ट चळवळीचा शिरकाव चीनमध्ये झाला. कामगारांची क्रांती म्हणत चीनमध्ये घुसलेला हा लाल लढा पार नापास झालेला होता. कारण चीन व रशीया यातील परिस्थीतीत मूलभूत फरक होता. चीन हा कामगारांचा देश नव्हता तर तो पक्का शेतक-यांचा देश होता. रशियन क्रांती शेतक-यांना शिव्या हासडत घडलेली होती. ती जशीच्या तशी चीनमध्ये राबविणे शक्य नव्हते. इथला सगळाच समाज शेतकरी. अन लाल सलामच्या तत्वज्ञानाप्रमाणे हे सगळे बुर्ज्वा ठरत होते.  थोडक्यात इथे क्रांती करायची तर लाल सलामच्या मूलभूत तत्वज्ञानात थोडा बदल करुन त्याची स्थानिक पातळीवर सूट होणारी आवृत्ती चीनी लोकांसामोर मांडणे गरजेचे होते. अन योगा योगांने माओ हा शेतकरी कुटूंबातून आलेला कमुनिस्ट लढवय्या होता. त्याचा रशियन कमुनिस्टांना मोठा उपयोग झाला. माओनी चायनीज साहित्यात कुठेच शेतक-यांचा इतिहास व लेखन का नाही म्हणत रान उठविले होते. तिथेल्या साहित्यात व पुस्तकात फक्त हुजूर लोकांचाच इतिहास सांगण्याची पद्धत होती. त्यामुळे कोणत्याच पुस्तकातून वा इतिहासातून तोवर शेतक-याचा उल्लेख झालेला नव्हता. माओनी बरोबर हा धागा धरुन शेतक-यांच्या देशात शेतक-याचा इतिहास असायलाच हवा. आम्ही आमचा इतिहास लिहू. राजे व सत्ताधारी लोकांचा तिरस्कार आधीच होता, आता जोडीला शेतक-यांचा इतिहास ही "अस्मिता" उभी केली गेली. त्यातून मग  रान पेटविले व तमाम शेतकरी अस्मितेच्या प्रश्नासाठी लाल लढ्यात उडी मारू लागले. खरंतर शेतक-यांची अस्मिता वापरुन माओनी लाल लढा अधीक तीव्र करत नेला. मग त्यातून सत्ताधारी, राजे व लष्करी अधिका-यांच्या विरोधात देश पेटला व  चीनमध्ये "अस्मितेची" क्रांती घडली. पण त्या अस्मितेला नेमकं टिपून लाल क्रांतीसाठी वापरणारे माओ खरे हुशार. पुढे हेच माओ ती अस्मिता पार विसरुन जातात व लाल क्रांती घडली म्हणून सत्तारोहणाच्या भाषणात कामगारांची हुकूमशाही अशा मथळ्याखाली भाषण ठोकतात. थोडक्यात रशियन लाल क्रांती कामगारांची होती तर चीनची क्रांती शेतक-यांची अस्मिता पेटवून घडविली होती.
भारतीय आवृत्ती: नक्षलवाद चळवळ
लाल क्रांती चीन मध्ये यशस्वी झाल्यावर तमाम लाल्यांच्या अंगात स्फूरण चढले व आता पुढचा टार्गेट भारत असं म्हणत इथल्या कमुनिस्ट पिल्लावळांनी जोर लावला. सुरुवातीचे ५०-६० वर्षे कामगारांना घेऊन ही चळवळ शहरी भागात चालविली गेली. पण संपकरी वृत्ती स्वत:ला मारक ठरली व लाल्यांची कामगार चळवळ त्यांच्याच लोकांना देशोधडीला लावून उध्वस्थ झाली. म्हणजे कमुनिस्ट चळवळीची रशियन आवृत्ती भारतात फेल गेली. तरी हे सगळे कामगार नेते मृतावस्थेतील चळवळीला कोणी वाली मिळतो का म्हणून भटकत होतेच. त्याच दरम्यान बंगालमधील ’नक्षलबारी” नावाच्या एका लहानशा गावी चारु मुजूमदार नावाच्या एका तरुणाने स्थानिक जमीनदाराविरुद्ध शेतक-यांना धरुन सशस्त्र उठाव केला व या चळवळीने चीनी आवृत्तीच्या दिशेने प्रवास सुरु केला. मग तमाम शेतक-यांचा प्रश्न घेऊन हा लढा उभारला गेला. त्याच दरम्यान तेलंगणाता पिपल्स वार गृप व अशा अनेक छोट्या मोठ्या कमुनिस्ट संघटना उदयास आल्या. प्रत्येकांनी स्थानिक पातळीवर काम चालविले होते. पण या सगळ्यांच्या केंद्रस्थानी कार्ल मार्क्सची विचारधारा होती. भारतात लाल लढा मात्र कामगार पातळीवर आणि शेतक-यांचा पातळीवरही फेल गेला होता. 
कमुनिस्ट चळवळीला रशिया किंवा चीन या देशात सत्ता मिळवितांना खूप मोठा लढा उभारावा लागला खरा पण त्यातिल पॉझिटीव्ह बाजू ही की तिथे हा लढा खूप मोठा बनत गेला. त्यातून सत्ते पर्यंत पोहचता आले. पण भारतात मात्र १०० वर्षे प्रयत्न करुनही लढाच नीट उभा राहिला नाही. याचं कारण कमुनिस्टांना इथे सत्ता बदल घडविण्याची कुवत बाळगणा-या उद्रेकाची नाड सापडली नव्हती. स्वातंत्रपूर्व काळात रशियन मॉडेल म्हणजेच कामगारांना धरुन चालविलेली लाल चलवळ ५०-६० वर्ष खाऊन बसली व हाती काहीच लागले नाही. त्या नंतर चारू मुजूमदार व त्या विचारसरणीतून उभी झालेली शेतकरी व तत्सम वर्ग यांच्या बाजूने उभी झालेली लाल चळवळही (नक्षलवादी) नुसतीच वळवळ बनून राहीली. म्हणजे कमुनिस्ट चळवळीचा चायनीज मोडेलही भारतात नापास झाला होता. थोडक्यात नक्षलवाद म्हणजे काय? तर शेतक-यांना धरुन उभी केलेली भारतीय लाल चळवळ होय. 
शेतक-यांसाठी उभारलेली लाल चळवळ म्हणजे नक्षलवाद ही कामगारांची लाल चळवळ यापेक्षा वेगळी होती. कामगारांची लाल चळवळ संपाचा हत्यार घेऊन आली होती. पण शेतक-यांची लाल चळवळ(नक्षलवाद) मात्र थेट हत्यार घेऊन जमिनदारांचे मुडदे पाडू लागली. या दोन्ही चळवळीत हा भूलभूत फरक होता. याच्या जोडीला कमुनिस्टांची राजकीय चळवळ मैदानात होतीच. म्हणजे एकाचवेळी कमुनिस्टांच्या तीन वेगवेगळ्या चळवळी या देशात होत्या. कामगार चळवळ, शेतक-यांसाठी उठाव करणारी नक्षल चळवळ आणि राजकीय़ चळवळ या प्रमुख तीन चळवळीच्या व्यतिरिक्त अनेक छोठे मोठे लाल विचारी गृप इथे होतेच.  तिकडे चीनला कायमच भारताशी छुपे युद्ध करायचे होते व त्यासाठी या तीन लाल शक्तींना एकत्र आणणे गरजेचे होते. मग त्यातूनच पहिला प्रयोग झाला व तमाम छोटे-मोठे लढवैय्ये संघटनांना नक्षलवादी चळवळीत विलीन करुन नक्षलवादी चळवळीचे नाव २००८ मध्ये माओवादी असे करण्यात आले. हे नाव धारण केल्यावर लाल सलामचा चीनशी असलेला संबंध सुस्पष्ट झाला. त्या नंतर चीनी कमुनिस्टांनी समविचारी इतर घटक जसे की कामगार चळवळ नि राजकीय चळवळ यांचा माओवादी चळवळीशी समन्वय घडविण्याचे व ते एकमेकांना पुरक म्हणून काम करतील याची सोय लावली. अन अशा प्रकार भारतीय लाल चळवळ विविध गटात विभागूनही एक मेकांना पुरक बनून काम करु लागली.
ही लाल चळवळ प्रामुख्याने चार भागात विभागलेली आहे.  १) विचारवंत २) फायनान्सर ३) एन.जी.ओ. व ४) सशस्त्र क्रांतिकारी.  पहिले तिघेही शहरी भागात राहणारे असून त्यातील विचारवंत हे खरे सुत्रधार नि समन्वयक असतात. यातील खाशीयत अशी की हे  तिघेही चळवळीचे गुप्त घटक असून ते कधिही पुढे येत नाहीत. चळवळीची आखणी, निर्णय, पैसा व एकूण उचापती हे सगळं हेच लोकं ठरवत असतात. या चळवळीचा चौथा व सर्वात कमी अधिकार असलेला किंवा थोडक्यात सांगकाम्या स्वरुपाचा घटक म्हणजे रानात बसलेला यांचा सशस्त्र गट... ज्याला आपण आपल्या बुद्धीनुसार नक्षलवादी म्हणतो. याचे अधिकार इतके कमी आहेत की अगदी कंत्राटदारांकडून वसूल केलेली खंडणी सुद्धा तो स्वत:कडे ठेवू शकत नाही तर ती वरचे अधिकारी व संघटनेकडे पाठवित असतो. म्हणजे आपण ज्याला नक्षलवादी म्हणून गैरसमज करुन घेतो तो नक्षल चळवळीतील सर्वात खालचा व दुय्यम स्वरुपाचा कार्यकर्ता आहे. या चळवळीचे खरे सुत्रधार कधीच रानात जात नसून ते शहरी भागात उजळ माथ्यने फिरत असतात. ते चीन व तिथल्या सत्तेशी संधान बांधून आहेत. येणारा पैसा व शस्त्रे याचं सगळं नियोजन शहरातून हीच लोकं करत असतात. त्याच बरोबर विविध गटात विभागलेल्या कमुनिस्ट चळवळीला हे शहरी सुत्रधार एकत्र आणून चळवळ अधिक भक्कम करत असतात. रानातल्या चळवळ्यावर पूर्ण फोकस करतांना आपण या शहरी विंग कडे फारसं लक्ष देत नाही. पण रानातल्या तुकडीला बळ देण्याचं, पैसा व शस्त्र पुरविण्याचा सगळा कारभार शहरातून होत असतो. थोडक्यात नक्षलवादी म्हणजे रानातला बंदूकधारी नसून शहरी भागात बसलेले राज्यकर्ते, विचारवंत, फायनान्सर, एन.जी.ओ. आणि चीनच्या कमुनिस्टांशी संधान बांधून क्रांती घडवू पाहणारे सुत्रधार आहेत. या सगळ्यांना, जे लाल क्रांतीच्या विचारांनी प्रेरीत होऊन कार्ल मार्क्सला अपेक्षीत साम्यवादी सत्ता आणायची आहे, त्यांना नक्षलवादी म्हणायचे असते. नुसत्या रानातल्या बंदुकधा-याला नाही. या नक्षलवाद्यांनी आधी लाल क्रांतीचा रशियन मॉडेल व नंतर चायनीज मॉडेल राबवून पाहिले व दोन्ही मॉडेल भारतात अयशस्वी झाले.
नवी भारतीय आवृत्ती: निळ्या विचारात लाल मिसळण.
रशियन व चायनीज दोन्ही मॉडेल फेल ठरल्यावर कमुनिस्ट चळवळ मूळ भारतीय वृत्ती व चळवळीचा अभ्यास करु लागली. या मातीत उद्रेकाची कुवत बाळगणारा घटक नेमका कोण? याच्या शोधात लाल कार्यकर्ते लागले. त्यात मग त्यांना दिसला आंबेडकरी समाज. हा समाज इतकी ताकद बाळगतो की त्याच्या निळ्या रक्तात जर हा लाल लावा ओतला व त्याचा बुद्धीभेद करुन शासनाच्या विरोधात पेटविले तर भारतात कमुनिस्ट क्रांती घडू शकते. म्हणजे कमुनिस्टांचा रशियन मोडेल व चीनी मॉडेल दोन्ही मॉडेल भारतात गैरलागू असून लाल क्रांतीसाठी निळ्या विचारधारेत लाल क्रांती मिसळून एक नवा मॉडेल तयार केल्यास, त्यातून सत्ता हस्तगत होऊ शकते हे यांनी ओळखले. अन मग हळूच निळ्या चळवळीत घुसण्य़ासाठी यांनी बाबासाहेबांच्या नावाचा वापर सुरु केला.
मग त्यासाठी राजकीय मैदानात परास्त होऊन पडलेल्या प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यात आले. त्यानंतर कोरेगाव भीमाचा वापर करण्यात आला व आंबेडकरी समाजाला आपले वाटेल असा कमुनिस्ट विचारात फेरफार करुन लाल चळवळ आमच्या समाजा समोर सादर होऊ लागली. लाल्यांचा हा डाव ओळखलेले काही आंबेड्करी स्वत:ला यापासून दूर ठेवून आहेत. पण ज्यांना कमुनिस्टांचा डाव कळला नाही ते साधेभोळे मात्र लाल सलामच्या जाळ्यात ओढल्या जात आहेत. याची प्रचिती पुण्यातल्या एल्गार परिषदेत झाली. आता तर कमुनिस्टांनी पूर्ण जोर लावून निळा विचारधारेत लाल विचारधारा मिसळ्याचे काम सुरु केले आहे. ही सरमिसळ जितकी अधिक होत जाईल तितकी आंबेडकरी चळवळ खिळखिळी होऊन लाल चळवळ भक्कम होत जाणार. मग एकदा लाल विचार पुरेसा रुजला की आंबेडकरी सामाजाला धरुन काल क्रांती उभारता येईल. चीनमध्ये शेतक-यांचा इतिहास का नाही म्हणत शेतकरी अस्मिता पेटवून लाल क्रांती घडविण्यात आली होती. चीनी शेतक-याला कार्ल मार्क्सच्या विचाराशी काही देणे घेणे नव्हते. कमुनिस्टांनी स्थानिक प्रश्न पेटवून त्या आडून लाल क्रांती घडविली होती. भारतातही अगदी त्याच वाटेने लाल्यांचा प्रवास सुरु झालाय. आंबेडकरी व इतर बहुजन समाजाची अस्मिता पेटविण्याचे काम सुरु झाले आहेत. या अस्मितेच्या आडून लाल क्रांती घडविण्याचा डाव आहे. अगदी तसेच जसे चीनमध्ये केले. आणि कमुनिस्टांचा हा भारतीय मॉडेल जर यशस्वी झाला तर मात्र भारतात क्रांती होणे अटळ आहे. कारण आंबेडकरी समाज मुळात चळवळ्या आहे. पण बाबासाहेबांच्या विचारावर चालतो तोवर हा समाज कोणासाठीच घातकी नाही. पण का एकदा निळ्या विचारात लाल विचाराची मिसळण झाली की त्यातून उठणारा वादळ इतका उद्रेकी असेल की कोणतीच व्यवस्था त्यापुढे टिकणार नाही. निळ्या रक्तात मिसळलेली लाल क्रांती कमुनिस्टांचा तो भारतीय मॉडेल असेल जो फेल जाणे तसे अशक्यच.  दुर्दैवाने हा मॉडेल ऊभा झाल्यास क्रांती अटळ आहे.  

-जयभीम

३ टिप्पण्या:

 1. दलित आणि वनवासी समाज मूर्ख नाही. क्रांती म्हणजे काय हे माहित तरी आहे का तुम्हाला. शेतकरी आणि वनवासी बंधूंचे जीवन कसे बदलायचे. जीवन खरी क्रांती काय असते त्या साठी हरिद्वारला एकदा जाऊन या. विचार बदलतील. सकारात्म्क उर्जा मिळेल.

  उत्तर द्याहटवा
 2. भारतामध्ये अनेक नेते दलित आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच एकमेव दलित नेते आजवर या देशात होऊन गेले. बाबासाहेबानंतरच्या सर्व मंडळींचं ध्येय हे आपल्या प्रभावाचा एक टापू तयार करणे त्यातून सत्ता मिळवणे, सत्ता मिळाल्यानंतर सर्व मार्गानं आपल्या संपत्तीमध्ये वाढ करणे हेच राहिले आहे. 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरला बाबासाहेबांची पूजा केली की यांची समाजाबद्दलची कर्तव्य भावना संपते. आपल्या जातीचा ही मंडळी शस्त्र आणि ढाल असा दोन्ही प्रकारे वापर करतात.अॅट्रोसिटीचा गैरवापर याच गटाकडून सर्वात जास्त होतो.

  दलितांमधला दुसरा वर्ग हा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आहे. जो आपल्या नोकरीच्या कार्यकाळात मुख्य धारेपासून वेगळा राहतो. नोकरी संपली की त्यांना आपल्या या वेगळेपणाची आणि विशेषतेची किंमत हवी असते. राजकारणात जाणे किंवा एनजीओ काढणे हाच त्यांचा निवृत्तीनंतरचा उद्योग असतो.दलितांमधला तिसरा वर्ग आपल्या स्वकष्टानं उच्चशिक्षण घेऊन आपली प्रगती करतो. पण हा वर्ग स्वत:ला कुठेही दलित अस्मितेशी जोडत नाही. आपल्या परिवारासह महानगरातल्या शहरी जीवनाशी हा वर्ग एकरुप होतो.

  दलितांमधला चौथा वर्ग गाड्यावर झेंडे लावून दिवसभर गावात फिरणाऱ्या तरुणांचा आहे. ही मंडळी आपल्या या अवस्थेला समाजातल्या सर्वांनाच जबाबदार धरतात. गाड्यांचं पेट्रोल वाया घालणे, भरपूर दारु पिणे, एखाद्या राजकीय नेत्याच्या खासगी सैन्यातला शिपाई बनणे,त्यांच्या आदेशावरुन प्रसंगी राडे करणे याशिवाय हा वर्ग काही करत नाही. आपल्या वॉर्डातल्या दलित सेलचा प्रमुख होणे हेच त्यांचं आयुष्याचं ध्येय असतं. दलितांमध्ये या चौथ्या वर्गातल्या तरुणांची संख्या सर्वात जास्त आहे. याच चौथ्या वर्गातली काही मंडळी कोरेगाव भीमा प्रकरणानंतर रस्त्यावर राडा करण्यासाठी रस्त्यावर उतरली होती

  उत्तर द्याहटवा
 3. अगदी बरोबर...लाल चळवळ निळ्या चळवळीला पंखाखाली घेण्यासाठी आतूरलेली आहे.
  आणि प्रस्थापित व्यवस्था ही त्यासाठी अनुकूल आहे.

  उत्तर द्याहटवा