रविवार, २१ जुलै, २०१९

भागवतांची लबाड संस्कृती.


Image result for mohan bhagwatमोहन भागवतांना संस्कृतचा पुडका असणे तसे नैसर्गिकच. त्यातल्या त्यात भाजपाची सत्ता आल्या पासून ते उतू जाणे अधिकच सहज नि उत्स्फुर्त असले तरी संस्कृतची झिंग चढल्यावर ती भाषा इतरांवर लादण्याच्या हेतून त्यांनी मांडलेला युक्तीवाद मात्र केविलवाणा, फसवा नि लबाड असून यातून लोकांचा बुद्दीभेद होत आहे. संस्कृतमुळे उभ्या जगाचा उद्धार घडणार हे जे त्यांचं तत्वज्ञान आहे ते संघाच्या मुशीतील मूलभूत शिकवणीचाच भाग असल्या कारणे त्यावर फारसं भाष्य करण्याला अर्थ नाही. परंतू संस्कृत भाषा बाबासाहेबांनाही शिकायची होती असं सांगताना या वाक्याच्या मागे पुढे ती जगाचा उद्धार करणारी भाषा आहे असं रेटून सांगितल्यावर संपूर्ण कथनाचा अन्वयार्थ (interpretation) असं निघतं की बाबासाहेबांना समाजाचा उद्धार करण्यासाठी संस्कृत शिकायची होती. त्याही पुढे जाऊन उद्या ही लोकं असही म्हणतील की बाबासाहेब इंग्रजी ऐवजी संस्कृत शिकले असते तर संविधान अधिक भक्कम, अधिक व्यापक नि अधिक समावेश बनले असते. मग या स्वदेशी दस्ताचा तमाम हिंदुना कोण अभिमान वाटला असता. त्या दस्ताच्या आत काय लिहले व त्याचे कसे पालन करणे यापेक्षा ते स्वदेशी असणे एवढेच त्याचा मान-सन्मान करण्यास पुरेसे असते. अशा देशी दस्ताची दिंडी काढण्याचे कार्यक्रम तमाम चड्डीवाल्यांनी मोठ्या तल्लीनतेने तन,मन, धनानी केले असते. पण झालं नेमकं उलटंच.
बाबासाहेबांना संस्कृत शिकायची होती का? हो नक्कीच. परंतु त्यातून काहितरी अगाध दैवी ज्ञान संपादन करत जादूची कांडी प्राप्त करुन मंत्रोच्चाराने तमाम पापकांचा नाश करत पिचलेल्या लोकांचा उद्धार करणे या हेतूने त्यांना नक्कीच संस्कृत शिकायची नव्हती. त्यांचा संस्कृत शिकण्याचा हेतू दोन टप्यावर वेगवेगळा होता. विद्यार्थी जिवनात ती अभिजनांची भाषा तसेच घरातील धार्मिक वातावरण याची सांगळ म्हणून शिकायची होती. कारण तमाम धार्मिक पुस्तकं मूळ संस्कृत भाषेत असल्या कारणे ती वाचता यावी एवढाच त्याचा हेतू होता. तर चळवळीच्या काळात मात्र अगदी याच्या उलट हेतू होता. मुठभर लोकांना समाजावर अधिराज्य गाजविण्याचा अधिकार बहाल करणारे सगळे सुत्र संस्कृतमधून लिहलेल्या पुस्तकांत होते. तमाम लोकांना गुलामीत ढकलण्याचे सुत्र समजावून घेण्यासाठी बाबासाहेबांना संस्कृत शिकायची होती. ती तात्कालिन संदर्भाला धरुन सामाजिक लढ्याला अधीक धार आणन्यासाठी, चळवळीला टोकदार बनविण्यासाठीची गरज होती. तात्कालीन समाज, त्याची व्यवस्था नि संहिता यातील गफलती मामला समजावून घेण्यासाठीची ती गरज होती. थोडक्यात बाबासाहेबांना संस्कृत शिकायची होती का? तर हो होती, परंतु त्याचा हेतू संस्कृतची पुजा करणे व त्याचं कौतूक करणे अथवा त्या भाषेती महती सिद्ध होत होती म्हणून ती शिकणे असा अजिबात नव्हता. उलटपक्षीत या भाषेतून निघालेल्या तत्वज्ञानानी समाजाला मारक जे जे लिहले ते शोधून त्याची चिरफाड करत या भाषेतील ही अशी तमाम पापी ग्रंथसंपदा आगीत टाकण्याची चळवळ उभारण्यासाठी संस्कृत शिकायची होती. संस्कृत भाषा किंवा त्यातील ग्रंथसंपंदा याची त्या अर्थी सामाजिक उपयोगीत शुन्य आहे हेच सिध्द करण्यासाठी ती शिकायची होती.

आज मोहन भागवतांना अचानक संस्कृतची महती ते ही थोडी थोडकी नाही तर भारताचं वैश्विक पटलावरील स्थान भक्कम करण्यासाठीचं vital element म्हणून दिसू लागतं ही लबाडी आहे. आज विविध पातळ्यांवर आपला प्रवास बराच पुढे गेलाय. आता पिळवणूकीचं ते संस्कृतमध्ये दडलेलं समाजघातकी सुत्र समजावून घेण्याची अजिबात गरज नाही, त्यामुळे संस्कृतचीही गरज नाही. अन समाजघातकी सुत्र व देवाच्या नावानी दिलेले धमक्या  हे सोडलं तर संस्कृत वांगमयात आजून काही फारसं लिहलेलं, दडलेलं नाही. वेद वगैरे गप्पा लोकांना शेंडी लावायला ठीक आहे पण त्याची आजच्या काळात व्यवहारीक उपयोगीत तशिही शुन्य सिद्ध होते. त्यामुळे खुद्द वेदांचा अभ्यास करणा-या घरण्यातील नवी पिढी संस्कृत न शिकता आधुनिक काळातील विविध भाषा, कला, साहित्य, संस्कृती, तंत्वज्ञान, विज्ञान, जागतीक व्यापार नि राजकारणा सकट अर्थशास्त्रा सारखे विषय शिकून प्रगती करत आहे. आमच्या पुर्वजांनी ६४ कलांचा,  कौटिल्यांनी अर्थशास्त्राचा, कादंबरी सारख्य साहित्याचा, आर्यभट्टानी शुन्याचा असा अचाट नि अफाट ज्ञानसाठा संस्कृतमधून मांडून ठेवलाय त्यामुळे संस्कृतच आता आमचा उद्धार करेल असा युक्तीवाद केल्या जातो. वरील युक्तीवादत एक लबाडी आहे ती म्हणजे हे ज्ञानसंपदा असेलही पण त्याला पुढे बहुजनांसाठी बंदी घालून पेटीत दडवून २००० वर्षे लोटू दिली. त्यामुळे वरील सगळ्या क्षेत्रात तसूभरही नविन संशोधन घडले नाही व हा संदूकबंद साठा आता कालबाह्य ठरावा ईतकी प्रगती याच क्षेत्रात इतर जगात केली गेली. त्यामुळे दुर्दैवाने आज याच क्षेत्रातील पारंगता हवी असल्यास देशाबाहेर जाऊन शिकावी लागते हे वास्तव आहे.
संस्कृतमधलं तुमचं सगळच ज्ञान टाकावू ठरावं याला कारणीभूत तुम्हीच आहात. जे काही २००० वर्षा आधी केलं ते संदूकीत बंद करुन ठेवल्यामुळे युरोप व इतर जगानी त्या क्षेत्रात सातत्याने केलेली प्रगती संस्कृतमधल्या संशोधनाच्या फार पुढे निघून गेली. जर्मन, फ्रेंच, इंग्रजी, स्पॅनिश, जापनीज, चायनीज या भाषांमधून मानवी जिवनाला विविध अंगानी संपन्न करणारं संशोधन सतत चालू राहिलं. आता मानवी उत्थानाचं विवेकी सुत्र नव्याने मांडायचं आहे. त्यासाठी संस्कृतची गरज नसून जागतीक पातळीवर चिंतन, मनन नि संशोधन ज्या भाषांतून झालेलं आहे त्या भाषा शिकणे गरजेचं आहे. अन ती भाषा संस्कृत नक्कीच नाही, तर मग तिचा अट्टाहास तरी का?   
--
ऍड. एम. डी. रामटेके,
हायकोर्ट, नागपूर बेंच,    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा