मंगळवार, ६ मार्च, २०१८

त्रिपुरा: भाजपही डाव्यांच्या वाटेनी निघालाय!


Image result for tripura lenin statueईशान्य भारतात मुसंडी मारत भाजपनी कमुनिस्टांची प्रदीर्घ सत्ता उलथवून नवा इतिहास घडविला त्यासाठी अमित शाह व मोदींचे अभिनंदन. पण त्याच सोबत आलेल्या सत्तेतून जो मस्तवालपणा चालू झालाय त्यातून मात्र भाजपची स्वत:ची अपरीपक्वता नि अपात्रता अधोरेखीत होते आहे. लेनीन हा तसा काही आदर्श वगैरे मानावा या गटातला नेता नव्हता. रशियन क्रांती घडवून आणतांना अतोनात रक्तपात व कापाकापी करुन कमुनिस्ट सत्ता स्थापन करणारा तो एक क्रुरकर्माच होता. एवढच नव्हे तर त्यांनी घालून दिलेल्या पायंड्यातून पुढे रशियाचा तर सत्यानाश झालाच पण खुद्द त्याच लाल चौकातील लेनीनचा पुतळा रशियन लोकांनी पाडून टाकला ज्या लाल चौकात इतिहासात नोंदली गेलेली पहिली वहिली लाल क्रांती खुद्द लेनीनच्या हातून घडली होती. थोडक्यात लेनीन आम्हाला प्रिय वाटावा असं ना त्याचं तत्वज्ञान होतं ना त्याची राज्यपद्धती. पण याच लेनीनचा पुतळा जेंव्हा त्रिपूरातील भाजप कार्यकर्ते बुलडोजरनी पाडतात तेंव्हा इथे लेनीन हा मुद्दा बाजूला पडतो... कारण लेनीन अप्रस्तूत आहे. पण भाजपची कृती मात्र बाजूला पडण्यासारखी वा अदखलपात्र अजिबात ठरत नाही. ती दखलपात्रच ठरते. कारण... भाजपचे हे कृत्य वैचारिक क्रांती किंवा लेनीनच्या पुतळ्याला असलेला विरोध व त्यातून घडलेला प्रकार असं म्हणता येणार नाही. तसं असतं तर लेनीनचा पुतळा हटविण्यासाठी सनदशीर मार्गाने प्रयत्न व्हायला हवे होते. भाजपकडून त्यासाठी चळवळ किंवा निदर्शने व्हायला हवी होती. त्यासाठी संबंधीत शासन व्यवस्थेकडे अर्ज वगैरे देऊन पुतळा हटविला जाऊ शकला असता. जसे महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडनी दादोजीचा पुतळा हटवावा म्हणून विनंत्या, मग चळवळ व शेवटी कृती केली, तसं भाजप करु शकत होता. पण हे कधी अपेक्षीत होतं? जर भाजपला लेनीनच्या पुतळ्याला वैचारीक विरोध असता तर...!
पण तसला काही प्रकार नव्हता. लेनीनच्या पुतळ्याला विरोध वगैरे काहीच नव्हतं. अचानक सत्तेत आल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अंगात उन्माद चढला व त्या मस्तीत त्यांनी थेट लेनीनचा पुतळाच पाडला. या कृत्यामागे पुतळ्याला विरोध असण्यापेक्षा विकृत मनोवृत्तीच अधिक आहे. हा सत्तेमुळे अचानक येणारं उन्माद असून यावर  सामान्य माणसाचा आक्षेप जरुर आहे. तो कधी व्यक्ती होईल ते आज सांगता येणे नाही. डाव्यांनी केलेला अतिरेकीपणा व त्याच्या विरोधातील ही कृती असा युक्तीवाद होतोय पण ते पुतळा पाडण्याच्या कृतीला Justified नाही करु शकत. पुतळ्याला पाडण्याची कृती मस्तवालपणाचीच असून हा मस्तवालपणा सत्ताप्राप्तीमुळे येत असेल तर याचा अर्थ असा निघतो की भाजप सत्तेसाठी Disqualified आहे. सत्ता रचनात्मक कार्य करण्यासाठी दिली जाते. ती मिळाल्यावर मस्ती करायची नसते तर त्याचा इतरांसाठी सदुपयोग करायचा असतो. पण पुतळा पाडल्यांने कोणतं लोकाभिमुख कार्य घडलं ते भाजपच जाणे. बदला घेणे किंवा विरोधकांमध्ये दहशत पसरविणे या प्रकारात मोडणारं हे कृत्य असून उद्या याचा बदला घेत भाजपच्या एक दोन कार्यकर्यांचे खून पडले तर भाजपं परत ओरडा करायला मोकळा. 
परवा Victory Speech मध्ये मोदींनी सांगितलच की कसं त्यांच्या कार्यकर्त्यांची कत्तल झाली वगैरे. ते खरच असेल तर मग सत्ता मिळाल्यावर किमान भाजपनी तरी अगदी तसच वागायला नको होतं ज्या वागण्याचा भाजपला तिरस्कार नि तक्रार होती. पण भाजपं सत्तेत आल्या आल्या अगदी त्याच वाटेनी जाऊ लागला ज्या वाटेची त्यांनी काल पर्यंत तक्रार केली. सत्तेत आल्यावर भाजपनी निवडलेला मार्ग पाहता भाजपची तक्रार नक्की कशा बद्दल होती असा प्रश्न पडतो. भाजपनी सनदशीर मार्ग सोडून जी मुजोरी व विरोधकांना डिवचणे सुरु केले ते पाहता कालवरची यांची तक्रार डाव्यांच्या त्या हिंसाचाराच्या वाटेबद्दल नव्हती असचं म्हणावं लागेल. कारण आता भाजपही त्याच वाटेवर निघालाय. विरोधकांमध्ये दहशत पसरविण्याचं जे कार्य भाजपनी लगेच हाती घेतलं ते पाहता भाजप राजकारण करत नसून दहशत के बदले दहशत या तत्वावर उतरली असं म्हणावं लागेल. हा तर दोन अंडर्वल्ड टोळ्यांनी एकमेकांशी दहशतीचा खेळ खेळावा तसला प्रकार झालाय. यात सत्तेचं भान नि राजकारणाची शालीनता वगैरे अजिबात दिसत नाही. मग उद्या सत्ता पालट झाल्यावर भाजपला परत तश्याच भाषेत उत्तर मिळणार नाही हे कश्यावरुन? ते मिळणारच! म्हणजे या देशांनी दहशतीचा उद्योग वाढविण्यासाठी यांना सत्तेत बसवायचं की काय? डावे हे जगभर हिंसेसाठी ओळखले जातात. पण त्याच बरोबर त्यांचा सर्वत्र पाडाव होत गेला हा सुद्धा इतिहास आहे. भाजपही जर हिंसा, दमदाटी नि दहशतीच्या मार्गानी जात असेल तर येणा-या काळात भाजपची डाव्यांसारखी गत व्हायला वेळ लागणार नाही. त्रिपुराची घटना तर हेच सांगतेय की भाजपही डाव्यांच्या वाटेनेच जाऊ लागलाय. पण अशांना इथला मतदार धडा शिकवतो हे भाजपनी कालच पाहिलं. अशा भाजपला मतदाराच्या या निर्णयाचा २४ तासात विसर पडावा हा भाजपच्या विनाशाचा संकेत आहे, अजुन काय!

-जयभीम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा