मंगळवार, २१ मे, २०१९

वाळु माफिया

सध्या कोर्टाला सुट्या असल्यामुळे मस्त खाणे, झोपणे अन फेबूवर टिपी करणे सुरू आहे. परंतू काल सायंकाळी एक क्लायंट आला. त्याचा रेती(वाळु)चा धंदा आहे. म्हटलं काय झालं? तर तो सांगू लागला..."सायेब माझ्याकडे दोन टँक्टर्स आहेत. पावसाळा व चुरणी असते तोवर 8 महिने कमाई असते पण हे चार महिने काम मिळत नाही. मग मी वाळुचा धंदा करतो. पण पोलिसांचा खूप त्रास आहे. तसेच पटवारी व रेव्हेन्यूवाल्यांचा पण त्रास आहे. काही दिवसा आधी पटवा-यानी ट्रक्टर जप्ती करून नेली. आता पोलिसांनी दुसरी ट्रक्टर नेली. पोलिस माझ्या मागावर असून मी आठवडाभर झाला लपतोय" वगैरे स्टोअरी सांगितली. मी सगळी केस ऐकल्यावर सगळ्यात आधी पोलिस इन्स्पेक्टरला भेटायचं ठरवलं. क्लायंटला म्हटलं तु आजून दोन दिवस भुमिगत रहा मी तुझी बेल करतो. 

आज P.I. ला भेटायला गेलो. नागपूर पासून ते पोलिस स्टेशन 65 किमी दूर आहे. P.I.ला भेटलो तर त्याचं स्टोअरीचं वर्जन अगदी उलट होतं. वाळुमाफीयाची दागागिरी कशी असते, ते कसे पोलिसांच्या अंगावर धावतात, वाळु तस्करांवर कारवाई करतांना आम्हाला खूप रिस्क उचलावि लागते, हे खूप खतरनाक असतात. मी प्रामाणिकपणे वाळु तस्करी रोकण्याचा प्रयत्न व त्या अनुषंगाने कारवाई करतो वगैरे P.I. नी दुखडा ऐकवला. ते ऐकल्यावर मला पोलिसांची बाजू योग्य वाटली. शेवटी महत्वाचं काय ते बोलून बाहेर पडलो.
 
परंतू वाटेत बरेच वाळुचे ट्रक्टर सर्रास जाताना दिसले. क्लायंटचा भाऊ सोबतच होता. म्हटलं यांना का नाही धरत पोलिस? त्यावर तो म्हणला "साहेब, या आधीचा P.I. महिना रू 5000/- प्रति ट्रक्टर, प्रति महिना घ्यायचा. हा नविन P.I. रू. 20,000/- प्रति ट्रक्टर मागतोय. आम्हाला तेवढा हप्ता परवडत नाही जरा कमी करा म्हणून बोलणी केली पण हा ऐकायला तयार नाही. ज्यांनी रू 20,000/- चा हप्ता पोहचविला त्यांचे ट्रक्टर्स चालू आहेत अन आमच्यावर मात्र कारवाई सुरू आहे. रेव्हेन्यु वाल्यांचा हप्ता वेगळा, पोलिसांचा वेगळा, गाडीचा EMI वगैरे सगळं पाहता एवढा हप्ता द्यायचा तर कामही तेवढे मिळायला पाहिजे. पोलिसांना या सगळ्याशी काही देणं घेणं नसतं. त्यांना वाढीव हप्ता पाहिजे असतो, बास.
 
त्यातूनच मग एखादा कोणीतरी पोलिस व पटवा-यांशी मारामारीवर उतरतो. यामागे दादागिरी प्रकार नसून बरेचवेळा पोलिस व पटवा-यांचा अती लोभ कारणीभूत असतो. वगैरे वगैरे तो सांगत होता व मी ऐकत होतो. आज मला वाळु तस्करीचं पडद्या मागील गणित नेमकं काय असतं ते कळलं. या वाळु तस्करांना ऊभं करण्याचं काम पोलिस व पटवारीच करत असतात. मग हप्त्याची रक्कम वाढत गेली की एका टप्यावर यांचं भांडण होतं. मग कोणीतरी एखादा टोकाला जातो व त्यातून मग गाडी आंगावर घालेस्तोवर प्रकरण जाते. नेमकी ही घटना पेपरात येते व वाळु माफीयाला झोडपले जाते. पण त्याला ऊभा करणारा पोलिस व पटवारी हे मात्र निर्दोष व बिचारे म्हणून प्रोजोक्ट केले जातात.

वाळु माफिया बदमाश आहेत हे खरच आहे, पण त्याना ऊभं करणारे रिश्वतखोर पोलिस व पटवारी हे ही तेवढेच दोषी आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा