शनिवार, ६ जानेवारी, २०१८

लाल सलाम-३ : सावधान... कमुनिस्ट येत आहेत.Image result for lal salaamभीमा कोरेगावात शेकडो वर्षांपासून आंबेडकरी जनता आपल्या पुर्वजाना श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असते. १९२७ पुर्वी स्थानिक पातळीवर पुर्वाश्रमीचे महार बांधव आपल्या परीने श्रद्धांजली वाहत असत. पण १९२७ साली बाबासाहेबांनी ईथे भेट दिली व तिथून पुढे हे स्थळ तमाम आंबेडकरवाद्यांसाठी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन श्रद्धांजली वाहण्याचे स्थान बनले. मागच्या २०-२५ वर्षात संपर्काची साधनं वाढलीत व प्रवासाची साधनही वाढलीत. त्याचा परिणाम म्हणून भीमा कोरेगावात भेट देणा-यांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढली. इथे कोणताही आंबेडकरी माणूस निव्वड पुर्वजांना श्रद्धांजली वाहणे एवढ्याचे हेतून येत असून अधिकांश लोकं सहकुटूंब येत असतात. कोणताही माणूस बायको व मुलांना घेऊन एखाद्या ठिकाणी भेट देत असेल तर ही गोष्ट खूप क्लिअर आहे की तो अंत:करणातून व पराकोटीच्या श्रध्देतून तिथे जात असतो. भीमा कोरेगावात येणा-या आंबेडकरी समाजाचे नीट निरिक्षण केल्यास तुम्हाला दिसेल की इथे येणारे जवळपास सगळेच सहकुटूंब येत असतात, त्यामुळे भीमा कोरेगावला १ जानेवारीत येणारीं लोकं कोणत्याही द्वेष भावनेतून वा कोणाशी लढण्या झगडण्यासाठी येत नसून ते निव्वड श्रद्धेतून व आपल्या पुर्वजांना स्मरण करण्यासाठीच येत असतात. हे झाले भीमा कोरेगावात येण्याचे कारण व त्यामागील प्रेरणा.
याच्या अगदी उलट मनात कोणतीही श्रद्धा व भावना नसताना निव्वड स्वर्थापोटी लाल सलामची यावेळेस एन्ट्री झाली. मरणासन्न अवस्थेत पोहचलेल्या कमुनिस्ट व डावे (लाल सलाम वाले) यांनी अनेक वर्षां पासून चालू असलेले आंबेडकरी जनतेचे हे श्रद्धास्थान स्वत:च्या राजकीय पुन:स्थापनेसाठी वापरायचे ठरविले. भीमा कोरेगावशी कधीच कसलाच संबंध नसलेले हे लाल सलामवाले अचानक २०० व्या वर्षाच्या निमित्ताने भीमा कोरेगावात येण्याचा कार्यक्रम आखतात व देशभर तसा प्रचार करतात. मुळात भीमा कोरेगाव हे कधीच जत्रा वा उत्सवाचे स्थान नव्हते. ते आंबेडकरी जनतेची श्रद्धेचे स्थान असून तिथे जमणारे बांधव कोणत्याच हेतूने वा राजकीय प्रेरणेने जमत नसतात. पण लाल सलामवाले मात्र २०० वी वर्षगाठचे निमित्य साधून एका अत्यंत भावनिक ठिकाणी राजकीय प्रेरणेतून उतरण्याचा प्लान आखू लागले. यात त्यांना सोबत करण्याचे पाप आंबेडकरी चळवळीतून जर कोणे बजावले तर ते प्रकाश आंबेडकर यांनी. त्यामागील कारण म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचे राजकीय स्थान तसे आधीच डगमगले असून ते आता कोणाच्या सोबतीने व कशाही मार्गाने स्वत:चं राजकीय पुनरुज्जीवन करु पाहात आहेत. त्याचाच परिणाम म्हणून ते चक्क लाल सलामला शरण गेले आहेत.
लाल सलामची टीम
कोरेगावचे श्रद्धास्थान लाल सलामसाठी वापरण्याचा घाणेरडा प्रकारे ज्यांच्या कोणाच्या डोक्यात उगवाला त्यातील काही अग्रणी नावं म्हणजे न्या. कोळसे पाटील, कन्हैया कुमार, ओमर खालीद व जिग्नेश मेवानी हे होत. न्या. कोळसे पाटील हे पुणे भागातील लाल सलामचे खंदे कार्यकर्ते आहेत. पुणे व परिसरात ते कायमच आंबेडकरी जनतेला लाल सलामचे डोस पाजत असतात. कोळसे पाटलांना कोरेगावशी काही देणे घेणे नाही. पण तिथे मोठ्या प्रमाणात आंबेडकरी जनता येते हे कळल्यावर त्यांनी आपला लाल अजेंडा तिकडे न्यायचे ठरविले. मग त्यातूनच प्रकाश आंबेडकर नावाचा गद्दार सोबतीला घेतला व देशातील तमाम लाल्यांना तिकडे पोहचविण्याची सोय लावली गेली. कन्हैया कुमार याचाही आंबेडकरी समाजाशी नि विचारधारेशी काही संबंध नाही. तो पक्का कमुनिस्ट असून कामगारांची हुकूमशाही त्याचा अजेंडा आहे. तो जरी संविधानाच्या बाता मारत असला तरी संविधान पेटविण्याची व हुकूमशाही आणण्याची शपथ घेणा-यांमध्ये तो सर्वात अग्रणी आहे. कोरेगावात लाल सलाम पोहचविण्यात त्यांनीही दिल्लीतून बरेच कष्ट उपसले. वर्षभर या लोकांनी कम्युनिस्टांची टीम कोरेगावात धाडण्याची आखणी व त्याची योग्य अंमलवजावणी यावर काम केले. या लाल सलामवाल्यांचा भीमा कोरेगावच्या शौर्यदिनाशी कोणताच भावनिक संबंध नसताना केवळ राजकीय प्रेरणेतून तिथे येण्याची तयारी करु लागले. हा हा म्हणता कमुनिस्टांची कोरेगावात धडकण्याची पूर्ण तयारी झाली व इकडे आंबेडकरी मात्र लाल सलामचा स्वार्थी लोंढा भीमा कोरेगावच्या दिशेनी येतोय या बद्दल पूर्ण अनभिज्ञ होता. प्रकाश आंबेडकर व त्यांच्या सोबत्यांनी आपल्या निळ्या झेंड्याचे छत्र लाल सलामवल्यांना बहाल करुन त्यांची भीम सैनिकांत घुसण्याची सोय लावून दिली. आजवर भीमा कोरेगावात शुद्ध अतंकरणातून निव्वड श्रद्धांजली वाहणारा समाज यायचा. पण १ जाने २०१८ मध्ये मात्र त्या जमावात कमुनिस्ट नावाचे रक्तरंजीत खेळ खेळणारे पापी शामील झाले होते. २०१८ च्या जानेवारीत भीमा कोरेगावात आंबेडकरी समाजाची दिशाभूल करुन देशद्रोह्यांना घुसविण्याचे पापक प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. मागील इतक्या वर्षांपासून तिथे येणा-या आंबेडकरी समाजाचा स्थानिकांशी कधीच वाद झालेला नव्हता. पण यावेळी निळ्या झेंड्याखाली येणारा समाज निव्वड आंबेडकरी समाज नव्हता तर त्या छायेत लपलेला लाल सलाम नावाचा गुंडही कोरेगावात दाखल झाला होता.
कोरेगावात १ तारखेला जरी कार्यक्रम होत असले तरी लोकं मात्रं दोन दिवसा आधी पासूनच दाखल व्हायला लागतात. मग हे दाखल होणारे लोकं पुणे व परिसारात जमतात. अगदी याच म्हणजे थोडं आधी दाखल होणा-या लोकांना डोळ्यापुढे ठेवून लाल सलाम वाल्यांनी पुण्यात येल्गार सभा आयोजीत केली. ३१ डिसेंबरला ती सभा झाली व तिथे जिग्नेश मेवानी आणि ओमर खालीद यांची भाषणं झाली. या भाषणांतून श्रद्धांजली बद्दल चकार शब्द बोलल्या गेलेलं नाही. निव्वड राजकीय धाटणीची ती भाषणं होती. थोडक्यात शौर्य दिनाचं निमित्य साधून डावे स्वत:ला पुनरुज्जीवित करु पाहात होते. इथला जमाव कशासाठी येतो याचं भान व ज्ञान नसलेले हे लाले स्वत:चा लाल अजेंडा रेटत होते. खालिद व मेवानी यांची भाषणं नुसती आगलावी भाषणं होती. त्या भाषणांचा व भीमा कोरेगावच्या शौर्य दिनांचा कोणताच लॉजिकल ताळमेळ बसत नाही. फक्त शौर्यदिनाच्या निमित्ताने येणारा जमाव आयता मिळाला हे पाहून यांनी आपली राजकीय दुकानदारी सुरु केली.
