गुरुवार, १८ जुलै, २०१९

एक शेतकरीन रानातली.

(फेबुवरुन.... पुन:प्रकाशन)

नाव- सदिबाई मोतिराम आत्राम
मु. हिंदेवाडा, ता. भामरागड, जि. गडचिरोली.

काल दि. 11/06/2019 ला हाय कोर्टाचं काम घेऊन ही बाई चक्क भामरागड वरून नागपूरला आली. केसची कागदं पत्र तपासल्यावर मी आपली फीज सांगीतली. केस जरी हायकोर्टाची असली तरी तिची एकुण परिस्थीती पाहुन फीज सांगतांना खूप कमी करून सांगितली. बाईकडे तेवढे पैसे नव्हते पण पैसे चुकते करण्याचा वादा इतका प्रभावी होता की पैसे बुडणार वगैरे विचार मनाला शिवला सुध्दा नाही. तिनी आपल्याकडचे जवळपास सगळेच पैसे मला दिले व उरलेले नंतर देईन पण माझी केस तुम्ही लढा म्हणाली.
मी केसचे कागदं घेतले व आज रात्री अभ्यास करून उद्या पिटीशन तयार करतो म्हटलं. तिनी मान डोलावली. तिच्याकडे परतीचेच पैसे असावे याचा अंदाज मला आला होता, म्हणून विचारलं "मुक्काम कुठे?" एका झटक्यात बोलली "बसस्टँडवर झोपते साहेब". बाईचे पैसे घेऊन तिला बसस्टँडवर झोपवणे मला पटत नव्हतं.
मी तिला म्हटलं "तुम्ही माझ्या घरी चला" सुरूवातीला का कू करत शेवटी बाई राजी झाली. मी माझ्या अशिलाली घरी घेवून आलो. रात्री जेवणं वगैरे उरकल्यावर गावाकडच्या गप्पा मारल्या. ती माझ्या वडिलांना ओळखायची. बाबां राजकारणी होते. बाईनी वडलांच्या राजकारणातील काही आठवणी सांगितल्या. ईकड तिकडच्या गप्पा झाल्या.
नवरा काय करतो म्हणून विचारलं तर बाई स्तब्ध. जरा वेळानी विधवा असल्याचं सांगताना स्वरात एक कंपन होतं. मुलं बाळांची चौकशी केल्यावर बाई बोलू लागली... " साहेब मला तीन मुलं आहेत. 8 एकर शेती आहे. मोठा मुलगा वेगळा झाला व त्यातली 4 एकर शेती तो करतो. 2 नंबरचा मुलगा भीमराव पुंगाटी. हा भामरागड पोलिस स्टेशनमध्ये पोलिस म्हणून नोकरीवर आहे. तीसरा खालिपिली आहे. मी शेतात एकटी राबते व धान पिकवते. यावर्षी पीक बुडालं त्यामुळे हाल आहेत. पोलिस मुलगा एक पैसा देत नाही. मोठ्यांचं जेमतेम भागतं. मी इतरत्र मजुरीही करते. पण साहेब काळजी करू नका. पुढच्या पिकात धान विकून तुमचे पैसे फेडीन" मी नुसतं ऐकतच राहीलो, शब्द फुटेना. गरिबीशी भिडणारी एक वीर शेतकरीन माझ्याशी बोलत होती. पैशाचे हाल होते पण आत्मसन्मानाने जगण्याची जिद्दही दिसत होती. म्हटलं पोलिस मुलाकडून पैसे का घेत नाही? त्यावर मुलगा व सून दारातही ऊभ करत नाही साहेब. पैसे तर सोडा साधी औषधीसुध्दा घेवून देत नाहीत वगैरे लांब लचक स्टोअरी ऐकवली.
सगळं ऐकल्यावर मी तिला म्हटलं की तुम्ही कष्टानी शिकवून पोराला नोकरीवर लावलं. आता तुमचं वय 63 चालू आहे. तो पैसे देत नाही. मी तुम्हाला कोर्टातून ऑर्डर मिळवून देतो व मुलाच्या पगारातून 15% रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होतील. बाई चक्क नाही म्हणाली. "तो सुखानी जगू दे, मी राबते आपली शेतात" अशी बोलली. मी जरा मुद्दा लावून धरला... त्यावर ती जे बोलली ते ऐकूण मी हैराण झालो. बाई म्हणाली की मला मुलगी नाही साहेब. उद्या मरताना बेड धरलं तर करायला मुलगी नसल्यामुळे यांच्यांकडेच जाणं आहे. त्यामुळे नाती चिघळवायची नाहीत. ईथे मला मुलिकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन मिळाला. मी अशिलाकडून एक अनमोल धडा शिकत होतो. बाई बराच वेळ यावर बोलत होती. झोपताना जरा हुरहुरच होती.
सकाळी पहाटेच म्हणजे आमच्या आधी ऊठून बाईनी सगळं उरकलं. चहा घेताना केस बद्दल थोडं बोलणं झालं. शेवटी कोर्टाची वेळ झाली. जेवण करून कोर्टाकडे निघण्यापुर्वी तिनी दिलेल्या फीज मधील काही पैसे मी परत केले. म्हटलं आता एवढे नकोत.... राहू द्या. बाई पैसे परत घ्यायला तयार होईना. शेवटी कसेबसे घेतले, पण थोडेसेच.अन निघण्याआधी हा छानसा फोटू घेतला. हायकोर्टात गेलो. पिटिशन फाईल झाल्यावर बाई निघून गेली.
मी मात्र अस्वस्थच घरी परतलो. बाई चटका लावून गेली होती. गरिबीचा अजिबात बाऊ नाही. सही करता येत नाही. कोर्टात सगळ्या कागदांवर अंगठेच दाबले. पण थेट नागपूर हायकोर्टा पर्यत येऊन केस लढण्याची जिद्द अफाटच. जाता जाता एक वाक्य बोलली... "आपल्या रानातला एक माणूस, तुम्ही, इथे आहात म्हणून इथवर येऊ शकली साहेब, नाहीतर शक्य नव्हतं" MNC ची नोकरी सोडून वकिली सुरू केल्याचं आज चीज झालं. खूप बरं वाटलं.
पुढच्या भेटीत भामरागड पो.स्टे. ला जाणार आहे. त्या भीमराव आत्रामची वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे. किमान महीना रू. 2000/- तरी आईला मिळावेत असं काहितरी करायचं आहे. वयाच्या 60 नंतर एकट्या बाईचे हे हाल... ते ही मुलगा नोकरीवर असून. मन अस्वस्थ झालय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा