गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१९

शरद पवार हटाव, राष्ट्रवादी बचाव.


Image result for शरद पवारसध्या शरद पवार अभी तो मै जंवा हू म्हणत  प्रचारात धावत आहेत. त्यांनी  राजकीय दौरे करण्याचा सपाटा लावला आहे ते स्तुत्य आहे परंतू वास्तवाला धरुन नाही.  कारण बुजुर्ग माणूस जो आता घरी बसून आराम करत पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्याच्या अवस्थेला जाऊन पोहचलाय त्यांनी स्वत:च मैदानात उडी घेणे दोन गोष्टी अधोरेखीत करते. एक म्हणजे या बुजुर्गाला सत्तेचा मोह सुटत नाही किंवा दुसरा अर्थ म्हणजे आपल्या घरात उभं केलेलं साम्राज्य चालविण्याच्या लायकीचा कोणी वारस नाही. पवारांच्या बाबतीत दुसरी शक्यता मोडीत निघते कारण त्यांचा वारसा चालवायला दुसरी पिढी सज्जही आहे नि त्यांच्यात कुवतही आहे. एवढच काय तर आता तिसरी पिढीही मैदानात उतरत आहे. त्यामुळे ८० वर्षाकडे झुकलेल्या बुजुर्ग माणसाला ’अभी तो मै जवां हू’ म्हणण्याची काहीच गरज नाही. परंतू ते तसं करत आहेत. याचा एकच अर्थ निघतो तो म्हणजे शरद पवार साहेब (ज्यांना मी लहानपणा पासून आदर्श नेता मानत आलोय) यांना सत्तेची लालसा काही सुटेना. अगदी अंगात बळ नसतांनाही उसने अवसान आणून जे काही चाचलं आहे त्यामागे एकच उद्देश दिसतो तो म्हणजे आपण उभं केलेलं साम्राज्य सध्याच्या पिढीकडे सुपुर्द करण्याची त्यांची ईच्छा नाही. म्हणजेच राष्ट्रवादीची कमान अजितदादा यांच्याकडे जावं हे थोरल्या पवारांना मान्य नाही.


खरंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष पवारांनी जिवाचं रान करुन उभं केलं त्यामुळे त्या पक्षाचं काय करायचं हे त्यांनीच ठरवावं. परंतू अजितदादा व इतर लोकांनी सुद्धा हा पक्ष बांधताना उभी हयात घालविली आहे. दादा तेंव्हा  तिशीत होते ते आता साठीचे झालेत. म्हणजे शरद पवार साहेबांचा हा पक्ष महाराष्ट्रात सर्वदूर पोहचविण्याच्या कामात अजित दादांचाही तेवढाच हातभार लागला आहे. आता निसर्ग नियमाप्रमाणे मोठे साहेब थकले आहेत व ८० कडे झुकले आहेत तेंव्हा एकूण परिस्थिती नि वयाचं भान ठेवत त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतिने हा वारसा दुस-यापिढीकडे हस्तांतरीत करायला हवं होतं. पण ते तसं करतांना दिसत नाहीत. बरं सुप्रिया सुळेकडे सुपुर्द करावा तर ताईची कुवत दादाच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे. अन चुकून माकून ताईच्या हाती डोर सोपविलीच तर मग दादा गटाचा जो बंड उसळेल तो राष्ट्रवादीला घेऊन बुडणार. अन याची जाण असल्यामुळे पवार साहेब ताईला पुढे करत नाहीयेत. या सगळ्य़ाचा एकूण परिणाम म्हणून दादाची कर्तबगारी  राजकीय़ पटलावर जेवढी ठसठशीत उमटायला हवी ती उमटली जात नाही. मग इतर नेत्यांना थोरल्या पवारांच्या मागे धावावं लागतं. अन थोरल्या पवारांनी कितीही आव आणला तरी ते आता पक्षाचे आऊटगोईंग सदस्य आहेत. ही आऊटगोईंग त्यानी स्वत: स्विकारावी.... न स्विकारल्यास  वेळ त्यांची आऊटगोईंग घडवून आणेल.  थोरले पवार जेवढा काळ पक्ष्याची धुरा स्वताकडे ठेवतील तेवढीच पक्षाची हालत खस्ता होत जाणार. कारण नव्या पिढीला आस्वस्त करण्यासाठी ८० चा पुढारी नको तर तरुण नेतृत्व हवं असतं. हे वास्तव नाकारुन साहेबांची जी मार्केटींग केली जाते की ते तरुणाना भुरळ घालत आहेत. अगदी हीच मार्केटींग पक्षाला मारक ठरत आहे. परंतू त्या बद्दल आजूण कोणी खुलून बोलायला तयार नाही. 

परंतू आता आठवड्याभरातच निवडणूका उरकुन निकाल लागतील. एकदा का हे निकाल लागले नि भाजप-सेना जर सत्तेत आली (ज्याची ९५% शक्यता आहे) की मग आयुष्यभर रक्त झिजविलेले राष्ट्रवादीचे नेते  अस्वस्थ होतील.  जे आज थोरल्या पवारांना तरुण म्हणून प्रोजेक्ट करत हिंडताहेत त्यांची कुरबुर सुरु होईल. दादांनी पक्षाचं नेतृत्व करावं  ही डिमांड पुढे येईल. कारण ज्यांनी पक्षासाठी हयात झोकून दिली ते एका  रेषेच्या पलिकडे थोरल्या पवारांपुढे गप्प बसणार नाहीत. सुखासुखी जर नेतृत्व बदल घडला तर ठीक. नाही घडलं तर मग अजितदादांना त्यांचे कार्यकर्ते गप्प बसू देणार नाहीत. एक तर ते राष्ट्रवादी सोडून जातील किंवा दादांना पक्षाची कमान हाती घ्यायला भाग पाडतील. यामागे सत्तेची लालसा नसून एक नैसर्गिक व्यवहार असेल. थोरल्यांनी नवे वारस नेमायचे असतात व आपण वयामानाने बाजूला होऊन मार्गदर्शन करायचं असतं. जिथे हा संकेत पाळला नाही गेला तिथे नव्या पिढीनी बंड करुन कमान हाती घेतली असा इतिहास आहे. फार जुन्या काळात जायची गरज नाही. अगदी मुलायम सिंग यांचा मुलगा अखिलेशचेच उदा. घ्या. बापानी पक्षाची डोर सोडायची तयारी दाखविली नाही तेंव्हा अखिलेशनी नव्या कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्ष हाती घेतला. कमीतकमी पवार साहेबांवर अशी वेळ येऊ नये, एवढी सुझबुझ त्यांनी दाखवावी म्हणजे झालं. 

आता आजून एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे पक्षाचे कर्ते धर्ते पवार साहेब आहेत. त्यांनी जावं हे सांगणारे तुम्ही कोण?  परंतू ही लोकशाही आहे व राष्ट्रवादी पक्ष हा लोकशाहीचा भाग नि संविधानाची तरतूद म्हणून उदयास आला आहे. राजकीय पक्ष कोणाच्या मालकिचा नसतो. जे कार्यकर्ते त्या पक्षात काम करतात त्यांचा असतो. राष्ट्रवादीचे  कार्यकर्ते हेच त्या पक्षाचे मालक असून त्यांच्या मतदानातून पवार साहेब अध्यक्षस्थानी आहेत. अन आता साहेबांची पक्ष सोडण्याची वेळ आली आहे. तरी नाही सोडलं तर हेच मतदार पवार साहेबांना पदावरुन खाली खेचून अजित दादांना खुर्चीवर बसवतील. कारण कार्यकर्ता जेवढा तुमचा भक्त असतो तेवढाच तो व्यवहारी सुद्धा असतो. साहेबांना अध्यक्षस्थानी बसवून आपलं भविष्य उध्वस्थ होतय हे लक्षात आल्यावर हाच कार्यकर्ता आपल्याच भाग्यविध्यात्याला, अन्नदात्याला खाली खेचतो. त्याला पवार साहेबही अपवाद नसणार.  

म्हणून म्हणतो, राष्ट्रवादी वाचवायची असेल तर शरद पवारांना हटावच लागेल. अन नाही हटले तर हटविले जातील, एवढं नक्की!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा