गुरुवार, ४ जानेवारी, २०१८

लाल सलाम-१ : आंबेडकर चळवळीची आत्महत्याच!Image result for lal salamजगात आंदोलनं खूप झालीत. ती कधी उत्स्फूर्तपणे तर कधी कटकारस्थनातून झालीत, कधी शह-काटशह यातून झालीत, तर कधी निव्वड स्वार्थातून झालीत. मग या आंदोलनातून कधी राजकीय व्यवस्था उलथवून लावल्या गेली तर कधी सत्ताधीशांची भर रस्त्यावर कत्तल केली गेली. त्यात रशियन क्रांती व फ्रेंच क्रांती या दोन क्रांत्या महत्वाचे स्थान बाळगतात. तर यापेक्षा थोडी वेगळी पण अमेरीकन सिव्हील वॉर ही सुद्धा एक जन आंदोलनातून निर्माण झालेली चळवळ होती जी पुढे युद्धाच्या टप्या पर्यंत जाऊन पोहचली. थोडक्यात चळवळ नि आंदोलन जगभरात सर्वत्रच झालीच पण या सगळ्य़ा चळवळी तात्कालीन स्वरुपाच्या होत्या. त्या जितक्या वेगाने उसळल्या तितक्याच वेगाने शमल्य सुद्धा. पण जगात दोन अशा चळवळी आहेत ज्या अखंडपणे २०० वर्षापेक्षाही अधीक काळ चालविल्या गेल्यात व आजही त्या चळवळी चालू आहेत त्यातली पहिली आंबेडकरी चळवळ नि दुसरी ही कम्युनिस्ट(साम्यवादी) चळवळ.
कमुनिस्ट चळवळ:
कम्युनिस्टांची साम्यवादी चळवळ कार्ल मार्क्सनी १८४८ रोजी जन्माला घातली तर ज्योतीबा फुले यांनी सुद्धा बरोबर त्याच वर्षी म्हणजे १८४८ रोजी भारतात मुलींची पहिली शाळा उघडून जातीव्यवस्थेच्या विरुध्दचा सामाजीक लढा उभारला. कमुनिस्ट चळवळीचा पाया होता भांडवलशाहीचा विरोध. जगात भांडवलशाहीमुळे कामगारावर अन्याय होत असून भांडवलशाही नष्ट करुन कामगारांची हुकूमशाही आणणे या तत्वावर कमुनिस्ट चळवळीची स्थापना व पुढील वाटचाल झाली. मग हे ध्येय कसे साधायचे याचही उत्तर कार्ल मार्क्सनी लिहून ठेवलय. तो म्हणतो हे ध्येय गाठण्यासाठी रक्तरंजीत क्रांती करायची व कामगारांनी हुकूमशाह बनायचे. बास! ही झाली कमुनिस्ट चळवळ. यातून सामाजीक हीत साधेल वगैरे गोष्टी सांगितल्या गेल्या. पुढे कम्युनिस्टांची चळवळ रक्तरंजीत इतिहास लिहीत निव्वड राजकीय चळवळ बनत गेली व १९१७ मध्ये रशीयात पहिली साम्यवादी सत्ता स्थापन झाली. त्यातून मग अर्धा युरोप लाल झेंड्याखाली येत गेलं व तिकडे शेवटी चीन सारखा अजस्त्र देश कम्युनिस्ट बनल्यावर तर उभ्या जगाला धडकी भरली. कारण रशीया व चीनच्या साम्यवादाने उभ्या जगाची वाटणी झाली. अर्ध जग कम्युनिस्ट व उरलेलं अर्ध नॉन कम्युनिस्ट. मग या नॉन कम्युनिस्टांमध्ये तमाम अरबी देश हे कट्टर इस्लामीक तर अमेरीका हा तेवढाच टोकाचा भांडवलशाही. मग फ्रान्स व ब्रिटन यांनी भाडवलशाहीवर समाजवादाचं आवरण पांघरलं. अशी ही वाटणी झाली. साम्यवादी चळवळ पुढे निव्वड राजकीय चळवळ बनल्यामुळे तिची सामान्य लोकांशी नाड तुटली व ती स्वत:लाच मारक बनत गेली. मग सर्वात आधी रशीया पडला व मग तमाम युरोपीयन चिल्ली पिल्ली साम्यवादी राष्ट्रे लाल झेंडा झुगारुन नव्याने उभी राहिली. अगदी चीन सुद्धा यातून बाहेर पडत राजकीय व्यवस्था साम्यवादी तर अर्थव्यवस्था भांडवलशाही असा अजब अवतार धारण करुन तग धरू शकला. तर कम्युनिस्टांची तीव्र राजकीय आकांक्षा त्याच्याच चळवळीस मारक ठरुन जनमानसांच्या मनातील स्थान गमावून बसली.

आंबेडकरी चळवळ:
ज्योतीबांनी सुरु केलेली सामाजीक चळवळ मात्र लोकांचं उत्थान घडवत अधिक बळकट बनत गेली. जातीव्यवस्थे विरुद्धच्या चळवळीचा आवाका आजून वाढत गेला. फुल्यांनी उभी केलेली ही चळवळ पुढे शाहू महाराजांनी चालविली. त्यानी शिक्षण व रोजगाराची उर्जा चळवळीत फुंकतानाच आरक्षणाची तरतूद आणून या चळवळीला अधिक भक्कम केले. पुढे हीच चळवळ बाबासहेबांकडे गेली व त्यांनी उत्तम नेतृत्व नि अचूक मार्गदर्शन करत या सामाजिक चळवळीला अशा टप्यावर नेऊन ठेवले की तिथून पुढे ही चळवळ आंबेडकरी-चळवळ म्हणून ओळखली जाऊ लागली.
बाबासाहेबांच्या मृत्यू नंतर या चळवळीचे नेतृत्व गाव नि गल्ली पातळीवर विभागले गेले तरी चळवळीचे नाव मात्र तसेच राहीले. मग त्यातून अनेक राजकीय पक्षांचा जन्म झाला, अनेक सामाजीक संघटना उभ्या राहील्या पण या सगळ्यांची ओळख मात्र आंबेडकरी चळवळ अशीच राहीली. या चळवळीचा मूलभूत सिद्धांत होता तो म्हणजे स्वातंत्र्य, समता व बंधुता अन मार्ग मात्र अहिंसेचा. पुढे या अहिंसेला भारतीय संविधान व संविधानिक मुल्ये याची जोड मिळाली व आंबेडकर चळवळ ही अधिक व्यापक नि लोकाभिमूख बनत गेली. मग त्यातूनच या चळवळीची गरज राजकीय पक्ष व इतर संघटना यांना भासू लागली. पुढे ही चळवळ राजकीय आखाड्यातील Key-Role Player बनत गेली व त्यातून मग स्वार्थी आंबेडकरी चळवळे जन्मास यायला लागले. तरी या सगळ्या अवस्थांमधून जाताना आंबेडकरी चळवळीने कधीच प्रमुख मुल्यांशी फारकत घेतली नाही. म्हणून ती सामान्य लोकांशी नाड जोडून होती.
याच्या अगदी उलट भारतातील कम्युनिस्टांची चळवळ जनमानसांच्या नजरेतून उतरत गेली. स्वातंत्र्योत्तर काळात तर कम्युनिस्टांची ओळख ही संपकरी अशीच बनली व त्यातून रोजगार मिळण्यापेक्षा हाती असलेला रोजगार गमाविण्याच्या उचापत्याच कम्युनिस्टांनी घडविल्या. त्यामुळे कम्युनिस्टांशी जुडलेला प्रत्येक कार्यकर्ता संपकरी वृत्तीमुळे देशोधडीला लागत गेला व जनमानसांच्या मनातून कम्युनिस्ट विचारधारा उतरू लागली. भारतातील कामगार समाज जो कधिकाळी कम्युनिस्टांची ताकद होता तो कम्युनिस्टांना सोडून गेल्यावर कम्युनिस्ट नेते हतबल होऊ लागले. त्यातूनच मग यांची राजकीय आघाडी खिळखिळी होत गेली व आज ती नामशेष होण्याच्या टप्यावर येऊन ठेपली. केरळचा तेवढा अपवाद सोडला तर कम्युनिस्ट सर्वत्र भुईसपाट झालेत. 
मग जे.एन.यू. मध्ये बसलेल्या कम्युनिस्ट टाळक्यांना परत एकदा चळवळीत नवचैतन्य फुंकण्यासाठी नव्या स्त्रोताची गरज भासू लागली. ती गरज आंबेडकरी चळवळीतून पूर्ण केली जाऊ शकते याची जाण झाल्यावर लाल-सलामवाले तमाम नेते पद्धतशीरपणे बाबासाहेबांचं गुणगाण गाऊ लागले. कोणी बाबासाहेबांचं नाव घेतलं की लगेच भारावून जाणारा आंबेडकरी इथेही बरोबर फसला. कम्युनिस्टांना धावत जाऊन कवटाळू लागला. मग कम्युनिस्टांनी हे कवटाळणं अधीक घट्ट व्हावं म्हणून बामणाला शिव्या हासडणे सुरु केले. कम्युनिस्टांची ही युक्ती तर एकदम हुकूमी ठरली व आंबेडकरवादाच्या तमाम संघटनाच कम्युनिस्टांच्या पाया पडू लागल्या. आजवर ज्या कमुनिस्टांना बासाहेब अजिबात चालत नव्हते, आता तेच कमुनिस्ट चक्क आंबेडकरी मंचावरुन भाषण झोडू लागलीत. पण हे  झोडताना पद्धतशीरपणे लाल सलाम ठोकणे चालू होते. ज्या लाल सलामचा आंबेडकरवादाशी काही एक संबंध नाही, अन असलाच तर तो वैचारिक मतभेदाचा, वैराचा व शत्रूत्वाचा आहे, पण आता चक्क तोच लाल सलाम आंबेडकरी मंचावरुन ठोकणे  सुरु झाले. एका अर्थाने आंबेड्करी चळवळीचा हा अपमान असून आंबेडकरी मुल्यांची ही प्रतारणा ठरते. खुद्द बाबासाहेबांच्या हयातीत लाल सलाम करणारे अण्णाभाऊ साठे यांना आंबेडकरी मंचावर जागा नव्हती. आयुष्याच्या शेवटच्या टप्यात त्यांना कम्युनिस्टांची लबाडी कळल्यावर लाल सलामला सलाम ठोकून जयभीम म्हणत आंबेडकरी मंचावर ते दाखल झाले. आता मात्र जयभीम व लाल सलाम एकाच मंचावरुन म्हटले जाऊ लागले आहे. ही वैचारीक क्रांती नसून आंबेडकरी लोकांची कम्युनिस्टांद्वारे फसवणूक आहे. ब्राह्मण द्वेषाने पछाळलेल्या आंबेडकरवाद्यांच्या हातून हा अनावधानाने राष्ट्रद्रोह घडत असून अशा तमाम आंबेडकरवाद्याना लाल-सलामच्या आरोपाखाली देशद्रोही ठरवत थेट जेलात पाठवावे.

कारण कम्युनिस्ट हे कधीच राष्ट्रहिताच्या कार्यात उभे राहिलेले नाहीत. यांची बेसीक विचारधारा कार्ल मार्क्सची असून ती चळवळ रक्तपाताचा इतिहास सांगणारी आहे. यांना लोकशाही मान्य नसून कामगारांची हुकूमशाही यावी असं त्यांच्या बापानी (मार्क्सनी) लिहून ठेवलं आहे. म्हणजे उद्या जर कम्युनिस्टांची सत्ता आलीच तर ते सर्वात आधी संविधान बदलतील व साम्यवादी यंत्रणा राबवितील. त्यासाठी आज मात्र बाबासाहेबांचं नाव वापरत असून उद्याचे खरे संविधान विरोधी RSS मध्ये नसून आजच्या आंबेडकरी मंचावरच कमुनिस्टांच्या रुपात उभे आहेत. तमाम कम्युनिस्ट हे देशद्रोही असून त्यांचा रक्तरंजीत क्रांतीवर विश्वास आहे. संविधान वगैरे गोष्टी कमुनिस्टांसाठी निव्वड एक साधन असून त्यातून चळवळ वाढविणे एवढाच त्यांचा उद्देश आहे. बाकी संविधानाशी कमुनिस्टांना काही देणेघेणे नाही एवढं तमाम आंबेडकरवाद्यांनी लिहून ठेवावे. कार्ल मार्क, लेनीन व माओ हे कमुनिस्टांचे दैवत असून, रक्तरंजीत क्रांती द्वारे कामगारांची हुकूमशाही हे कमुनिस्टांचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आज आंबेडकरी मंचाचा जो वापर होत आहे ते आंबेडकरी चळवळीला तर मारक आहेच पण ते एक देशद्रोही कृत्य असून त्यात शामील होणारा प्रत्येक आंबेडकरीही तेवढाच दोषी आहे.
कन्हैया कुमार, मो. खालीद ते जिग्नेश मेवानी ही सगळी कमुनिस्टांची पिल्लावळं असून ती पद्धतशीरपणे आंबेडकरी चळवळीत घुसून लाल-सलाम ठोकत आहेत. परवा पुण्याच्या शनिवार वाड्यावर झालेल्या सभेत जिग्नेश मेवानीनी भाषणाची सुरुवात लाल-सलामनी केली आहे. हा लाल सलाम आंबेडकरी चळवळीचा कायमच शत्रू राहिला आहे. बाबा साहेबांच्या हयातीत याला आमच्या मंचावर जागा नव्हती. मग आज अचानक आमच्या मंचावरुन लाल सलाम ठोकणे हे तमाम आंबेडकरवाद्यांची दिशाभूल करणे तर आहेच, पण त्यांना आंबेडकरी मंचावरुन बोलू देणे हे स्वत:च्या विचारधारेला मारक विचारधारा स्वत:च राबविणे असला प्रकार झाला.
आंबेडकरी विचारधारेत काही गोष्टी अत्यंत सुस्पष्ट आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला हिंसा वा रक्तरंजीत चळवळ मान्य नाही. दुसरी आम्ही देशाशी गद्दारी करु शकत नाही. तिसरी आमचा लढा सामाजीक उत्थानासाठी असेल. कमुनिस्टांचे मात्र अगदी वेगळे आहे. कमुनिस्टांना क्रांती हवी असून ती रक्तरंजीतच असावी असं स्पष्ट नमूद आहे. दुसरं कमुनिस्टांना देश ही संकल्पना अमान्य असून जागतीक कामगार हाच त्यांचा देश आहे. अन तिसरी गोष्ट म्हणजे कमुनिस्टांचं मुख्य टार्गेट हे सामाजीक उत्थानापेक्षा कामगारांची हुकूमशाही असावी असं आहे. म्हणजे त्यांच्या मते कामगारांच्या हुकूमशाहीतून सामाजीक उत्थान होतो. तर आंबेडकरी विचारधारेच्या मते शिक्षणातून माणसाचं उत्थान घडतं.
असं मूलभूत फरक असलेल्या दोन विचारधारा... यातली आंबेडकरी विचारधारी ही Constructive चळवळ नि अहींसेच्या मार्गानी जाणारी एक देशभक्त चळवळ आहे. कमुनिस्ट विचारधारा अगदी याच्या उलट असून ती Destructive स्वरुपाची आहे. त्यांच्या मते शिक्षण व रोजगार याला फारसे महत्व नसून कामगारांची हुकूमशाही ही सर्व प्रोब्लेमवर एकमेव सोल्युशन आहे. अशा कमुनिस्टांना धरुन आंबेडकरी चळवळ जेंव्हा चालविली जाते तेंव्हा एकतर आपण देशाशी गद्दारी करायला निघालो आहोत किंवा खुद्द आंबेडकरी संघटनाच कमुनिस्टांच्या द्वारे स्वत:चा विनाश घडविण्याच्या दिशेनी धावत सुटल्या आहेत असे म्हणावे लागेल.  
तमाम आंबेडकरवाद्योंनो... जरा जागे व्हा. लाल सलाम हा कधीच आंबेडकरी चळवळीचा सोबती होऊ शकत नाही हे समजून घ्या. अन यापुढे आपला लढा जर दोन पाऊल मागे गेला तरी चालेल पण कमुनिस्टांच्या सोबतीने तो पुढे नेऊ नका. कारण यांच्या सोबतीने चालणे म्हणजे आत्महत्या करणे होय. कारण कमुनिस्ट स्वत: आज मृतावस्थेला पोहचले आहेत, ते तुमच्या बळाने स्वत:ला पुन:स्थापीत करु पाहात आहेत. तुम्ही उगीच त्यांच्या नादी लागून बाबासाहेबांची चळवळ कलुषीत करुन घेऊ नका. आपल्यातला ब्राह्मणद्वेष इतका टोकाला नेऊ नका की त्यातून कमुनिस्ट सारख्या राष्ट्रद्रोह्यांच्या व मानव द्रोह्यांच्या नादी लागून आंबेडकरी मुल्यांचा सत्यानाश घडेल!!!!

1 टिप्पणी:

  1. वाचला मी ब्लॉग आणि अपेक्षित होतं असाच स्वतःच्या विचारांचा गोंधळ लोकांपर्यंत पोचवून संभ्रम पसरवणे . घातक आहे हे एकूण सामाजिक चळवळीसाठी. आरएसएस चा हाच डाव आहे. अंतर्गत वैचारिक स्पर्धा लावून देऊन, संभ्रम निर्माण करणे. तुम्ही असले लेख लिहून, वाचून, पसरवून त्यांना पूरक वातावरण तयार करताय.... वेगवेगळ्या विचारधारा असला तरी ध्येय एक असला तर एकत्र येणं गरजेचं आहे.

    उत्तर द्याहटवा