भीमा कोरेगावात त्या नंतर जे घडले त्याचा व या सभेचा काही संबंध आहे का? हा मुद्दा उपस्थीत होतो. मला वाटते एल्गार सभेचा व दलितांवर झालेल्या दगड फेकीचा तसा कोणताच संबंध नाही. वढू गावातून पेटलेला वाद नि त्यानंतर झालेली दगडफेक व जाळपोळ हा स्वतंत्र मुद्दा असून त्याचा कमुनिस्टांच्या एल्गार सभेशी प्रायमाफेशी तसा काहीच संबंध दिसत नाही. वढूचा वाद वेगळा आहे तर लाल सलाम वाल्यांची घुसखोरी हा वेगळा विषय आहे. या लेखात मला फक्त लाल सलाम वाल्यांच्या घुसखोरीवर बोलायचे आहे. वढूच्या वादावर उद्या वगैरे दुसरा लेख लिहेनच.
तर भीमा कोरेगावात लाल सलामवाल्यांनी जी घुसखोरी केली ती प्रकाश आंबेडकर यांच्यामुळेच होय. तिथे येणारी आंबेडकरी जनता कोणत्याच राजकीय हेतून येत नसते तर शुद्ध मनानी आपल्या पुर्वजांचं स्मरण कराण्यासाठी येत असते. त्यामुले ईथे कमुनिस्टांच काहीच काम नव्हतं. राजकीय खेळ खेळायला उभा देश पडला आहे ना... तुम्ही तिकडे जाऊन खेळा. आपली ताकद तिकडे दाखवा. पण भीमा कोरेगाव सारख्या जागी स्वत:च राजकारण घेऊन येण्याचं काही कारण नाही. पक्ष बांधनी व संघटना उभारणी करायची तर लाल सलाम वाल्यांसाठी जे.एन.यू नावाचं विद्यापिठ आंदण दिलच आहे. काय घोळ घालायचा तिथे घाला. पण ईथे यांचं काय काम. लाल सलामवाल्यांनी ज्या ज्या ठिकाणी पाय ठेवला त्याचा सत्यानाश झाला आहे. या लोकांनी जे.एन.यू विद्यापिठाची आधीच वॉट लावून ठेवली आहे. या लोकांनी कामगार चळवळी हाती घेतल्या होत्या व देशातील त्या सर्व मील व कारखान्यांची संपद्वारे पूरी वाट लावून ठेवली. यांच्या उचापत्यांमुळे सगळे कारखाने बंद पडले व कामगार बेरोजगार होऊन रस्त्यावर पोहचला. आता बेरोजगारी वाढली म्हणून हे ओरडतात पण हातात असलेला रोजगार पेटवून देण्याचे पाप या लाल सलाम वाल्यांनीच केले आहे. सोबत नक्षलवाद व सशस्त्र उठाव तर यांनी चालूच ठेवला आहे. जवळपास २५० जिल्ह्यांमधून धुडघूस घालणारा नक्षलवाद्य या लाल सलाम वाल्यांचीच देण असून या सर्व जिल्ह्यांतील विकास खुंटला आहे व तो होऊ नये म्हणून हे कायम लढत असतात. असे एकापेक्षा एक देशद्रोही कार्यात शामील असलेले हे लाल सलामवाले भीमा कोरेगावात येतातच कशाला? यांचं ईथे काय काम आहे? अन अशा देशद्रोह्यांना भीमा कोरेगावात आणून प्रकाश आंबेडकर (शनिवारवाड्यावर) सभा घेतात व आंबेडकरी जनतेला भडकविणारे भाषण ठोकतात हेच मुळात न पटणारे आहे. तुम्हाला कोणत्या जागेत काय करावं एवढही भान राहिलेलं नाही. आपल्या पुर्वजांचं शौर्य नि लढवय्येपणा याच्या स्मरनार्थ जमणारा जमाव राजकारणासाठी वापरु नये एवढीही नैतिकता प्रकाश आंबेडकरात उरली नाही. ही आंबेडकरांची लाचारी व राजकीय लालसा समाजाला मोठ्या घातकी वळणावर नेऊन उभी करणारी आहे. यातून समाजाला वाचवायचे असल्यास कमुनिस्टांना दूर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
बाकी काहिही असो... पण प्रकाश आंबेडकरां सारख्या समाज द्रोह्यामुळे आंबेडकरी चळवळीत कमुनिस्ट नावाचे देशद्रोही घुसत आहेत. वेळीच सावधान होऊन त्याना पिटाळण्याची हीच योग्य वेळ आहे. माझ्या परीने मी समाज बांधवाना एवढेच सांगेन. सावधान.... कमुनिस्ट येत आहेत.

२ टिप्पण्या:

  1. धाधांत खोटं लिहीलय आपण, रामटेके जी.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. davesh atre---काय खोटं लिहिलं , मग खरं तुम्ही लिहा ..लेख उत्तम लिहिलाय, एल्गार परिषद घ्यायचा मूळ उद्देश तोच होता..

      हटवा