शनिवार, ५ मे, २०१८

भुजबळ हे भ्रष्टच!

माझे लेख कधीच एखाद्या पक्ष किंवा विचारधारेला वाहिलेले नसतात. संबंधीत घटनेचं माझ्या आकलनानुसार व कुवतीनुसार केलेलं विवेचन असतं. बरेचदा यातून लोकांचा गोंधळ उडत असतो. त्यांना वाटतं की काल हा माणूस माझ्या बाजूने बोलत होता आज आचानक माझ्या विरुद्ध का बोलत आहे असा प्रश्न पडतो. पण वास्तव हे असतं की मी कधी कोणाची बाजू घेऊन बोलत नसतो तर माझं आकलन व तर्क यातून जे निघतं ते मी मांडत असतो. मग हे कधी कोणाला त्यांच्या बाजुचं वाटू शकतं तर कधी विरुद्धचं. हे सगळं अगदी लेखाच्या सुरुवातीला लिहण्य़ाचं कारण काय? कारण हा लेख भुजबळांवर आहे. यात एकतर बाजू घ्या किंवा घेऊ नका असे दोन गट असतात. मग हे गटाचे भोई डोकं गहाण ठेवून नेत्याची व पक्षाची पालखी वाहत असतात. अशा भोयांसाठी म्हणून हे खास स्पष्टीकरण सुरुवातीलाच टाकावं लागत आहे. असो.
तर अखेर काल ४ मे २०१८ रोजी भुजबळांची सुटका झाली. तब्बल २ वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगात घालविल्यावर त्याना आता जामीन मिळाला आहे. तुम्हाला अश्चर्य वाटेल पण भुजबळ सुटल्याची बातमी ऐकून माझी पहिली सहज प्रतिक्रिया आनंद झाल्याचीच होती. अन नंतर काही सेकंद सरकल्यावर मग वाटले की ’आजून एकदा न्याय व्यवस्थेला शेंडी लावण्यात लबाड लांडगा यशस्वी झाला’ असे वाटून गेले. हे असं का? कारण भुजबळांबद्दल मनात आदर नि प्रेम अनेक वर्ष जोपासला होता. बाळ ठाकरेनी जेंव्हा ओबीसी आरक्षणाच्या विरोधात भुमिका घेतली तेंव्हा शिवसेना सोडून ओबीसी लढ्यासाठी मैदानात उतरणारे भुजबळ. बाबासाहेबांचा वैचारिक वारसा नि समाजभान बाळगणारे एक सच्चे नेते म्हणून मनात घर करुन गेले. पुढे त्यांचा राजकीय प्रवास हा पुरोगामी तत्वांना धरुन यशाचे अनेक शिखरं पादाक्रांत करत गेला. महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रा बाहेरही त्यांची एक ओबीसी नेता व पुरोगामी तत्वावर चालणारा राजकारणी अशी ओळख निर्माण होत गेली. शरद पवार साहेबांच्या सोबतीने त्यांचा पुढील प्रवास हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मोलाचा तर ठरतोच, पण त्यातून त्यांनी चालविलेली सामाजीक चळवळही तेवढीच मोलाची ठरते. एकूण काय तर भुजबळांचं राजकारण ज्या  विचारधारेला धरुन होतं मी त्या विचारधारेचा असल्यामुळे मला कायमच भुजभळ आदरस्थानी होते.
पण याची दुसरी बाजू मात्र तेवढीच काळी नि तिरस्करणीय आहे. भायखळ्याच्या बाजारात भाजीपाला विकणारा एक साधा माणूस ते राजकारणात आल्यावर बनलेला कोट्याधीश, हे नेहमीच खटकायचे. वाम मार्गाने  जमविलेली माया इतकी जास्त होती की एखाद्याने किती कमवू नये हे सांगायचे झाले तर भुजबळांकडे बोट दाखवून ’इतके’ म्हणावे एवढा खो-यानी पैसा ओढला. भ्रष्टाचार हा सर्वत्रच असतो, पण ते करतांना थोडी लाज लज्जा बाळगणारेही आहेत. भुजबळ मात्र कमरेचं सोडून डोक्याला बांधलेले भ्रष्ट्राचारी होते. पुढे पुढे यांच्यातील पुरोगामी नेता गडून पडला व जो उरला होता तो निव्वड एक लबाड लांडगा होता. या लांडग्याने मग मिळेल ते लुटण्याचा सपाटाच लावला. राजकीय शक्तीची  गुर्मी नि बेफिकीरी इतकी वाढली की आपणास कोणी नखही लावणार नाही या अविर्भावात जगणे सुरु झाले. अन मग एक दिवस त्यांच्या घडा भरला आणि मग थेट दोन वर्षे तुरुंगाची हवा खावी लागली.  
आज त्यांची बेल झाली.... म्हणजे न्यायालयांनी त्यांनी अटी व शर्थी घालून बाहेर येऊ दिले एवढाच त्याचा अर्थ आहे. त्यांचे गुन्हे व केले गेलेले आरोप याची न्यायालयात ट्रायल होणे आजून बाकी आहे. त्यात जे सिद्ध होईल त्यावर मग पुढील शिक्षा ठरेल. काही लोकं मात्र जणू भुजबळांची ट्रायल झाली व ते निर्दोष सोडले गेले असा गैरसमज करुन घेतला. ट्रायल होणे म्हणजे न्यायालयात केस लढली जाणे होय. भुजबळांची ट्रायल व्हायची आहे. त्याच्या आधी चौकशी व पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया असते. आता नुसती ती प्रक्रीया पार पडली असून त्या आधारे आता ट्रायल होईल. तोवर सर्वांनी धीर धरावा. त्यात जर ते गिल्टी निघालेत तर मग शिक्षा होईल. आता गिल्टी ठरतील की नाही हे जुळवा जुळव केलेल्या पुराव्यांवर अवलंबून असते. बाकी काही असो. पण भुजबळांनी जमविलेली माया पाहता ते ट्रायलमध्ये ’No-Guilty’ ठरले तरी त्यांची पापं कमी होणारी नाही. पुराव्या अभावी सुटणे म्हणजे चारित्र्य स्वच्छ आहे असे होत नाही. न्यायदानात एक महत्वाचं तत्वज्ञान पाळलं जातं “It is better to acquit the guilty than to convict the innocent” हे तत्व पाळण्याचा हेतू हा असतो की चुकून एखाद्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये, एवढच. मग जेंव्हा पुराव्या अभावी एखाद्यावर थेट आरोप सिद्ध होत नसतील तर मग कोर्ट वरील तत्वज्ञान अवलंबित आरोपीला सोडून देते. पुराव्यांचे निकषा लावल्यावर आरोप सिद्ध होण्यात अडचण आली की आरोपी Innocent असावा या शक्यतेवर त्याला सोडले जाते. पण ही शक्यता म्हणजे तो निर्दोष आहे असे होत नाही. भुजबळ सुटले तरी ते निर्दोष नसणारच हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. कोर्टाच्या उदार धोरणाचा परिणाम म्हणून ते सुटतील एवढाच त्याचा अर्थ होतो. बाकी काही असो, पण भुजबळ हे भ्रष्टच.
बघुया, आता ट्रायल सुरु झाल्यावर काय सिद्ध होते ते!